तेजश्री गायकवाड, गायत्री हसबनीस

नानाविध संकल्पना, विषय आणि ते घेऊन मनोरंजन करणारे यूटय़ूबर्स, त्यांचे सबस्क्रायबर्स, लाखो-कोटय़वधी व्ह्य़ूजनी बदलणारी ऑनलाइन व्यवसायाची आर्थिक गणितं यामुळे सध्या या विश्वात वेगळीच काटाकाटीची समीकरणं सुरू आहेत. आपल्या चॅनेलला प्रसिद्धी मिळावी म्हणून दुसऱ्याशी एक तर वाद उकरून काढला जातो किंवा बदनामी केली जाते. मात्र रोजच्या रोज रंगणाऱ्या या वादांमध्ये खरंतर भांडण असं नसतंच, असतं ते फक्त फायद्याचं गणित.. सांगतायेत काही तरुण यूटय़ूबर्स.

एखादी गोष्ट घडली आणि ती जरा चुकीची वाटली तर लगेच यूटय़ूबवर त्या संदर्भात ट्रोल करणारे, रोस्ट करणारे व्हिडीओ, पोस्ट्स यांचा एकच भडिमार होतो. समर्थन देणारे आणि न देणारे यांच्यात एकच कलगीतुरा रंगतो. ऑनलाइन रंगणारा हा तंटाबखेडा इतका मजेशीर होऊन बसतो त्याचं कारण ज्यांच्यासाठी वाद रंगतो ते राहतात बाजूला. भांडणाऱ्या दोन्ही गटांना म्हणजे समर्थक आणि विरोधक यांनाही याचा थेट फायदा होतो का तर तेही नाही. मात्र ज्या चॅनेल्सवरून हे वाद रंगतात त्यांच्यासाठी मात्र ते फायदेशीर ठरतं. त्यामुळे हे असे वाद मधूनमधून पेटते ठेवण्याचा प्रयत्न मुद्दामहून केला जातोय असे चित्र दिसू लागले आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘प्युडीपाय’ आणि ‘टी सीरिज’ यांच्यामध्ये रंगलेला वाद. ‘प्युडीपाय’ म्हणजे इंटरनॅशनल यूटय़ूबर तर टी-सीरिज ही भारतीय म्युझिक कंपनी. या दोघांमध्ये वाद नेमका कधी सुरू झाला याबद्दल लोकांना माहिती नाही, पण दोघांच्या वतीने त्यांचे सबस्क्रायबर एकमेकांत झुंजतायेत. आणि या वादाचा समाचार घेणारे व्हिडीओ, पोस्ट तयारकरून ते आपल्या चॅनेलवर खपवत इतर छोटे-मोठे यूटय़ूबर आपली पोळी भाजून घेतायेत. अशाच दुसऱ्या एका प्रकरणात भारतीय यूटय़ूबर भुवन बम आणि अमित भडाना यांनी १० मिलियनचा टप्पा पार केला. त्या वेळी अमित भडानाला भुवनच्या फॅन्सकडून प्रचंड ट्रोल करण्यात आलं. कधी फॉलोअर्स एखाद्या यूटय़ूबरच्या व्हिडीओखाली ‘तू अमुक अमुक एका यूटय़ूबरची कशी कॉपी करतोयस,’ अशा कमेंट करून मोकळे होतात. मात्र अनेकदा हे वाद होतायेत असे भासवून दिले जाते. हा वर्षभरापूर्वी पाश्चात्त्यांनी आपल्याकडे आणलेला ट्रेण्ड आहे, अशी माहिती ‘सलील जामदार अ‍ॅण्ड को’ हे यूटय़ूब चॅनेल चालवणाऱ्या तरुण यूटय़ूबर सलीलने दिली.

प्युडीपाय आणि टी-सीरिजच्या वादाचंच तो उदाहरण देतो. या वादामुळे प्युडीपाय नक्की काय आहे याची माहिती भारतीयांना मिळाली. खरं तर प्युडीपाय हे जगातील सर्वात जास्त सबस्क्राइबर्स असलेले चॅनेल आहे. मात्र गेले काही दिवस त्यांच्या सबस्क्राइबर्सच्या संख्येची वाढ थोडी मंदावली होती. त्याला गती देण्याचे काम या वादाने केले. टी – सीरिज ही भारतीय कंपनी आहे, त्यामुळे या कंपनीबद्दल प्युडीपायने अनुद्गार काढल्याने हा वाद होणं अपेक्षितच होतं. प्युडीपायने केलेल्या टीकेनंतर टी-सीरिजला पाठिंबा मिळावा यासाठी भारतीय यूटय़ूबर्स आणि त्यांच्या चाहत्यांचे प्रयत्न वाढले. टी-सीरिजला पाठिंबा दिला तर तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील, असे आमिष दाखवण्याचेही प्रकार सुरू झाले होते. अशा वादामध्ये त्या दोन चॅनेल्स किंवा त्या दोघांपैकी एकाचा फायदा असतो. इतर लोकांचा त्यात नाहक वेळ वाया जातो, हे तरुणांनी खासकरून लक्षात घेतलं पाहिजे, असं सलील म्हणतो.

अशा प्रकारच्या घटनांमध्ये इतर यूटय़ूबर्स त्याचं श्रेय घेण्याच्या प्रयत्नात असतात. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या उक्तीप्रमाणे इतर यूटय़ूबर्स त्या प्रकरणावर वेगवेगळे व्हिडीओ टाकून आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात, अशी माहिती ‘मराठी किडा’ या यूटय़ूब चॅनलचे सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर यांनी दिली. सध्या हे ‘वॉर’ प्रकरण चांगलंच गाजतंय आणि हा फार मोठा ट्रेण्ड ठरला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या व्हिडीओतून यूटय़ूबर्स विवादास्पद मुद्दे निर्माण करतात. संपूर्ण दिवस यूटय़ूबवरच रमणारी मंडळी हे व्हिडीओ बघून त्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न करतात. हे वाद खरे नाहीत, ही जाणीव असणाऱ्या मंडळींचे प्रमाण अत्यल्प आहे. ७० टक्के लोकांना हे वाद खरे वाटतात आणि मग ते त्या वादात उडी घेतात. जे यूटय़ूबर्स या व्यवसायात स्थिरावले आहेत, त्यांना अशा प्रसिद्धीची गरज नसते मात्र नवीन यूटय़ूबर्सना या वादांमध्ये उडी घेऊन आपले व्हिडीओ प्रथमदर्शनी का होईना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने फायदा होतो, असे सूरजने सांगितले.

एकमेकांवर चिखलफेक करीत प्रसिद्धी वाढवण्याचा हा प्रकार यूटय़ूबर्समध्ये अनेकदा होताना दिसतो.  आपल्या समकालीन यूटय़ूबर्सने कशी सबस्क्रायबर्सची दिशाभूल केली आहे, इथपासून ते पेड प्रमोशन करताना चुकीच्या गोष्टी सांगण्यापर्यंत अनेक प्रकार केले जातात. मुंबईत असे यूटय़ूब वॉर फॉलो करणारे अनेक जण आहेत. पुण्यात मात्र अद्याप या प्रकाराची क्रेझ नाही. बरं यात तिसरेच कोणी तरी समोर येतात आणि वाद करणाऱ्या चॅनेलला अनसस्क्राइब करा असं आवाहन करतात. त्यामुळे मुळात यातून एकमेकांची दर्शकसंख्या कमी-जास्त करणे हाच छुपा हेतू असतो हे लक्षात घेऊन लोकांनी सतर्क राहायला हवे, असं प्रशांत म्हणतो. ऑनलाइन वाद रंगतात तेव्हा त्याचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. टी-सीरिज ही भारतीय कंपनी आहे, त्यांची यूटय़ूब वाहिनी आहे. तर प्युडीपाय हे स्वतंत्र यूटय़ूबर्स म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी टी-सीरिजवर रॅप गाण्यांच्या माध्यमातून ते पैसे देऊन सबस्क्रायबर्स वाढवीत असल्याबद्दल टीका केली. या टीकेला प्रत्यक्षात टी-सीरिजने काही उत्तर दिले नाही, मात्र त्यांच्या चाहत्यांनी हा वाद वाढवीत नेला. यातून भारतीय प्रेक्षकांना एकूणच वाद या विषयात बऱ्यापैकी रस आहे हे यूटय़ूबर्सनी हेरले असून त्याचाच सध्या वापर करून घेतला जातो आहे, असं मत जीवन कदम या यूटय़ूबरने मांडले. रफ्तार आणि एमीवे या दोन रॅपर्सनीही यूटय़ूबवरून एक मेकांत भांडणे केली आणि ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. या वादापूर्वी दोघांनाही यूटय़ूबर्स म्हणून ओळख नव्हती. त्यांनी केवळ बॉलीवूडपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या गाण्यांचे व्हिडीओ बनवून घेऊन ते यूटय़ूब चॅनेल्सच्या माध्यमातून प्रकाशित केले होते. मात्र या वादानंतर दोघांच्याही प्रेक्षकसंख्येत वाढ झाली, याकडे दुर्लक्ष करता येत नाही, असा मुद्दा जीवनने मांडला. यात कोण चांगला-क ोण वाईट याच्याशी लोकांना देणे-घेणे नसते, मात्र या भांडणात चूक कोण ठरलं आणि बरोबर कोण, यात मात्र त्यांना रस असतो. त्यामुळेच प्रेक्षकसंख्या वाढत राहते, हेही जीवनने स्पष्ट केले.

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ!

यूटय़ूबची संकल्पनाच मुळात अशी आहे, ज्यातून जास्तीत जास्त मनोरंजन होते. त्यामुळे तरुण पिढी त्याकडे जास्त आकर्षित होते. यूटय़ूबवरचे कन्टेन्टही तसे असतात. त्यातले ‘यूटय़ूब वॉर’ हे निव्वळ बाळबोध मनोरंजन ठरले आहे, कारण या युद्धाचे रंजक चित्रण करून तिसरा यूटय़ूबर आपले सबस्क्राइबर्स वाढवीत असतो. अशी अनेक मंडळी असतात, ज्यांना या वादांबद्दल काही कल्पनाच नसते. त्यांनी सबस्क्राइब केलेल्या चॅनेलने अशी काही माहिती अपलोड केली तर ती त्यांच्याकडून फॉलो होते. मग या वादातील दोन्ही चॅनेल्स फॉलो केले जातात. इथे हा तिसरा माहिती देणारा चॅनेल महत्त्वाचा ठरतो आणि तो अशा वादांवर मला काय वाटते नामक आघाडी सुरू ठेवत आपली पोळी भाजून घेतो.

यूटय़ूबवर धोका?

यूटय़ूब माध्यमातून सध्या खोटेपणा वाढतो आहे. ट्रॅव्हल ब्लॉगर्स किंवा एखाद्या चालू घडामोडींवर मतं मांडणारे असे अनेक ब्लॉगर्स, यूटय़ूबर्स याचे व्हिडीओ फॉलो केले जातात. मात्र अशा वादांमध्ये यूटय़ूबर्सची भूमिका बदलू शकते. आपल्यावर झालेला आरोप खोडण्यासाठी त्यांच्याकडून खोटा आशय टाकला जाण्याची किंवा चुकीच्या गोष्टींना समर्थन देण्याचा प्रकार सहज होऊ शकतो. हा वाद एकाने कोणी तरी माघार घेतली तर संपू शकतो, मात्र बऱ्याचदा दोन्ही चॅनेल्सपैकी एकाची प्रेक्षकसंख्या वाढली की दुसरा आपोआप माघार घेतो. यात खरे-खोटे पडताळता येण्याची शक्यताही कमी असल्याने विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते

– जीवन कदम.