16 January 2021

News Flash

न्यू इअर, ओल्ड सेलिब्रेशन

नाइट कर्फ्यू’मुळे आपल्या थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवरही प्रचंड मर्यादा येणार आहेत

वेदवती चिपळूणकर

अगदी लहानपणी सोसायटीतले सगळे एकत्र जमत असू, काही खेळ खेळत असू, गाणी म्हणत असू, एकत्र खाणं-पिणं करत असू आणि सोसायटीच्या आवारात फटाके लावून ‘हॅपी न्यू इअर’ म्हणत असू. तेव्हा आपल्याला त्यातसुद्धा गंमत वाटायची. हळूहळू आपण मोठे होत गेलो तशा आपल्या सेलिब्रेशनच्या संकल्पना बदलत गेल्या. मित्र-मैत्रिणींसोबत हॉटेलिंग, पबिंग, लाँग ड्राइव्ह, पार्टीज, लेट नाइट मूव्हीज अशा अनेक पर्यायांनी आता आपण न्यू इअर सेलिब्रेशन करतो. अनेक सार्वजनिक ठिकाणी रात्री फटाक्यांची आतषबाजी केली जाते. जवळजवळ रात्रभर सर्व दुकानं, हॉटेल्स, खाण्याची आउटलेट्स, आइसक्रीम कॉर्नर अशा ठिकाणी गर्दी असते. केवळ तरुणाईच नव्हे तर हळूहळू यात सगळेच सामील होऊन आनंद घ्यायला शिकले. मात्र २०२० ने आपल्याला ज्या वेगळ्या गोष्टी दाखवल्या, शिकवल्या आणि करायला लावल्या त्यात आता न्यू इअर सेलिब्रेशनचीही भर पडणार आहे. आता हळूहळू आपण सगळीकडे जायला लागलेलो असलो तरी नव्याने आलेल्या ‘नाइट कर्फ्यू’मुळे आपल्या थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवरही प्रचंड मर्यादा येणार आहेत. बाहेर जाऊन नेहमीच्या पद्धतीने मजा करता येणार नसल्याने सगळे प्लॅन्स इनडोअरपुरते मर्यादित ठेवावे लागणार आहेत.

आत्ता कुठे सगळं पूर्वीसारखं होतंय असं वाटत असताना आलेल्या या नव्या निर्बंधांमुळे सगळ्यांचाच मूडऑफ झालाय. घरात बसून काय सेलिब्रेट करणार अशा विचाराने अनेकांनी काही प्लॅन्सच केले नाहीत. मात्र काहीजण अगदी जुन्या दिवसांप्रमाणे एकत्र जमून धमाल करायच्या विचारात आहेत. मैत्रिणींच्या एका ग्रुपने एकत्र जमून सगळ्यांनी मिळून घरीच केक करायचा, रात्रभर हौजी खेळायचं आणि गप्पा मारत धमाल करायची असा बेत आखलेला आहे. तसंच आपणही घरात स्लीपओव्हर्सचे प्लॅन करू शकतो. लहानपणी सोसायटय़ांमध्ये खेळायचो तसे खेळ घरीही खेळता येतील. लॉकडाउनमध्ये आपण शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्षात उपयोग करून घ्यायची ही वेळ आहे. दालगोना कॉफी, वेगवेगळे केक, डीआयवाय क्राफ्ट या सगळ्याचा सेलिब्रेशनसाठी विशेष उपयोग होऊ शकतो. ग्रुपमधल्या प्रत्येकाने वेगेवगळे पदार्थ करून आणणं, हँडिक्राफ्टच्या वस्तूंनी डेकोरेशन करण्याची कॉम्पीटिशन ठेवणं, संगीतखुर्ची, डम्ब शेराड्स सारखे गेम्स खेळणं अशा अनेक गोष्टींनी स्वत:चं मनोरंजन करून घेता येऊ शकतं.

एका कुटुंबातल्या सगळ्या पुरुषांनी आणि मुलांनी मिळून घरातल्या बायकांना आराम द्यायचं ठरवलं आहे. कर्फ्यूच्या वेळेच्या आधीच बाहेरून डिनर आणि आइसक्रीम मागवून मध्यरात्री एकत्र आइसक्रीम पार्टी करायची ठरवली आहे. थोडं अजून क्रिएटिव्ह व्हायचं असेल तर डिनर स्वत:च बनवण्याचं चॅलेंज घ्यायलाही हरकत नाही. कर्फ्यूमुळे मिडनाइट स्नॅक्स बाहेरून ऑर्डर करण्याची शक्यता जवळजवळ संपलेली आहे. ज्यांना मूव्ही नाइट, रात्रभर ग्रुप बिंज वॉच किंवा स्लीपओव्हर्स प्लॅन करायचे आहेत त्यांना ही सोय आधीच करून ठेवावी लागेल. मात्र त्यापेक्षा एक्सायटिंग गोष्ट म्हणजे मिडनाइट कुकिंग! बाहेरून ऑर्डर करता येणार नाही याचा फायदा घेऊन मध्यरात्री दोन वाजता सगळ्यांनी मिळून पदार्थ बनवण्याची मजा काही वेगळीच!

थोडक्यात काय तर या वर्षी आपल्याला घरीच पार्टीचा माहौल तयार करून त्यात एन्जॉय करायचं आहे. घरात डिस्को लाइट्स, पार्टीवेअर आउटफिट्स, फोटोसाठी डीआयवाय प्रॉप्स, अपबीट म्युझिक आणि आवडते स्नॅक्स अशा सगळ्यांनी मिळून पार्टी नक्की सजवता येईल. कर्फ्यूचे नियम पाळून आणि तरीही आनंदाने थर्टी फर्स्ट एन्जॉय करून येत्या वर्षांला आपली मानसिक स्ट्रेग्न्थ दाखवण्याची हीच ती वेळ! त्यामुळे बाहेर जाता येणार नाही यासाठी नाराज होण्याऐवजी कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकण्यासाठी आपण आपल्याकडून सगळे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.

२०२० या वर्षांत आपल्याला अनेक गोष्टी, सवयी, पद्धती बदलाव्या लागल्या. घरात असलेल्या वस्तूंचा उपयोग करून शक्य तितकं क्रिएटिव्ह होण्याचा आपण प्रयत्न केला. मग त्यात जुन्या कपडय़ांचे नवीन कपडे शिवणं असो किंवा घरात असलेल्या सगळ्या वेगवेगळ्या पिठांचा मिळून केलेला केकचा प्रयत्न असो. स्वत:च्या गोष्टी स्वत: आणि तरीही न कंटाळता करण्याची सवय आपल्याला या वर्षांने लावली.

कमीतकमी रिसोर्सेसमध्ये जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्हिटी हे कॉर्पोरेटचं स्किल या वर्षी आपण घरात बसून शिकलो. एकच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येते हेही आपल्याला समजलं. कित्येक काळ नुसत्या स्टोअररूममध्ये असल्यासारख्या पडलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष उपयोग कळला. हा सगळा घरबसल्या मिळणाऱ्या जीवनशिक्षणाचा भाग होता.

सगळ्यात मोठा फरक पडला तो म्हणजे आपल्या शॉपिंगच्या सवयींमध्ये.. नेहमी चार-चार तास फिरून शॉपिंग करणारे आपण घरबसल्या शक्य तितक्या कमी वेळात शॉपिंग करायला लागलो. सगळं सुरळीत चालू असताना जो खर्चाचा किंवा किमतीचा विचार कदाचित केला नसता तो आता आवर्जून करायला लागलो. आपण घेत असलेली गोष्ट खरंच तितकी गरजेची आहे का आणि खरंच तिचं दिसतंय तेवढं मूल्य आहे का या सगळ्याचा आपण सगळ्या बाजूंनी विचार करायला लागलो.

संकलन साहाय्य : प्रियंका वाघुले

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2020 3:15 am

Web Title: article about new year celebration zws 70
Next Stories
1 आला डेझर्ट्सचा सण लय भारी..
2 सदा सर्वदा स्टार्टअप : व्यवसाय शोधाची प्रेरणा!
3 क्षितिजावरचे वारे : वाळूतली रेघ
Just Now!
X