मनीष खन्ना

फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. सणावाराला जेवढं गोडधोड खाल्लं जातं तितकंच गोडधोड फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने खाल्लं जातं. म्हणूनच आम्ही खास व्हिवाच्या वाचकांसाठी फेब्रुवारी महिन्यातली शेफखानाची ‘मधुर’ सीरिज घेऊन आलो आहोत. या महिन्यात आपण जाणार आहोत ‘ट्रेंडिंग डेजर्ट’च्या सफारीला. आणि ही सफारी आपल्याला घडवणार आहेत ‘ब्राऊनी पॉइंट’चे सर्वेसर्वा शेफ मनीष खन्ना.

शेफ मनीष खन्ना यांचा डेजर्टसचा गाढा अभ्यास आहे. डेजर्टच्या विश्वाविषयी आपली मतं मांडण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी त्यांनी अनेक परदेश दौरे केले आहेत. १९९७ साली त्यांनी ‘ब्राऊनी पॉइंट’ची मुंबईत स्थापना केली. मुंबईच्या इतिहासातील चीजकेक आणि ब्राऊनी मिळणारं मुंबईतील पहिलं दुकान असण्याचा त्यांनी बहुमान मिळवला आहे. गेल्या २२ वर्षांत त्यांनी दोन खंडांत व चार शहरांत २९ शाखा उघडल्या आहेत. या सीरिजची नांदी शेफ मनीष खन्ना टीकेक या दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या केकपासून करणार आहेत.

क्रीमने लथपथलेला केक आपण प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याची जागा छोटय़ा छोटय़ा केक, मफिन्स, पेस्ट्रीने घेतली. आता आपण दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेला टीकेकसुद्धा प्रवासात घेऊन जाऊ शकतो. आजकाल मुलांच्या कोरडय़ा खाऊच्या टिफिनमध्ये हे टीकेक दिसू लागले आहेत. कारण टीकेक हे दीर्घकाळ टिकू शकतात आणि त्यांची चव दीर्घकाळ टिकून राहते. टीकेकचे काप करून त्यांना व्यवस्थित फॉइलमध्ये ठेवून आपण ते काही दिवस वापरू शकतो.

टीकेकची उत्पत्ती ब्रिटनमध्ये झाली. तो दुपारच्या चहाबरोबर सव्‍‌र्ह केला जाऊ लागला आणि त्यामुळे त्याचे टीकेक असे नाव प्रचलित झाले. जगामध्ये टीकेक हा वेगवेगळ्या पद्धतींनी आणि वेगवेगळ्या नावांनी ओळखू जाऊ लागला. इंग्लंडमध्ये लाइट ईस्ट बन टीकेक ड्रायफ्रुटपासून बनवून त्याचे काप करून त्यावर बटर लावून सव्‍‌र्ह केला जात असे. कालांतराने टीकेकची जागा लाडक्या चॉकलेट क्रीम केक, फ्रेश क्रीम केक आणि डेजर्टनी घेतली पण जगभरातील शेफ आपापल्यापरीने संशोधन करून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफुट्र्स उदा. अक्रोड, बदाम, मॅकॅडमिया, शेंगदाणे, काजू वापरून टीकेक बनवू लागले. फळांचा वापर करूनसुद्धा टीकेक बनविण्यात येऊ लागले. आता पुन्हा टीकेक मोठय़ा प्रमाणात प्रचलित होऊ लागले आहेत. स्लाइस केक, कप केक, मॅडेलियन्स, अप साइड डाऊन केक, पाऊंड केक, बार केक यांची मागणी दिवसेंदिवस केक शॉप व बेकरीमध्ये वाढते आहे.

गेल्या काही वर्षांपासून मावा केक अनेक चवदार टीकेकमध्ये विकसित झाले आहेत. टीकेक तुम्ही सकाळच्या चहाबरोबर व संध्याकाळी स्नॅक्स म्हणून किंवा रात्री चॉकलेट सॉस व आइसक्रीमबरोबरसुद्धा खाऊ शकता. टीकेकचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे अनेक फ्लेवर्स आणि त्याचा मऊपणा. टीकेक खाताना तो जास्त कोरडा नसावा याची काळजी आवर्जून घ्या. नवनवीन चवीचे टीकेक बनवण्यासाठी अनेक यशस्वी संशोधन केले जात आहेत. हे केक परिपूर्ण स्वाद आणि स्वादिष्टपणा अनेक दिवस टिकवण्यासाठी उत्कृष्ट सामग्री वापरून तयार केले जातात.

काही चविष्ट टीकेकच्या रेसिपीज खाली देत आहे..

बनाना वॉलनट केक

साहित्य : २०० ग्रॅम मैदा, १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून दालचिनी पावडर आवडीनुसार, १२० ग्रॅम तेल, ३ कुस्करलेली केळी, १ टीस्पून वॅनिला इसेन्स, १२० ग्रॅम साखर, ३० ते ४० मिली दूध, ७० ग्रॅम दही, ५० ग्रॅम अक्रोडचे तुकडे.

कृती : ओव्हन १७० डिग्रीला गरम करून घ्यावा. लोफ टिनला बटरग्रीसिंग करून साइडला ठेवावे. एका भांडय़ात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणी दालचिनी पावडर चाळून घ्यावी. दुसऱ्या भांडय़ात कुस्करलेली केळी, तेल, साखर आणि वॅनिला इसेन्स यांचे मिश्रण एकजीव करून घ्यावे. नंतर दही टाकून पुन्हा मिक्स करावे. वरील मिश्रणात मैदा मिश्र घालावे जर ते अधिक घट्ट असल्यास त्यात दूध टाकून त्याची पातळसर मिक्स करून घ्यावे. त्यावर अक्रोडचे तुकडे टाकावे. तयार झालेले बॅटर लोफ टिनमध्ये ओतावे आणि वरून पुन्हा अक्रोडचे तुकडे सोडावेत. वरील मिश्रण ग्रीसिंग केलेल्या लोफ टीनमध्ये ओतून गरम ओव्हनमध्ये २५ ते ३० मिनिट बेक करून घ्यावे.

गुलाब पिस्ता टीकेक

साहित्य : १२० ग्रॅम मैदा, पाव टीस्पून वेलची पावडर, ६० ग्रॅम पिस्ताचे काप, १ टीस्पून गुलाब इसेन्स, १३० ग्रॅम दही, ७० मिली पाणी, ८० मिली तेल, १३५ ग्राम साखर, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून पिंक कलर (आयसिंग आपल्या आवडीनुसार), ११५ ग्रॅम आयसिंग शुगर, १ टीस्पून गुलाबपाणी, काही ड्रॉप पिंक कलर फॉर गर्निश, २० ग्रॅम पिस्त्याचे काप, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या.

कृती : ओव्हन १८० डिग्रीला गरम करून घ्यावा. एका भांडय़ात मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या. त्यात पिस्ता काप घाला. एका मोठय़ा भांडय़ात दही, तेल, साखर, पाणी आणि रोझ इसेन्स घेउन मिश्रण एकजीव करा. साखर विरघळेपर्यंत मिश्रण ढवळत राहावे नंतर त्यात मैदापिस्त्याचे वर तयार केलेले मिश्रण एकत्र करावे. वरील मिश्रण एका बटर ग्रीसिंग केलेल्या लोफ टिनमध्ये टाकून २० ते २५ मिनिटे ओव्हनमध्ये बेक करून घ्यावे. ओव्हनमधून बाहेर काढल्या नंतर ते शिजले आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी एक टूथपिक त्यात टाकून पाहावी. ती काढल्या नंतर त्याला काही चिकटलेले नसले म्हणजे तुमचा बार केक व्यवस्थित शिजला आहे असे समजावे. नंतर लोफ टिनमधून बाहेर काढून थंड करण्यासाठी ठेवावे.

आइसिंग : एका भांडय़ात आइसिंग शुगर, गुलाबपाणी आणि पिंक कलर घ्यावा आणि त्याची एक पेस्ट तयार करावी आणि केकवरती लावावी. केक वरती गार्निश म्हणून पिस्ता काप आणि सुकलेल्या गुलाब पाकळ्यांचा वापर करावा.

हे केक ताजे ताजे सव्‍‌र्ह करावे. उरलेले टीकेक हवाबंद डब्यात ठेवावेत. ४ ते ५ दिवस आपण टीकेक फ्रिजमध्ये ठेवू शकतो.

बनाना वॉलनट केक हा लवकर तयार होणारा केक आहे आणि त्याची चव दुसऱ्या दिवशीसुद्धा टिकून राहते. कधी कधी मी त्यावर ऑरेंज मार्मालेड टाकतो.

हेल्दी डेट अ‍ॅण्ड वॉलनट केक

सामग्री : २२ ते २५ सीडलेस खजूर, ३७५ मिली दूध, १२५ ग्रॅम गव्हाचे पीठ, १२५ मिली तेल, १ टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, ६५ ग्रॅम अक्रोड.

कृती : दूध गरम करून घ्यावे. नंतर त्यात २० खजूर भिजवून ठेवावे, मऊ झाल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. पेस्ट एका भांडय़ात काढून त्यात तेल एकजीव करावे. ओव्हन १७० डिग्री सेल्सिअसला गरम करून घ्या. एका भांडय़ात मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या. लोफ टीनला ग्रीसिंग करून घ्या. मैद्याचे आणि खजुराचे मिश्रण एकत्र करा. अक्रोडचे आणि खजुराचे तुकडे करून बॅटरमध्ये टाकावे. सर्व मिश्रण ग्रीस केलेल्या लोफ टिनमध्ये टाकून ३० ते ३५ मिनिटे गरम ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवावे. केक तयार झाल्यावर टीकेक लोफ टिनमधून काढून थंड करण्यासाठी ठेवावा. हा केक साखरविरहित आहे.

संयोजन साहाय्य : मितेश जोशी

viva@expressindia.com