अमृता अरुण

लॅक्मे फॅशन वीकची भव्यता पडद्यावरच अनुभवणाऱ्या फॅशनप्रेमींना या रॅम्पच्या पडद्यामागे डोकावयाची संधी क्वचितच मिळते. फॅशन वीक, डिझायनर्स, त्यांचे कलेक्शन आणि मॉडेल्स यांना जोडणारे अनेक दुवे पडद्यामागे काम करत असतात. कोण असतात हे चेहरे, त्यांची जबाबदारी काय असते, मॉडेल्स आणि त्यांचे कपडे यांची अचूक फिटिंग्ज कशी साधली जाते, या सगळ्याचा वेध घेत असताना फॅशनविश्वातील करिअरच्या संधींची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

नुकत्याच पार पडलेल्या ‘लॅक्मे फॅशनवीक समर रिसॉर्ट’ची चर्चा अजूनही फॅशन जगतात रंगते आहे. यंदाचा लॅक्मे फॅशनवीक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात बीकेसी येथील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये मोठय़ा दिमाखात पार पडला. मोठमोठे दिग्गज, सिनेतारका, गायक, नृत्यांगना, ब्लॉगर्स इ. या फॅशनवीकला उपस्थित होते. जिओ गार्डनच्या आत पाऊल ठेवताच आपण एका वेगळ्याच झगमगाटाच्या दुनियेत आल्याची प्रचीती पाहुण्यांना येत होती. बाहेरून चंदेरी दिसणारी ही रॅम्पवरची दुनिया साकारण्यासाठी प्रत्यक्षात किती मेहनत घ्यावी लागते हे बॅकस्टेजला गेल्यावरच कळते.

‘लॅक्मे फॅशनवीक’ची तयारी मुख्य तारखेच्या चार दिवस आधीच सुरू होते. तसे पाहता सेट, लाइट, मॉडेल्स सिलेक्शन, टीम सिलेक्शन या सर्वाची तयारी महिनाभर आधीच झालेली असते, परंतु ‘लॅक्मे फॅशनवीक’च्या चार दिवस आधी ‘फिटिंग्ज डे’ असतात. त्यात आखलेल्या वेळापत्रकानुसार डिझायनर्स आपले गारमेंट्स मॉडेल्सवर ट्राय करून बघतात. ‘लॅक्मे फॅशनवीक’ हा भारतातला महत्त्वाचा मानला जाणारा एक फॅशनवीक आहे. त्यामुळे त्याची आखणी ही अगदी शिस्तबद्धरीत्या केलेली असते.

‘लॅक्मे फॅशनवीक’मध्ये दोन स्टेज असतात. ‘द रनवे’ आणि ‘द स्टुडिओ’. यंदाच्या वर्षी ‘द स्टुडिओ’ हे नाव बदलून ‘द अटेलिअर’ असे नाव देण्यात आले होते. ‘द रनवे’ हा मुख्य स्टेज असून ‘द अटेलिअर’ हा स्टेज मुख्य स्टेजच्या तुलनेत आकाराने मोठा असतो; परंतु तो स्टेज डिझायनर प्रेझेन्टेशन करण्याकरिता आणि मोठा सेट उभारण्याकरिताच वापरतात. प्रत्येक स्टेजचा एक डायरेक्टर असतो. ‘लॅक्मे फॅशनवीक’मध्ये एकूण ४८ फीमेल मॉडेल्स आणि १२ मेल मॉडेल्स असतात. याखेरीज काही शोजमध्ये एक्स्ट्रा मॉडेल्सही असू शकतात. या मॉडेल्सची तीन गटांत विभागणी केली जाते. त्या गटांना ‘पूल’ असे म्हटले जाते. म्हणजे ‘पूल ए’मध्ये १६ फिमेल आणि ४ मेल मॉडेल्स असतात. अशा पद्धतीने पूल बी आणि पूल सीमध्येही विभागणी होते. प्रत्येक पूलचा एक बॅकस्टेज मॅनेजर असतो. या वर्षी पूल एच्या मॅनेजर नाझनीन पारख, पूल बीच्या मॅनेजर डेलनाझ दारुवाला, तर पूल सीच्या मॅनेजर कमल मेहता या होत्या. या मॅनेजरच्या हाताखाली ४ असिस्टंट मॅनेजर्स असतात. मॉडेल्सच्या गारमेंट्सवर टॅग लावणे, त्यांचे फोटो काढून लुकनुसार चार्ट बनवणे, प्रत्येक मॉडेलला एक ड्रेसर नेमून देणे, त्या ड्रेसरला आपली कामे समजावून सांगणे इ. कामे असिस्टंट मॅनेजर्स करतात.

‘लॅक्मे फॅशनवीक’मध्ये दिवसाला ८ ते ९ शोज होत असतात. प्रत्येक शोचा एक डायरेक्टर असतो. डायरेक्टरच्या सांगण्यानुसार मॉडेल्सची एन्ट्री-एक्झिट ठरवली जाते. नृत्यात जशी कोरिओग्राफी महत्त्वाची असते त्याचप्रमाणे रॅम्पवॉक करतानाही कोरिओग्राफी महत्त्वाची असते. त्यामुळे शो डायरेक्टर हा महत्त्वाचा मानला जातो. यंदाच्या वर्षी वाबिझ मेहता, रवणीत गोराया, नीरज गाबा, अनु अहुजा आणि लुबना अदम हे पाच शो डायरेक्टर होते. ग्रँड फिनालेचं डायरेक्शन अनु अहुजा यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. यंदाचा ग्रँड फिनाले मुके श मिल्स, कुलाबा येथे पार पडला. डिझायनर अमित अग्रवाल यांचे गारमेंट्स परिधान करून तब्बल ४६ मॉडेल्स एकाच वेळी रॅम्पवर अवतरल्या होत्या. त्यात चाहत्यांची लाडकी करीना कपूर-खान ही सिनेअभिनेत्री लॅक्मे फे स असल्यामुळे या शोची शो स्टॉपर होती. एकू णच या सोहळ्याचं दृश्य पाहण्याजोगं होतं.

या फॅशनवीकमध्ये विविध डिझायनर्स आपल्या गारमेंट्सचे कलेक्शन फॅशनप्रेमींसमोर आणतातच, परंतु ‘लॅक्मे’ हा एक मेकअप ब्रँड असल्यामुळे मॉडेल्सच्या मेकअपवरही तितकाच भर दिला जातो. या वेळी या फॅशनवीकमध्ये ‘बेटर इन थ्रीडी’ नावाची नवीन लिपस्टिक लॉन्च झाली. प्रत्येक शोसाठी मॉडेलला केला जाणारा मेकअप आणि त्यांचे हेअर काय असतील याची आधीच आखणी के ली जाते. त्यानुसार एका मॉडेलवर लुक ट्राय केला जातो व तो कन्फर्म झाल्यावर असिस्टंटसला शिकवला जातो. यंदा मरिआना मुकूच्यान आणि डॅनिअल हे दोन मेकअप आर्टिस्टस रनवेच्या शोचा मेकअप करणार होते, तर लॅक्मेची टीम ‘द अटेलिअर’मध्ये होणाऱ्या शोजचा मेकअप करणार होते.

ज्याप्रमाणे बॅकस्टेजचा एक मॅनेजर असतो त्याचप्रमाणे मॉडेल्सचा एक मॅनेजर असतो. प्रत्येक पूलच्या मॉडेल्ससाठी एक मॅनेजर नेमून दिला जातो. तसेच प्रत्येक शोसाठी एक क्रिएटिव्ह कन्सल्टंट किंवा स्टायलिस्ट असतो. या वेळी एकता रजनी, एडवर्ड आणि जेम्स हे स्टायलिस्ट होते. त्याचप्रमाणे एल. ई. डी. टीम आणि लाइट्स यांचीदेखील शोसाठी पूर्वतयारी झालेली असते, तर शो बघायला येणाऱ्या लोकांच्या येण्याजाण्याची व्यवस्था, शो पासेसची अरेंजमेंट, बॅकस्टेजची खानपानाची व्यवस्था, शंकांचे निरसन इत्यादींची जबाबदारी यंदा आय.एम.जी.च्या टीमने उत्कृष्टरीत्या पार पाडली. एकूणच या सर्व बॅकस्टेज टीमच्या मेहनतीने आणि कष्टाने झगमगणारा लॅक्मे फॅशन वीक समर रिसॉर्ट २०२० तर दिमाखात पार पडला आणि आता आतुरता आहे ती येणाऱ्या लॅक्मे फॅशनवीक विंटर फेस्टिव्हल २०२०..!