वेदवती चिपळूणकर

एखादी व्यक्ती बहुआयामी असते, तर एखादी व्यक्ती स्वत:च्या क्षेत्रातली अनुभवी आणि जाणकार असते. फार थोडय़ा व्यक्ती बहुआयामी, अनुभवी आणि जाणकार तिन्ही असतात. अशा व्यक्ती जेव्हा एखाद्या क्षेत्रात काम करतात तेव्हा ते क्षेत्र समृद्ध होत असतं. मराठी, हिंदूी आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमांत अनेक वर्षं कार्यरत असलेलं आणि मराठी मनोरंजन क्षेत्रात मोलाचा वाटा असलेलं असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे वैजयंती आपटे. प्रिन्टं मीडियापासून ते वृत्तवाहिनीपर्यंत आणि दूरदर्शनपासून ते ‘चला हवा येऊ  द्या’ पर्यंत सर्वत्र त्यांचा सहभाग आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
Thakur College viral video
मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध महाविद्यालयात पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती, ओळखपत्र जप्त करून…
Appointment of financial institution
विरार-बोळींजमधील घरांच्या विक्रीसाठी वित्तीय संस्थेची नियुक्ती

एका लहान वृत्तपत्रासाठी काम करण्यापासून वैजयंती आपटे यांच्या करिअरची सुरुवात झाली. ‘मी स्वत: प्रामुख्याने क्राइम रिपोर्टिग करायचे,’ त्या सांगतात. ‘वृत्तपत्र लहान असल्या कारणाने प्रत्यक्ष रिपोर्टिग करून बातम्या आणणं, इतर ठिकाणांहून बातम्या घेणं, त्या लिहिणं, शुद्धलेखन तपासणं, पानावर बातम्या लावणं, प्रत्यक्ष छपाई, नंतरची दुरुस्ती, अशा सगळ्याच गोष्टी मी एकटीच करत असे. ते वृत्तपत्र संध्याकाळचं होतं. संध्याकाळच्या पेपरचा सगळा खप हेडलाइनवर अवलंबून असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेडलाइन. सगळीच कामं स्वत: केल्यामुळे अनुभवही चांगला मिळाला. त्या वृत्तपत्रासाठी मी जवळपास तीन ते चार वर्ष काम केलं’, असं त्या सांगतात. संध्याकाळच्या वर्तमानपत्रात दिवसभराच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सगळ्याच क्षेत्रांतल्या बातम्यांवर लक्ष ठेवणं आणि सतत तत्पर राहून काम करणं या दोन्ही गोष्टी वैजयंती आपटे यांनी एका वेळी सांभाळल्या.  १९९२ साली ‘कॉमनवेल्थ प्रेस युनियन’ची ‘हॅरी ब्रिटन फेलोशिप’ वैजयंती आपटे यांना मिळाली होती. शिष्यवृत्तीअंतर्गत त्यांनी तीन महिने लंडनला ट्रेनिंग घेतलेलं आहे.

सतत काम करणाऱ्या आणि नवीन कामाची इच्छा असणाऱ्या माणसाला एकाच ठिकाणी काम करून तोचतोचपणा जाणवायला लागतो. सुरुवातीच्या अनुभवानंतर माणूस साहजिकच मोठय़ा अनुभवासाठी प्रयत्न करतो. ‘नंतर कोणत्यातरी मोठय़ा वृत्तपत्रात अनुभव घ्यायची आणि करिअर करायची इच्छा होती म्हणून मी तो पेपर सोडला. मराठी पत्रकारितेत त्या वेळी मोठं नाव असणाऱ्या दोन्ही वृत्तपत्र समूहांमध्ये नोकरीसाठी मी प्रयत्न केले. मला तिथे नोकरी मिळालीही असती, मात्र त्या वेळी दोन्ही समूहांनी मला फील्डवर पाठवायला नकार दिला. मराठी पत्रकारितेत त्या वेळी असा पॉलिसी डिसिजन झाला होता की मुलींना फील्डवर पाठवायचं नाही. त्यामुळे मला फीचरसाठी काम करायला सुचवलं गेलं. पण मला रिपोर्टिगच करायचं होतं,’ वैजयंती आपटे सांगतात. फील्ड रिपोर्टिग करायच्या इच्छेमुळे त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये त्यांनी त्यांचं पुढचं करिअर सुरू केलं. त्यांनी सांगितलं, ‘फ्री प्रेस जर्नलमध्ये मला फार लहान वयात पॉलिटिकल रिपोर्टिग करायला मिळालं. सामान्यत: राजकारण हे क्षेत्र अनुभवी पत्रकारांना दिलं जातं. पण तिथे इंग्रजी वृत्तपत्रात मी एकटीच मराठी मुलगी होते. विधानसभेत सगळं कामकाज मराठीत चालतं आणि त्यातही सरकारी मराठीत! त्यामुळे मला पॉलिटिकल बीट दिलं गेलं. प्रत्येक बीटचा अनुभव स्वतंत्र वेगळा असतो. इंग्रजीत गेल्यामुळे मला इतर बीटही अनुभवायला मिळाले’.

माध्यमांमध्ये कालानुरूप बदल होत गेले. वृत्तपत्र ते वृत्तवाहिन्या हा प्रवास माध्यमांनी पाहिला. नवनवीन अनुभव घेण्याच्या उद्देशाने सुरुवातीला केवळ प्रिंट मीडिया म्हणजेच वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या वैजयंती आपटेंनी नंतर नव्याने उदयाला येत असलेल्या वृत्त वाहिन्यांमध्येही काम केलं. मात्र आताच्या तंत्रज्ञानाइतकं विकसित तंत्रज्ञान सुरुवातीच्या काळात नव्हतं. वैजयंती आपटे सांगतात, ‘ओबी व्हॅन्स, अपलिंकिंगचं तंत्रज्ञान या आणि अशा अनेक गोष्टी त्या वेळी अस्तित्वात नव्हत्या. बातम्या दिल्लीला पोहोचवाव्या लागत. त्यासाठी बातम्यांच्या टेप विमानाने दिल्लीला पाठवायच्या, दिल्लीला कोणीतरी त्या टेप उतरवून घेणार आणि मग चॅनेलपर्यंत त्या बातम्या पोहोचणार. त्यामुळे रात्री दहाच्या बातम्यांसाठी संध्याकाळी पाच ही आमची डेडलाइन असायची. दहाच्या बुलेटिनसाठी ज्या बाइट्स इथून रेकॉर्ड व्हायच्या ते सगळं काम आम्हाला पाचच्या आधी पूर्ण करावं लागत असे. या सगळ्या धावपळीनंतरच रात्री दहाच्या बुलेटिनमध्ये मुंबईच्या बातम्यांचा समावेश होऊ  शकत होता’. ईटीव्हीने ज्या वेळी मराठीत वृत्तवाहिनी सुरू केली तेव्हा चॅनेल लाँच होण्याअगोदर रिक्रुटमेंट करण्यापासून ते प्रत्यक्ष लाँचपर्यंत सगळी जबाबदारी वैजयंती आपटे यांनी सांभाळली होती.

आपण जे क्षेत्र निवडतो त्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्यासाठी, मिसळून घेण्यासाठी स्वत:मध्ये, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही बदल करावे लागतात. हे बदल जाणूनबुजून आणि प्रयत्नपूर्वक करायचे असतात. वैजयंती आपटे या मूळच्या पत्रकार असल्याने काही सवयी त्यांनी त्या काळात स्वत:ला लावून घेतल्या होत्या, तर मनोरंजन क्षेत्रात आल्यानंतर त्यासाठी पुन्हा काही बदल त्यांना स्वत:मध्ये करावे लागले. त्या म्हणतात, ‘पत्रकार असताना चौकस राहणं, चौफेर लक्ष ठेवणं, अशा गोष्टी मला अंगी बाणवाव्या लागल्या. त्या वेळी केवळ वर्तमानपत्र असल्याने आपल्याकडे इतरांपेक्षा काय वेगळी बातमी आहे याला खूप महत्त्व असे. एकाच फील्डवर जाऊनही प्रत्येकाने त्यातून काही वेगळी बातमी काढणं ही चुरस असायची. त्यामुळे ज्याला ‘नोज फॉर न्यूज’ म्हणतात तशी सवय लावावी लागली. मनोरंजन क्षेत्रात प्रोडय़ुसर म्हणून आल्यावर आर्थिक गणितांची जुळवाजुळव करण्याचीही हळूहळू सवय लागली. प्रॉडक्शन हाऊस स्वत:चं असलं की सगळ्यात जास्त जबाबदारी घ्यावी लागते. कलाकारांशी बोलण्यापासून ते वेळेत काम पूर्ण होण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं. मनोरंजन क्षेत्रातलं सगळं अर्थकारण समजून घेणं हीच माझ्यासाठी शिकण्याची गोष्ट होती.’

सुरुवातीला टीव्हीवर केवळ दूरदर्शन आणि डीडी नॅशनल अशी मोजकीच चॅनेल्स होती. त्या वेळी दूरदर्शनमध्येही वैजयंती आपटे यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. हळूहळू पत्रकारिता सोडून त्या जशा टेलिव्हिजन क्षेत्रात आल्या तसं त्यांनी ते क्षेत्रही आपलंसं करून घेतलं. ‘मानसी’ या त्यांच्या मालिकेला ‘राफा’ पुरस्कारही मिळाला. ‘विनयजी माझे नुसते मित्र किंवा पती नव्हते, तर ते माझे या क्षेत्रातले गुरू होते, त्यांनीच मला या क्षेत्रात कायम मार्गदर्शन केलेलं आहे,’ असं त्या म्हणतात. ‘आभाळमाया ही आमची पहिली मालिका आणि नंतर आम्ही आणखी काम करतच राहिलो. जसं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं तसं त्याच नावाच्या अंतर्गत आम्ही मालिका करायला सुरुवात केली. स्वत:ची नाटय़संस्था सुरू केली आणि ‘कुसुम मनोहर लेले’सारखी नाटकंही आम्ही त्यामार्फत केली. सर्वात अवघड आणि खडतर मार्ग आहे तो म्हणजे सातत्याने आर्थिक गणितं जुळवत हा सगळा गाडा चालवत राहणं! अनेकांनी मला नाटय़संथा किंवा प्रॉडक्शन हाऊस, किमान एक गोष्ट तरी बंद कर, असे सल्ले दिले. मात्र माझा निश्चय पक्का असल्याने मी ते खंबीरपणे सांभाळते आहे’, असं त्या सांगतात.

दूरदर्शनच्या कार्यक्रमांपासून ते आताच्या पूर्णपणे व्यावसायिक असलेल्या दैनंदिन मालिकांपर्यंत अनेकविध प्रकारच्या जबाबदाऱ्या वैजयंती आपटे यांनी समर्थपणे पेलल्या. प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत असलेल्या ‘चला हवा येऊ  द्या’ या कार्यक्रमाची संकल्पना, पाहुण्यांचा समन्वय, त्यात सादर होणाऱ्या प्रवेशांच्या थीम, त्यामागचा रिसर्च या सगळ्या गोष्टी त्या एकहाती सांभाळतात. सतत काहीतरी नवीन करत राहण्याच्या त्यांच्या स्वत:च्याच आग्रहामुळे आणि प्रयत्नांमुळे रिपोर्टर ते प्रोडय़ुसर हा यशस्वी प्रवास वैजयंती आपटे यांनी केला.

‘आमच्या वेळी स्त्री-पुरुष हा फरक माध्यमांत दिसून यायचा. आता मात्र मला तो फारसा आढळत नाही. मी काम करत असताना पत्रकारितेत तर फार कमी मुली असत आणि त्याहून प्रत्यक्ष फील्डवर असणाऱ्या मुली तर बोटावर मोजता येतील इतक्याच! नागपूर अधिवेशन कव्हर करायला मी जात असे तेव्हा तिथे मी धरून एखाद-दोनच स्त्रिया असत आणि त्यातही माझ्या वयाची बहुतेक वेळा मी एकटीच. रात्री-अपरात्री फील्डवर किंवा पॉलिटिकल पार्टीजना वगैरे मुली दिसायच्याच नाहीत. एकदोन वेळेला मी अशा पाटर्य़ाना जाऊन पाहिलं, मात्र माझ्या कामाच्या दृष्टीने उपयोगी असं काही घडत नाही म्हटल्यावर मीही अशा पार्टीजना जाणं बंद केलं. आता मात्र माध्यमांच्या क्षेत्रात खूपच सकारात्मक बदल दिसतायेत. खूप स्क्रिप्ट रायटर्स, असिस्टंट डायरेक्टर्स आता स्त्रिया आहेत. त्यामुळे आपोआपच त्या मालिकेत किंवा कलाकृतीतही महिलांच्या दृष्टीने विचार होतो.’

‘अपयश प्रत्येकालाच कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या वेळी बघावं लागतं. मात्र त्यातून स्वत:ला बाहेर काढून पुन्हा काम करणं गरजेचं असतं. ‘नथुराम गोडसे’च्या नाटकाच्या वेळी त्यावर आक्षेप, रोज पार्लमेंटमध्ये चर्चा, घराभोवती पोलीस संरक्षण अशा अनेक गोष्टींना तोंड दिलं. नाटक बंद करावं लागलं होतं. त्यानंतर एका मालिकेसाठी आठवडय़ाला सात लाख रुपये टेलिकास्ट फी भरावी लागत असे. त्या मालिकेसाठी हळूहळू करत प्रचंड कर्ज झालं आणि मालिकाही अर्धवट बंद करावी लागली. या सगळ्यातून आम्ही बाहेर आलो ते केवळ आमच्या सकारात्मक विचारांमुळे.. जेव्हा अपयश येतं तेव्हा इतरांना दोष न देता त्याची जबाबदारी स्वत: घेऊन पुढे जायला पाहिजे’.

– वैजयंती आपटे

viva@expressindia.com