18 February 2019

News Flash

‘कट्टा’उवाच : अमुक इज द न्यू तमुक..

भाषेत सतत होणारे बदल हे बहुतांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतात.

| August 31, 2018 12:54 am

(संग्रहित छायाचित्र)

जुन्या सगळ्याच संकल्पना बदलण्याची घाई सतत तरुणाईला असते. आजकालच्या तरुणाईसाठी तर सगळ्या गोष्टी खूप पटापट जुन्या होतात. ऑर्कुट आलं, जुनं झालं, फेसबुक आलं, जुनं झालं, इन्स्टाग्राम आलं, स्नॅपचॅट आलं; चॅटिंग करण्यासाठी सुरुवातीला बीबीएम आलं, ते जुनं झालं आणि व्हॉट्सअ‍ॅप आलं. सगळ्या नवीन येत चाललेल्या गोष्टींना धडाधड ‘जुनं’ ठरवत तरुण पिढी सतत नवीन काहीतरी शोधून काढतेय. तरुणाईच्या याच स्वभावातून कदाचित ‘एबीसी इज द न्यू एक्सवायझेड’ अशा प्रकारची म्हण रूढ झाली आहे.

भाषेत सतत होणारे बदल हे बहुतांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतात. सोशल मीडियावरून आपल्या आवडीनिवडी जाहीर करणाऱ्या तरुणाईने आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी बदलल्या की त्या थेट ‘बदलल्या’ असं सांगण्याऐवजी नवीन वस्तू ही कशी जुन्या वस्तूसारखीच आहे अशा प्रकारची विधानं अर्थात स्टेटमेंट्स करायला आणि तशी स्टेटस टाकायला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, ऑरेंज इज द न्यू ब्लॅक (जी एक अमेरिकन वेब सिरीज आहे, मात्र ही चर्चा सिरीजबद्दल नसून नावाबद्दल आहे), पिंक इज द न्यू ब्लू, ऑफलाइन इज द न्यू वीकएंड, मँगो इज द न्यू चॉकलेट आइस्क्रीम, चबी इज द न्यू सेक्सी, फूड इज द न्यू बे (ुंी) वगैरे वगैरे इत्यादी इत्यादी म्हणी सोशल मीडियावर पाहायला मिळताहेत.

बदलते ट्रेण्ड्स या म्हणींच्या माध्यमातून सोशल मीडियावर फेमस करायचे तरुणाईचे प्रयत्न अगदी स्तुत्य म्हणायला हवेत. रंगांसारख्या साध्या संकल्पनेतही जुन्या रंगाच्या जागी नवीन रंग ‘रिप्लेस’ कसा होऊ  शकतो हा प्रश्न मात्र शिल्लक राहतो. संकल्पनांच्या व्याख्या बदलाव्यात किंवा त्यात काळानुसार सुधारणा कराव्यात हे जितकं खरं, तितकंच बालवाडीमध्ये शिकवलेल्या एका रंगाला दुसरंच काहीतरी म्हणणं हेही हास्यास्पद आहे! सामान्यत: आपल्या सोयीचे बदल आपण प्रस्थापित गोष्टींमध्ये करत असतो. मात्र एखाद्याच्या बालिश डोक्यातून तयार झालेल्या अशा बालिश म्हणी व्हायरल होणं आणि तरुणाईने त्या डोक्यावर घेऊ न त्यात भर घालणं हे म्हणजे ‘बदलाची सुरुवात’ किंवा ‘उत्क्रांतीची नांदी’ वगैरे काही नसून निव्वळ ‘टाइमपास’ आहे.

जुन्याच्या नावावर नवीन खपवायचं ही तरुणाईची लाडकी पद्धत आहे. त्यापेक्षा नवीन गोष्टींना ‘नवीन’ म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी लागणारी मेहनत घेतली तर तरुणाईची ‘ओरिजिनॅलिटी’ टिकून राहील.

viva@expressindia.com

First Published on August 31, 2018 12:54 am

Web Title: article about new trending language