12 August 2020

News Flash

रंजनापलीकडचे मूकनाटय़

मूकनाटय़ म्हटले की ‘न बोलता साधला जाणारा संवाद’ ही साधारण व्याख्या प्रत्येकाच्या नजरेपुढे तरळते.

निलेश अडसूळ

कलेच्या माध्यमातून विकास साधण्याची भारतीय रंगभूमीची जुनी परंपरा आहे. यामध्ये गीत, नृत्य, नाटय़ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. परंतु असाच विकास साधणारे आणि विशेष म्हणजे भारताचे आदिबीज असलेले ‘मूकनाटय़’ आज काहीसे दुर्लक्षित झालेले दिसते. आज भारतामध्ये या कलेचे नव्याने साम्राज्य उभे करू पाहणारा असाच एक अवलिया तरुणांमध्ये ‘माईम कल्चर’ रुजवण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. त्याची खास बात म्हणजे मूकनाटय़ाची कला त्याने मनोरंजन किंवा स्पर्धेपर्यंत मर्यादित ठेवली नाही तर त्यातून माणसाचा शारीरिक आणि मानसिक विकास साधणाऱ्या ‘माईम थेरपी’वर तो सध्या काम करतो आहे. महाविद्यालयीन जीवनात माईम आर्टचा शोध घेऊ पाहणारा मुंबईतील कुणाल मोतलिंग आज ‘वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो आहे.

मूकनाटय़ म्हटले की ‘न बोलता साधला जाणारा संवाद’ ही साधारण व्याख्या प्रत्येकाच्या नजरेपुढे तरळते. पण मूकनाटय़ म्हणजे अगदी दिव्य असे काहीच नाही. तो तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातील घटक असल्याचे कुणाल सांगतो. त्याच्या मते, एखादी कथा मूकनाटय़ रूपात आणण्यासाठी आणि लोकांना शब्दाविना कळण्यासाठी तिची कौशल्यपूर्ण बांधणी करणे गरजेचे आहे. पण हे कौशल्य प्रत्येकात असते. जसे आपण एकाशी फोनवर बोलत असताना अचानक दुसरी व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपण केवळ इशारे, हातवारे करून त्याच्याशी संवाद साधतो आणि तो पोहोचतोही. म्हणजेच हे माईम आहे, फक्त कला म्हणून तिचा विकास आपल्याकडे फारसा झाला नाही अशी खंत तो व्यक्त करतो.

मूकनाटय़ाबाबत अनेक समज-गैरसमज आपल्याकडे आहेत. चार्ली चॅप्लीन आणि त्या समकालीन कलाकृतींमुळे ही कला पाश्चात्त्यांची त्यातही ग्रीक किंवा फ्रेंचांची असल्याचे लोकांना वाटते. पण या कलेचे मूळ भारतात असल्याची माहिती कुणाल देतो. आपल्याकडे कथकली, भरतनाटय़म असे अनेक नृत्य प्रकार आहेत, ज्यांचे मूळ मूकनाटय़ात आहे. या सर्व नृत्य प्रकारांचा आत्मा मुखाभिनयात आहे. जे सांगायचे आहे ते हावभावातून, कृतीतून सांगणे. हीच कला पाश्चात्त्यांनी विकसित केली, त्यावर प्रचंड मेहनत घेतली आणि ‘माईम आर्ट’ जन्माला घातले. तिथे राजे महाराजे स्वरंजनासाठी अशा कलाकारांना पाचारण करत असत. याच कलाकारांनी मूकनाटय़ातून सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत जनजागृती केल्याचे दाखले आहेत. पुढे याला कल्पनाविलासाची जोड मिळाली आणि विविध रसांनी भरलेले नाटय़ उदयास आले. पुढे १९ व्या शतकात चार्ली चॅप्लीन आणि मार्शल मार्सो यांनी ही कला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. माईम कल्चरकडे वळण्यामागे याच दोन असामी प्रेरणास्थानी असल्याचेही त्याने सांगितले.

माईम कलेचा ध्यास त्याला रुईया महाविद्यालयात आल्यानंतर लागला. ‘महाविद्यालयात युथ फे स्टिव्हलच्या निमित्ताने माईम करायची संधी मिळाली. त्यावेळी आम्हाला माईम शिकवायला विख्यात माईम कलाकार बापी डास यायचे. त्यांचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की मी त्यांच्याकडे माईमचे धडे गिरवले. घरच्यांची मानसिकता मराठी मध्यमवर्गीय असल्याने सरकारी नोकरी, शिक्षण यासाठी त्यांनी बराच रेटा लावला, पण मला माईममध्येच करियर करायचे असल्याने मीही माझ्या मतावर ठाम राहिलो. हा प्रवास साधारण २०१० च्या दरम्यानचा आहे, तेव्हा माईम म्हणजे काय हे अनेकांना माहिती नव्हते’, असे तो सांगतो.

माईम कलेकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता समाजातील विवंचना, विषय न बोलता मांडण्याचे हे उत्तम तंत्र आहे, असे तो म्हणतो. विनोदी अंगाने का होईना, विज्ञानकथा, सामाजिक प्रश्न, यशोगाथा असे अनेक विषय तो आवर्जून माईममधून मांडतो. माईम कला ते थेरपीपर्यंतचा प्रवास उलगडताना माईममुळे माणसाचा शारीरिक आणि मानसिक विकास साधला जात असल्याने त्यातूनच माईम थेरपी विकसित झाली. अमेरिकेत ही थेरपी उपचारासाठी वापरली जात असल्याचे तो सांगतो. थेरपी घेणे हा शब्दप्रयोग ऐकला की लोकांना आपण आजारी आहोत की काय असा प्रश्न पडतो. पण थेरपी फक्त एखाद्या आजारावर दिली जात नसून आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वस्थ्यासाठीही ती तितकीच महत्त्वाची ठरते. माईम थेरपी देताना समोरच्या व्यक्तीला विशेषकरून लहान मुलांना आपलेसे करणे हेच मोठे आव्हान असते, कारण त्यांची मानसिकता आणि विचार यामध्ये आपण कुठेच नसतो. त्यामुळे वर्गावर जाताना मला एखादे सोंग घेऊन जावे लागते, एखादे विनोदी पात्र साकारावे लागते. मग ती मुले हसतात, बडबडतात. यात मेकअप आणि गेटपचाही बराच प्रभाव पडतो. मी त्यांना त्याच्यातल्याच काही खोडय़ा करून दाखवतो. मग हा आपल्यातलाच एक असल्याची त्यांची खात्री पटते आणि मग थेरपीला सुरवात होते.

दिव्यांग किंवा बौद्धिक असक्षम मुलांना शिकवताना तर अधिकच जोखीम असते. त्यांना नाही पटले तर ते एखादी वस्तू फेकूनही नाराजी व्यक्त करू शकतात. माझा एक विद्यार्थी वर्गातल्या खिडकीवर माकडाप्रमाणे लटकून ऐकत असतो तर दुसरा ब्लेडची पाती तोंडात धरून चावत असतो. आपल्याला या गोष्टी बघून भीती वाटली तरी त्यांची ती सहजकृती असल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्या कृतीतून बाहेर काढायला बराच वेळ जातो, असे कु णाल सांगतो. एखादी गोष्ट ३० ते ४० वेळा वेगवेगळ्या अंगाने करून दाखवावी लागते किंवा सांगावी लागते. मूकनाटय़ तुम्हाला संयम शिकवते. याच संयमाच्या आधारे आपण हळूहळू आपल्या शरीरावर, मेंदूवर आणि पर्यायाने विचारांवर ताबा मिळवू लागतो. यामध्ये शारीरिक, मौखिक, मेंदूच्या आणि विशेषकरून श्वसनाच्या व्यायामाला विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे तो सांगतो.

माईम आर्टप्रमाणेच थेरपीच्या प्रसारासाठीही तो गेली दहा वर्षे प्रयत्न करतो आहे. आपल्याकडे दिव्यांग, मतिमंद, गतिमंद मुले जन्माला आली की त्यांच्या संगोपनाचे, शारीरिक—मानसिक विकासाचे असंख्य पेच पालकांपुढे उभे राहतात. शाळांनी, संस्थांनी त्याची जबाबदारी स्वीकारली तरी विकासाबाबत शाश्वती देता येत नाही. परंतु अशा मुलांची बौद्धिक ताकद ही सामान्य माणसांपेक्षा अधिक तीक्ष्ण असते. त्यांना माईम थेरपीचा खूप उपयोग होतो असे कुणाल आपल्या अनुभवातून सांगतो. गेली काही वर्षे तो महाराष्ट्रभरातील विविध शाळा—संस्थांमध्ये माईम थेरपीचा प्रयोग करत आहे. आपल्याकडे शिकवण्यापेक्षा लादण्याची प्रकिया अधिक होते. त्यामुळे मुलांची क्षमता असतानाही ते ग्रहण करत नाही. त्यांना त्यांच्यातलं होऊन शिकवलं की असाध्यही साध्या करण्याची ताकद ते बाळगतात. मला असे शिक्षण कधीच मिळाले नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला असे मुक्त शिक्षण घेता यावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तो सांगतो. आज लहान मुलांनाच नाही तर सिनेसृष्टीतील अभिनेत्यांनासुद्धा कुणाल माईमचे प्रशिक्षण देतो. शब्दावाचून कळणाऱ्या या कलाप्रकाराने अभिनयाचे सामथ्र्य दृढ होते. सध्या अनुपम खेर, सौरभ सचदेवा अशा दिग्गज अभिनेत्यांच्या प्रशिक्षण केंद्रात तो मूकनाटय़ाचे धडे देत आहे.

माईम आर्टमध्ये आर्थिक प्रगतीच्या संधीही आहेत, मात्र आर्टिस्टनी त्यांची शैली आणि व्यासपीठ स्वत: निर्माण करायला हवे, असे कु णाल सांगतो.  गेल्या सहा वर्षांत माईम करणारे कलाकार वाढत असले तरी आज त्यांची गरज मोठी असल्याचे देशभरात सगळीकडे माईमचे प्रशिक्षण वर्ग घेणाऱ्या कु णालचे म्हणणे आहे. भविष्यात संगीत, नृत्य याप्रमाणेच मूकनाटय़ालाही शाळेत दैनंदिन अभ्यासक्रमात स्थान मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानसही त्याने व्यक्त के ला.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 1:19 am

Web Title: article about silent drama zws 70
Next Stories
1 क्षितिजावरचे वारे : झूम बराबर
2 लॉकडाऊन आणि लगीनघाई!
3  ‘पॅड’वुमन
Just Now!
X