तेजश्री गायकवाड

तुमचे तोंडी संवाद कितीही चांगले असले, तुम्ही कितीही नीट बोलत असलात तरी तुमची अ‍ॅक्शन, फेशिअल एक्स्प्रेशन्स त्या त्या वेळी काय आहेत हेही महत्त्वाचं ठरतं.

बोलण्याची ही कला आजच्या घडीला संवाद किंवा संपर्क इतपुरती मर्यादित नाही. तर प्रत्येक गरजेनुसार कसं बोलावं याचे संदर्भ बदलत जातात. सध्या कॉलेजेसमधून स्पर्धा-इव्हेंट्सच्या निमित्ताने या बोलण्याच्या कलेला अधिक धार दिली जाते आहे..

माणूस आयुष्यभर शिकतच असतो, असं म्हटलं जातं. नवीन काही तरी शिकायला कधीच उशीर झालेला नसतो किंवा शिकण्याची प्रक्रिया कधीही ‘संपली’ असं होत नाही. पण तरीही आपलं शिक्षण हे मात्र शालेय-महाविद्यालयीन अशा पद्धतीने प्रत्येक टप्प्यानुसार ठरल्याप्रमाणे पार पडतं. त्यातलं महत्त्वाचं शिक्षण म्हणजे आपलं बोलणं. जे अगदी लहानग्या दुडुदुडु धावणाऱ्या बाळालाही बोबडं का होईना सुरुवातीला आई-बाबा असे शब्द आवर्जून शिकवले जातात. नंतर मग आताच्या पद्धतीप्रमाणे नर्सरी, ज्युनिअर केजी, शाळा आणि कॉलेज मग नोकरी अशा टप्प्याटप्प्यांत कसं बोलावं याचं प्रशिक्षण सुरूच असतं. बोलण्याची ही कला आजच्या घडीला संवाद किंवा संपर्क इतपुरती मर्यादित नाही. तर प्रत्येक गरजेनुसार कसं बोलावं याचे संदर्भ बदलत जातात. सध्या कॉलेजेसमधून स्पर्धा-इव्हेंट्सच्या निमित्ताने या बोलण्याच्या कलेला अधिक धार दिली जाते आहे..

खरं तर माणसाला बोलता येणं आणि त्याने वेगवेगळ्या पद्धतीने बोलणं, शब्द-वाक्य आणि मग संवाद ही त्याची प्रक्रिया सहजपणे होते. मात्र तरीही बोलण्यापेक्षा ते कसं बोलायला हवं, उच्चार कसे हवेत हे शिकवलं जातंच. शाळेपासूनच आपल्या बोलण्याला ‘वळण’ दिलं जातं. लहानपणापासूनच उत्तम भाषा कशी बोलावी, कोणाशी कसं बोलावं हे पद्धतशीर शिकवलं जातं. माध्यमिक शाळेत तर वक्तृत्व क ला, कथाकथन स्पर्धा अशा पद्धतीने बोलण्याची ही कला ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बहरत जाते. मात्र सध्या बोलणंच नाही तर मुळात बोलण्याआधी समोरच्याचं ऐकणंही महत्त्वाचं आहे हे शिकवलं जातं. एरवीही मोठय़ांशी, शिक्षकांशी कसं बोलावं आणि मित्रमैत्रिणींमध्ये कसं बोलावं याचे मापदंड असतातच. मात्र सध्या महाविद्यालयात शिरणाऱ्या तरुणाईला प्रवेशाआधीपासूनच तिथे गेल्यावर कोणाशी कसं बोलायचं याचे धडे घ्यावे लागतात.

कॉलेजच्या पहिल्या दिवशी आलेला मुलगा किंवा मुलगी आणि कॉलेजमधून एखादी डिग्री घेऊ न बाहेर पडणारा तो किंवा ती यात जमीन-आस्मानाचा फरक असतो. पहिल्या दिवशी अनेकांना कॉलेजमध्ये प्रवेश घेताना बोलायचं कसं हेही माहिती नसतं. हळूहळू आजूबाजूला बघून मोठय़ांकडून याचं शिक्षण घेतलं जातं. हे आपलं जे बोलणं असतं यात प्रत्येक ठिकाणानुसार, वेळेनुसार, समोर असलेल्यांनुसार बदल होत असतो. कॉलेजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या वर्गमित्रांशी बोलतो आणि ते क सं बोलावं हे आपल्याला काही शिकवलं जात नाही. पण आपल्या सीनिअर्सशी कसं बोलायचं हे मात्र सध्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं. आपल्यालापेक्षा एकच वर्ग पुढे असणारेसुद्धा आपले सीनिअर्स असतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमीच रिस्पेक्टने बोलायचं असाच खमका सल्ला दिला जातो. अनेक ठिकाणी तर पहिल्या वर्षांतील मुलं अनेक गोष्टींमध्ये कल्चरल इव्हेंट्स, स्पोर्ट्समध्ये भाग घेतात. अशा वेळी तर पहिल्याच मीटिंगमध्ये ज्युनिअर्सला सिनिअर्ससशी कसं बोलायचं, काय विचारायचं आणि काय नाही हे सगळंच शिकवलं जातं. सीनिअर्सची टीमच यात पुढाकार घेते, असं मुलं सांगतात.

कॉलेजमध्ये रेग्युलर बोलणं असतं तसंच कल्चरल, स्पोर्ट्स, सोशल इव्हेंटमध्ये भाग घेणाऱ्यांची संख्याही मोठी असते. या कॉलेज इव्हेंट्सच्या वेळी बोलण्यात खरी कसोटी लागते. कारण त्यांना बोलण्यातून आपल्या कॉलेजचा इव्हेंट यशस्वीपणे पार पाडायचा असतो. टीम वर्कसाठी बोलणं हे तर मस्ट आहे. कॉलेज इव्हेंट्स, फेस्टिवलच्या वेळी स्पॉन्सरशिप, पीआर, मार्केटिंग अशा टीमला कसं बोलायचं याचं ट्रेनिंग तर खुद्द कॉलेजमधूनच दिलं जातं. पूर्वी कॉलेज इव्हेंट्स हे मजामस्तीसाठी ओळखले जात होते. आता अनेकदा मुलांना त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीचा धागा इथे सापडतो. कॉलेजमधून घेतलेला अनुभव, प्रशिक्षण या जोरावर पुढच्या वाटा निश्चित व्हायला मदत होत असल्याने या ट्रेनिंगला मुलंही तितकं च महत्त्व देतात. कॉलेज इव्हेंट्सना स्पॉन्सर्स मिळवण्यासाठी तुमचं प्रेझेंटेशन उत्तम असणं गरजेच असतं. तुमच्या कॉलेजच्या फेस्टिव्हल किंवा इव्हेंट्सची माहिती बरोबर सांगता आली तरच स्पॉन्सर्स मिळतात. मार्केटिंग आणि पी आर टीमसाठीही हाच नियम लागू होतो. या टीमला सीनिअर्स किंवा प्रोफेसर यांच्याकडून ट्रेनिंग दिलं जातं. ज्यामध्ये नेमका तुमच्या बोलण्याचा टोन कसा हवा, कोणते शब्द वापरायचे, कोणते शब्द टाळायचे, कोणती माहिती द्यायची, समोरच्याच्या पोस्टनुसार कसं बोलायचं असं सगळंच शिकवलं जातं. अनेकदा यासाठी बाहेरून एक्स्पर्टलासुद्धा बोलावलं जातं. याबद्दल साठे कॉलेजचा प्रथमेश मेढेकर सांगतो, ‘बाहेर स्पॉन्सर्स शोधताना स्पॉन्सर्स काय विचार करतायेत ते लक्षात घेऊन त्यानुसार बोलावं लागतं. त्यांना यातून स्वत:ला काय फायदा आहे, मी काय स्पॉन्सर करावं आणि का करावं, असे अनेक प्रश्न घेऊन ते तुमच्यासमोर येतात. अशा वेळी तुम्हाला फक्त बोलण्यातून त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देत त्यांना राजी करून घ्यायचं असतं. तुम्ही ज्यांना स्पॉन्सरशिपसाठी कॉल केला आहे त्यांना फक्त तुमच्याबद्दल, कॉलेज आणि फेस्टिव्हलबद्दल रोबोट बोलतो तशी माहिती दिली तर कधीच पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळत नाही. बोलताना आपल्यापेक्षा समोरच्याचा कसा फायदा होणार आहे हे सतत समोरच्याला कळलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही बेगरप्रमाणे काही तरी मागताय असंही  वाटता कामा नये, याचीही काळजी घ्यावी लागते.’

केवळ कॉलेजमधील इव्हेंट्स किंवा फेस्टिव्हल एवढाच भाग नसतो. तर इतरही अनेक आंतरराज्यीय स्पर्धा, इव्हेंट्स अशा गोष्टींसाठी कॉलेजमधून बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. नुकतीच रिसर्च स्पर्धेसाठी बाहेर गेलेली ‘निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स’ची कुंजन बजाज म्हणते, आम्हाला कॉलेजच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी जाताना कसं वागायचं, बोलायचं याच ट्रेनिंग दिलं जातं. मी रिसर्च स्पर्धेसाठी जाणार होते तेव्हा आम्हाला बोलताना कॉन्फिडन्स लेव्हल दिसली पाहिजे, तुम्ही समोरच्याचा डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे. आपण जे बोलतोय तेच बरोबर आहे असं समोरच्याला वाटेल इतक्या ठामपणे ते बोललं गेलं पाहिजे. तुमच्या बोलण्याला तुमच्या बॉडी लँग्वेजचीही साथ असावी लागते, यासाठी तयारी करून घेतली होती, असं तिने सांगितलं. तुमचे तोंडी संवाद कितीही चांगले असले, तुम्ही कितीही नीट बोलत असलात तरी तुमची अ‍ॅक्शन, फेशिअल एक्स्प्रेशन्स त्या त्या वेळी काय आहेत हेही महत्त्वाचं ठरतं. या सगळ्याची तयारी क रून घेतली जाते. अनेकदा सीनिअर्सची यात मदत होते, असे तिने सांगितले.

कॉलेजमधून शिकवण्याची प्रक्रियाही बदलत गेली आहे. कॉलेजच्या अभ्यासात सध्या प्रेझेंटेशनचा भाग फारच महत्त्वाचा ठरतोय. तुम्ही कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेत असलात तरी त्यात वेगवेगळ्या विषयांसाठी प्रेझेन्टेशन्स द्यावीच लागतात. अशा वेळी अगदी अ, ब, क पासून कॉलेजमध्ये शिकवलं जातं. त्यानंतर फक्त आपल्या वर्गात प्रेझेंटेशन करताना मुलं वेगळ्या पद्धतीने करतात, डिपार्टमेंटच्या बाहेर प्रेझेंटेशन करताना त्यात वेगळेपणा असतो. तर कॉलेजच्या बाहेर गेल्यावर केलं जाणारं प्रेझेंटेशन हे वेगळं असतं. अशा वेळी त्यासाठी मुलांकडून खास तयारी करून घेतली जाते. या तयारीतूनच मग मुले अनेकदा नाटक-वक्तृत्व-कथाकथन यापासून ते कॉर्पोरेट मार्केटिंग, मॅनेजमेंटपर्यंत अनेक क्षेत्रांकडे फार लवकर ओढली जातात. सध्या बोलण्याची ही कला टेड टॉक, प्रोफे शनल टॉक, स्टँड अप कॉमेडी, यूटय़ूब चॅनेल्स, व्लॉगर्स अशा अनेकविध पद्धतींनी विस्तारत चालली आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून कॉलेजमध्ये होणारं हे ‘कसं बोलायचं?’ नामक ट्रेनिंग मोलाचं ठरतंय!