वैष्णवी वैद्य

ही गोष्ट आहे अशाच एका १९ वर्षांच्या कारवेडय़ाची. हल्ली लहान मुलांमध्ये कार आणि बाइक्सचे वेड असणे ही काही आश्चर्याची गोष्ट  राहिलेली नाही. मुळातच कार म्हणजे चारचाकी प्रवासाचे वाहन इतकंच आपल्या डोक्यात येतं; पण या पठ्ठय़ाने मात्र त्याची व्याख्याच बदलून टाकली आहे. या युवकाचे नाव आहे सोहम सराफ. सोहमचा जन्म ठाण्याचा, पुढचे काही वर्ष त्याचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक होते आणि आता पुण्यात वास्तव्याला आहेत. साधारण दीड वर्षांचा असल्यापासून खेळण्यातल्या हॉट व्हील्स गाडय़ांचे सोहमला फारच आकर्षण होते; पण या आकर्षणाचे झोप उडवणाऱ्या स्वप्नात रूपांतर झाले ते अमेरिकेतल्या ‘कॉव्‍‌र्हेट’ संग्रहालयाला भेट दिल्यावर! त्या चारचाकांच्या यंत्रामध्ये काही तरी जादू होती जी सोहमला शोधायची होती.

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
aarzoo khurana advocate and wildlife photographer documents Indias 55 tiger reserves
वकिली सोडली अन् धरली अनोखी वाट; वाइल्डलाइफ फोटोग्राफीत रमलेल्या आरजू खुरानाची गोष्ट

सोहमच्या वडिलांकडे सुरुवातीला मारुती ८०० होती. मग मारुती झेन जी सोहमला जास्त आवडू लागली. अमेरिकेत त्याच्या या आकर्षणाची पाळंमुळं अधिक रुजत गेली. सोहम जसा मोठा होत होता तसे त्याच्याकडचा हॉट व्हील्स कार संग्रहही वाढत होता. आताच्या घडीला त्याच्याकडे ४०० हून अधिक हॉट व्हील्स कारचा संग्रह आहे. इतर मुलांप्रमाणे सोहमलाही कारसंबंधित व्हिडीओ, टीव्ही शोज बघायची आवड होती, पण हे सगळं एवढय़ापुरतंच त्याला ठेवायचं नव्हतं. मध्यमवर्गीय पालकांसारखी त्याच्याही पालकांची इच्छा होती की, त्याने इंजिनीअरिंग करावं. त्यानुसार ‘पेस आयआयटी’मध्ये शिक्षणही सुरू होते. अकरावीदरम्यान सोहमच्या लक्षात आले की, आपली ही आवड नाही. बारावी विज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने वर्षभराचा ब्रेक घेतला.

या ब्रेकदरम्यान ही चारचाकी जादू नक्की काय आहे याचा झपाटल्यासारखा अभ्यास केला. हे क्षेत्र काय आहे, याचा आवाका किती आहे, भारतात किती आणि कसे फोफावले आहे याचे संशोधन केले. अकरावीचे शिक्षण घेत असतानाच २०१६ मध्ये सोहमने ‘द ड्रायव्हर्स हब’ या नावाने संकेतस्थळ तयार केले. त्या वेळी तो अवघा १५ वर्षांचा होता! चारचाकी-दुचाकी वाहनांचे महत्त्व, या क्षेत्रातली कार्यपद्धती, यंत्रांच्या जडणघडणीचा प्रवास आजच्या तरुणाईसमोर आणणे हा संके तस्थळाचा उद्देश होता. हळूहळू त्याचा हा प्रवास जगासमोर येऊ लागला, लोकांना तो आवडू लागला आणि त्याने स्वत:चे यूटय़ूब चॅनेलदेखील बनवले. त्याच्या चॅनेलचे ५ हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनेलवर १५० हून अधिक कार आणि बाइक्सचे व्हिडीओज आहेत. ‘‘मार्केटमध्ये नवी कार लाँच झाली की त्याचे व्हिडीओज सहज इंटरनेटवर पाहायला मिळतात. ‘द ड्रायव्हर्स हब’वर आम्ही जुन्या कार मॉडेल्सची पुन:रचना करून त्याच्या गोष्टी सांगतो. ती कार कधीची आहे, कुठे आणि कशी वापरली गेली होती, त्यातल्या तांत्रिक गोष्टी सांगणं हा आमचा यूएसपी आहे. चॅनेलवर ‘होंडा एकॉर्ड के२४’ या गाडीचा व्हिडीओ पाहिला तर या कारकथा आम्ही कशा सांगतो हे नक्की कळेल,’’ असे सोहम सांगतो.

हे सगळे व्हिडीओज १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. २०१७ मध्ये सोहमच्या ‘द ड्रायव्हर्स हब’ने पहिलावहिला करार केला तो ‘ऑडी’सारख्या प्रशस्त कार कंपनीसोबत व्हिडीओज करण्याचा. ‘ऑडी’च्या सोशल मीडिया पेजवर जाहिरात आणि प्रसिद्धी व्हिडीओज टाकण्याचे काम सोहमने हाती घेतले. ‘कॉफी विथ ऑडी’ हा पहिला स्वतंत्र टॉक शो पुण्याच्या शोरूममध्ये त्याने आयोजित केला. सोहम पुढे सांगतो, ‘‘२०१८ हे साल ‘द ड्रायव्हर्स हब’साठी खूप महत्त्वाचे आणि यशस्वी ठरले. या क्षेत्रात आम्ही हळूहळू जम बसवत होतो. बरेच महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आम्हाला मिळत होते. १५ ऑगस्ट २०१८ आणि २६ जानेवारी २०१९ ला आम्ही पुण्यात अनेक प्रशस्त इव्हेंट्स केले. हे इव्हेंट्स व्यावसायिक दृष्टीने आमच्यासाठी खूप यशस्वी ठरले. ‘पंचशील रिअल इस्टेट’, ‘हॉटेल कॉनरॅड’, ‘जॅग्वार’ असे अनेक नामांकित ब्रॅण्ड्स आम्हाला इव्हेंट्सचे प्रायोजक म्हणून लाभले. आमचा चौथा सगळ्यात यशस्वी इव्हेंट होता ‘मिडनाईट रन’. जपानचे कार कल्चर आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न केला. लोक  आपल्या गाडय़ांची पुनर्रचना करून एखाद्या भूमिगत जागी भेटतात. आम्ही यासाठी वेस्टएण्ड मॉलची पार्किंग जागा बुक केली होती. जवळ जवळ १०० स्पर्धकांची हजेरी लागली होती, ज्यामध्ये ‘सुझुकी’पासून ते ‘ऑडी आर ८ सुपरकार’पर्यंत सगळ्या गाडय़ांचा समावेश होता.’’

सोहमने आतापर्यंत मर्सिडीज बेन्ज, लँबॉर्गिनी, पोर्शे अशा अनेक नामांकित कार कंपन्यांसोबत काम केले आहे. हे सगळं घडवून आणणारा क र्ताकरविता १९ वर्षांचा तुमच्याआमच्यासारखा युवक आहे. लहानपणीपासूनचा त्याचा छंद आता एवढा मोठा व्यवसाय झाला आहे. सोहमकडे त्याची सशक्त अशी अकरा युवकांची कारवेडी टीम आहे. सध्याच्या परिस्थितीतही ते स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांचे ई-मासिकही यंदा प्रकाशित झाले असून संपूर्ण मासिक फोन, व्हिडीओ कॉल्सच्या मदतीने डिजिटल स्वरूपात साकारले आहे. या मासिकाबद्दल सोहम सांगतो, ‘‘मासिकाची संपूर्ण प्रक्रिया एकमेकांना अजिबात न भेटता के ली आहे. मासिकाच्या रचनेपासून ते संपादनापर्यंतची सगळी धुरा माझ्या टीममधील तीन मुलांनी सांभाळली आहे.‘द ड्रायव्हर्स हब’चा उद्देश-ध्येय समजून घेऊन समर्पित वृत्तीने काम करणारी अशी टीम मला मिळाली आहे.’’ सध्या पुणे, चेन्नई आणि कोची या तीन ठिकाणचा व्याप सांभाळून सोहम शिक्षणही पूर्ण करतो आहे. पुण्याच्या ‘इंदिरा वाणिज्य महाविद्यालया’त तो बीबीएचे शिक्षण घेतो आहे. गेल्या दीड वर्षांत या सगळ्याला योग्य दिशा देण्यात सोहमला यश आले असून त्याला आता याचे मोठय़ा व्यवसायात रूपांतर करायचे आहे. काळानुरूप आपल्या ध्येयानुसार योग्य शिक्षण घेण्याची संधी आता तरुणाईला उपलब्ध असल्याबद्दल तो समाधान व्यक्त करतो.

गाडी हे केवळ वाहतुकीचं साधन नसून आपली ओळख व्यक्त करण्याचं माध्यम आहे. इतर देशांत गाडी खरेदी करताना लोक या दृष्टीने विचार करतात, असे तो सांगतो. गाडीबद्दलची ही चिकित्सक वृत्ती आणि कुतूहल निर्माण व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाची ताकद अजूनही आपल्याकडे लोकांना कळलेली नाही. ज्या तरुणांना त्यांचा स्वत:चा व्यवसाय करायचा आहे त्यांनी ही माध्यमे समजून घेणे गरजेचे आहे, असा संदेशही तो तरुणांना देतो.

अमेरिकन तत्त्वज्ञ इमर्सनने म्हटले आहे- ‘एव्हरी रिफॉर्म इज वन्स अ प्रायव्हेट ओपिनियन.’ प्रत्येक क्रांती, बदल म्हणजे प्रथम माणसाच्या डोक्यातून आलेली कोवळी कल्पना असते. अनेकदा समाज अशी कल्पना करणाऱ्याला वेडय़ात काढतो, मात्र हेच वेड जिद्दीने पूर्ण केले, की समाजाचाही त्यावर विश्वास बसतो. सोहमलाही असे अनेक अडथळे आले, पण त्याने ध्यास सोडला नाही. आज पुण्यातील आणि जगभरातील अनेक कार कंपनीचे मालक सोहमला आणि त्याच्या कामाला फक्त ओळखत नाहीत, तर त्याच्याशी सल्लामसलतही करतात. सोहमचा हा प्रवास अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरेल हे नक्की!

प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं वेड असतं, पण त्या वेडाचे ध्यासात रूपांतर झाले तर तो खरा कलाकार ठरतो. जो आपल्या क्षेत्रात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना जो स्वत:वर आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ते सत्यात उतरवण्याचे धाडस करतो तो प्रत्येक जण कलाकारच असतो.

viva@expressindia.com