17 July 2019

News Flash

लेट्स री-मॉडल

एकविसाव्या शतकातील लोकांसाठी फिटनेस आणि इको-कॉन्शस्नेस फार महत्त्वाचा ठरतो आहे

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

री-मॉडलिंगची संकल्पना सध्या प्रभावी ठरते आहे. यामध्ये तुमच्या कपडय़ात काही एक छोटे-छोटे बदल करून त्याला नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला जातो आणि जे कपडे निकालात निघणार असतात ते पुन्हा फॅशनेबल म्हणून वॉर्डरोबमध्ये इन होतात.

एकविसाव्या शतकातील लोकांसाठी फिटनेस आणि इको-कॉन्शस्नेस फार महत्त्वाचा ठरतो आहे. त्यामुळे साहजिकच लोकांचा ओढा वापरून फेकून देण्यापेक्षा इकोफ्रेंडली पर्यायांचा वापर करीत री-सायकल, अपसायकल करून पुन्हा वापरात आणणाऱ्या फंडय़ांकडे वळतो आहे. हेच हेरून सध्या बाजारात आणखी एक नवी संकल्पना जोर धरते आहे ती म्हणजे री-मॉडलिंग. ‘री-मॉडलिंग’ला मेकओव्हर अशीही ओळख आहे. प्रदूषणाच्या बाबतीत टेक्स्टाइल इंडस्ट्री दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेक्स्टाइलच्या प्री ते पोस्ट अशा सगळ्याच पायऱ्यांवर काही ना काही वेस्ट मटेरिअल बाहेर पडत असतं. या वाढत्या वेस्ट मटेरिअलची समस्या इंडस्ट्रीला भेडसावू लागली असल्याने या वेस्ट मटेरिअलचे विघटन करण्याऐवजी रिसायकल, अपसायकल करणे असे पर्याय वापरले जात आहेत. त्यामुळेच की काय री-मॉडलिंगची संकल्पना सध्या प्रभावी ठरते आहे. यामध्ये तुमच्या कपडय़ात काही एक छोटे-छोटे बदल करून त्याला नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला जातो आणि जे कपडे निकालात निघणार असतात ते पुन्हा फॅ शनेबल म्हणून वॉर्डरोबमध्ये इन होतात.

एखादे वेळी आपण वापरत असलेल्या कपडय़ावर किंवा कपडय़ाला काही तरी छोटासा डाग पडतो किंवा तो फाटतो. अशा वेळी आपल्याला तो कपडा फेकून देण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही; पण री-मॉडलिंगने तुम्ही तुमच्या ड्रेसला वेगळाच लुक देऊ न तो पुन्हा वापरू शकता. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या टॉपवरती नेमक्या मध्यभागी तेलाचा डाग पडला तर? एक तर तो डाग सहजी काही जायचं नाव घेत नाही. अशा वेळी त्या डागाच्या ठिकाणीच जर आपण एखादं कापडी फूल लावलं किंवा त्या ठिकाणी शोभून दिसेल अशा कापडाचा पॅच लावून एम्ब्रॉयडरी केली, तर त्या ड्रेसचा लुकच बदलून जातो. तुम्ही तो टॉप पुन्हा वापरू शकता आणि त्याला नवा लुक मिळाल्याने तो आधीसारखा कंटाळवाणा राहत नाही. अशा प्रकारे री-मॉडलिंगच्या मदतीने आपल्या रोजच्या कपडय़ांवर छोटे छोटे बदल करून त्यांनाही नवीन लुक सहज मिळवता येतो. मूळच्या कपडय़ाला जास्त काहीही न करता री-मॉडलिंग केलं जातं.

बाजारात काही काळानंतर नवनवीन ट्रेण्ड येत असतात आणि त्यानुसार फॅशन करायला कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला ट्रेण्डनुसार कपडे हवेच असतात; पण दर वेळी ट्रेण्डी कपडे विकत घेणं शक्य होईलच असं नाही. मग अशा वेळी आपल्या वॉडरोबमध्ये असलेल्या कपडय़ांना बाहेरचा मार्ग दाखवण्यापेक्षा कल्पकतेने री-मॉडेल करा. ट्रेण्डनुसार त्यात छोटे छोटे बदल करा आणि नवीन फॅशन म्हणून मिरवा.री-मॉडलिंगच्या या काही टिप्स..

१. जुन्या पण अजूनही उत्तम परिस्थितीत असलेल्या टी-शर्टवरती तुम्ही बाजारात मिळणारे रेडीमेड स्टिकर्स लावू शकता.

२. स्टिकर्सप्रमाणे तुम्ही दुसऱ्या टी-शर्टवरती असलेली प्रिंट व्यवस्थित कापून फॅब्रिक गमने ती चिकटवू शकता.

३. बाजारात नेटची डिझाईन असलेल्या ड्रेसची फॅशन ट्रेण्डमध्ये असेल तेव्हा तुम्ही ती तुमच्या साध्या प्लेन टॉपवरही करू शकता. यासाठी तुम्ही एखाद्या वापरात नसलेल्या नेटच्या ओढणीचा वापर करू शकता. ओढणीमधील डिझाईन नीट कापून ते टॉपवर लावू शकता.

४. एखाद्या कुर्तीला किंवा टॉपला स्लीव्हच्या ठिकाणी स्लीव्हज फोल्ड केल्यावर लावण्यासाठी एक छोटा बेल्ट असतो. तो बेल्ट आऊट ऑफ  फॅशन वाटत असेलतर तो काढून इनफॉर्मल शर्टवरती लावू शकता.

५. अनेकदा आपल्या कपडय़ांची अवस्था वाईट होते; पण त्यावरती असलेली झिप मात्र अजूनही छान असते. अशा वेळी ती झिप नीट काढून तुम्ही ती दुसऱ्या कोणत्याही कपडय़ावर फक्त शो झिप म्हणूनही लावू शकता.

आपला ड्रेस, टॉप किंवा कुर्तीवर असलेल्या अनेक गोष्टी काही काळानंतर आपल्याला आवडेनाशा होतात. अशा वेळी तुम्ही त्या सहज बाजूला काढून ठेवू शकता आणि त्याचा वापर दुसऱ्या कपडय़ांचा न्यू लुक देण्यासाठी करू शकता. री-मॉडलिंगसारख्या संकल्पनेमुळे पोस्ट कन्झ्युमर वेस्टला थोडा तरी आळा बसेल आणि जुन्यातून नव्याची निर्मिती झाल्याने त्याचा थेट फायदा आर्थिक उलाढालींतही दिसेल. मोठमोठय़ा गारमेंट इंडस्ट्रीमधून निघणारा हा कचरा किंवा वेस्टही एकत्र केलं जातं आणि त्याचा वापर पुन्हा दुसऱ्या गोष्टीसाठी केला जातो. आपल्याकडे हे वेस्ट मॅनेजमेंट आणि वितरण करणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या गारमेंट इंडस्ट्रीमध्ये निघालेला कचरा म्हणजे कापडाचे छोटेमोठे तुकडे गोळा करून मग ते ज्यांना गरज आहे त्यांना किलोच्या हिशोबाने विकत देतात. यामध्ये असे कापडाचे तुकडे विकत घेणारे कोण असतात, याचाही विचार केला तर अनेक पर्याय समोर येतील. मात्र या सगळ्या गोष्टी मोठय़ा कंपन्या, बाजारपेठेशी संबंधित असतात. घरच्या घरी मात्र री-मॉडलिंग या संकल्पनेचा वापर आपल्याच जुन्या कपडय़ांना नवे रूप देण्यासाठी केला जातो आहे. एखाद्या फाटलेल्या जीन्सला शॉर्टचं रूप दिलं जातं, याच शॉर्टला एखाद्या कपडय़ाचा फ्रिलसारखा वापर करून तो जोडत त्याचा स्कर्ट होतो. एखाद्या प्लेन ड्रेसला फाटलेल्या ठिकाणी रफू करण्याऐवजी ब्रोचचा वापर करून वेगळा लुक दिला जातो. साडीच्या वापरातून नवीन कुर्ती किंवा टॉप जन्माला येतो. री-मॉडलिंग करून आपली आपणच फॅशन घडवणे खर्चीकही नाही आणि अवघडही नाही. त्यामुळे सध्या ही संकल्पना वेगाने लोकप्रिय होताना दिसते आहे.

First Published on December 7, 2018 2:27 am

Web Title: article about re modeling