25 January 2021

News Flash

क्षितिजावरचे वारे : झूम बराबर

करोनाकाळात मात्र या पिढय़ांना एकमेकांशी अधिक सामंजस्याने वागणं भाग पडतं आहे.

सौरभ करंदीकर

अगदी गेल्या वर्षीपर्यंत ‘स्काइप’ प्रणालीची विजयी घोडदौड चालू होती; पण करोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात जेव्हा लॉकडाऊन करण्यात आला आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची खरी गरज निर्माण झाली तेव्हा मात्र ग्राहकांनी स्काइपला डावलून ‘झूम’ नावाच्या तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅपचा स्वीकार केला.

जनरेशन गॅप — दोन पिढय़ांमधील अंतर — गेल्या शतकात होतं त्याहूनही या शतकात अधिक प्रकर्षांने जाणवू लागलेले आहे. याला कारण आहे लोकोपयोगी तंत्रज्ञान. आपल्या सर्वाच्या गळ्यातला (हातातला, खरं तर) ताईत असलेला मोबाइल फोन घ्या. सुमारे २०—३० वर्षांपूर्वी प्रक्षेपित केलेल्या मानवनिर्मित उपग्रहांमध्ये होतं त्याहून अधिक क्लिष्ट तंत्रज्ञान आताच्या मोबाइल फोनमध्ये असतं.

अशा मोबाइल फोनवरून कॉल घेताना, व्हॉट्सअ‍ॅप वापरताना, गजर लावताना घरातल्या वरिष्ठ व्यक्तींची कशी तारांबळ उडते आणि त्याच क्रिया पाच-दहा वर्षांची मुले कशा सहजतेने करतात हे आपण पाहतोच. ही गॅप तीन वेगळ्या जनरेशन्समध्ये निर्माण झालेली आहे असं तज्ज्ञ मानतात.

लोकोपयोगी तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे या तीन पिढय़ा विभागल्या गेल्या आहेत — पहिली पिढी ‘डिजिटल आऊटकास्ट’ म्हणजे ज्यांचा डिजिटल तंत्रज्ञानाशी कधीही संबंध आला नाही आणि ज्यांना तो आला नाही, म्हणून काहीही फरक पडला नाही. दुसरी भरडली गेलेली पिढी म्हणजे ‘डिजिटल सेटलर्स’ — कोलंबसला जसा नवीन जगाचा शोध लागला तसा या (माझ्या) पिढीला ग्राहकोपयोगी डिजिटल तंत्रज्ञानाचा शोध लागला. ते समजून घेण्याशिवाय गत्यंतर नाही, हेही लक्षात आलं. नवीन वर्तन आत्मसात करावं लागलं — बँकेत जाण्याऐवजी एटीएम वापरणं, लायब्ररीमध्ये खेटय़ा घालण्याऐवजी इंटरनेटवरून हवे ते संदर्भ डाऊनलोड करणं, रेस्टॉरंटमध्ये न जाता मोबाइल अ‍ॅपवरून हवे ते खाद्यपदार्थ मागवणं. इतकंच काय, प्रत्यक्ष भेटून हास्यविनोद करण्याऐवजी जोक्स ‘फॉरवर्ड करणं, हे सगळं शिकावं लागलं आणि सरतेशेवटी तिसरी पिढी, जिला ‘डिजिटल नेटिव्ह’ असं संबोधलं जातं, ती तर या डिजिटल जगात जन्माला आलेली! सर्वव्यापी तंत्रज्ञान, म्हणजे जणू काही ऑक्सिजनच असं समजून बेफिकिरीने वाटचाल करणारी.

करोनापूर्व काळामध्ये या तीनही पिढय़ा सुखासमाधानाने एकत्र नांदत होत्या. आपापल्या डिजिटल—अवस्थेबद्दल त्यांना फारशी फिकीर नव्हती. ‘मला नाही बाबा तुमचं अ‍ॅप—बीप समजत’, ‘या मुलांचा वाढता स्क्रीन—टाइम कमी केला पाहिजे’, अशा स्वरूपाच्या भूमिका घेत आपला समाज वाटचाल करत होता.

करोनाकाळात मात्र या पिढय़ांना एकमेकांशी अधिक सामंजस्याने वागणं भाग पडतं आहे. मेसेज कसा फॉरवर्ड करायचा, ऑनलाइन शॉपिंग कसं करायचं, बँकेचे व्यवहार बसल्या जागी कसे पार पडायचे, ओटीपी म्हणजे काय, कॉन्टॅक्ट—लेस डिलिव्हरी करणार म्हणजे नेमकं काय करणार, इत्यादी प्रश्नोत्तरं घरोघरी झडत आहेत.

ग्राहकोपयोगी तंत्रज्ञान, विशेषत: मोबाइल अ‍ॅप आणि मोबाइल प्लॅटफॉर्म यांच्या प्रवर्तकांनासुद्धा आता कंबर कसावी लागते आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हा प्रकार या आधी नव्हता अशातली बाब नाही, परंतु आता ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘लर्न फ्रॉम होम’ — घरातून कार्यालयीन कामं तसंच शालेय आणि उच्चशिक्षण — आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा करणं अनिवार्य झालं आहे.

प्रत्यक्षात समोरच्याला न भेटता त्याच्याशी दृश्य आणि ध्वनी यांच्या माध्यमातून संवाद साधण्याची कल्पना १८७० च्या दशकात युरोप तसेच अमेरिकेत मांडण्यात आली होती. १९२० च्या दशकात बर्लिन आणि जर्मनीमधील अनेक शहरं कोअ‍ॅक्सीअल केबल्सद्वारा आणि रेडिओ लहरींचा वापर करून जोडली गेली होती, ज्यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केलं जात असे. १९९० नंतर इंटरनेटच्या माध्यमातून असे व्हिडीओ आणि ऑडिओ सिग्नल्स पाठवणं अधिक सुलभ झालं, परंतु या प्रयत्नांवर होणारा खर्च पाहता याचा वापर सैन्य आणि औद्योगिक क्षेत्रानेच अधिक केला.

सर्वसामान्यांच्या हातात मोफत व्हिडीओ कॉल करायची क्षमता ठेवणारी पहिली लोकप्रिय इंटरनेट सुविधा म्हणजे ‘स्काइप’. ‘स्काइप’चा जन्म २००३ चा. २०११ साली मायक्रोसॉफ्टने ‘स्काइप’ सुमारे साडेआठ अब्ज डॉलर्सला विकत घेतलं आणि अगदी गेल्या वर्षीपर्यंत या प्रणालीची विजयी घोडदौड चालू होती, पण करोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात जेव्हा लॉकडाऊन करण्यात आला आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची खरी गरज निर्माण झाली तेव्हा मात्र ग्राहकांनी स्काइपला डावलून ‘झूम’ नावाच्या तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅपचा स्वीकार केला.

या आश्चर्यकारक कलाटणीचं श्रेय जितकं ‘झूम’च्या रचनेला जातं तितकाच दोष मायक्रोसॉफ्टने ‘स्काइप’मध्ये केलेल्या बदलांना द्यावा लागेल. २०११ च्या खरेदीनंतर मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञांनी अनेक नवीन तांत्रिक करामती साध्या सोप्या ‘स्काइप’मध्ये आणायला सुरुवात केली आणि ‘स्काइप’ला क्लिष्ट, समजण्यास कठीण, वापरण्यास अवघड करून टाकलं. औद्योगिक क्षेत्राला ‘स्काइप’ आकर्षक वाटावं यासाठी हे केलं गेलं, पण त्यामुळे सर्वसाधारण ग्राहक दुरावला गेला. याउलट ‘झूम’ वापरायला अत्यंत सोपं होतं, ज्याचा सर्वानी स्वीकार केला.

एखादं यंत्र, फोन, कम्प्युटर किंवा अ‍ॅप वापरता आलं नाही तर डिजिटल आऊटकास्ट आणि सेटलर्स तो स्वत:चा दोष समजतात. मला समजलं नाही, म्हणजे मला शिकायची गरज आहे, असं म्हणतात. डिजिटल नेटिव्ह मात्र तितके दयाशील नाहीत. ‘मला पाहिजे तसं अ‍ॅपने किंवा विशिष्ट तांत्रिक प्रणालीने केलं नाही, मला समजून घेतलं नाही, तर तो त्या तंत्रज्ञानाचा दोष आहे,’ असं म्हणणारी ही पिढी!

आजच्या उपयोजकांना (युजर्स) तंत्रज्ञान विकसित करणाऱ्यांनी समजून घ्यावं, त्यांची मानसिकता, त्यांच्या इच्छा, त्यांची आवडनिवड, यांचा विचार करावा. त्याशिवाय बाजारपेठेत यश मिळवणं कठीण आहे. लोकोपयोगी तंत्रज्ञान जितकं सक्षम तितकंच ते लोकाभिमुख, लोकसुलभ असावं हे करोनाकाळाने आणि ‘झूम’सारख्या अ‍ॅपने अधोरेखित केलं आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 1:12 am

Web Title: article about zoom video conferencing app zws 70
Next Stories
1 लॉकडाऊन आणि लगीनघाई!
2  ‘पॅड’वुमन
3 सदा सर्वदा स्टार्टअप : संचालक मंडळाचे महत्त्व
Just Now!
X