22 October 2019

News Flash

टेकजागर : उचलला मोबाइल..

स्मार्टफोनच्या वापराचे नियमन करणारे किंवा त्याच्या अवाजवी वापरावर र्निबध आणणारे कायदे अजून तरी कोणत्याही देशात बनलेले नाहीत

(संग्रहित छायाचित्र)

आसिफ बागवान

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. एका लाल सिग्नलवर माझी बाइक उभी असताना शेजारी एक दुसरा बाइकस्वार आला. त्याच्या बाइकच्या आरशाजवळ मोबाइल स्टॅण्ड लावला होता आणि त्यावर मोबाइलही लटकवला होता. बाइक थांबवताच त्याने पटकन मोबाइल अनलॉक केला आणि व्हॉट्सअ‍ॅप उघडून मेसेज तपासू लागला.. उण्यापुऱ्या ६०  सेकंदांचा तो सिग्नल. पण तेवढय़ा वेळातही त्या पठ्ठय़ाने स्मार्टफोनवर ‘फेरफटका’ मारलाच. इतकं काही तरी महत्त्वाचं असू शकेल? की सोशल मीडियाच्या धबडग्यात सतत ऑनलाइन राहणं हे एक व्यसन बनत चाललंय?

प्रश्न स्मार्टफोनच्या प्रेमात पडण्याचा किंवा त्याचं व्यसन लागण्याचा नाही. काही दिवसांपूर्वीच पालकांनी स्मार्टफोन वापरू न दिल्याने किशोरवयातील दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना पुणे आणि नवी मुंबईत घडल्या. त्यामुळे  स्मार्टफोनचे व्यसन किती धोकादायक बनू शकते, याची चर्चा होऊ लागली आहे. पण मुद्दा स्मार्टफोनमध्ये गुंगून जाण्याचा नाही, तर  स्मार्टफोनच्या वापरातल्या ‘एटिकेट्स’चा, शिष्टाचाराचा आहे.

हो, स्मार्टफोन वापरायचे शिष्टाचार आहेत! परदेशात या शिष्टाचारांच्या पालनासाठी वेगवेगळ्या मोहिमा सुरू आहेत आणि वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते मोठमोठय़ा कंपन्यांच्या व्यवस्थापनांपर्यंत अनेकांनी या शिष्टाचारांची गरज विशद केली आहे. हे शिष्टाचार फार कठीण नाहीत. जिथे सूचना असेल तेथे मोबाइल ‘सायलेंट मोड’वर ठेवणे, बैठक, सभांमध्ये फोनचा वापर टाळणे, समोरची व्यक्ती बोलत असताना फोनमध्ये डोळे खुपसून न राहणे असे अनेक ‘एटिकेट्स’  मानवाच्या सभ्यपणाचे प्रतीक आहेत. पण दुर्दैवाने याकडे कोणीच गांभीर्याने पाहात नाही. याउलट जिथे ‘मोबाइल वापरू नका’ अशी सूचना असते, तेथेच तो हटकून वापरणे शौर्याचे लक्षण समजले जाते. विमानात बसल्यानंतर उड्डाण करण्यापूर्वी ‘सीटबेल्ट लावा आणि मोबाइल बंद करा’ अशी सूचना दिली जाते. त्यानंतरही अनेकांची बोटे मोबाइलशी चाळे करताना दिसतात. आणि जेव्हा विमानाचे लँडिंग होते तेव्हा वैमानिकाची सूचना येण्याआधीच मोबाइल कानाला लागलेले दिसतात. एकूणच आपण या शिष्टाचारांची ऐशी की तैशी केली आहे.

स्मार्टफोनच्या वापराचे नियमन करणारे किंवा त्याच्या अवाजवी वापरावर र्निबध आणणारे कायदे अजून तरी कोणत्याही देशात बनलेले नाहीत. फ्रान्स सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये शाळांमध्ये स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या वापराला पूर्णपणे मज्जाव केला. त्या देशात १२ ते १७ वयोगटातील ९० टक्के मुलामुलींकडे मोबाइल आहेत. वर्गात बसलेले विद्यार्थी जर स्मार्टफोनमध्येच डोके खुपसून राहणार असतील तर, शिक्षकांनी शिकवायचे कोणाला? या समस्येतून तो कायदा निर्माण झाला. पण त्याविरोधातही निषेधाचे सूर उमटलेच. भारतासह जगभरातील देशांत वाहन चालवताना मोबाइल वापरावर बंदी आहे. भारतात ड्रायव्हिंग करताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास १०० ते ३०० रुपयांचा दंड आहे. शिवाय, चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबितही केला जाऊ शकतो. अलीकडच्या काळात पोलिसांनी काही प्रकरणांत दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. वाहन चालवताना मोबाइल वापरणे किती धोक्याचे ठरू शकते, हे नव्याने सांगायची गरज नाही.

सिनेमा सुरू असतानाच अनेकदा मोबाइलची घंटी खणखणीत आवाजात वाजते. त्यामुळे इतर प्रेक्षकांना निर्माण  झालेला व्यत्यय कमी की काय, तो उचलून मोठमोठय़ा आवाजात बोलणारेही महाभाग असतात. मध्यंतरी मुंबई – ठाण्यातील एका नाटय़गृहात नाटकाचा प्रयोग सुरू असताना सतत वाजणाऱ्या मोबाइलवरून कलाकारांनी प्रयोगच थांबवल्याचा प्रकारही घडला होता. ऑफिसच्या मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन सुरू असताना मोबाइलशी चाळा करणे म्हणजे विरंगुळाच समजले जाते.

ही झाली सार्वजनिक उदाहरणे. पण घरातही कोणी आपल्याशी बोलत असताना मोबाइलकडे बघतच त्या व्यक्तीशी संवाद साधला जातो. चारजण जेवत असताना दोघांचे लक्ष टीव्हीकडे तर दोघांचे मोबाइलच्या स्क्रीनवर हेही ‘मॅनर्स’ नसल्याचेच लक्षण आहे. आपल्याशी समोरील व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीने वागते तेव्हा आपल्याला या शिष्टाचाराचे महत्त्व कळते. त्याऐवजी सर्वानीच हे ‘एटिकेट्स’ अमलात आणले तर, अपघात आणि अपमान दोन्हीही टाळता येतील.

स्मार्टफोनचे शिष्टाचार

ल्ल ‘सायलेंट’ होना भी जरुरी है : ऑफिसात मीटिंगमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना किंवा थिएटरमध्येही मोबाइल ‘सायलेंट मोड’वर ठेवा. अनेकजण फोन व्हायब्रेट मोडवर ठेवतात आणि तो टेबलावर ठेवतात. जेव्हा फोन व्हायब्रेट होतो, तेव्हा त्याची घरघर अवघ्या बैठकीला घेरून टाकते.

* कॅमेऱ्याला आवर हवाच : हल्ली दर्जेदार मोबाइल कॅमेरे उपलब्ध झाल्याने चालताबसता ‘क्लिक’ करून ते फोटो शेअर करण्याची हौस अनेकांना असते. पण हे करताना आपण इतरांचा खासगीपणा (प्रायव्हसी) भंग करत नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. मित्रमंडळींच्या पार्टीत बसल्यानंतर काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करताना पार्टीतील प्रत्येकाची परवानगी घ्यायलाच हवी (न जाणो, यातल्या कुणीतरी घरी किंवा ऑफिसमध्ये भलतीच थाप मारून पार्टी गाठली असेल!)

* फोन बहिरा नाही : पूर्वीच्या काळी टेलिफोनच्या लाइनमध्ये दोष असल्यास समोरच्या व्यक्तीशी संभाषण करताना आवाज वाढवून बोलावे लागायचे. पण आता मोबाइलचे नेटवर्क जागोजागी पसरलेले आहे. तरीही मोठय़ाने बोलायची सवय जात नाही. ही सवय तुम्हाला चारचौघांत मूर्ख ठरवते. (तुमच्या गुजगोष्टी इतरांच्या कानी पडतात, हे वेगळेच!)

* ‘टॅगिंग’ की ‘रॅगिंग’ : फेसबुकवर स्वत:ची काहीही पोस्ट वा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यात साऱ्यांनाच टॅग करण्याचीही अनेकांना सवय असते. यासारखी वैतागवाणी गोष्ट  नाही. तुमची छायाचित्रे पाहण्याची बळजबरी इतरांना का? कोणालाही ‘टॅग’ करताना त्याची परवानगी घ्याच.

* खासगीपणाची ऐशीतैशी : लोकल, बसमधून जाताना अनेकजण मोबाइलमध्येच गुंतलेले असतात. अशा वेळी डोक्यामागून तुमच्या मोबाइलमध्ये डोकावणारे तुमच्या खासगीपणाचा भंग करत असतात. पण त्यांना दोष का लावावा? त्याऐवजी आपणच आजूबाजूला बघून मोबाइल वापरणे चांगले नव्हे का?

* ‘डीजे’ बनू नका : मोबाइलमधील गाणी मोठय़ा आवाजात वाजवण्यासारखा वाईट प्रकार कोणताही नाही. मोबाइल तुमचा, त्यातील गाणी तुमच्या आवडीची मग त्याचा आवाज गावभर कशाला?

* मोबाइल खासगी असतो :  मोबाइल हा प्रत्येकाची खासगी वस्तू आहे. त्यामुळे परवानगीशिवाय मित्राचा किंवा कुटुंबातल्या व्यक्तीचा फोन हातात घेऊन त्याच्याशी चाळे करू नका. त्याचप्रमाणे तुमच्या मोबाइलचेही प्रदर्शन उगाच मांडू नका.

viva@expressindia.com

First Published on January 11, 2019 1:16 am

Web Title: article about to be addicted with mobile