20 April 2019

News Flash

वाचू ऑनलाईन

सध्या त्यांना त्यांच्या सोयीने हवं तसं हवं ते वाचण्यासाठी विविध पर्याय खुले झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती परब, स्वप्निल घंगाळे

तरुणाईला नकार देणाऱ्यांपेक्षा पर्याय निवडीचं स्वातंत्र्य देणारी व्यवस्था जवळची वाटते. वाचनाच्या बाबतीतही हेच झालं आहे. सध्या त्यांना त्यांच्या सोयीने हवं तसं हवं ते वाचण्यासाठी विविध पर्याय खुले झाले आहेत. त्यामुळे ही पिढी मनापासून वाचनात रमलीय. त्यांचं वाचन योग्य लाइनवर म्हणजेच ऑनलाइन आहे.

अलीकडे अमुकअमुक पुस्तक वाचतोय.. अशा आशयाचं स्टेटस अपडेट कमी दिसायला लागलं आणि त्याची जागा वॉचिंग वेबसिरीज या स्टेटसने घेतली. परंतु असं असलं तरी आजची पिढी साहित्याशी वेगवेगळ्या प्रकारे जोडली गेली आहे, हेही तितकंच खरं आहे. तरुणाईला नकार देणाऱ्यांपेक्षा पर्याय निवडीचं स्वातंत्र्य देणारी व्यवस्था जवळची वाटते. वाचनाच्या बाबतीतही हेच झालं आहे. सध्या त्यांना त्यांच्या सोयीने हवं तसं, हवं ते वाचण्यासाठी विविध पर्याय खुले झाले आहेत. त्यामुळे ही पिढी मनापासून वाचनात रमलीय. त्यांचं वाचन योग्य लाइनवर म्हणजेच ऑनलाइन आहे.

अभिनय क्षेत्रात मुशाफिरी करत असला तरी वाचनाची आवड असणाऱ्या विनम्र भाबलने २०१० नंतर ‘वाचनवेडा’ या नावाने फेसबुक पेज सुरू केलं. यावर पुस्तकांचीच चर्चा असते. या पेजचा नियम सोपा आहे. वाचनासंबंधी विविध पोस्ट इथे शेअर केल्या जातात. त्याचबरोबर आपण काय वाचतोय आणि कुठल्या लेखकांचं किंवा कुठल्या प्रकारचं साहित्य आपल्याला वाचायचं आहे याविषयी इथे मतं व्यक्त केली जातात. त्याचबरोबर आपण वाचलेल्या पुस्तकाबद्दल सविस्तरपणे लिहून पोस्ट करायचं. जेणेकरून इतरांची ते पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढेल. विविध लेखनप्रकाराच्या किंवा विषयानुसार पुस्तकांच्या यादींची इथे देवाणघेवाण होते. वाचकांना कोणती पुस्तके वाचायला हवीत, याची माहिती मिळते. त्यामुळे फक्त स्टेटस टाकण्यासाठी न मिरवता प्रत्यक्ष वाचणारी तरुण मुलं या पेजवरील प्रत्येक पोस्टमध्ये सहभाग घेतात. आणि स्वत: ते काय वाचतायेत ते सांगतात.

गणेश मांजरे याने पुस्तकप्रेमी हा उपक्रमही समाजमाध्यमांचा आधार घेऊन सुरू केला. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकमधून पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या तरुणाईला त्याने व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ दिलं आहे. पुण्याचा हर्षल लोहकरे हा तरुण लोकांना मोफत पुस्तकं वाटतो. आतापर्यंत त्याने तेरा हजार पुस्तकं वाटली आहेत. महागाईच्या या जमान्यात अशी मोफत पुस्तकं वाटणं परवडतं का, यावर तो म्हणाला, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा वापर करून कुणाला वापरलेली पुस्तकं भेटवस्तू म्हणून दान करायची आहेत का, असं आवाहन करतो. मग ती पुस्तकं गोळा करून महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी वाटतो. माझ्यासोबत या उपक्रमात तरुणाई जोडलेली आहे आणि वाचकांच्या रूपात भेटणाऱ्या तरुणाईचा उत्साह पाहून मला हुरूप येतो. आजही माध्यमं बदलली तरी पुस्तक वाचणारी तरुणाई असल्याचं तो सांगतो.

पुस्तकाविषयी जाणून घेऊन मग पुस्तक वाचनाला सुरुवात करणाऱ्यांसाठी ‘बुकशेल्फ’ हा चांगला पर्याय आहे. बुकशेल्फ हे पुस्तक परिचय करून देणारं यूटय़ूब चॅनल आहे. एखादं पुस्तक निवडून इथे व्हिडीओतून त्याची माहिती दिली जाते. आणि प्रत्यक्ष लेखकालाही बोलावलं जातं. आधीच्या काळात आपण ज्या लेखकांचं पुस्तक वाचायचो, त्यांची प्रत्यक्षात भेट कधी व्हायची नाही. पण या चॅनेलमुळे लेखकाचे विचार कळतात. किरण क्षीरसागर आणि हिना खान यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सकस वाचन करायचं आहे आणि तेही ऑनलाइन तर बहुविध.कॉमसारखा पर्याय आहे. याविषयी बहुविध.कॉमचे किरण भिडे म्हणाले, आम्ही पुनश्च नावाने एक संकेतस्थळ आणि अ‍ॅप सुरू केले. आता त्याचे नाव बदलून बहुविध.कॉम असे केले आहे. यामध्ये साहित्याबरोबरच सांस्कृतिक आणि मनोरंजन या विषयावरील लेखनही वाचायला मिळते. या उपक्रमाला तरुणांचा प्रतिसाद मिळणार नाही, असे सुरुवातीला वाटले होते, पण तसे झाले नाही. २० ते २६ वयोगटातील मुलंही आमच्या संकेतस्थळाची सभासद आहेत. तरुणाई वाचते आणि तिच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले तर त्याला प्रतिसादही देते, हे यानिमित्ताने अनुभवायला मिळाले.

ब्रोनॅटो या ईबुक संकेतस्थळावर नवोदित लेखकांना त्यांच्या पुस्तकाची ईआवृत्ती प्रकाशित करता येते, तसेच या संकेतस्थळावर साहित्यासंबंधी प्रश्नांचे निवारणही केले जाते. यावर प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये अधिक संख्या युवकांची आहे. असे प्रकाशक शैलेश खडतरे यांनी सांगितले.

साहित्य या उपक्रमातून जगभरातील वेगवेगळ्या वयोगटांतील, वेगवेगळ्या विचारांचे, आणि वेगवेगळ्या स्तरांतील वाचक जोडले गेले आहेत. या संकेतस्थळाला मेल करून स्वत:ला वाचक किंवा लेखक म्हणून नोंदवण्याची सोय आहे. इथे साहित्य विनामूल्य वाचता येतं. साहित्य प्रतिष्ठान हा बहुतांशी तरुण लेखक कवींचा ग्रूप. पण त्याची आता वाचन चळवळ झाली आहे.

मनोरंजनाची साधने वाढली आणि वाचनाचे प्रमाण कमी झाले. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाच्या हल्लीच्या काळात मराठी पुस्तकांना नवा वाचक मिळणे दुर्मीळ झाल्याचा सूर हल्ली वारंवार दिसतो. पण या परिस्थितीत नुसतीच चर्चा न करता आजच्या तरुण पिढीपर्यंत मराठीतील अभिजात साहित्य न्यायला हवे, या तळमळीतून अनेक तरुण पुढे आलेले दिसतात.

सध्या ऑडिओ बुक्सला लोकमान्यता मिळत असून हळू हळू ट्रेण्ड मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांबरोबरच देशातील टू आणि थ्री टायर शहरांमध्येही वेगाने पसरतो आहे. आज अनेक साइट्सवर ऑडिओ बुक्स छापील पुस्तकांच्या किमतीमध्ये किंवा त्याहून कमी पैशात उपलब्ध आहेत. २०१० पासून भारतामध्ये ऑडिओ बुक्सचा ट्रेण्ड मोठय़ा प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू लागला. मात्र सध्या भारतातील ऑडिओ बुक्सचे मार्केटिंग, तंत्रज्ञानातील प्रगती पाहता भारतीय ऑडिओ बुक मार्केट हे जगातील सर्वात झपाटय़ाने वाढणारे मार्केट म्हणून उदयास येत आहे.

पॉडकास्ट हा वाचकांना आकर्षित करण्याचा आणखीन एक नवीन प्रकार सध्या अनेकजण वापरताना दिसतात. पॉडकास्ट म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास ऑन डिमांड रेडिओ. स्नॉवेलमार्फत मागील एका वर्षांहून अधिक काळापासून पॉडकास्ट केले जाते. या माध्यमातून गद्य प्रकराचे लेखन, लेख, चर्चा, मालिका श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. पॉडकास्ट आकाराने बुक्सपेक्षा लहान असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्नॉवेलचे समीर धामणगावकर सांगतात.

पण वाचकांची आवड जपण्यासाठी आणि नवोदितांना साहित्याचं व्यासपीठ देणाऱ्या प्रतिलिपी अ‍ॅपची गोष्टच वेगळी आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधील रणजित प्रताप सिंग हा २९ वर्षांचा तरुण. वडील सैन्यात. पण तो लहानपणापासूनच त्याच्या काकांना स्वत:चं लेखन हिंदी भाषेत प्रकाशित करण्यासाठी पैशाची बचत करताना पाहत होता. तसं आपलं लेखन प्रकाशित करण्यासाठी आपली पुंजी प्रकाशकाकडे लावल्याच्या कथा भारतात नवीन नाहीत. हाच अडसर बाजूला करण्याचा ध्यास रणजितच्या मनाने घेतला. आणि मग विचार पक्का झाला. अशा अनेक मातृभाषावेडय़ांसाठी प्रकाशनाचा अडथळा दूर करून स्वभाषेतून वाचनाचं आणि लेखनाचं एक मुक्त व्यासपीठ उभं करायचा! ही कल्पना रणजितची असली तरी या प्रवासात तो एकटा नव्हता. त्याच्या साथीला होते ते त्याच्या कल्पनेशी एकमत झालेले त्याचे समवयीन शंकरनारायण देवराजन (२८), प्रशांत गुप्ता (२९), राहुल रंजन (२८) आणि सहृदयी मोदी (२६) असे आणखी चार साथीदार. या सर्वाच्या प्रयत्नांतून २०१४ मध्ये प्रतिलिपी या उपक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला हिंदी आणि गुजराती या दोन भाषांमध्ये खुलं झालेलं हे व्यासपीठ आजमितीस तमिळ, मराठी, मल्याळम, बंगाली, तेलुगू आणि कन्नड या भारतीय भाषांमध्ये चांगलंच लोकप्रिय झालं आहे.

इथे स्वभाषेतील कथा, कविता, कादंबरी, वैचारिक लेख असं बरंच काही वाचायला मिळतं. तसेच हे सर्व स्वत:च्या भाषेत प्रकाशितही करण्याची संधी मिळते. लेखक आणि वाचक या दोघांसाठीही हे व्यासपीठ पूर्णत: विनामूल्य आहे, असं प्रतिलिपीच्या मराठी विभाग सांभाळणाऱ्या प्रगती पाठक यांनी सांगितलं. तर सध्या असे अनेक ऑनलाइन वाचक पर्याय तरुणांनी तरुणांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. पुस्तकबिस्तक, वाचू आनंदे बोलभिडू.कॉम, मराठी माती, माय मराठी, ऐसी अक्षरे रसिके, बिगूल, अक्षरनामा, माय बोली अशा संकेतस्थळांवरही मुबलक प्रमाणात साहित्यविषयक वाचायला मिळतं.

वाचाला तर वाचाल याविषयी कधीच शंका नव्हती, तरुण पिढीलाही हे ठाऊक आहे, पण त्यांच्या वाचनाची माध्यमं बदलत आहेत इतकंच..

लेखनवाचन संस्कृती लोप पावतेय की काय अशी नवीन पिढीबद्दलची शक्यता वर्तवली जाते. हा विषय आपल्या सतत कानावर पडत असतो. याचं कारण म्हणजे तरुण पिढी हाताळत असलेली माध्यमं आणि उपलब्ध लेखनाचं स्वरूप यात असलेली तफावत असं म्हणता येईल. ही तफावत कमी करण्यासाठी सकस लेखन निवडून ते श्राव्य स्वरूपात रसिकांसमोर मांडणं असा नवोदित विचार घेऊन आम्ही समवयस्क तरुणांनी ‘स्नवेल’ची निर्मिती केली आहे. याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. स्नॉवेलमध्ये आम्ही पुस्तके वाचून काढत नाही. तर आम्ही लिहिलेल्या कथेमध्ये जीव ओततो. सरळ सरसकट एका टोनमध्ये कथा वाचण्यापेक्षा चांगले व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, आवाजातील चढउतार, बँक्ग्राउण्ड म्युझिकच्या मदतीने आम्ही पुस्तकातील कथेमधील भावना श्रवणीय बनवतो. पुस्तक फक्त वाचून न काढता त्याचे ऑडिओकरण करताना आम्ही त्यासाठी वेगळी स्क्रिप्ट लिहितो. ज्यामुळे ते या माध्यमामध्ये जास्त प्रभावशाली ठरते.

समीर धामणगावकर, सहसंस्थापक, स्नॅवेल

viva@expressindia.com

First Published on February 1, 2019 1:25 am

Web Title: article about online reading