तेजश्री गायकवाड

आपल्या कपाटात वेगवेगळ्या रंगांचे कपडे खणा-खणांतून ओळीने सजवलेले असले तरी या ओळीत आपला आवडता असा एखादा रंग अंमळ जास्तच उठून दिसत असतो. अनेकदा काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कलेक्शन किती तरी जणींच्या कपाटात पाहायला मिळते. त्याचे एक कारण म्हणजे काळा रंग हा इतर रंगांना सामावून घेणारा रंग आहे आणि या रंगावर आपण इतर कोणत्याही रंगाचे कपडे सहज पेअर करू शकतो. एरव्ही कदाचित सणासमारंभाला काळ्या रंगांच्या क पडय़ांना दूर ठेवले जात असेल, मात्र थंडीत येणाऱ्या मकर संक्रातीला काळ्या रंगाचीच साडी किं वा ड्रेस परिधान करण्याची परंपरा आहे. फॅशनविश्वात इतर कोणत्याही रंगाप्रमाणे काळ्या रंगाचाही आपल्या मानसिकतेवर होणारा परिणाम कसा असतो हे जास्त जोखले जाते. काळा रंग हा अनेकदा प्रतिष्ठेचा, सत्तेचा, बुद्धिमत्तेचा म्हणून गणला जातो. कोळ्या रंगाची फॅशन ही अधिक स्टायलिश आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही फॅशनमध्ये काळया रंगाचा वरचष्मा पाहायला मिळतो. संक्रांतीच्या निमित्ताने या कृष्णरंगाचा साज वेगवेगळ्या पद्धतीने चढवता येऊ शकेल. विशेषत: काळी साडी या दिवसांत लोकप्रिय असली तरी त्यातही वैविध्य पाहायला मिळते आणि इंडो-वेस्टर्न फॅशनचा प्रभाव तरुणाईवर जास्त असल्याने त्या पद्धतीची फॅशनही तुम्ही सहजपणे कॅ री करू शकता..

इंडोवेस्टर्न

पारंपरिक साडीपेक्षा तुम्ही इंडोवेस्टर्न कपडय़ांचा प्रयोग नक्की करून बघा. एखाद्या जुन्या काळ्या साडीपासून नानाविध कपडे तयार करता येतील. यात तुम्ही साडीपासून लॉन्ग अनारकली, गाऊन, वनपीस, घागरा – चोळी, स्कर्ट, स्ट्रेट पॅन्ट आणि कुर्ता असे अनेक प्रकार बनवू शकता. या स्टाईलला पारंपरिक टच देण्यासाठी नाजूकशी नथ किंवा कोणताही पारंपरिक दागिना तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे नेहमीच्या साडीला फाटा देत इंडोवेस्टर्न फॅशन नक्की ट्राय करून बघता येईल.

वेस्टर्न स्टाईल

ज्यांना पूर्णपणे इंडियन किंवा इंडोवेस्टर्न स्टायलिंग करायची नसेल ते पूर्णपणे वेस्टर्न स्टाईलही नक्कीच करू शकतात. काळ्या रंगातील लॉन्ग शॉर्ट टॉप, क्रॉप टॉप, ब्लेझर, विंटर स्पेशल हायनेक टॉप, वनपीस, सिक्वेन्स वर्क केलेले गाऊन किंवा वनपीस तुम्ही परिधान करू शकता. पलाझो, अ‍ॅकल लेन्ग्थ पॅन्ट, फॉर्मल पॅन्ट ते अगदी पेन्सिल स्कर्टवरही टॉप्स पेअर करू शकता. ऑफिसला जाणाऱ्या तरुणींना अशी स्टायलिंग करून तिथेही हा सण नक्कीच अनोख्या पद्धतीने साजरा क रता येईल.

साडी आजही अनेक स्त्रिया पारंपरिक काळी चंद्रकला या साडीला प्राधान्य देतात. तर अनेक स्त्रिया जरीच्या काठापदराच्या काळ्या रंगाच्या साडीला प्राधान्य देतात. दरवर्षी तेच तेच नेसण्यापेक्षा तुम्ही सिल्कची पदराला थ्रेड वर्क केलेली साडीही नेसू शकता. नेटची साडीही तुम्ही नेसून पाहू शकता. या साडीवर तुम्ही थ्रीफोर्थ, पूर्ण स्लीव्जचे ब्लाऊज घालू शकता. तसेच नेटच्या साडीवर तुम्ही नेटच्या स्लीव्ज असणारे ब्लाऊज घालू शकता. यातही वेगळा लूक हवा असल्यास तुम्ही काळ्या रंगाचा क्रॉप टॉप साडीवर पेअर करू शकता. साडीवर लूक चेंजसाठी एखादं छानसं जॅकेट घालणं आणि नेहमीच्या गोल्डन रंगाच्या दागिन्यांपेक्षा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी नक्की ट्राय करा.

कुर्ती

साडी आणि वेस्टर्न स्टाईल या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधत आपण कुर्ती स्टायलिंग करू शकतो.  पंजाबी ड्रेस, धोती स्टाईल कुर्ती आणि लेगिंग्ज, अंगरखा कुर्ती आणि पलाझो, शर्ट कुर्ती, कफ्तान कुर्ती, केपच्या कुर्तीवर मिरर वर्क, वेगवेगळ्या प्रकारचे भरतकाम, जरीचं सिल्वर – गोल्डन वर्क केलेले सगळे प्रकार काळ्या रंगामध्ये बाजारात उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त पलाझो टॉप आणि जॅकेट, डेनिम कुर्ती हे कॉम्बिनेशनसुद्धा काळ्या रंगामध्ये बाजारात आहे.

मेन्स फॅशन

तरुणींप्रमाणे तरुणही आवर्जून रंग फॉलो करतात. फॉर्मल लूकसाठी काळ्या रंगाची ट्राऊझर, पॅन्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा फॉर्मल शर्ट घालता येईल. शर्टमध्ये सेमी फिट शर्ट नक्की ट्राय करा. काळ्या रंगाची जीन्स आणि त्यावर कुर्ता घातला तर तुम्हाला इंडोवेस्टर्न लूक सहज मिळेल. यावर तुम्ही काळ्या रंगाचे स्नीकर, मोजडी, कोल्हापुरी चप्पल घालून लूक पूर्ण करू शकता. जीन्सवरती टी—शर्ट, हाय नेक टी—शर्ट घालू शकता. काळ्या रंगाचा पठाणीसुद्धा तुम्ही घालू शकता. याशिवाय कुर्ता आणि त्याखाली स्ट्रेट पॅन्ट, धोती, बलून पॅन्ट घालत वेगळा लूक करता येईल. रेग्युलर प्लेन कुर्त्यांपेक्षा थ्रेड वर्क, भरतकाम केलेले, जरीची काठ असलेले कुर्ते नक्कीच वापरून बघा.

ता. क. – या सगळ्या आउटफिट्सवरती नेहमीच्या हलव्याच्या दागिन्यांबरोबरच ज्वेलरीचे अन्य प्रकारही तुम्हाला ट्राय करता येतील. चंपाकली हार, गोखरू बांगडय़ा/कडा, वज्रतिक ठुशी, फ्लोरल टेम्पल झुमके  नक्की पेअर करा.

viva@expressindia.com