अमित दाणी, आश्चफेनबुर्ग, जर्मनी

मी जर्मनीत फ्रँकफुर्टपासून ५० किलोमीटरवर असणाऱ्या आश्चफेनबुर्ग शहरात नोकरीनिमित्त राहातो आहे. मी मूळचा मुंबईकर. इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर वेगळी वाट धुंडाळायचं ठरवलं. काही काळ नोकरी केल्यावर या क्षेत्रातील संधीची कल्पना आली. त्या दृष्टीने विचार केल्यावर जर्मन देशात पुढचं शिक्षण घेऊ  शकतो हे कळलं. मात्र भाषेचा थोडा अडसर होता, तो जर्मन भाषा शिकल्याने दूर सरला. अ‍ॅनालिटिकल इन्स्ट्रमेंट्स, मेजरमेंट अँड सेन्सर टेक्नॉलॉजी (एआयएमएस) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमासाठी होकशूल कोबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्स अ‍ॅण्ड आर्ट्स इथे प्रवेश मिळाला. अभ्यासाव्यतिरिक्तचा वेळ अर्थात दर वीकएण्ड फिरण्यात सार्थकी लावायचा हे मनाशी पक्क ठरवलं. ते लगोलग अमलात आणलं. जर्मनीच्या भौगोलिक स्थानमहात्म्यामुळे गेल्या तीन वर्षांत मी फिरण्याच्या आवडीमुळे जर्मनी, चीन, स्वित्र्झलड, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅण्ड्स, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, हंगेरी, ग्रीस, इटली, अमेरिका आदी ठिकाणी फिरलो आहे. त्यामुळे त्या फिरस्तीच्या अनुभवांचा एक वेगळा लेख होऊ  शकेल, तो पुन्हा कधीतरी. आपल्या विचारांची कक्षा रुंदावण्यासाठी स्थानिकांसोबत मिळूनमिसळून वागायला हवं, असं मला वाटतं. तसा प्रयत्न मी कायमच करतो. त्यामुळे तिथली संस्कृती, भारताविषयीचं त्यांचं मत कळून ते बदलायला हवं असल्यास तसा वावही मिळतो.

पहिल्यांदा जर्मनीत लॅण्ड झाल्यावर कॉलेजला जायला ट्रेन पकडली. पाऊण तासानंतर एका स्टेशनवर ट्रेन थांबली आणि त्यानंतर ट्रेनच्या डब्यांचे दोन भाग होऊन ते वेगवेगळ्या दिशांना गेले. असं काही होतं हे मला तेव्हा माहीतच नव्हतं. सुदैवाने मी योग्य ट्रेनमध्ये बसलो होतो. कारण माझ्याकडे ना सिमकार्ड होतं ना फारसा कुणाचा कॉन्टॅक्ट होता. कॉलेजमध्ये शेअरिंग नव्हे तर स्वतंत्र रूम मिळाली. पहिला पंधरवडाभर सगळ्या अत्यावश्यक गोष्टींची माहिती दिली जात होती. अभ्यासात रट्टा मारणं नव्हे तर समजून उमजून अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. परदेशी विद्यार्थ्यांसाठी जर्मन बडी प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत मुलगा किंवा मुलगी हे मित्रत्वाच्या नात्याने मदतीचा हात देतात. परदेशातून आलेल्या मुलांना मुली आणि मुलीला मुलगा मित्र म्हणून नेमणूक होते. या मित्रासोबत किंवा ग्रुपने मिळून तिथल्या नवीन जीवनशैलीत रुळायचा प्रयत्न होतो. त्यामुळे मित्रमंडळीच्या संख्येत निश्चितच वाढ होते. शिवाय जर्मन पेरेंट बडी प्रोग्रामही असतो. त्याअंतर्गत ज्या पालकांची मुलं परदेशात किंवा दुसऱ्या शहरात राहतात, ते पालक परदेशी मुलांना इथे स्थिरावायला मदत करतात. एका काकूंनी मला ख्रिसमसला घरी बोलावलं होतं. त्या बॉलीवूडच्या फॅन होत्या. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना कुतूहल वाटत होतं.

जर्मनीतल्या लोकांना स्वत:ची संस्कृती आणि भाषेविषयी प्रचंड अभिमान आहे. त्यांच्या कृती-उक्तीतून तो जाणवतो. त्यांना सगळ्या गोष्टी कायमच आखीवरेखीव आणि आधीपासून ठरवलेल्या लागतात. त्यांना भारतीय जेवण खूपच महाग असूनही आवडतं. मी स्वत: इथे आल्यावर स्वयंपाक शिकलो. अगदी महिन्याभरात बरेच पदार्थ करता येऊ  लागले आणि जर्मन मित्रामंडळींना मराठमोळे पदार्थ जेवायला बोलावलं होतं. इथे मी पहिल्यांदा आइसस्केटिंग केलं. तेव्हा मी धडपडलो तरीही नेटानं ते केलं. एका स्थानिक वाहिनीवर ख्रिसमसच्या सुमारास माझी जर्मन भाषेत छोटीशी मुलाखत झाली होती. बेसिक जर्मन भाषा शिकून गेलो असलो तरी कॉलेजमधील जर्मनच्या क्लासलाही गेलो. इथे वक्तशीरपणाला प्रचंड महत्त्व दिलं जातं. एकदा आमच्या डीनना यायला दोनच मिनिटं उशीर झाला तर त्यांनी अनेकदा दिलगिरी व्यक्त करत उशीर होण्याचं कारण विशद केलं. इथे कचऱ्याच्या वर्गीकरणालाही फारच महत्त्व दिलं जातं आणि ते तसं होण्याकडे सगळ्यांचा कटाक्ष असतो. दारात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू गाडय़ा असल्या तरीही सायकलिंगला अधिक प्राधान्य दिलं जातं. एकदा रात्री आम्ही सायकलवरून जात होतो. रस्त्यावर कोणीही नव्हतं. लाल सिग्नल लागला. तरीही आम्ही थांबून काही क्षणांनी मार्गस्थ झालो. ही सवय आता अंगात एवढी भिनली आहे की मध्यंतरी भारतात आल्यावरही मी तेच फॉलो केलं.

अभ्यासक्रमाच्या आखणीनुसार समर सेमिस्टरसाठी चीनला जाणं सक्तीचं होतं. चीन म्हटल्यावर घरी थोडी काळजी वाटली, पण माझ्या हिताचा विचार करून आईबाबांनी होकार दिला. मग एका सेमिस्टरसाठी चीनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ शांघाय फॉर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ (यूएसएसटी)मध्ये गेलो होतो. विमानतळावर जाणवलं की परदेशी आणि चिनी लोकांची रांग वेगळी आहे. मी चिनी भाषा शिकलो. युनिव्हर्सिटीचा परिसर अतिशय विस्तीर्ण होता. सहा कॅ न्टीन होती. दोन ऑलम्पिक साइजची मैदानं होती. त्याचा वापर फिटनेससाठी हमखास केला जातो. फिटनेस हा जणू चिनी लोकांच्या रक्तातच आहे. या सहा महिन्यांच्या काळात बीजिंगला बुलेट ट्रेनने जायला मिळाल्यानं वेग म्हणजे काय ते कळलं. तिथल्या काही हॉटेलमध्ये फक्त चिनी लोकांनाच प्रवेश होता. चीनमध्ये केवळ वायडू आणि वीचॅट हीच समाजमाध्यमं वापरावी लागतात. ग्रेट वॉल ऑफ चायनावर एके ठिकाणी घसरगुंडीसारखी सोय असून तिथून घसरायला जाम मजा येते. इथली अर्थव्यवस्था अतिप्रगत असून कॅशचा वापर कमी होतो. वाहतूकव्यवस्था फार चांगली आहे. मॅगलेव (मॅग्नेटिक  लेव्हिटेशन ट्रेन) ट्रेनमध्ये बसण्याचाही योग आला होता. तिथल्या कॅन्टीनमध्ये भाषेच्या अडचणीमुळे पदार्थाच्या फोटोंवर बोट ठेवून काय हवं ते सांगायचो. त्यामुळे आम्ही कोणते पदार्थ खाल्ले, हे तो कॅन्टीनवालाच जाणे. चिनी लोक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अत्यंत वाकबगार असून मोबाइल म्हणजे जणू त्यांचा तिसरा हातच.

पुढच्या सेमिस्टरसाठी मला इंटर्नशिप करायची होती आणि योग आला स्विर्झलडचा. तिथे माझ्या खिडकीतून आल्प्स पर्वताचं मनोहारी दृश्य दिसायचं. तिथे घर मिळणं ही फारच कठीण गोष्ट होती. पण अखेरीस कंपनीच्या मदतीने ऑफिसपासून पाच मिनिटं चालण्याच्या अंतरावर मला घर मिळालं. मात्र घरातलं स्वयंपाकघर वापरायची परवानगी मिळाली नाही. मग मी मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करायच्या नवीननवीन कल्पना शोधून काढल्या. वेळप्रसंगी ऑफिसचं किचन वापरायची परवानगी मला मिळाली होती. पुढे माझी घरमालकीणीशी खूपच छान मैत्री झाली. एकदा मी तिच्या वाढदिवशी त्यांच्या किचनमध्ये पावभाजी करून तिला खायला घातली. त्यांनीही मला वेळोवेळी त्यांच्याकडचे खास पदार्थ खाऊ  घातले. त्यांच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याला आधी मी घाबरायचो, पण नंतर रोज संध्याकाळी आम्ही मजेत खेळायचो.

सुरुवातीच्या काळात ऑफिसला चालत जात होतो. एकदा एका धष्टपुष्ट गाईने मला बघितलं. बहुधा तिला वाटलं असावं की मी तिच्याशी खेळणार आहे. त्यामुळे ती माझ्याकडे धावतच निघाली. दुसऱ्या गाईनेही मैत्रिणीचं अनुकरण केलं आणि माझी भीतीने पार गाळण उडाली. मी सुसाट पळत सुटलो ऑफिसच्या दिशेने, जणू युसेन बोल्टपेक्षाही जोरात! या प्रसंगावरून धडा घेऊ न मी सायकल वापरायला लागलो. एकदा थंडीच्या मोसमात सायकलवरून जाताना पोलिसानं मला पकडलं, कारण मी सायकलचे दिवे लावले नव्हते आणि अंधार पडायला लागला होता. त्यांनी सांगितलं की, ‘तू महामार्गावरून जातो आहेस आणि हे पहिल्यांदाच होतंय, त्यामुळे तुला भरभक्कम दंड न करता फक्त ताकीद देऊन सोडून देतो आणि सांगितलं की दंडापेक्षा तुझी सुरक्षा महत्त्वाची आहे’. मी तिथे असताना माझे पार्ले टिळक शाळेतील काही मित्र युरोपमध्ये शिकायला होते. तेव्हा आम्ही स्विर्झलडला एकत्र भेटायचं आणि मस्त फिरायचा प्लॅन केला. स्वित्र्झलडमध्ये मित्र भेटणं, त्यांच्याशी मराठीत गप्पा मारणं हा फार सही अनुभव होता. पुढं सर्न या प्रकल्पाला भेट द्यायला मिळावी, म्हणून मी दोन महिने प्रयत्न करत होतो. शेवटी मला ती संधी मिळाली. त्यासाठी पुन्हा जिनिव्हाला गेलो होतो आणि विशेष म्हणजे स्थानिक मार्गदर्शक भारतीय होता.

जर्मनीतील लोकांना मोबाइल आणि तंत्रज्ञानाची वापरण्याच्या दृष्टीने तितकीशी आवड नाही. संध्याकाळी स्वयंपाक करण्यापेक्षा आपापले छंद जोपासना करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. संध्याकाळचा वेळ स्वत:साठी देणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते. काहीतरी स्पोर्ट्स, खेळणं किंवा बागेत निवांत बसणं, ही खूप कॉमन गोष्ट आहे. इथे मी पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, वॉटर स्किइंग, बाईक रायडिंग, गो कार्टिग, आइस स्केटिंग असे अनेक प्रकारचे खेळ खेळलो आहे. एकूणच इथली जीवनशैली चैनीची आहे. वीकएण्डला पार्टी, पब या गोष्टी असतातच. आपल्यासारखं सिनेमा-नाटक कमी पाहिलं जातं. अलीकडं काहीजण नेटफ्लिक्सकडे वळताना दिसतात. सर्वाधिक खर्च बाहेरचं खाण्यासाठी केला जातो. मुलांना स्पोर्ट्स बाइकचं प्रचंड वेड असून तो वेग, त्यातल्या करामती हे थक्क करणारं असतं. त्यात कोणताही अपघात होत नाहीत, हे विशेष. अगदी मजेमजेत सांगायचं तर मी जर्मनीत राहीन, स्वित्र्झलडमध्ये मिळणारा पगार घेईन आणि शांघायमधली वाहतुकीची साधनं वापरेन..

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com