तेजल चांदगुडे

वैमानिक म्हटलं की पटकन पुरुषाची छबी उभी राहते, कारण भारतात महिला वैमानिक असूनदेखील त्यांची कल्पना आपल्याला तितक्या सहजतेने करता येत नाही. मात्र आता तर तीन भारतीय महिलांनी भारतीय वायू सेनेत पुरुषांच्या बरोबरीने फायटर जेट विमान चालवून देशाच्या संरक्षणाची सूत्रं हातात घेतली आहेत. अशीच एक मोहीम फत्ते करण्यासाठी भारताच्या दोन ‘आकाश’कन्या निघाल्या आहेत. जगावेगळी कामगिरी करायला निघालेल्या मुंबईच्या या दोन तरुण मुलींची हवाहवाई गोष्ट..

सध्या सगळीकडेच नवरात्र आणि दुर्गापूजेचे वारे वाहतायेत. आदिशक्ती, माँ दुर्गा, अंबा माता अशी अनेक रूपं आणि नावं असणाऱ्या देवीला पर्यायाने स्त्री शक्तीला वंदन करणारा हा मोठा उत्सव. एकीकडे स्त्रीशक्ती म्हणून दुर्गादेवीची पूजा केली जाते आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे याच स्त्रीला # मी टु म्हणत आपल्यालाही लैंगिक शोषणाला बळी पडावं लागलंय, हे जाहीरपणे सांगावं लागतंय. स्त्री म्हणून उपभोगाची वस्तू नव्हे तर खऱ्या अर्थाने स्त्रीशक्ती म्हणून जगायला मिळावं यासाठी आज, आताही संघर्ष करावा लागतोय. परस्परविरोधी अशा टोकाच्या परिस्थितीतही जेव्हा आजूबाजूच्या सगळ्या नकारात्मकतेला मागे टाकत अवघ्या २२ वर्षांची आरोही पंडित आणि २४ वर्षांची किथेअर मिस्क्विटा या दोन मुली लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट घेऊन महिला सक्षमीकरणाच्या प्रचारासाठी आकाशात झेपावतात तेव्हा स्त्रीशक्तीची खरी प्रचीती येते.

‘बॉम्बे फ्लाइंग क्लब’च्या या दोन तरुणींनी विमान उड्डाणामध्ये इतिहास घडवण्यासाठी पाऊल उचलले आहे. वजनाने ५०० किलोग्रामपेक्षाही हलके असणारे ‘माही’ नावाचे एअरक्राफ्ट घेऊन आकाशातून पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा या दोघींनी विडा उचलला आहे. ‘माही’ हे भारताचं पहिलं नोंदणीकृत लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट असून याची बांधणी स्लोव्हेनिया या देशात केली गेली आहे. भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सहकार्याने ‘महिला सशक्ती अभिनयानां’तर्गत, ‘वी! एक्सपीडिशन’ नावाची मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत तीन टप्प्यांत संपूर्ण जगभर या एअरक्राफ्टने प्रवास करत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा संदेश दिला जाणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा आरोही आणि किथेअरने पूर्ण केला आहे. पहिल्याच टप्प्यात लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टने ट्रॉपिक टू आर्क्टिक (इंडिया टू ग्रीनलॅण्ड) असा हवाई प्रवास करणाऱ्या जगातील पहिल्या महिला वैमानिक हा लौकिक या दोन तरुणींनी मिळवला आहे. इतकंच नाही तर लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट उडवण्यासाठीचा परवाना मिळवणाऱ्याही त्या दोघी पहिल्या भारतीय महिला आहेत.

लहानपणापासूनच वैमानिक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मोठी झालेली आरोही तर अटलांटिक महासागरावरून हे लाईट स्पोर्ट विमान एकटीने उडवणारी पहिली महिला भारतीय ठरली आहे. पूर्वी वैद्यकीय क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेली किथेअर देखील वैमानिक बनून आणि मुख्य म्हणजे हे जगावेगळं आव्हान स्वीकारून तिच्या आई-बाबांचं स्वप्नं पूर्ण करते आहे. या मोहिमेची सुरुवात कशी झाली हे विचारले असता किथेअरने सांगितले की, ‘आम्ही दोघी बॉम्बे फ्लाइंग क्लबमधून विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेत होतो. एक दिवशी लीन मॅडम अशा दोन मुलींच्या शोधत आल्या ज्या ही मोहीम पूर्ण करू शकतील. मग अनेक परीक्षा, चाचण्या आणि मुलाखतींनंतर आमची निवड करण्यात आली. या मोहिमेसाठी सहा महिने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन आम्ही ३० जुलैला पटियालामधून उड्डाण केले आणि साधारण ४५ ते ४७ दिवस प्रवास करून आम्ही ग्रीनलॅण्डला पोहोचून या मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण केला’.

खरंतर ही मोहीम सुरू झाल्यापासूनच या दोन्ही तरुण वैमानिक विक्रमावर विक्रम रचतायेत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा विक्रम त्यांनी ७ ऑगस्टला केला. त्या दिवशी केवळ महिलांनी उड्डाण केलेले हे पाहिले भारतीय विमान कराचीत पाकिस्तानमध्ये जाऊन उतरले. दुसरा महत्त्वाचा विक्रम होता तो म्हणजे आरोही पंडित विक, स्कॉटलण्डवरून अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत अटलांटिक महासागरावरून हे अतिशय हलके असणारे विमान घेऊ न ग्रीनलॅण्डला जाण्यासाठी निघाली. अटलांटिक महासागर पार करून आरोही किथेअरला कॅनडाला भेटणार होती, मात्र हवामान आणि निसर्ग यांचा अंदाज घेऊ न या दोन्ही मुलींच्या संरक्षणासाठी या मोहिमेचा पहिला टप्पा ‘माही’ ग्रीनलॅण्डला उतरवून पूर्ण करण्यात आला.

आरोही आणि किथेअर यांनी या प्रवासात ७ हजार नॉटिकल माईल्स म्हणजेच साधारण १२ हजार ९६४ किलोमीटर इतकं अंतर पार करत जवळ जवळ २७ देशांवरून उड्डाण केले आहे. त्यांनी पृथ्वीचा एकतृतियांश भाग सर केला असून पुढील टप्पे पूर्ण करण्यासाठी त्या लवकरच उड्डाण करणार आहेत.

या मोहिमेदरमान्य दिवसातून किती वेळ उड्डाण केलं जायचं आणि नेमकी व्यूहरचना काय होती याबद्दल बोलताना आरोही आणि किथेअर यांनी सांगितलं की, ‘आम्ही व्ही.एफ.आर म्हणजे व्हिज्युअल फ्लाईट रूटवरून उड्डाण करतो. हे एक अल्ट्रालाईट विमान असल्याने आम्ही रात्री उड्डाण करू शकत नाही. केवळ दोन जणांची जागा असलेले हे एअरक्राफ्ट आहे. त्यामुळे आम्ही हवामान आणि निसर्गाचा अंदाज घेऊन साधारण चार ते साडेचार तास उड्डाण करायचो. पुढील टप्प्यांमध्येसुद्धा आम्ही हीच पद्धत वापरणार आहोत’.

उंच आकाशात वादळ, हवामान यांचं भयानक रूप पाहून कधी ही मोहीम पूर्ण होईल की नाही अशी भीती वाटली का, या प्रश्नाला उत्तर देताना अडचणी प्रत्येक कामात येतात आणि त्यांच्याशी कसं लढायचं हे आम्हाला उत्तमरीत्या शिकवलं गेलं होतं. अशा परिस्थितीत सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे सुरक्षित स्थानी विमान उतरवणं. आम्ही असं काही झालं तर जवळच्या विमानतळावर किंवा सुरक्षित ठिकाणी विमान उतरवायचो, असं दोघींनी सांगितलं. आमच्या पहिल्या टप्प्यात हवामान आम्हाला हरवेल असं कधी वाटलं नाही, मात्र जर तशी परिस्थितीच उद्भवली असती तर आम्ही तिच्याशी दोन हात करण्यात सज्ज झालो असतो, पण हार मानली नसती, असं त्या सांगतात.

या मोहिमेच्या माध्यमातून आरोही आणि किथेअर पुन्हा एकदा महिलांची प्रगती, शैक्षणिक स्थिती, समान संधी हेच मुद्दे जगासमोर ठेवतायेत. याविषयी बोलताना त्या दोघीही हळव्या होतात. आपल्या देशात स्त्रियांची स्थिती आता हळूहळू बदलते आहे ही आनंदाची बाब आहे. तरी आकडेवारीच्या भाषेत सांगायचं तर संबंध जगात ११ टक्के महिला वैमानिक भारतात आहेत आणि हा टक्का इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे, असं त्या सांगतात. हवाईक्षेत्रात केवळ वैमानिकच नाहीत तर तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि जमिनीवरून आम्हाला तांत्रिक मदत देणाऱ्या विभागांमध्येही महिलांचं प्रमाण जास्त आहे. भारतीय वायू सेनेत देखील तीन महिला फायटर जेट चालवत देशाचं संरक्षण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आम्हीसुद्धा जेव्हा हा विचार घेऊ न निघालो तेव्हा देशभरातूनच नाही तर आम्ही जगात जिथे जिथे गेलो तिथे तिथे आम्हाला प्रोत्साहन आणि प्रेम मिळालं. भारताच्या दोन मुली जेव्हा ही मोहीम करण्यासाठी निघाल्या आहेत हे लोकांना कळलं तेव्हा त्यांनी आम्हाला या धाडसासाठी शुभेच्छा आणि प्रेम दिलं. आम्हाला आम्ही भारताच्या नाही तर जगाच्या मुली आहोत, असंच वाटत होतं, हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. महिला आता अनेक क्षेत्रांत पुढे येऊ न उत्तम कामगिरी करतायेत आणि त्यांना तितकाच पाठिंबाही मिळतो आहे. आम्हालाही या कार्यात आमचा खारीचा वाटा देता आला याचा आनंद वाटतो, असं त्यांनी सांगितलं.

पुढच्या काही वर्षांत काय करावंसं वाटतं, असं विचारताच क्षणाचाही विलंब न करता दोघींनी एकच गोष्ट सांगितली. जे आम्ही केलं तसंच आव्हानात्मक  काहीतरी करण्यासाठी आणखी काही मुलींना प्रोत्साहन द्यायला आम्हाला आवडेल. ही मोहीम फत्ते करून आम्ही दाखवून देऊ  की मुली म्हणून आम्ही कुठेच मागे नाही आणि हीच प्रेरणा आम्हाला भारतातील प्रत्येक मुलीला द्यायची आहे. संधी मिळाल्यास त्यासाठी समाजातील विविध स्तरांतून काम करायला आवडेल, असं त्यांनी सांगितलं. सध्या या दोघींनाही वेध लागले आहेत या मोहिमेचे उरलेले टप्पे पूर्ण करण्याचे. हवामान उड्डाणासाठी अनुरूप झालं की मग या दोन्ही आकाशकन्या पुन्हा आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज होतील.

खरंतर हे एक असं धाडस आहे जे याआधी भारतातच काय तर संबंध जगात कोणी केलेलं नाही, आकाशातून पृथ्वी प्रदक्षिणा..  खरंच किती अनन्यसाधारण स्वप्नं आहे हे, पण त्यामागे या दोघींची मेहनत, त्यांना पाठिंबा देणारी पूर्ण टीम यांचेही तितकेच परिश्रम आहेत. या दोघी आकाशात लवकरच भरारी घेतील, मात्र त्यांच्याप्रमाणेच या देशातील प्रत्येक दुर्गा यशस्वी होत राहावी हेच तर एका आदर्श भारताचं रूप आहे जे लवकरच सत्यात उतरावं हीच अपेक्षा!!