राधिका कुंटे viva@expressindia.com

फार्मसी शाखेतल्या संशोधानाचे एकेक टप्पे पार करत, तांत्रिक कौशल्य आत्मसात करून औषधी वनस्पतींचा वापर मूत्राशयाच्या विकारांवर करता येऊ शकेल का, याचा शोध घेते आहे मृणाल किंजवडेकर. जाणून घेऊ या तिच्या संशोधनाविषयी.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

काही वेळा काही आपल्या माणसांचं आपल्या भोवताली असणं, हे आपलं आयुष्य किती उत्तमरीत्या बदलून टाकतं त्याचं एक उदाहरण म्हणजे मृणाल किंजवडेकर. तिच्या घरी या क्षेत्रातलं कुणीच नाही. शालेय जीवनात तिला नेहमीच चांगले गुण मिळाल्याने ती विज्ञानशाखेत चांगलं करिअर करू  शकेल, असं तिच्या पालकांना वाटलं. तिला बायोलॉजीमध्ये रस होताच. पुढे बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्राविषयी रस होता खरा, पण तितके गुण पडले नाहीत. तरी त्याच्याशी निगडित क्षेत्राची माहिती तिच्या आई-बाबांनी काढली आणि फार्मसीमध्ये करिअर होऊ शकेल असं ठरलं. मृणाल पुण्यात भारती विद्यापीठाच्या ‘पुना कॉलेज ऑफ फार्मसी’मध्ये बॅचलर ऑफ फार्मसी करत असताना तिच्या गाईड होत्या डॉ. सुनीला धनेश्वर. त्या मेडिसिनल केमिस्ट्री हा विषय शिकवायच्या. त्यामुळे तिला फार्मसीमध्ये रस वाटू लागला. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना थोडी संशोधनदृष्टी मिळाली. त्यांनी तिला या क्षेत्रातल्या पुढच्या संधींची कल्पना देत मोलाचा सल्ला दिला. त्या सुमारास मृणाल आणि वेदांग किंजवडेकर यांची भेट झाली. तो तिचा कायमचा फ्रेण्ड- गाईड- फिलॉसॉफर आणि नंतर जीवनसाथीही झाला. वेदांग मृणालला नेहमीच भक्कम पाठिंबा, प्रोत्साहन आणि प्रेरणा देतो.

बी.फार्मनंतर मृणालने ‘जीपीएटी’ परीक्षा दिली होती. तिने चेंबूरच्या ‘विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी’ इथे एम.फार्म केलं. तिच्या क्वॉलिटी अ‍ॅशुरन्स या विषयाची फार्मा इंडस्ट्रीमध्ये खूपच महत्त्वाची भूमिका असते. मास्टर्सला तिच्या गाईड होत्या डॉ. दीपाली गांगराडे. त्यांच्यामुळे तिला नवी मुंबईत ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्समध्ये काही महिने प्रशिक्षण घ्यायची संधी मिळाली. तिने अ‍ॅनालिटिकल आरएनडीमध्ये काम केलं. तिथे तिला केमिस्ट्री आणि अ‍ॅनालिटिकल थिंकिंगची गोडी लागली. मास्टर्सनंतर तिने पुण्यात ‘ल्युपिन रिसर्च पार्क’मध्ये अ‍ॅनालिटिकल आरएनडीमध्ये नोकरी केली. त्या वेळी तिला काही आधुनिक साधनांसह काम करायची संधी मिळाली. आयसीपीएमएस हे तंत्र खूप कमी लोकांना आत्मसात करता येतं. एखाद्या पदार्थात काही अंशी अन्य घटक असतात, ते कोणते हे या तंत्राने ओळखता येतात. तिथले व्यवस्थापक बालकृष्णन स्वामीदास यांच्या सहकार्यामुळे हे तंत्र तिला शिकायला मिळालं.

हे काम सुरू असतानाच मुंबईतील ‘बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी’मधल्या डॉ. वैशाली शिरसाट आणि डॉ. कृष्णप्रिया मोहनराज यांच्या प्रकल्पाला सरकारकडून निधी मिळाला होता. त्यासाठी ज्युनिअर रिसर्च फेलो नेमण्यासाठीची जाहिरात त्यांनी पेपरमध्ये दिली होती. मृणाल सांगते, ‘वेदांगमुळे मला या संदर्भात कळलं आणि मी अर्ज केला. दोन-तीन टप्पे पार पडले आणि ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून डीएसटी डीपीआरपीच्या ‘नॅशनल फॅसिलिटी फॉर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन इन्टिग्रेटेड अ‍ॅनालिटिकल स्ट्रॅटेजीज फॉर डिस्कव्हरी, डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड टेस्टिंग ऑफ ड्रग्ज, फार्मास्युटिकल्स अ‍ॅण्ड न्यूट्रास्युटिकल्स’ या प्रोजेक्टसाठी माझी निवड झाली. त्या प्रकल्पासाठी आयसीपीएमएस, एलसी – एमएस/एमएस आणि एचपीटीएलसी- विथ एमएस इंटरफे स या तीन आधुनिक आणि महाग यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या होत्या. डॉ. वैशाली शिरसाट आणि डॉ. कृष्णप्रिया मोहनराज यांच्या प्रकल्पात मलाही रस वाटला आणि त्यामुळे २०१८ मध्ये डॉ. वैशाली शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली इथेच मी पीएचडीसाठी प्रवेश घेतला. मूत्राशयाचे विकार (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन- यूटीआय) हे विशेषत: स्त्रियांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात संक्रमण करतात. त्यासाठी बाजारात बरेच अ‍ॅण्टिबायोटिक्स उपलब्ध आहेत, पण बहुतेक सूक्ष्मजीवांनी प्रतिजैविकांना प्रतिकार करण्यास सुरूवात केल्याने उपचार कुचकामी ठरतात. माझं संशोधन प्रतिरोधक यूरोपॅथोजेनवर औषधी वनस्पतीच्या साहाय्याने उपाय शोधण्यावर आणि क्रियाशीलता देण्यासाठी जबाबदार असलेल्या वनस्पतीपासून बायोमार्कर शोधण्यावर भर देतं. नैसर्गिक उत्पत्ती असलेल्या वनस्पतींचे कमीत कमी दुष्परिणाम असतात. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये यूटीआयची अधिक शक्यता असते. नैसर्गिक उत्पत्तीचा हा शोध निश्चितपणे सर्व प्रकारच्या यूटीआयवर मात करण्यात मदत करेल.’

या संशोधनात सक्रिय फायटोकॉनस्टिंटियंट्स वेगळे करण्यासाठी, वेगवेगळ्या एक्स्ट्रॅक्शन टेक्निक्स वापरून, नैसर्गिक उत्पादनांचा अभ्यास केला गेला. त्यानंतर या वेगवेगळ्या अर्काचा अभ्यास यूटीआयसाठी कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजीवांविरुद्ध क्रियाशीलतेसाठी केला गेला. त्या अर्काचा अभ्यास वेगवेगळ्या विश्लेषणात्मक तंत्राचा वापर करून त्यामध्ये उपस्थित फायटोकॉनस्टिंटियंट्सच्या ओळखीसाठी केला गेला. विषाणूला कारणीभूत ठरणाऱ्या किमान डोसबद्दल कल्पना मिळावी म्हणून त्या अर्काचा उंदरावरील विषारीपणाबद्दल सखोल अभ्यास केला गेला. युरीनरी ट्रॅक इन्फेक्शनवरच्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या डोसबद्दल कल्पना मिळण्यास मदत होते. त्याचे काही दुष्परिणाम असल्यास कळून येतात. क्रियाशीलतेसाठी विशिष्ट जबाबदार फायटोकॉनस्टिंटियंट्सदेखील समजून घेऊन आणि त्यांचा अभ्यास करून ते कृत्रिमरीत्या तयारही होऊ शकतील. कोणत्याही क्रियाशीलता आणि वापरासाठी सुधारित केले जाऊ शकतील. हे संशोधन करताना अनेक प्रकारचे अभ्यास आणि शैलींचा अभ्यास करणं आवश्यक असतं आणि सर्व शैलींचा अचूक वापर केला तरच उत्तमरीत्या काम होऊ शकतं. माझ्या पीएचडीचं हे चौथं वर्ष असून यंदा माझं काम पूर्ण करू शकेन, असं आशादायी चित्र दिसत असल्याचं ती सांगते.

अर्थात हे सगळं इतकं सुरळीतपणे घडलेलं नाही. आपल्याकडे ग्रामीण भागात औषधी वनस्पती अजूनही उपयोगात आणल्या जातात. त्यात पुन्हा जैवविविधता आहेच. त्यामुळे अभ्यासताना ती वनस्पती नीट पडताळून घ्यावी लागते. या अभ्यासासाठी अनेक सहकारी- ज्येष्ठांचा सल्ला वेळोवेळी लाभला. कोणताही क्लिनिकल स्टडी उंदीर किंवा अन्य जीवांवर केल्याखेरीज माणसावर केल्या जाऊ शकत नाहीत. या प्रकल्पात उंदरांवर संशोधन केलं. अभ्यासासाठी प्राण्यांची ऑर्डर सांगणं आणि लॉकडाऊन होणं या गोष्टींचा योग अगदीच जणू जुळून आला. प्राणी पुण्याहून मागवायचे असल्यामुळे तो अभ्यासाचा भाग अल्पकाळासाठी थांबला. शिवाय प्राणी म्हटल्यावर त्यांची बाकी निगा राखण्यासाठी अभ्यासकाने लॅबमध्ये हजर असणं गरजेचं असतंच. ऑक्टोबरमध्ये कॉलेजला जायला परवानगी मिळाल्यावर ते काम करता आलं. आताच्या लॉकडाऊनमध्ये फक्त सिनॉप्सिस (प्रबंधाची रूपरेषा) देण्यासाठी तिला कॉलेजमध्ये जाता आलं, असं तिने सांगितलं.

मृणाल सांगते, ‘मूत्राशयाचे विकार दोन गटांमध्ये मुख्यत्वे स्त्रियांमध्ये आणि मधुमेहींमध्ये दिसतात. औषधी वनस्पतीची मात्रा एखाद्या मधुमेहीला देऊ केल्यास तो आधीच त्यासाठीची औषधं घेत असणार. मग या दोन्ही औषधांचा विरोधी परिणाम तर होणार नाही ना, हेही अभ्यासायचं होतं. त्यासाठी तिला डॉ. कृष्णा अय्यर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं.  त्याखेरीज मी काही प्रकल्प इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेस – नॉएडा, सोसायटी ऑफ फार्मास्युटिकल डिझॉल्यूशन सायन्स – (एसपीडीएस)- चंडीगड, फोर्थ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ द सोसायटी फॉर स्टडी ऑफ झेनोबायोटिक्स – (एसएसएक्स) – बेंगळूरु, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ व्हर्च्युअल फार्मा,  २०२१ अशा राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत. त्यातही औषधी वनस्पती हा महत्त्वाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. हे काम सुरू असताना मी एका मास्टर्सच्या विद्यार्थिनीला याच विषयात मदत करत होते. तिच्या मास्टर्सनंतर माझ्या पीएचडीव्यतिरिक्त मी तिचं काम पुढे पूर्ण केलं. त्यावर माझा टीएलसी बायोऑटोग्राफी – एलसी – एमएस- एमएस – अ‍ॅनालिसिस फॉर आयडेंटिफि के शन ऑफ कम्पाऊंड्स हॅविंग इनहिबिटरी अ‍ॅक्टिव्हिटी अगेन्स्ट स्टॅफलोकॉकस ऑरिअस इन अ‍ॅबीज वेबियाना लीव्हज एक्स्ट्रॅक्ट’ हा पेपर ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.’ त्या संदर्भातलं पोस्टर प्रेझेंटेशन तिने इंडियन फार्मास्युटिकल कोँग्रेसच्या परिषदेत सादर केलं. त्यात दोनशे सहभागींमध्ये तिला प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यासाठी घेतलेल्या कष्टांचं चीज झालं आणि तिच्या विषयनिश्चितीवर पुन्हा शिक्कामोर्तब झालं. ‘अ‍ॅनालिटिकलमध्ये आम्हाला मिळणारे प्रकल्प मी मार्गदर्शक डॉ. वैशाली शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हाताळते आहे. आयपीए एमएसबीचे प्रमुख शिवप्रसाद आणि अध्यक्ष नितीन मणियार यांनी या अत्यंत आधुनिक आणि महाग यंत्रणांचा सेटअप सुयोग्य पद्धतीने करताना त्यांनी माझा सहकारी प्रणव पाठक आणि माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी सार्थ ठरवू शकते आहे, याचं समाधान मला वाटतं.

नशिबाने माझ्यासाठी हे सगळं चांगल्यारीतीने आखून ठेवलं होतं. योगायोग खूप आले. शिवाय आई-बाबा, वेदांग यांनी वेळेवेळी संधी दाखवून दिल्या आणि दोन्ही कुटुंबीयांचा अत्यंत खंबीर पाठिंबा मिळाला आणि मिळतोच आहे,’ असं ती सांगते. पीएचडीला प्रवेश घेतल्यावर महिन्याभरात तिचं लग्न झालं. सासू- सासऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा नि मोलाचा पाठिंबा तिला मिळतो आहे. कितीही अभ्यास- काम असलं तरी छंद हा जीवाला विसावा असतोच.

बाबांमुळे मला कलेची गोडी लागली. अजूनही ते मला शिकवतात. ते एफटीआयआयमध्ये असून पेंटिंगसह बऱ्याच कलांची जोपासना करतात. मी वारली पेंटिंग खूप करते. मला नृत्य करायला खूप आवडतं. सगळ्या कला स्पर्धामध्ये आवर्जून भाग घेते, असं सांगणाऱ्या मृणालला पुढे संशोधनात्मक काम करायची इच्छा आहे किंवा मग शिक्षण क्षेत्रात जायचा विचार आहे. मृणालच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.