|| सौरभ करंदीकर

आज सोशल मीडियामुळे एखाद्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल अनुभवाशिवाय मांडलेली मतं वणव्यासारखी पसरतात आणि येऊ घातलेल्या गोष्टींना आधीच बाहेरचा रस्ता दाखवतात. ‘गूगल ग्लास’ ग्राहकांच्या हातात पडण्याआधीच बदनाम झाला होता, आणि जागतिक बाजारात येऊ  शकला नव्हता, हे या जनमताचं एक दुर्दैवी उदाहरण.

वाफेवर चालणाऱ्या गाडय़ा जेव्हा रस्त्यावर आल्या, तेव्हा ‘घोडय़ाविना’ पळणारी गाडी पाहून ‘हे चेटूक आहे’ असं अनेकांना वाटलं असेल. ‘अशा वेगवान गाडय़ा अपघातास कारणीभूत ठरतील’पासून ते अगदी ‘अशा मंतरलेल्या गाडय़ा आमच्या बायकापोरांना घाबरवतील’पर्यंत सर्व प्रकारच्या टीकांची झोड उठली असेल. त्या काळातील गाडय़ांची तसंच जनतेची मतं पसरण्याची गती तशी कमी होती. आज सोशल मीडियामुळे एखाद्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल अनुभवाशिवाय मांडलेली मतं वणव्यासारखी पसरतात आणि येऊ  घातलेल्या गोष्टींना आधीच बाहेरचा रस्ता दाखवतात. ‘गूगल ग्लास’ ग्राहकांच्या हातात पडण्याआधीच बदनाम झाला होता, आणि जागतिक बाजारात येऊ शकला नव्हता, हे या जनमताचं एक दुर्दैवी उदाहरण. तंत्रज्ञानाची अशीच एक नवीन करामत येऊ  घातली आहे, ती म्हणजे स्वयंचलित वाहनं. जनमताचे, कायद्याचे आणि तांत्रिक आव्हानांचे अडथळे दूर झाले, तर काही दशकांतच आपल्या रस्त्यांवर ‘चालकाविना’ पळणाऱ्या गाडय़ा अवतरतील.

कुणीही ना चालवता चालणाऱ्या, परंतु आपल्या इच्छेबाहेर न जाणाऱ्या अशा जादूई गाडय़ा विज्ञान कथांमधून सत्यात येऊ  लागल्या त्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच. १९२५ साली न्यू यॉर्क शहरात ‘अमेरिकन वंडर’ या नावाची एक गाडी ड्रायव्हरशिवाय चालवली गेली. परंतु या गाडीचा खरा ड्रायव्हर काही अंतरावर दुसऱ्या गाडीत बसून एका अँटेनाच्या साहाय्याने ‘वंडर’ चालवत होता! आज खेळण्यांच्या दुकानात अशा गाडय़ा पैशास पासरी असतात. १९३० ते १९६० या काळात चालकाविना चालणाऱ्या गाडय़ा एकतर रेडिओ लहरींवर चालवल्या जात, किंवा रस्त्यावर बसवलेल्या विविध प्रकारच्या चुंबकाच्या साहाय्याने फिरवल्या जात, पण त्या गाडय़ांच्या मागे कुणातरी मनुष्याचा हात असे.

१९८० आणि १९९० दरम्यान मर्सिडीस, कार्नेगी मेलन विद्यापीठ आणि अमेरिकेच्या लष्करी संशोधन संस्थेने (DARPA – आपल्या सर्वाच्या परिचयाचे ‘इंटरनेट’ निर्माण करण्यात यांचाच हात होता) अशा स्वयंचलित वाहनांवर लक्ष कें द्रित केलं. लष्कराला अर्थातच अशा मानवरहित गाडय़ा रणांगणावर पाठवण्यात रस होता. परंतु रडार, आयडार (अनुक्रमे रेडिओलहरींच्या आणि प्रकाशकिरणांच्या साहाय्याने भौतिक माहिती गोळा करण्याचं तंत्र), कृत्रिम मज्जासंस्था, इत्यादी तंत्रज्ञानावर अधिक प्रयोग करण्यास उत्सुक असलेले शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विद्यार्थी यांचाही या वाटचालीत महत्त्वाचा सहभाग होता.

गाडी स्वयंचलित असणं याचा अर्थ केवळ ‘चालकाविना’ असा होत नाही. वाहनचालक जसा रस्त्यावर लक्ष ठेवून, वाहतुकीच्या नियमांचं पालन करत गाडी चालवतो तशीच स्वयंचलित गाडी चालली पाहिजे हा खरा उद्देश आहे. गाडीतील इंधन कमी झालं तर पेट्रोल पंप शोधणं, हे कार्य चालक सहजतेने करतो. एखाद्या प्रवाशाला गाडीतून उतरायला जास्त वेळ लागला तर तो त्याच्यासाठी थांबतो. अशी निर्णयक्षमता स्वयंचलित गाडय़ांमध्ये असली पाहिजे, यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.

स्वयंचलित वाहनात रडार आणि आयडार यांच्या साहाय्याने रस्त्यावरच्या प्रत्येक वस्तूचं – मग ती स्थिर असो अथवा वेगात असो – आकलन के लं जातं. वाहनातील कॉम्प्युटर या माहितीवर तात्काळ प्रक्रिया करून वाहनाची दिशा आणि वेग याबाबत निर्णय घेतो. ते निर्णय वाहनप्रणालीपर्यंत पाठवतो आणि मग वाहन आपला वेग किंवा दिशा बदलतं. ही  प्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी सातत्याने चालू असावी लागते.

अशा वाहनांना रस्त्यावर येऊ  द्यावं का? याबाबत विविध देशांनी कायदे केले आहेत. अशा स्वयंचलित गाडय़ांमुळे अपघात झाले तर दोष कुणाला द्यावा, भरपाई कुणी द्यावी याच्या चर्चा सध्या कायदेपंडितांमध्ये घडत आहेत. त्याला कारण म्हणजे स्वयंचलित वाहनांच्या इतिहासात घडलेला पहिला जीवघेणा अपघात. २०१८ च्या मार्च महिन्यात, उबरच्या स्वयंचलित गाडीने अमेरिकेतील अ‍ॅरिझोनाच्या टेम्पे या शहरात, ईलेन हर्जबर्ग या ४९ वर्षे वयाच्या महिलेला धडक देऊन तिचा बळी घेतला. ईलेन आपली सायकल घेऊन एका काळोख्या गल्लीतून अचानक गाडीसमोर आली असं काही साक्षीदारांचं म्हणणं आहे. गाडी स्वयंचलित असली काय किंवा नसली काय, हा अपघात अटळ होता असे तपासाअंती पोलिसांचं म्हणणं पडलं, परंतु उबरने आपल्या स्वयंचलित ताफ्यावर काम करणं तात्पुरतं स्थगित केलं.

जो बूंद से गयी, वह हौद से नहीं आती, तशागत स्वयंचलित गाडय़ांच्या चारित्र्यावर डाग एकदाचा लागला तो लागला. जगभरातल्या तंत्र-विरोधकांनी हा अपघात उदाहरण म्हणून घेतला आणि अशा वाहनांच्या कार्यक्षमतेबद्दल, कॉम्प्युटर प्रणालींच्या गुणवत्तेबद्दल शंका घेतली. याउलट मनुष्याच्या चुकांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता खरंतर सर्व वाहनव्यवस्था स्वयंचलित केली पाहिजे! स्वयंचलित वाहनं रहदारीचे नियम मोडणार नाहीत. मनाला वाटलं म्हणून भरधाव जाणार नाहीत. प्रवासापूर्वी मद्यपान करणं हे तर कॉम्प्युटर प्रणालीला केवळ अशक्य! रात्रंदिवस मालवाहतूक केल्यानंतर ट्रकचालकांचा ताबा सुटून झालेले अगणित अपघात आठवा. स्वयंचलित ट्रक चोवीस तास चालले तरी तितक्याच नियमाने मार्गक्रमण करतील, परंतु असा काळ आपल्या हयातीत येईल की नाही ते सांगता येत नाही.

आज टेस्ला, टोयोटा, जॅग्वारसारख्या कार कंपन्या, तसेच गूगलसारखे बलाढय़ तंत्रविकासक अशी परिस्थिती लवकरात लवकर यावी म्हणून प्रयत्नशील आहेत. उबर आणि वेमोसारख्या टॅक्सी कंपन्या मनुष्यबळावर विसंबून राहायला नको म्हणून, तर अमेझॉन आपल्या डिलिव्हरी मनुष्यरहित व्हाव्या म्हणून या क्षेत्रात उतरलं आहे. व्यावसायिक फायदा, सामाजिक सजगता, रोजगाराचा प्रश्न, कायदे या साऱ्यांच्या समुद्रमंथनानंतर आपल्या हातात स्वयंचलित वाहतूकव्यवस्था यावी हीच इच्छा!