राधिका कुंटे

संगीत, भाषाप्रेम, लेखन, छायाचित्रण, भटकंती या छंद आणि आवडीनिवडी जोपासत तेजस मोरे समुद्र आणि हवामानाबद्दलचं संशोधन करतो आहे. जाणून घेऊ या त्याच्या या चौकटीबाहेरच्या अभ्यासाविषयी.. 

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या
pune, girl, suicide, engineering college, restroom , fir registered, one girl and man,
धक्कादायक! पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीची आत्महत्या

हवामान खातं हा तसा टिंगल टवाळीचा विषय होता अगदी अलीकडल्या काही काळापर्यंत.. पण त्याकडे दुर्लक्ष करून काही मोजक्याच मंडळींना हवामानाचा अभ्यास करावासा वाटतो. त्यात संशोधन करावं असं वाटतं त्यापैकी एक आहे तेजस मोरे. त्याला शालेय जीवनापासून विज्ञान—गणिताची आवड होती. संशोधन क्षेत्रातच जायचं हेही तेव्हाच ठरवलं होतं. ठाण्यातील शिवसमर्थचं शाळेचं वाचनालय आणि तत्कालीन ग्रंथपाल वैशाली फाटक यांना तेजसच्या या विचारप्रक्रियेचं श्रेय द्यायला हवं. निरंजन घाटे, मोहन आपटे, जयंत नारळीकर यांची अनेक पुस्तकं त्याने आवडीने वाचली. विज्ञानाचे शिक्षक निरंजन भागवत आणि गणिताचे शिक्षक देवीदास सानप यांचाही त्याच्या निर्णयप्रक्रियेत मोठा वाटा आहे. भौतिकशास्त्र हा त्याचा आवडता विषय असल्याने त्या संदर्भात अधिक वाचन व्हायचं. दहावीत तेजसने अच्युत गोडबोले यांचं ‘किमयागार’ पुस्तक वाचलं. ते वाचल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हे त्याला कळलं. तेव्हा त्याने अच्युत गोडबोले यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी वेळात वेळ काढून त्याला मार्गदर्शन केलं. इंजिनीअरिंग न करता प्लेन सायन्स घ्यावं, भौतिकशास्त्रात पदवी घ्यावी हे तेव्हा समजलं.

तेजस ‘वझे—केळकर महाविद्यालया’त बीएस्सी (भौतिकशास्त्र) झाला. त्यानंतरचा टप्पा होता ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’मधल्या एमएस्सीचा (हवामानशास्त्र – अ‍ॅटमोस्फे रिक सायन्स). तिथल्या प्रवेशपरीक्षेत तो पहिला आला. विभागात प्रवेश घ्यायला गेल्यावर कळलं की, या विषयामध्ये फार संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे नोकरी मिळणार नाही. ते ऐकून त्याचे बाबा थोडे खट्टू झाले होते, पण त्याला अगदी मनापासून हा विषय शिकायचाच होता. तो त्याच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिला. अनेकदा आपण दोन शब्द सर्रास ऐकतो किंवा वापरतो – ‘वेदर आणि क्लायमेट’. ‘वेदर’ म्हणजे रोजच्या रोज बदलणारं हवामान आणि ‘क्लायमेट’ म्हणजे कमीत कमी तीस वर्षांंत होणारे हवामान बदल. हवामानाचा अभ्यास या दोन पातळींवर होतो, असं तो सांगतो.

मास्टर्सच्या दोन वर्षांंपैकी एक वर्षांच्या इंटर्नशिपमध्ये प्रबंधासाठीचं संशोधन त्याने पुण्यातील ‘भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र’ विभागात (आयआयटीएम) केलं. त्यात समुद्राचं बदलतं तापमान आणि त्याची कारणं याचा अभ्यास केला. गेल्या दशकात समुद्राच्या तापमानात विलक्षण वाढ दिसून आली, याचे परिणाम हवामानावर निश्चितच दिसत असल्याने, या तापमानवाढीच्या भौतिकशास्त्रीय आणि गतिकी (डायनॅमिक्स) कारणांवर लक्ष केंद्रित केलं होतं. या प्रबंध संशोधनासाठी आयआयटीएममधील डॉ. ज्ञानशीलन, पुणे विद्यापीठातील प्रा. आनंदकुमार करिपोत, डॉ. प्रदीपकुमार पलाथ यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. या प्रबंधाचं २०१७ मध्ये तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेत पहिल्यांदाच सादरीकरण करायला मिळालं. बंगालच्या उपसागरात होणारे तापमानातील बदल आणि त्याची कारणं यावरील संशोधन ‘ओशन सोसायटी ऑफ इंडिया’च्या ‘कोस्टल रिसर्च’ या मासिकात प्रकाशित झालं. परिषदेच्या उद्घाटनाला उपस्थित मान्यवर आणि शास्त्रज्ञांसमोर हे सादरीकरण करता आलं. सादरीकरणासाठी मास्टर्सचे दोन – चार विद्यार्थी वगळता पीएचडी करणाऱ्यांची संख्या अधिक होती.

पीएचडीची तयारी करताना त्याने ‘स्कायमेट’ या कंपनीत हवामान विभागात काम करण्याचा दीड वर्षांंचा अनुभव गाठीशी बांधला. तिथे रोजच्या हवामानाचा अंदाज बांधण्याचं काम करत होता. शिवाय ऑब्झव्‍‌र्हेशनवर काम करत होतो. महाराष्ट्र राज्याचा ‘महावेध’ हा प्रकल्प होता. त्यात रोजच्या हवामानाचा वेध घ्यायचा असे. त्याने एकटय़ाने एक प्रकल्प हाताळला तो बिहार – मध्य प्रदेशचा. तेही रोजच्या हवामानाशी निगडित काम होतं. आपल्याकडे हवामानखातं आणि काही कंपन्या सोडल्यास या विषयाला फारशी संधी उपलब्ध नाही. काही संस्थांमध्ये संशोधन होतं आणि चांगल्या सुविधाही आहेत. या क्षेत्रात आवश्यक असणारे मोठय़ा क्षमतेचे संगणक दिल्ली, पुण्यात आहेत. तेजस सांगतो, ‘भारतात पीएचडी करावी यासाठी प्रयत्न करत होतो, पण पुणे, कोचीन विद्यापीठ अशा मोजक्याच ठिकाणी ती करता येते. त्यामुळे हाँगकाँगसह जपान, न्यूझीलंड आदी ठिकाणी अर्ज केले होते. पैकी ‘सिटी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग’मध्ये २०१९ मध्ये माझी निवड झाली. तेव्हा इथे हाँगकाँगमध्ये प्रचंड तणाव सुरू होता. जाळपोळ, गोळीबार वगैरे सुरू होतं. त्यामुळे इथे येण्याचा निर्णय घेताना मनावर अतिशय ताण होता. घरच्यांना माझी अत्यंत काळजी वाटत होती. शैक्षणिक जगात हे विद्यापीठ ४५ व्या स्थानावर असून इथली शिष्यवृत्तीही समाधानकारक आहे. इथे विषयनिवडीचं स्वातंत्र्यही मिळालं. ही हाती आलेली संधी सोडायची नसल्यानं मी याही निर्णयावर ठाम राहिलो’.

एकूण चार वर्षांंच्या त्याच्या पीएचडीचा ‘हवामान आणि समुद्र भौतिकशास्त्र’ हा विषय आहे. हवामानातील बदल तसंच समुद्र आणि हवामान यांची सांगड घालून चालणाऱ्या निसर्गनियमांचं (एअर – सी इंटरअ‍ॅक्शन) मूलभूत संशोधन अपेक्षित आहे. हिंदी महासागरातील समुद्राच्या इंडियन ओशन डायपोल या विशिष्ट प्रकाराचा अभ्यास करत आहे. हवामान व समुद्राच्या बदलामुळे मान्सूनवर होणारे परिणाम, भौतिकशास्त्र व त्याचे गतिकी नियम (डायनॅमिक्स) अभ्यासतो आहे. एल निनो, इंडियन ओशन डायपोल आणि भारतीय मान्सून यांचे भौतिकशास्त्राच्या निरीक्षणांतून संशोधन सुरू आहे. या प्रबंधासाठी प्रा. वेन जोउ मार्गदर्शन करत आहेत. आठवडय़ातून एक—दोनदा त्याची मार्गदर्शकांशी भेट होते. तो सांगतो, ‘अभ्यासक्रमांतर्गत टीचिंग असिस्टंट म्हणून काम करावं लागतं. विद्यार्थ्यांंना शिकवणं, त्यांचे पेपर तपासणं ही सध्या कोव्हिडमुळे ऑनलाइन सुरू असणारी कामं त्यात येतात. इथल्या शिक्षणपद्धतीत प्रॅक्टिकल्सवर अधिक भर दिला जातो. आपल्यासारखी इथे मुद्देसूद उत्तरं लिहिलेली आढळत नाहीत. कुणाचं उत्तर चार पानी असेल तर कुणी फक्त चार ओळी लिहितं. दोन्ही उत्तरं बरोबर आहेत, असं मानावं लागतं. कधीकधी वाटतं की ही डय़ुटी किंवा एकुणातच अकादमिक गोष्टी जास्त होत आहेत की काय, पण ते तेवढंच. चार वर्षांंत आम्हाला काही क्रेडिट्स पूर्ण करायची असतात. आठ सेमिस्टरमध्ये कितीही विषय कधीही घेऊ शकतो अशी मुभा आहे. इथे आल्यावर पहिल्या वर्षभरात सगळे विषय धडाधड पूर्ण केले. त्यामुळे पुढचा वेळ वाचला. आता वेळेचं व्यवस्थापन चांगलं होतं आहे. गेल्या वर्षी कोव्हिडमुळे इथेही लॉकडाऊन केला गेला. बरेचसे विद्यार्थी आपापल्या घरी परतले होते. मलाही घरचे भारतात यायचा आग्रह करत होते, पण तेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवास करणं टाळून, घरच्यांची समजूत घालून मी तिथेच ठामपणं थांबलो. इथल्या महाराष्ट्र मंडळातील सदस्यांचं एक कुटुंब तयार झालेलं असल्याने त्यांचा मोठाच आधार आहे’.

‘बालगंधर्व’ चित्रपट पाहिल्यापासून विशेषत: आनंद भाटे यांच्या स्वरांमुळे तेजसला शास्त्रीय संगीताची गोडी वाटू लागली. त्यानंतर त्याने हार्मोनियम शिकण्यास सुरुवात केली. गाणं शिकायचंच, असं विचारपूर्वक ठरवून ते शिकायला लागला. आधी प्राजक्ता जोशी यांच्याकडे शास्त्रीय संगीत मग सीमा दामले यांच्याकडे शास्त्रीय संगीत आणि नाटय़गीतांचं शिक्षण घेतो आहे. सध्या तो उस्ताद गुलाम सिराज खान यांच्याकडे रामपूर—सहसवान घराण्याची तालीम घेत आहे. दिवसातले तीन ते चार तास रियाजाला देतोच. कितीही व्यग्र जीवनशैली असली तरी रियाज कधीच बुडवत नाही. शास्त्रीय संगीत शिकताना माझ्यात पेशन्स खूप आले. आधी गाणं शिकलो असलो तरी इथे खांसाहेबांनी अगदी ‘सा रे ग म’पासून सुरू केलं. पहिले तीन महिने फक्त ‘सा’ घोटून घेतला. या दीड वर्षांंत एकच राग शिकवला आहे, असं तो सांगतो. कोव्हिड काळात त्याला नैराश्याचं प्रमाण भोवताली वाढताना दिसलं, मात्र तो गाणं आणि अभ्यासात रमलेला असल्याने त्याला रिकामटेकडेपण आलंच नाही. त्याचं मनोस्वास्थ्य चांगलं राहिलं. संशोधनासाठी सतत वाचन करून अपडेट राहावं लागतं. मनातले प्रश्न विचारणं आणि त्या उत्तरावर चिंतन करणं आवश्यक आहे. अनेकदा संशोधन करताना काहीही हाती लागत नाही, तेव्हा पुन्हा नव्याने सगळ्या गोष्टींचा पुनर्विचार करावा लागतो. इतरांच्या संशोधनावर डोळे झाकून विश्वास न ठेवता ते नेहमीच पडताळून बघावं, असं त्याला वाटतं. त्याने कदाचित पोस्ट डॉक परदेशात केलं तरी त्याला भारतामध्ये काम करायची इच्छा आहे. प्राध्यापक होणं हाही एक पर्याय आहे, पण त्यात मर्यादित उपलब्धता आहे.

‘सृष्टीज्ञान’ मासिक आणि काही वृत्तपत्रांतून त्याचे विज्ञानविषयक लेख प्रकाशित झाले आहेत. हे लेखन करताना काही इंग्रजी शब्दांना प्रतिमराठी शब्द त्याने तयार केले. उदा. ‘स्तरतंतूमेघ’ हा शब्द Cirrostratusसाठी किंवा ‘पुंजतंतूमेघ’ हा शब्द Cirrocumulus साठी.. शालेय जीवनात तो कविता लिहायचा. महाविद्यालयीन जीवनात त्याने जवळपास ऐंशी संगीत नाटकं वाचली. ‘संगीत स्वराज्य’ हे नाटक २०१४ मध्ये लिहिलं. ‘शेतकरी बितकरी’ हे नाटक लिहून तयार असून कवितासंग्रहाची तयारीही सुरू आहे. त्याचा व्याकरणातील वृत्तांचा अभ्यास त्याला नाटय़लेखनात उपयोगी पडतो. सध्या तो हाँगकाँगमधल्या भटकंतीचं थोडक्यात वर्णन करतो आहे. अलीकडेच छायाचित्रणाची गोडी लागल्याने या वर्णनांना चांगल्या छायाचित्रांची जोडही देतो आहे. अभ्यास आणि आवडीनिवडीही समरसून जोपासणाऱ्या तेजसला त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

viva@expressindia.com