वैशाली शडांगुळे

आपल्या परंपरा, संस्कृती आणि जगभरातील फॅशन, आधुनिकता यांचा मेळ घालत देशी फॅशन आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करणारी फॅशन डिझायनर म्हणून वैशाली शडांगुळे यांची ओळख आहे. हातमागावरच्या कपडय़ांनाही कलात्मक साज देत जगभरात नवीन ओळख मिळवून देणाऱ्या या तरुण डिझायनरकडून ग्लोबल फॅशनची समीकरणं समजावून घेत जगभरातील फॅशन संकल्पना, त्याचे एकंदरीतच फॅशनविश्वावर उमटणारे पडसाद आणि पर्यायाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारी ग्लोबल फॅशन अशी अराऊंड द फॅशन सफर आपल्याला घडणार आहे.

सध्या सगळ्या गोष्टींचा विस्तार होतोय. फॅशनचे नवरूप बदलत चालले आहे. आत्तापर्यंत फसलेली फॅ शन आपण पाहिली, नावारूपाला आलेली फॅशनही आपण पाहिली. त्याचबरोबर काही तरी हटके या नावाने ओव्हरसाइज्ड आणि बटबटीत फॅशनही पाहिली. त्यामुळे आज जागतिक पातळीवर फॅशनकुठे आहे, हा प्रश्न असताना त्याही स्तरांवर विविध प्रकारचे कपडे आणि त्यावर प्रयोग करून पाहिले, हे उत्तर आपण देतो. ग्लोबल फॅशन आपण नेहमी विचित्र, काहीच सौंदर्य नसलेली अशी पाहिली, पण हे फक्त प्रयोग झाले आणि ती फॅशन रॅम्पपुरतीच मर्यादित ठेवली गेली हे लक्षात घ्यायला हवे. काही सिनेस्टार किंवा गायक-गायिका सोडले तर बाकी अशी फॅशनकॅरी करण्याचे धाडस कोणी दाखवू शकत नाही. लोकांना मर्यादेच्या पलीकडे जाऊन हटके काही ट्राय करून बघायची सवय होती, पण सध्या विविध देशांत आरामदायी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुटसुटीत अशा फॅशनची देवाणघेवाण होते आहे.

पूर्वी युरोपियन देशांची अर्थव्यवस्था आणि उद्योग पाहता फॅशनला त्या देशाने वाढवलं होतं. युरोपची एक फॅशन होती जी जगभरात ओळखली जायची. मध्यमवर्गीय कुटुंबापासून ते अगदी राजघराण्यातील स्त्रिया आणि पुरुषांपर्यंत नानाविध पद्धतीची फॅशनकेली जायची. तेव्हा गार्मेट्स खूप ओव्हरसाइज्ड आणि हेवी होते. आता तुम्ही युरोपमधली फॅशन पाहिली तर अगदी आरामदायी आणि लुझ तर कधी थोडे टाइट असे कपडे फॅशनमध्ये आले आहेत. हा बदल खूप मोठा आहे त्यातून लोकांची अभिरुची, राहिणीमान, लाइफस्टाइल, सांपत्तिक स्थिती किती झपाटय़ाने बदलत गेली?, याची वारंवार प्रचिती येते आणि यंदा हाच ट्रेण्ड बनत चालला आहे. ओव्हरसाइज्ड, अतिडेकोरेटेड कपडे आता लोकांना नकोयेत, मग त्यात वेडिंग सीझन असो वा रुटिन फॅशन. पूर्वी जग इतकं जवळ नव्हतं. देशोदेशी एकमेकांत फारसे संबंध नव्हते. त्यामुळे युरोपची फॅशनसोडली तर जगात दुसऱ्या कोणत्याही देशाच्या फॅशनचा एवढा गाजावाजा नव्हता, पण आता दृश्य फार वेगळे आहे. त्यामुळे आज जागतिक फॅशनही जवळ आली आहे. लोकांना विविध देशातील फॅशनआवडायला लागली आहे, त्यांना ती कळते आहे, दिसते आहे. ते त्याविषयी जाणून घेत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर आता एक प्रकारे मिक्स फॅशन पाहायला मिळते आहे. रशियन, युरोपियन, अमेरिकन, इटालियन, रोमन, चायनीज आणि जॅपनीज फॅशन जास्त अ‍ॅडॉप्ट केली जाते. लेदर जॅकेट्स आज सगळीकडे सर्रास वापरले जातात, सिल्क आज जगभरात ओळखले जाते, ब्रोकेडचा वापरही मोठय़ा प्रमाणावर होतो आहे. मी स्वत: अमेरिकेत स्वत:चे म्हणजे भारतीय फॅब्रिक घेऊन कलेक्शन सादर करते. आपल्या भारतीय फॅशनला परदेशी लोक आपलेसे करतायेत तर आपण विदेशी फॅशनही मोठय़ा प्रमाणात वापरतो. आज भारतातील डिझायनर्स बाहेरील फॅशन भारतीय रॅम्पवर आणतायेत. त्यामुळे आज विशिष्ट अशी फॅशनराहिलीच नाहीये, सर्वाचे मिश्रण झाले आहे.

भारतीय फॅशन विशिष्ट पद्धतीने राहिली नाहीये आणि वेस्टर्न फॅशनही विशिष्ट राहिली नाहीये. प्रत्येक देशाच्या फॅशनची ओळख आहेच, पण आता ती फॅशन एकमेकांत आणि दुसऱ्या देशातून मिसळली जात आहे, जे वास्तव आहे. जेव्हा आपण सगळं ग्लोबल झालंय म्हणतोय त्याचा अर्थही हाच आहे की फॅशन मिश्र पद्धतीने ग्लोबल झाली आहे. सीझन्सनुसार फॅशनमध्ये कम्फर्ट पाहिला जातो आहे. उदाहरणार्थ, थंडीत डेकोरेटेड शॉलपेक्षा लॉन्ग कोट वापरणं मुली पसंत करतात. ओव्हरडिझायनर लेदर जॅकेटपेक्षा सिम्पल वेस्टकोट किंवा सिम्पल प्लेन ब्लॅक जॅकेट त्यांना आवडतंय. मल्टिपल गार्मेट्स घालण्यापेक्षा सिंगल, लुझ थोडक्यात ईझी कपडे घालायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मानसिकतेत झालेला बदलही सहज लक्षात येतो.

हल्ली सगळीकडे सीझन आणि फॅशन असं समीकरण आहे, जे सातत्याने बदलतं आहे.दिवाळी, न्यू इअर, ख्रिसमस किंवा वेडिंग कुठलाही सीझन असो फॅशनमध्ये एम्बलिशमेंट (सजावट), ऑर्नमेन्टेशन, एम्ब्रॉयडरी आणि डेकोरेटेड असे कपडे असायचेच पण आता फ्लोई, ट्रान्सपरन्ट, कमी वजनदार, इझी, लाइट वेट, कम्फर्टेबल असे कपडे फॅशनमध्ये ट्रेण्ड सेंटर होतायेत. वेडिंगमध्येसुद्धा ओव्हरवेट किंवा ओव्हर एमब्लिशमेंट असलेले ग्लॅमरस कपडे घालणं जवळजवळ थांबलं आहे. मी हातमाग जास्त प्रमाणात प्रमोट करते. लोकांना लाइट वेट कपडे लाइफस्टाइलच्या सगळ्या टप्प्यावर आवडतात तर हीच योग्य वेळ आहे हातमागावरचे कपडे आज आपण दुसऱ्या देशात नेण्याची.. त्याला ग्लोबल करण्याची. हातमागावरचे कापड हे नैसर्गिकरीत्या लाइट वेट आणि कम्फर्टेबल आहे. शिवाय, हातमागावर विणलेले कापड फॅशनेबल करता येते. वेगवेगळ्या स्टाइल्सही निर्माण करता येतात. वेडिंग, रुटिन, फेस्टिव्हल यामध्येही हातमागावरची फॅशनसर्रास दिसते. भारताचा इतिहास पाहिला तर पूर्वी हातमागावरचे कपडेच वापरले जात होते. त्यानंतर एम्ब्रॉयडरी आणि डेकोरेशन कपडय़ांवर उतरलं होतं; कारण तेव्हा स्वातंत्र्योत्तर बरेच परदेशी भारतात आले. ब्रिटिशही होते. नंतर तर ग्लोबलाझेशन झालं. वेस्टर्नायझेशन झालं. वेस्टर्न कपडे, फॅब्रिक्स आपण वापरू लागलो. त्यामुळे तेव्हा ओव्हरसाइज्ड किंवा हेवी एम्ब्रॉयडरीचे कपडेच ट्रेण्डमध्ये आले होते. पण आता सामाजिक, आर्थिक परिस्थिती फार वेगाने बदलते आहे. लोकांचे राहणीमान आणि व्यवसायही बदलतायेत. त्यामुळे कपडे आणि त्यांची गरज ही महत्त्वाची ठरते. लोकांनी आपल्या गरजांना प्राधान्य देत, थोडं ग्लॅमर बाजूला ठेवून साध्या कपडय़ांना महत्त्व देणं सुरू केलं आहे. त्यामुळे जसा इम्पॅक्ट पडतो तशी जीवनशैली आणि फॅशनबदलत चालली आहे.

या सगळ्यामुळे एक तर आपण आपल्या देशाच्या, संस्कृतीच्या रुट्सकडे जातोय तर दुसरीकडे इतर देश आणि भारतीय फॅशन हे महत्त्वाचं समीकरण झालंय. एकीकडे आपल्याला परदेशी फॅशन युनिक वाटते तर परदेशातील मंडळींना आपल्या फॅशनमधील वैविध्य जास्त युनिक वाटतंय. सोशल मीडियाद्वारेही फॅशनची देवाणघेवाण होते आहे. त्यामुळे आपण जसं त्यांना फॉलो करतोय. आपल्याकडचे विद्यार्थी जसे तिकडे फॅशन शिकायला जातायेत तसे तिकडचे लोकही आपली फॅशनफोलो करतायेत. त्यामुळे जसं वर म्हटलं तसं आज ग्लोबली फॅशनवेगवेगळ्या देशांच्या फॅशनइतिहासाकडे पाहते आहे, रुट्सकडे पाहते आहे, ओरिजिन्सकडे पाहते आहे. आणि त्यातही भारतीय संस्कृती, इतिहास यांचा वरचष्मा राहिला आहे. भारतीय चित्रपट परदेशातही पोहोचल्याने त्यांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात भारतीय फॅशन तिथे पोहोचते. आपण जास्त फॅशनेबेल आहोत हे आता परदेशी लोकांना जाणवलं आहे. याचं कारण सर्वाना माहीत आहे की महाराष्ट्र म्हणा किंवा तामिळनाडू म्हणा. कपडे वेगळे, ऑर्नमेंट्स वेगळे आहेत.

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही किती तरी प्रकार आहेत. आपण गजरा माळतो, कुंकू लावतो, लुगडं नेसतो, नऊवारी नेसतो, पैठणी नेसतो. हे वैविध्य त्यांना जास्त आवडू लागल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण होते आहे. तोच विचार मग फॅशनच्या रूपातरॅम्पवर उतरणार आहे. हा बदल साध्या गृहस्थांपासून ते सिनेतारकांपर्यंत सगळ्यांमध्ये पाहायला मिळेल.

रुटीन फॅशनबद्दल म्हणायचे तर नव्या वर्षांत आता विंटर आणि फेस्टिव्हल सीझनच्या अनुषंगाने डीप डार्क रंग असतात तर समरमध्ये लाइट कलर, पेस्टल कलर असतात. विंटरमध्ये आता डार्क ग्रीन, बॉटल ग्रीन, नाइट रेड, डीप ब्ल्यू, मिडनाइट ब्ल्यू, मरून, मस्टर्ड कलर, वाइन कलर हे सगळे रंग जानेवारीपासून ट्रेण्डमध्ये आले आहेत. एक विशिष्ट ट्रेण्ड म्हणायचा झाला तर हिप्पी, रेट्रो, विटेंज, पर्सनलाइज्ड, लेदर, फेमिनिझम, युनिसेक्स, ट्रान्सपरंट, कम्फर्टेबल, पल्स फॅशन, प्रिंट असे प्रकार कायम राहतील. ग्लोबल फॅशनमधला नेमका बदल समजून घ्यायचा प्रयत्न आपण या सदरात केला. आता या सदराच्या माध्यमातून अराऊंड द फॅशन सफर वर्षभर सुरू राहील.

शब्दांकन : गायत्री हसबनीस