19 September 2020

News Flash

सदा सर्वदा स्टार्टअप : गुंतवणुकीच्या तऱ्हा

व्हीसी सामान्यत: लहान मुदतीची निर्गमन धोरण (शॉर्ट टर्म एक्झिट) योजना आखतात.

डॉ. अपूर्वा जोशी

मागच्या सदरात आपण प्रारंभ निधी संकलन (स्टार्टअप फंडरेझिंग) या विषयाला सुरुवात केली; ज्यामध्ये व्हीसी आणि पीई फर्ममधील फरक काय आहेत? व्हेंचर कॅपिटल कंपन्या स्टार्टअप लाइफसायकलमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर स्टार्टअप्सना निधी देत असतात. खरं तर सुरुवातीच्या टप्प्यावरच सर्वात जास्त जोखीम असते, व्यवसाय स्थिर झालेला नसतो, ब्रँड माहितीचा नसतो, प्रवर्तक यशस्वी होतील याची कोणतीच शाश्वती नसते, पण म्हणतात ना जोखीम जितकी अधिक तितका परतावा अधिक मिळतो.

त्यामुळे  सुरुवातीच्या फंडिंग राउंड्समध्ये अधिकाधिक व्हीसी सहभागी होताना दिसत आहेत, कारण त्यांना या स्टार्टअपच्या प्रक्रियेतून जाण्याचा अनुभव मिळतो आणि म्हणूनच व्हेंचर कॅपिटॅलिस्ट्सची उपस्थिती सीड फंडिंगपासून ते सिरीज डी फेरीपर्यंत लक्षणीय असते, जास्तीतजास्त पैसे गुंतवून ते आपल्या गुंतवणुकीचे मूल्य अधिकाधिक वाढवण्यामागे पळत असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर व्हेंचर कॅपिटॅलिस्ट ही सुरुवात असेल तर प्रायव्हेट इक्विटी हा एन्ड गेम आहे.

प्रायव्हेट इक्विटी (पीई) म्हणजे काय संकल्पना आहे याविषयी आपण मागच्या लेखात जाणून घेतले होते . प्रायव्हेट इक्विटीचे जगच निराळे असते. आपण विचार करू शकत नाही अशा प्रकारचे या कंपन्यांचे व्यवहार असतात. कार्लाईल नावाचा असाच एक मोठा प्रायव्हेट इक्विटी क्षेत्रातील खेळाडू. युद्धातून पैसे कमवायची किमया यांना जमली. अमेरिकन सेनादलांना शस्त्रास्त्रं पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये त्यांनी मोठय़ा गुंतवणुका केल्या आणि १९९८ ते २००३ पर्यंत यांना पेंटागॉनकडून १४ अब्ज डॉलर्सची कंत्राटे मिळाली. अमेरिका युद्धखोर असण्याचे हेही एक कारण आहे की त्यांच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा ज्या कंपन्यांच्या जिवावर उभा आहे त्यांना जगात कुठे तरी युद्धे झाली तरच फायदा होतो.

असो! तर या कार्लाईलबद्दल सांगण्याचे कारण म्हणजे त्यांची गुंतवणुकीची एक पद्धत आहे, ते कंपनीमध्ये छोटामोठा हिस्सा विकत घेतच नाहीत, ते विकत घेतात बहुसंख्य समभाग, विकत घेतात तो संपूर्ण व्यवसायावरचा ताबा. ज्याचं भवितव्य तेच ठरवतात आणि त्यासाठी त्यांना अधिकाधिक समभाग स्वत:कडे असावे लागतात. कर्जाचा डोंगर म्डोक्यावर असलेले स्टार्टअप्स हे त्यांचे टार्गेट असते.  अशा प्रकारे अधिग्रहण करायची एक पद्धत म्हणजे ‘लिव्हरेज्ड बाय आउट’.

लिव्हरेज्ड बाय आउट म्हणजे कंपनीचे संपूर्ण अधिग्रहण करण्यासाठी कर्जाऊ रक्कम वापरणे. ही मोठी विचित्र पद्धत आहे. विकत घेतल्या गेलेल्या कंपनीच्याच मालमत्तेचा वापर विकत घेणारी कंपनी कर्जासाठी संपाश्र्विक (कोलॅटरल) म्हणून करते. स्वत:चे पैसे न गुंतवता बँकेकडून रक्कम उभी करून अशा पद्धतीची अधिग्रहणं केली जातात. आणि केवळ गुंतवणूकदारच अधिग्रहण करतात असे नसून अनेक व्यवसायांनीदेखील ही पद्धती अवलंबली आहे. ब्रिटनमधील ‘टेटली’साठी २००० मध्ये टाटा समूहाने ब्रिटनमध्येच ‘टाटा टी’ नावाची एक कंपनी स्थापन करून अधिग्रहण पूर्ण केले. यासाठी टाटांनी श्रोडर्स, मेझानाइन अशा प्रायव्हेट इक्विटी समूहांकडून व नेर्दलड्सस्थित राबो बँकेकडून भांडवल उभे केले ते ‘टेटली’च्याच मालमत्तांसमोर. ‘टाटा स्टील’ने ‘कोरस’चे केलेले किंवा  ‘हेन्सन ट्रान्समिशन’चे ‘सुझलॉन’ने केलेले अधिग्रहण हे याच पद्धतीचे होते.  प्रायव्हेट इक्विटी हा तुमच्या स्टार्टअपसाठी एन्डगेम असू शकतो. प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदार आल्यावर बऱ्याचदा प्रवर्तकांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो, कंपनी व्यावसायिक सीईओच्या हातात दिली जाते, कंपनीचे भवितव्य एका मार्गदर्शक पथावर वाटचाल करू लागते. स्टार्टअपमधील भांडवल उभारणीच्या फेऱ्या या व्हेंचर कॅपिटॅलिस्ट आणि प्रायव्हेट इक्विटी या दोघांमधील दरी दूर करतात. कंपनीची वाटचाल व्हेंचर फंडिंगकडून प्रायव्हेट इक्विटीकडे होणे म्हणजे त्यांच्या यशाचे प्रतीक असते. व्हेंचर कंपन्या  मर्यादित भांडवल पुरवठा करत असतात, पण प्रायव्हेट  इक्विटीची भूक खूप प्रचंड असते. या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे स्टार्टअपकडून व्यवसायाशी संबंधित भरीव डाटा आणि मार्केटमधील त्यांचा वावर हा दखलपात्रच पाहिजे  जेणेकरून दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांना स्टार्टअप फंडिंगसंदर्भात निर्णय घेता येईल.

व्हीसी सामान्यत: लहान मुदतीची निर्गमन धोरण (शॉर्ट टर्म एक्झिट) योजना आखतात. त्यांच्याकडे त्यांच्या निधीवर मर्यादा असते त्यामुळे त्यांना त्वरित निकाल हवे असतात तर प्रायव्हेट इक्विटीवाल्यांचे खिसे चांगलेच भरलेले असतात त्यामुळे त्यांना दूरदृष्टी असते, कारण पीई गुंतवणूकदार हे नेहमी आकडे पाहून आकर्षित होतात तर व्हीसी मंडळी लोकोंना पाहून आकर्षित होतात.

प्रायव्हेट इक्विटी इंटरनॅशनलच्या रँकिंगनुसार काही टॉप प्रायव्हेट इक्विटी कंपन्या :

* द कार्लाईल ग्रुप * ब्लॅकस्टोन * बेन कॅपिटल * गोल्डमन सॅक्स * बर्कशर पार्टनर्स

इन्व्हेस्टपेडियाच्या रँकिंग्जनुसार भारतातल्या काही टॉप प्रायव्हेट इक्विटी कंपन्या :

* ब्लॅकस्टोन * एपॅक्स * टीपीजी (टेक्सास पेसिफिक ग्रुप) * एव्हरस्टोन * द कार्लाईल ग्रुप

काही उल्लेखनीय काम करणारे एंजल्स:

* रतन टाटा * संदीप गोएंका * विजय शेखर शर्मा * मोहनदास पै *  क्रिस गोपालकृष्णन * नंदन निलेकणी * संजय मेहता * बिन्नी बन्सल – सचिन बन्सल

थोडक्यात सर्वोत्कृष्ट एंजल्स ते होते जे आधी उद्योजक होते आणि एक्झिट करण्याइतके यशस्वी होते.

एंजेल इन्व्हेस्टर्स

एंजेल इन्व्हेस्टर बहुतेक स्टार्टअप संस्थापकांसाठी वित्तपुरवठा भागीदार असतात. एंजेल्स चांगले अर्थसाहाय्य मिळवीत आहेत, एकत्र ग्रुप्स बनवत आहेत आणि अधिक गुंतवणूक करत आहेत.

एंजेल्स निधी उभारण्याच्या पहिल्याच फेऱ्यांमध्ये भाग घेण्यास इच्छुक असतात. व्यवसायाशी संबंधित माहिती, नफा हे मूलभूत गुंतवणुकीचे आधार न ठेवता ते सामान्यत: ‘उद्योजक आणि कल्पना’ यावर आधारित गुंतवणूक करतात. तुम्ही व्हीसी गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याआधीच्या फंडिंग राउंड्समध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यावर एंजल इन्व्हेस्टर्सकडून गुंतवणूक मिळवण्याची अपेक्षा करू शकता. याच टप्प्यापासून चार ते पाच राउंड्सपुढे शक्यतो पीई इन्व्हेस्टर्स असतात.

इतर स्टार्टअप गुंतवणूकदार

(स्टार्टअप अ‍ॅक्सलरेटर) प्रारंभिक प्रवेगक आणि इनक्यूबेटर हे अर्ली फंडिंगचे नवीन उदयास येणारे प्रकार आहेत. इंटेन्सिव्ह प्रोग्राम्स, रिसोर्सेस आणि वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या संधी या अ‍ॅक्सलरेटर आणि इनक्यूबेटर यांच्याकडून ऑफर केल्या जातात. तुमचे स्टार्टअप त्यांच्या ठरलेल्या प्रमाणात बसत असेल तर तुम्ही त्यांच्या ‘गुड फिट’ यादीत जाल. इतकेच नाही तर तुमच्या स्टार्टअपला इतर गुंतवणूकदारांसमोर नेण्यातही त्यांची मुख्य भूमिका असेल.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 1:41 am

Web Title: article about the startup fundraising zws 70
Next Stories
1 नवे कार्यधागे
2 हातमागाशी जुळले डिजिटल धागे
3 क्षितिजावरचे वारे  : वेलकम प्रतिसृष्टी – २
Just Now!
X