vn14एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

शब्द, शब्दांचे उच्चार याबाबतीत नेहमी दोन मतं आढळतात. एक तर त्याच्या अचूकपणाबद्दल आग्रह धरणारे आणि दुसरे त्या शब्दाच्या विविध उच्चारांना का बदलता? उच्चारातला बदल हा सहज असतो तो स्वीकारला पाहिजे या मताचे. आपण कोणत्या प्रवाहात पोहायचं हे आपल्यावर आहे. आजच्या शब्दाकडे वळण्यापूर्वी हे नमनाला घडाभर तेल वाहण्याचं कारण असं की, या शब्दाचा ज्वेलरी हा उच्चार तोंडात असा बसलाय की तो बदलायचा म्हटल्यावर, काय गरज आहे? असा प्रश्न येण्याची शक्यता वाटते. तर त्यामुळे आपण लोकल बोलीतला उच्चार ज्वेलरी स्वीकारायचा की खऱ्याखुऱ्या उच्चाराला धरायचं ? हे ज्याने त्याने ठरवावं.

इंग्रजीत या शब्दाचा ‘ज्युल्री’ हा नेमका उच्चार आहे. यातला ‘ल’ अर्धा देण्याचं कारण इंग्रज या शब्दाचा असाच उच्चार करतात. ‘ल’ ला अर्धवट ठेवून. तर अमेरिकन उच्चार हा पूर्ण आहे – ‘ज्युलरी’. आपल्याकडे W हे अक्षर दिसल्यावर ‘व’ आलाच पाहिजे ही ठाम समजूत असल्यामुळे असेल पण या सायलेन्ट ‘W’ ला आपण उच्चारात प्रेमाने सामावून घेतलंय आणि ज्युल्रीचं झालं ज्वेलरी. इतक्या वर्षांचा हा तोंडी रूळलेला उच्चार बदलणं जरा कठीण होईल, पण अचूकतेचा आग्रह धरायचा म्हटलं तर ज्युल्री म्हणणं कठीण नाही.
या शब्दाच्या स्पेलिंगची सुद्धा गंमतच आहे. Jewelry  असंही एक स्पेलिंग आढळतं आणिJewellery असंही स्पेलिंग आढळतं. हा काय प्रकार आहे बुवा? असा प्रश्न स्वाभाविकच मनात येतो. तर मूळ स्पेलिंग Jewelry  असं आढळतं. लॉटिन शब्द Jocale  पासून हा ज्युल्री शब्द आला आहे. त्याचा मूळ अर्थ तर आणखीनच गंमतीचा आहे. Jocale   म्हणजे खेळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू. इतक्या भुवया उंचवू नका. पूर्वी दागिने खेळण्यासाठी वापरायचेत की काय? असा बालिश प्रश्न माझ्याही मनात आला. पण आदिम काळातले दागिने हे निसर्गातील विविध गोष्टींपासून बनवले गेले होते. खडे, पिसं, शंख-िशपले. या वस्तू म्हणजे थेट खेळण्याच्या नसल्या तरी आपल्या शाळेच्या दप्तरात हा साठा असायचा की नाही? आपल्या संग्रहातील त्या खेळणंसदृश वस्तू होत्या. त्यामुळे  jocale  हा शब्द समांतर ठरतो. पण मौल्यवान धातूपासून दागिने बनू लागल्यावर त्यावरचा खेळणं सदृश  हा छाप मिटला आणि ‘दागिना’ हा अर्थ निश्चित झाला.
आता वळूया  jewellery  कडे. हे स्पेिलग युरोपियन इंग्लीशने स्वीकारले आहे. स्पेिलग भिन्न असली तरी उच्चार मात्र तोच. ज्युल्री किंवा ज्युलरी. दागिने बनवणारा तो ज्युलर. सराफासाठी असलेल्या या शब्दाची व्याख्या डिक्शनरित तपासताना आणखी एक इंटरेस्टींग शोध लागला. ज्युलर म्हणजे दागिने किंवा घड्याळे घडवणारा किंवा प्रसंगी दुरुस्त करणारा. घड्याळजीलासुद्धा ज्युलरच म्हटलंय. पूर्वीच्या काळातल्या घडयाळांचं मौल्यवान असणं वा त्यातल्या हिरे मोत्यांच्या वापरामुळे कदाचित हा संबंध जोडला गेला असावा.
एकंदर या उच्चाराकडे पाहता, ज्युल्री किंवा ज्युलरी आपल्या ओठात रूळलं तर काही गोष्टींचे उच्चार कसे बदलतील? ‘ज्वेलथीफ’ चित्रपटाचं नाव ‘ज्युलथीफ’ उच्चारावं लागेल. ज्वेल ऑफ इंडिया कोहिनूर होईल ज्युल ऑफ इंडिया. बघूया ओठात हा उच्चार बसतोय का? प्रयत्न करायचे म्हटलं तर अशक्य काहीच नाही.
viva.loksatta@gmail.com