विपाली पदे

दिवाळी हा सण भारतात प्रत्येक प्रांतात साजरा केला जातो. दिवाळी साजरी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असली तरी त्याबरोबर लागणारा ‘फराळ’ हा अगदी अविभाज्य भाग होय. हा असा एक मोठा भारतीय सण आहे जिथे सगळे नातेवाईक एकत्र येऊन गप्पा मारतात, फटाके फोडतात आणि मनमुरादपणे फराळाचा आस्वाद घेतात. प्रत्येक प्रांतागणिक बदलत जाणारी आपली खाद्यसंस्कृती असल्यामुळे फराळातदेखील प्रांतागणिक चविष्टता आढळून येते. त्याचप्रमाणे दिवाळी म्हटलं की आपण नातेवाईकांना भेटवस्तू देतो. त्यातही नावीन्य आणण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळेस आजच्या डाएट कॉन्शस सोसायटीचा विचारही आपल्याला करावाच लागतो. आपल्यासमोर मग पर्याय उपलब्ध असतात ते डाएट फराळाचे आणि फ्युजन मिठाई बॉक्सचे. सध्याच्या काळाप्रमाणे विविध खाद्यपदार्थ तयार करून, त्यातदेखील फ्युजन साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्या पदार्थाची मोठया प्रमाणात विक्री करणाऱ्या शेफ सोनाली राऊत आणि हर्षदा संधान या दोघी बहिणींची आगळीवेगळी जोडी आघाडीवर आहे.

ठाण्यात राहणारी सोनाली राऊत ही मुळात शेफ असून ती आणि तिची बहीण हर्षदा या दोघी ‘नमकशमक.कॉम’ नावाचा स्वत:चा फुडब्लॉगदेखील चालवतात. एवढेच नाही तर सोनाली हिने ‘राजश्री एन्टरटेन्मेंट’बरोबर शेफ म्हणून ‘रुचकर मेजवानी’ या यूटय़ूब चॅनेलसाठीही काम केले आहे. तसेच बजाज, रिलायन्स फ्रेश, केंट अशा मोठय़ा कंपन्यांबरोबर तिने कामे केलेली आहेत. मागची अनेक वर्षे ती स्वत:चे ‘कुक विथ सोनाली राऊत’ असे हिंदी भाषिक यूटय़ूब चॅनल यशस्वीपणे सांभाळते आहे, तर बहीण हर्षदा संधान हिचा ‘एंजेल डेलिकेट्स’ नावाचा ब्रँड असून त्याअंतर्गत ती केक आणि बेकरी प्रॉडक्ट्स मोठय़ा प्रमाणात विकते. पदार्थ बनविणे ही एक कला असून ती अगदी सर्वसामान्य गृहिणींपर्यंत पोहोचावी या हेतूने तयार केलेला तो ब्लॉग आहे. अगदी स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर, तसेच एखादा पदार्थ बनवताना त्यात काय काय घालावे तसेच त्याचे प्रमाण या गोष्टी त्या सांगतात. या ब्लॉगच्या मदतीने दोघी बहिणींनी दिवाळीच्या फराळाची संकल्पनासुद्धा वेगळ्या प्रकाराने मांडलेली आहे.

लहानपणी मामाच्या गावाला दिवाळी साजरी केली जायची आणि त्यासाठी वर्षभर त्या दिवसाची वाट आम्ही बहिणी बघत असायचो, असं त्या सांगतात. मग हळूहळू आमचं मामाकडे जाणं कमी झालं आणि आई नोकरी करत असल्यामुळे तिला स्वयंपाकात मदत करायची सवय आम्हाला लहानपणीच लागली होती. दिवाळी आली की फराळ करणं आलंच आणि मग आम्ही सगळ्या बहिणी खास फराळ करण्यासाठी एकत्र यायचो. मग आम्ही आवडीने बेसनाचे लाडू, रवा लाडू, चिवडा, करंजी, शंकरपाळे आणि चकली असे पदार्थ एकत्र बनवायचो, असं त्या सांगतात. नेहमीच्या आपल्या फराळाबरोबरच नॉर्थ इंडियन खासियत असलेले गव्हाचे लाडू, काजूने भरलेले डालमूठ, पिंनी आणि मोहंतिथाळ यांचा समावेशही आमच्या फराळात असायचा, अशी आठवणही त्यांनी सांगितली. या सगळ्या अनुभवातूनच की काय या नव्या व्यवसायाची बीजं त्यांच्या मनात रुजली असावीत. गेल्या वर्षी दिवाळीत सोनाली आणि हर्षदा या दोघींनी नेहमीच्या खाल्ल्या जाणाऱ्या फराळात नावीन्य आणायचे ठरवले आणि त्यांनी त्यात वेगवेगळे प्रयोग करून पाहायला सुरुवात केली. नेहमीच्या फराळाला वेगळेपणा देत चॉकलेट चिरोटे, शेजवान शेव, चॉकलेट करंजी, पिझ्झा फ्लेवर शंकरपाळे, कलरफुल चिरोटे आणि असे अनेक फ्युजन खाद्यपदार्थ आम्ही तयार केले होते, असं त्यांनी सांगितलं. दिवाळीत नेहमीपेक्षा वेगळं असं काही मिळत असेल तर त्याला कायम मागणी असतेच. त्यामुळे त्यांच्या या फ्युजन पदार्थानाही मागणी वाढू लागली. गेल्या काही वर्षांतील वाढती मागणी बघून आम्ही या वेळेस फराळ कसा वेगळा आणि पटकन होईल याकडे लक्ष दिलं. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्रातही आमची ओळख असल्याने वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवून त्याचे गिफ्ट पॅकिंग करून आम्ही विक्री केली, असं त्या सांगतात.

फ्युजन फराळाप्रमाणेच डाएट फराळ हीसुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आजकाल आलेल्या ‘डाएट कॉन्शस’च्या जमान्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने फराळ बनवायला सुरुवात केली, असं त्या सांगतात. या प्रकारच्या फराळात आम्ही चॉकलेट्स, विविध लाडू यांचा समावेश केला जे अर्थातच लो कॅलरी आहेत, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, तिखट म्हणून खास करून डाएट करणाऱ्याच नव्हे तर इतर ग्राहकांसाठीही आम्ही खास भाजलेली चकली तयार केली आणि त्यालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, असं त्या म्हणतात. त्याचबरोबर शुगरफ्री बाजरीचे भाजलेले चविष्ट लाडू त्यांनी खास करून बनविले. मोठय़ा प्रमाणात खजूर आणि गूळ वापरून वेगळ्या प्रकारचे गोड खाद्यपदार्थ आम्ही तयार केले जे गोडदेखील असतील आणि पौष्टिकदेखील. या मिठाईव्यतिरिक्त ‘फ्युजन ट्रीट्स’ हा नवीन प्रकार यंदाच्या दिवाळीत सुरू

के ला असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या पदार्थाला नवे रूप द्यायचे आणि ते छान जमले तर आपोआपच नवे काही सुचत राहते. त्याप्रमाणे या दोघींनीही आपल्या नावीन्यपूर्ण फ्युजन फराळाची ही यादी वाढतीच ठेवली आहे. ‘फ्युजन ट्रीट्स’ या नवीन प्रकारात आम्ही रसमलाई, गुलाबजाम केक, काजुपिस्ता कुकीज, रसमलाई चीजकेक आणि गुलाबजाम गुलकंद पान असे वेगवेगळे पदार्थ तयार केले, असं त्यांनी सांगितलं. असा हा फ्युजन बॉक्स बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतेच. अशा प्रकारे, नवनवीन फ्युजन असलेले फराळाचे पदार्थ बनवून एक वेगळा ट्रेंड या दोन शेफ बहिणींनी सुरू केला आहे.

बदलत्या लाइफस्टाइलप्रमाणे आता सगळेच बदलते आहे. अगदी कपडे असो किंवा खायचे पदार्थ असो, काळाप्रमाणे बदलत जाणारे हे ट्रेण्ड कोणालाही चुकलेले नाहीत, असं त्या सांगतात. या दोन्ही बहिणींचा हा खाद्यसंस्कृतीत बदल आणण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. त्या दोघींकडे बघून मनात येते की, त्यांची भाऊ बीज त्या एकमेकींना ओवाळून नाही तर एकत्र काम करून साजरी करत असतील. ग्राहकांना संतुष्ट करून त्यांची मिळणारी जी पोचपावती असते तीच त्यांची मोठी ओवाळणी असावी.

viva@expressindia.com