शारवी कुलकर्णी

त्या दिवशी लेक लिडोच्या काठाशी निवांतपणे बसले होते. पाण्याकडे पाहताना गेल्या दोन-तीन वर्षांतल्या घडामोडी आठवू लागल्या.. जणू पाण्यावर उठणारे तरंग आणि मनातल्या विचारांची जुगलबंदीच सुरू होती. दहावीत ९६ टक्के मिळाल्याबद्दल माझा सत्कार करण्यात आला होता. अमेरिकेतील संशोधक प्राध्यापक मुकुंद चोरघडे यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. गप्पांच्या ओघात कळलं की ते फर्ग्युसन महाविद्यलयात माझ्या आजोबांचे वर्गमित्र होते. त्यांनी करिअरविषयी विचारल्यावर मला संशोधन करायचं आहे, असं मी सांगितलं. इंजिनीअरिंग आणि मेडिकलला जायचं नाही, हे मी पक्कं ठरवलं होतं. मला बायोलॉजीत संशोधन करायचं होतं. पण त्यासाठी आपल्याकडे फारशा चांगल्या सोयीसुविधा नाहीत. त्यांनी मला परदेशात जायचा पर्याय सुचवला. तोपर्यंत या पर्यायाचा विचारच केला नव्हता. विशेषत: इतक्या लवकर जाता येईल, असं वाटलं नव्हतं. पण त्यांच्या बोलण्यावर मी विचार सुरू केला. शिवाय आपल्या शिक्षणपद्धतीतील वर्षांनुवर्षांचे तेच ते ठरावीक पर्याय आणि त्या चौकटीतील करिअर मला आवडत नव्हतंच. मला आवडीच्या विषयातलेच पर्याय उपलब्ध होत असतील, तर तसे ते निवडता येतात ही गोष्ट मला महत्त्वाची वाटली. हा मोठा निर्णय घेताना विद्यापीठांची माहिती काढणं, विषयांची शोधाशोध करणं वगैरे या गोष्टी स्वत:च केल्या. तोच एक मोठ्ठा अभ्यास होता. त्यात लक्षात आलं की ते विद्यापीठ चांगलं हवं, पुढे संधी उपलब्ध व्हायला हव्यात. आपला अभ्यासविषय चांगला शिकवला गेला पाहिजे. माझं विद्यापीठ २०१८मध्ये बायोमेडिकल सायन्समध्ये यूकेमध्ये प्रथम क्रमांकावर होतं. ही सारी माहिती प्राध्यापक चोरघडे यांना पाठवल्यावर त्यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केलं.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
When a leopard came in front of Karkare couple who were giving nature education to students
पाऊलखुणा दिसताच ‘ते’ थांबले; समोर गेल्यानंतर ‘तो’ पुढ्यात उभा ठाकला; निसर्ग शिक्षणाचे धडे देणाऱ्या दाम्पत्याला…

माहिती काढल्यानंतर आईबाबांना परदेशी शिक्षणाला जाण्याविषयी सांगितल्यावर त्यांनी चटकन नकार दिला. पदवीनंतर परदेशी जावं, असं त्यांचं मत होतं. त्यांनी पैशांचं काय? स्वयंपाक येतो का?, असे काही मुद्दे मांडले. प्राध्यापक चोरघडे पुन्हा एकदा पुण्यात आल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो. पदवीनंतर आणि पदवीआधी परदेशी शिकायला पाठवण्याचे फायदेतोटे त्यांनी सविस्तरपणे आईबाबांना समजावले. प्राध्यापकांचे आणि माझे मुद्दे आईबाबांनाही पटले. पण त्यांनी विचारलं की, ‘तू तिथे जाण्यासाठी तयार आहेस का?’ मग त्यांनी बऱ्याच गोष्टींचं चक्क प्रशिक्षणच दिलं मला. मग ते स्वयंपाक शिकणं असो किंवा अन्य व्यावहारिक गोष्टी असोत. त्या गोष्टी मी प्रत्यक्षात करून बघू लागले. स्वत:ची काळजी घ्यायला त्यांनी शिकवलं. गेलं वर्ष अर्थात बारावीचं वर्ष केवळ अभ्यासामुळेच नव्हे तर या प्रशिक्षणामुळेही कठीण परिश्रमांचं वर्ष ठरलं.

बारावीचा निकाल लागल्यानंतर लगेचच मी विद्यापीठात अर्ज करायला सुरुवात केली. त्यासाठी जवळपास ९० ड्राफ्ट लिहिले होते. कारण ते तितकेच परिपूर्ण असायला हवे होते. एका सॉफ्टवेअरवर ‘गुगल’वरचा मजकूर कॉपी-पेस्ट असल्याचं कळतं. त्यामुळे अर्ज काय किंवा विद्यार्थ्यांचं लिखाण काय, ते कटाक्षाने तपासलं जातं. त्यात कॉपी-पेस्ट केलेलं आढळलं तर कारवाई होऊ  शकते. त्यामुळे सगळं लिखाण स्वत:चं स्वत:लाच लिहायला लागतं. बारावीत मला चांगले गुण मिळाल्याने ‘युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड’मध्ये बीएस्सी ऑनर्सला थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळाला. बायोमेडिकल सायन्सचा हा अभ्यासक्रम एकूण तीन वर्षांचा असून त्यात बायोकेमिस्ट्री, इम्युनॉलॉजी, फार्मोकॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी हे विषय आहेत.

मग मुद्दा आला पैशांचा. माझं मत होतं कर्ज घ्यावं. तर पैशांच्या ओझ्याखाली, ताणाखाली नवीन आयुष्याची सुरुवात नको, असं बाबाचं प्रांजळ मत होतं आणि त्यामुळे तोच पैसे भरणार होता. पण मला त्याला ताण द्यायचा नव्हता. मग मी स्टेट बँकेतून शिक्षणकर्ज घेतलं आणि त्यासंबंधीच्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता, त्यासाठीची सगळी धावपळ मीच केली. व्यावहारिक जगातला अनुभव हाही त्या प्रशिक्षणाचाच एक भाग होता, असं आईबाबांचं म्हणणं होतं. कर्ज मंजूर झाल्यावर खूपच आनंद झाला. अद्याप त्या कर्जाची परतफेड करायची आहे. मला माहिती आहे की मला काहीच जमलं नाही, तर मी बाबाकडेच जाणार आहे आणि तो मला नाही म्हणणार नाही, याची खात्री आहे. आपल्या कुटुंबाचा खंबीर पाठिंबा हा भारतीय कुटुंबसंस्थेचा यूएसपीच. असा पाठिंबा इथल्या मुलांना मिळत नाही.

आपल्या शिक्षणातला पाठांतर हा मोठा भाग असतो. इथे प्राध्यापकांना शिकवायचं असतं आणि विद्यार्थ्यांना शिकायचं असतं. आपल्याकडे हे चित्र फारसं दिसत नाही. अनेकदा काहीसा रटाळपणा, खिन्नता वातावरणात भरून राहिलेली असते. इथलं फक्त वातावरण उदाहरणार्थ ग्रंथालयातलं अभ्यासाला पोषक वातावरण, तिथे अभ्यासालाच म्हणून आलेले विद्यार्थी हे सगळं प्रकर्षांनं जाणवलं. भारतातून इथे येताना कुणी ओळखीचं नव्हतं. माणसं जोडायला लागणार, हे माहिती होतं. मला स्थिरावायला मदत करण्यासाठी आई आठवडाभर आली होती. कॅम्पस अ‍ॅकोमोडेशनचा फ्लॅट पाचजणांसोबत शेअर करते आहे. ते पोलिश, साउथ आफ्रिकन, चायनीज आणि कोरियन आहेत. त्यांचे विषय वेगळे आहेत. आता आमचं एक कुटुंबच झालं आहे. इथला पहिला महिना खूप अवघड गेला. लोक काय बोलत आहेत ते कळायचं नाही. इथला ग्लासिव्हियन अ‍ॅक्सेंट हे समजायला मोठं अवघड प्रकरण आहे. सुदैवाने प्राध्यापकांना याची कल्पना असल्याने ते विद्यार्थ्यांना कळेल, अशा तऱ्हेने बोलतात. त्यामुळे अभ्यासात काही प्रश्न आला नाही. पण मित्रमैत्रिणींशी बोलताना सुरुवातीला कळायचं नाही. मायकल या माझ्या मित्राला ‘मला कळेल असं हळू बोल’, असं सांगितलं तरी थोडंसं हळू बोलून त्याची गाडी येरे माझ्या मागल्याच असायची. आता त्यांचं बोलणं व्यवस्थित कळतं. तसं बोलणं मात्र मी कटाक्षाने टाळते आहे. मला आपले स्पष्ट उच्चारच कायम ठेवायचे आहेत.

स्वयंपाक आईने शिकवला होताच. फक्त तो दमून घरी आल्यावर करायचा कंटाळा करेन, ही खात्री असल्यामुळे ती फोनवरून त्याबाबतच्या सूचना द्यायची. सुरुवातीला ते थोडं कठीणच गेलं. घरकामाची कधीच सवय नव्हती. या कामांमुळे स्वावलंबन आपसूकच अंगी बाणलं गेलं. शिवाय काही व्यावहारिक कामंही करायची होती. हे सगळं करायचं तर तारेवरची कसरत होणार, हे कळल्यानं एक वेळापत्रक तयार केलं आणि ते कटाक्षाने पाळायचं ठरवलं. त्यामागे घरच्या प्रशिक्षणात बाबाने दिलेले व्यवस्थितपणाचे धडेही होतेच. इथे येऊन मला पाच महिने झाले आहेत; अजूनही कधी कधी एकटेपणाचा त्रास होतो. मराठी बोलायला, एखादा टिपिकल मराठमोळा किस्सा आठवला तर तो शेअर करायला कुणी नसतं. मग घरची आठवण येतेच. मात्र शिकताना अगदी ठळकपणे जाणवतं की यासाठी केला सारा अट्टहास.. स्वत:च्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी असा ‘स्व’संवाद अधूनमधून साधायला हरकत नसते.

इंडक्शनमध्ये पुढचा अभ्यासक्रम, परीक्षांविषयी माहिती दिली गेली. त्याबद्दल पूर्वकल्पना होती आणि शिकत गेले तसं आवडत गेलं. आमचं ग्रंथालय मला फारच आवडलं. दिवसातला कितीतरी वेळ मी तिथेच घालवते. ते २४ तास चालू असतं. ग्रंथालयासारखी जागा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी किती प्रवृत्त करू शकते, ते इथं आल्यावर कळतं. या इमारतीची रचना फार सुंदर आहे. तिच्या प्रत्येक मजल्यागणिक सायलेंट झोन, क्वाएट झोन, ग्रूप स्टडी, काउच आणि लाउंजची सोय आणि कॉम्प्युटर रूम्स असे विभाग आहेत. आपल्या मूडनुसार त्यातला पर्याय निवडता येतो. विद्यापीठाच्या अ‍ॅपवर कुठे, किती जागा आहे हे दिसतं. परीक्षेच्या काळात ग्रंथालय खचाखच भरलेलं असतं. तांत्रिक सुविधांमुळे पुस्तकं, रिसर्च पेपर्स मिळायला काहीच अडचण येत नाही. इथली सगळीच माणसं सुस्वभावी आहेत. इथे आल्यावर लोकांनी आपुलकीने बोलण्याचं महत्त्व फारच जाणवलं. एकूणच सगळं वातावरण अभ्यासाला प्रोत्साहन देणारं आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांला पर्सनल डेव्हलपमेंट अ‍ॅडव्हायजर असतात. माझे अ‍ॅडव्हायजर डॉ. निकोलस टकर हे मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक आहेत. मी त्यांना ईमेल करणं आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं अपेक्षित असतं. माझं वेळापत्रक त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलं. इथल्या सगळ्या प्राध्यापकांच्या शिकवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. स्वत:च्या विषयाची पूर्ण माहिती आणि अपडेट्स त्यांना असतात. इथल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष शिक्षण हा मोठा भाग असतो. शिक्षणाखेरीज आपण काय करावं किंवा नाही, याची जबाबदारी पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांवरच असते. प्रत्येक लेक्चर लहान मुलासारखं कुतूहलाने ऐकते. त्यातून असंख्य गोष्टी कळतात आणि तसं काहीतरी भारी काम करायचं आहे, असं मनाशी घोकत राहते.

बायोकेमिस्ट्रीची पहिल्याच असाइनमेंटला ४० टक्के ग्रेड होती. तिचे गुण ऑनलाइन कळणार होते. खूप घाबरले होते. पाहिलं तर ९३ टक्के मिळाले होते. वर्गाचे अ‍ॅव्हरेज गुण ६० टक्के होते. माझा विश्वासच बसत नव्हता. वर्ग सुटल्यावर तिथूनच आईला फोन करून सांगितलं. तिने खूप कौतुक केलं. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. कष्टाचं फळ मिळतं, हे कळलं. एम्युनॉलॉचा निबंध लिहायचा होता. त्यात अनेक शास्त्रीय संदर्भ द्यायचे होते. त्यासाठी चिक्कार वाचायला लागलं होतं. आदल्या रात्रभर जागी होते. थोडक्या वेळेत खूप काही लिहायचं होतं. त्यात मला ८१ टक्के गुण मिळाले. मला ते कमी वाटले. नंतर कळलं की, त्यात मी वर्गात पहिली आले होते. कुणाला त्या आसपास गुण मिळाले नव्हते. ठरावीक चौकटी नसतातच इथे. स्वत:ची स्वत:शी स्पर्धा असते फक्त.

विद्यापीठात स्पोर्ट्स आणि स्टुडंट युनियन आहेत. स्पोर्ट्स युनियनमध्ये अनेक खेळ, स्पर्धा होतात. भारतात मी खो खो खेळायचे. इथल्या रन क्लबमधून आम्ही छोटे मॅरेथॉन वगैरे इव्हेंटमध्ये धावतो आणि फिट राहातो. स्टुडंट युनियनचे वेगवेगळे क्लब, सोसायटीज असतात. मी ड्रामा सोसायटीची सदस्य आहे. आम्ही ‘द गेम ऑफ टियाराज’ हे पहिलं इंग्रजी नाटक केलं. तो अनुभव खूपच चांगला होता. तिथे खूप मित्रमैत्रिणी मिळाले. पुढच्या नाटकाचं लिखाण किंवा दिग्दर्शन करावं, असं मनात आहे. नाटकाच्या तिकीट विक्रीचे पैसे चॅरिटीला जातात. आमच्या कॅम्पसमध्ये सतत काही ना काही इव्हेंट्स होतात. त्यातून अनेकांच्या ओळखी होतात. अभ्यासातून वेळ काढला तर तो नक्कीच मिळतो. बाकी परीक्षेच्या वेळी पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित असतं. आता दुसरी सेमिस्टर नुकतीच सुरू झाल्याने थोडासा फावला वेळ हातात मिळतो आहे. आता मला नॅशनल इन्शुरन्स नंबर मिळाल्याने नोकरीच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. पुढे पाच वर्षांची पीएचडी करायचा विचार आहे. विषयनिश्चिती व्हायची आहे अद्याप.. चला, आता आटोपती घेते विचारांची जुगलबंदी. जस्ट, विश मी लक!

  शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com