News Flash

जाऊ तिथे खाऊ : बार्बेक्यू मिसळ

हॉटेल मॅनेजमेंटचा गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी दीपक थोरात या युवकाने आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून बार्बेक्यू मिसळीची सुरुवात केली.

(संग्रहित छायाचित्र)

मितेश रतिश जोशी

जगभरात कुठेही जा.. माणूस तीन गोष्टींच्याच शोधात असतो. मी एकाच गोष्टीच्या शोधात असतो ते म्हणजे खाणं. आता मूलभूत गरजेच्या गोष्टींच्या यादीत म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा यातही अन्नच प्रथम क्रमाकांवर आहे. ही यादी मी अगदी श्रध्दापूर्वक फॉलो करतो. त्यामुळे मी कुठल्याही शहरांत उतरलो की इथे खायचं काय? हे पहिलं शोधतो. मात्र ‘जाऊ तिथे खाऊ’ असा आपला स्ट्रेट फंडा असला तरी काहीही खाऊ असं आपल्याला नाही चालत. त्यामुळे जिथे जाऊ तिथे चांगलंच खाऊ या न्यायाने माझ्या भटकंतीतल्या चांगल्या खाऊच्या जागा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा सविनय प्रयत्न..

खाणं, राहणं आणि कपडे घालणं या तिन्ही ‘णं’ च्या यादीत सध्या वायफाय, नेटफ्लिक्स वगैरे वगैरे अनेक गोष्टी आपण घुसवू लागलो आहोत. पण आपल्याबरोबर सतत फिरणारी लक्झरी आणि टेक्नॉलॉजी या गोष्टी क्षणभरासाठी म्हणजे अगदी क्षणभरासाठीच बाजूला सारल्या तर उदरभरणाची क्रिया जास्त महत्त्वाची आणि गरजेची ठरते. त्यातही वायफायने मोबाईलवर नेटफ्लिक्स जितक्या वेगाने डाऊनलोड होत नसेल त्याहीपेक्षा वेगाने फूड अ‍ॅप दाखल होतात. त्यामुळे अर्थात जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तिथे खायला काय चांगलं मिळतं आणि कुठे मिळतं याची फोटोसहित सगळी माहिती आपल्यापुढे गूगल महाराज सादर करतात. त्यांनाही आपल्या पोटाची किती काळजी असते नाही..तर अशा या जिव्हातृप्ती देणाऱ्या आणि पर्यायाने मनाला सुखशांती देणाऱ्या खाऊच्या जागांविषयी बोलणं मस्ट आहे.

एक काळ असा होता की मुलं इटालियन, मेक्सिकन खायला बाहेर पडायचे. पण आताचा काळ इतका बदलला आहे की आपण कुठल्या तरी हटके फूड स्पॉट्सला जाऊन तिथल्या पदार्थावर केलेले हटके प्रयोग, हॉटेलचा कडक माहौल अनुभवण्यासाठी तिथे पोहोचतो. आपण महाराष्ट्रातल्या अशाच निरनिराळ्या हटके खाद्यपदार्थाची सफर करणार आहोत. खाद्यभ्रमंतीची नांदी करण्यासाठी मी आलो आहे, मिम्सच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शहरात आणि विद्येच्या माहेरघरात म्हणजेच पुण्यात.

पुणे शहराच्या वेशीवरून म्हणजेच चांदणी चौकातून खाली उतरलो रे उतरलो की खाद्यपदार्थाचे ठेले सुरू होतात. पुणेकरांनी जितकं कॅफे कल्चर जपलंय तितकंच स्ट्रीट कल्चरवरसुद्धा भरभरून प्रेम केलंय. पुणे शहराला लाभलेली मिसळ संस्कृती फार जुनी आहे. बेडेकर, श्रीकृष्ण, मोरया, श्री, रामनाथ नाव घेऊ तितकी कमी.. पण यांसारख्या पारंपरिक मिसळीचा काटा किर्र्र करायला आली आहे आगळीवेगळी ‘थोरात बार्बेक्यू मिसळ’. आज मी तुम्हाला याच मिसळची ओळख करून देणार आहे.

हॉटेल मॅनेजमेंटचा गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी दीपक थोरात या युवकाने आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून बार्बेक्यू मिसळीची सुरुवात केली. दीपकने करिअरच्या सुरुवातीला चायनीजचा ठेला थाटला होता. नंतर तो हॉटेल लाईनकडे वळाला. तिकडे फारसे यश न मिळाल्याने त्याच्या मनावर उदासीचे मळभ पसरले होते. यातून मग पुढे नैराश्य वाढतच गेले. या नैराश्यातून बाहेर येण्यासाठी त्याला बार्बेक्यू आणि मिसळ या दोन गोष्टींची मोठी साथ मिळाली. बार्बेक्यू आणि मिसळ हे तसे दोन पूर्ण भिन्न शब्द. आणि दोन पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे खाद्यपदार्थ. या दोन गोष्टी त्याच्या आयुष्यात एकत्र कशा आल्या हे जाणून घेण्यापेक्षा या त्याने एकत्रित कशा आपल्या पुढय़ात ठेवल्या आहेत हे जाणून घेण्यात मला जास्त रस होता. दीपकला हॉटेल उद्योजकच व्हायचे होते. पुणे, कोल्हापूर, नाशिक या शहरांमधल्या मिसळ त्याने चाखल्या होत्या. प्रत्येक शहरातील मिसळीच्या र्तीच्या चवीपासून ते मिसळ सव्‍‌र्ह करण्यापर्यंतची वेगवेगळी पद्धत त्याने अभ्यासली होती. या अभ्यास आणि प्रयत्नांतूनच त्याने ‘थोरात बार्बेक्यू मिसळ’ची ९ जानेवारी २०१९ मध्ये सुरुवात केली. नुकताच पहिला वाढदिवस साजरा केलेल्या या ‘थोरात बार्बेक्यू मिसळ’मध्ये पारंपरिक कोल्हापुरी, पुणेरी, नाशिक आणि जैन अशा चार प्रकारची मिसळ मिळते. त्यांचा रस्सा वेगवेगळा असतोच. हा रस्सा आणि त्याचसोबत मोठय़ा प्लेटरमध्ये कांदा-लिंबू,मटकी, दही, पोहे, उकडलेल्या बटाटय़ाची पिवळी भाजी मिळते. एका मोठय़ा टोपलीत बटर लावून भाजलेले टम्म फुगलेले पाव आणि ब्रेड टेबलची शान वाढवतात. बार्बेक्यू मिसळ म्हटल्यावर आपल्याला वाटत असेल की पारंपरिक मिसळ संस्कृतीला यांनी धक्का लावला असेल पण असे अजिबात नाही. मिसळच्या चवीला आणि त्यासोबतच्या जिनसांना कुठेही डावलण्यात आलेले नाही. मिसळीच्या चारही चवी जिव्हातृप्ती देतात. कोल्हापुरी रस्सा तर नाकाडोळ्यात पाणीच आणतो. जैन रश्शाची चव सात्विक आहे. मग आपल्या मनात प्रश्न येतो की बार्बेक्यू हा काय प्रकार त्यांनी केला आहे? तर इथे प्रत्येक टेबलवर बार्बेक्यू स्टँड आहे. अर्थातच त्याच्या खाली गरम कोळसे असतात आणि हे कोळसे वर ठेवलेल्या चारही मिसळचे रस्से सतत गरम ठेवतात. मिसळीच्या र्तीला बार्बेक्यू केल्याने एक स्मोकी फ्लेवर कुठेतरी जिभेलाही जाणवतो.

पुण्याची मिसळ संस्कृती मोठी आहे. त्यांच्या पंक्तीत बसायचा प्रयत्न आता ‘थोरात बार्बेक्यू मिसळ’ करते आहे. पुणेकरांना हा प्रयत्न सहजी रुचणारा नसला तरी आम्हाला आपला बार्बेक्यू आणि मिसळ या दोघांनाही एकत्र आणणारा हा भन्नाट प्रयोग खूप आवडला आहे. त्याचं कारण म्हणजे या दोन्ही गोष्टींना त्यांनी समान न्याय दिला आहे. आणि आश्चर्य म्हणजे ही मिसळ फक्त ९९ रुपयांत तेही अमर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. सगळं काही झाल्यावर इथे बडीशेप न देता गुळाचे खडे दिले जातात. हॉटेलचा माहौलही पारंपरिक आणि छान आहे. ‘थोरात बार्बेक्यू मिसळ’चे वर्षभराच्या आतच एकूण १२ आउटलेट्स पुणे शहरात पसरले आहेत. प्रत्येक ठिकाणचा माहौल थोडामोठय़ा प्रमाणात वेगळा आहे. पण या एकाच छताखाली कोल्हापूर, नाशिक आणि पुणे अशा श्रीमंत शहरांच्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी आणि मिसळीचा हा आगळावेगळा प्रकार अनुभवण्यासाठी मस्ट ट्राय बार्बेक्यू मिसळ !

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 4:06 am

Web Title: article on barbeque missal abn 97
Next Stories
1 व्हिवा दिवा : काजल जैन
2 भय इथले संपत नाही..
3 सदा सर्वदा स्टार्टअप : ‘स्टार्टअप’ची सरकारी व्याख्या..
Just Now!
X