वेदवती चिपळूणकर

उत्पादक आणि ग्राहक यांच्यातल्या संवादाचं काम करणारी जाहिरात ही कला अवगत करून त्या क्षेत्रात टिकू न राहणं अवघडच! गेली दहा वर्षं स्वत:च्या पायावर या क्षेत्रात उभं असलेलं नाव म्हणजे प्रीती नायर. वीस वर्षांच्या नोकरीनंतर स्वत:ची अ‍ॅड एजन्सी सुरू करून त्यांनी ‘करी नेशन’ या त्यांच्या अ‍ॅड एजन्सीला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

टीव्ही आल्यापासून मालिकांप्रमाणेच फुलत गेली ती जाहिरातीची इंडस्ट्री. काळानुरूप जाहिरातींमध्ये बदल होत गेले, इंडस्ट्रीत बदल होत गेले. तांत्रिक प्रगतीमुळे छापील स्वरूपातल्या जाहिरातींनीही मोठय़ा प्रमाणात बदलांचा अंगीकार केला. वर्तमानपत्रांशी ‘टाय – अप’ असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडूनच जाहिराती द्यायच्या असतात एवढीच या क्षेत्राची पूर्वी असलेली ओळख हळूहळू बदलू लागली आणि ‘जाहिरात’ ही पासष्टावी कला म्हणून मोजली जाऊ लागली. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातल्या संवादाचं काम करणारी जाहिरात ही कला अवगत करून त्या क्षेत्रात टिकू न राहणं अवघडच! गेली दहा वर्षं स्वत:च्या पायावर या क्षेत्रात उभं असलेलं नाव म्हणजे प्रीती नायर. वीस वर्षांच्या नोकरीनंतर स्वत:ची अ‍ॅड एजन्सी सुरू करून त्यांनी ‘करी नेशन’ या त्यांच्या अ‍ॅड एजन्सीला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

बाबा कामानिमित्त बाहेर असतात आणि त्यांना आईसोबत वेळ घालवता येत नाही म्हणून प्रीती यांनी बीएचं शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच नोकरीला सुरुवात केली. मी घरातला पुरुष होऊन कमवेन आणि आईबाबांना एकत्र वेळ मिळेल, अशा विचारांनी त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. स्त्री – पुरुष हा भेदच न मानता कलेच्या क्षेत्रात सर्वांनीच स्वत:ला समान समजावं असं त्यांचं मत आहे. ‘जाहिरातक्षेत्रात तुमच्या कलेला महत्त्व असतं, तुमच्या स्त्री किंवा पुरुष असण्याला नाही’, असं म्हणणाऱ्या प्रीती नायर स्त्रियांनी काम करण्याबद्दल खूप आग्रही आहेत. ‘स्त्री आहे म्हणून कोणी मला काही वेगळी वागणूक दिली आहे असं या क्षेत्रात कधीच झालं नाही. तुमचं काम तुमच्या क्लाएंटला आवडणं या एकाच गोष्टीवर इथे सर्वाधिक लक्ष दिलं जातं. तू स्त्री आहेस म्हणून तुला जमणार नाही किंवा कमी पेमेंट मिळेल वगैरे असं काही इथे नाही आहे. मात्र मी बऱ्याच स्त्रियांना पाहिलं आहे ज्या स्वत:हून ड्रॉपआऊट होतात. घर, संसार, मुलंबाळं यांच्यामुळे त्यांना कामावर लक्ष देता येत नाही, काही जणींना इतक्या जास्त डिमांडिंग क्षेत्राशी फार काळ जुळवून घेता येत नाही, अशा अनेक कारणांमुळे स्त्रिया स्वत:च बाहेर पडतात’. हा आपला अनुभव असल्याचे सांगतानाच कुटुंबाला किंवा मुलाबाळांना महत्त्व द्यावं लागतं, प्राधान्य असतं आणि ते द्यायला हवं, पण म्हणून काम पूर्णच सोडून देणं ही योग्य गोष्ट नाही, असं प्रीती सांगतात. आपल्या शिक्षणावर आपल्या पालकांनी खर्च केला आहे, आपण शिक्षणासाठी मेहनत घेतली आहे, त्यामुळे आपली वर्थ दाखवून देणं महत्त्वाचं आहे. आपल्या क्षमता सिद्ध केल्या की मग आपल्याकडे आपोआपच आदराने बघितलं जातं’, असे अनुभवी बोल प्रीती यांनी ऐकवले. स्त्रीने तिच्या स्त्रीत्वाचा सकारात्मक किंवा नकारात्मक बाऊ  करू नये आणि पुरुषानेही तिला सामान्य माणूस म्हणूनच पाहावं, असे प्रीती यांचे विचार आहेत.

वर्क- लाईफ बॅलन्स सांभाळताना अनेकदा अनेकांचं व्यक्तिमत्त्वही दुहेरी होऊन जातं. वैयक्तिक आयुष्यात वेगळ्या पद्धतीने वागणारी व्यक्ती प्रोफे शनल आयुष्यात वेगळ्या पद्धतीने वागते. अनेकदा उत्तम प्रोफेशनल होण्याच्या आग्रहाखातर मूलत: एखाद्याच्या स्वभावात नसणाऱ्या अनेक गोष्टी केल्या जातात आणि मग त्या व्यक्तीला कायम तोच मुखवटा घालून फिरावं लागतं. प्रोफेशनल व पर्सनल आयुष्य वेगळं ठेवणं आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व दुहेरी बनून जाणं यात अगदी थोडासा फरक आहे. प्रीती म्हणतात, ‘मुळातच दोन ठिकाणी दोन वेगळ्या पद्धतींनी वागण्याची गरजच नाही. त्याहूनही एखाद्याने प्रीटेंड करायचं ठरवलंच तरीही जसजसा काळ जातो आणि काम वाढतं तसतसा तो मुखवटा सांभाळणं अशक्य होऊन जातं. ज्याला करिअर करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीचा बराचसा वेळ कामात आणि कामाच्या ठिकाणीच जातो. साधारण गोळाबेरीज केली तर पंच्याहत्तर टक्के वेळ तर आपण कामातच गुंतलेले असतो. किती काळपर्यंत एखादी व्यक्ती ही वेगळी प्रोफेशनल पर्सनॅलिटी टिकवू शकते? त्यापेक्षा मी जशी आहे तशीच सगळीकडे राहणं पसंत करते. माझं ‘करी नेशन’ हे माझं दुसरं कुटुंब आहे. त्यामुळे तिथे काही वेगळ्या पद्धतीने वागण्याची गरज नाही. मी जशी आहे तशीच वावरते.’ प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे वागायचं ठरवलं तर प्रत्येक क्षणाला वागण्याची पद्धत बदलत राहावी लागेल. त्यामुळे माणसाने स्वत:च्या स्वभावानुसार जी प्रतिमा तयार होईल ती स्वीकारावी जेणेकरून त्याला बदलायची गरज पडणार नाही.

क्रिएटिव्ह क्षेत्रात असणाऱ्यांना सतत काहीतरी नवीन ‘इन्स्पिरेशन’ची गरज असते, कामात तोचतोचपणा येऊ नये म्हणून ‘रिफ्रेश’ होण्याची गरज असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापले मार्ग शोधत असतो. प्रीती नायर यांना प्राण्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. वेळ मिळेल तसं ‘रेस्क्युअर’ म्हणूनही त्या काम करतात. प्राण्यांना मदत करून त्यांना समाधान मिळतं आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीला आवश्यक असणारी ऊर्जाही मिळते. त्याचबरोबर त्या म्हणतात, ‘जर कधी घर किंवा कु टुंब आणि करिअर यांच्यात निवड करायची वेळ माझ्यावर आली असती तर मीही अर्थात कुटुंबाचीच निवड केली असती. मात्र मला तसं कधी करावं लागलं नाही. तरीही सगळ्या कुटुंबाने एकत्र जमून धमाल करणं, गप्पा मारणं, या सगळ्यातून मला प्रचंड आनंद मिळतो. माझ्यासाठी तोच माझा विरंगुळाही आहे आणि स्वत:ला समृद्ध करणारा अनुभवही आहे. प्रत्येकवेळी नवीन चर्चा, प्रत्येक माणसाचे नवीन पैलू, नवीन विचार, नवीन गोष्टी कशा हाताळायच्या हे अनुभव मला नेहमीच एनरिचिंग वाटतात.’

अ‍ॅड एजन्सीचं काम हे केवळ वर्तमानपत्रात जाहिराती देणं इतकंच नसून दरवेळी क्रिएटिव्हिटीला, अर्थात सर्जनशीलतेला आव्हान देणारं हे क्षेत्र आहे. क्लाएण्ट्ला कल्पना पटत नाही, आवडत नाही तोपर्यंत त्या एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा काम करावं लागतं. एखाद्या जाहिरातीची कल्पना, मग ती छापील असो किंवा व्हिडीओ, क्लाएण्ट्ला पटली तर त्याच्यावर लेआऊट, डिझाइन किंवा स्क्रिप्टिंग, शूटिंग असे पुढचे संस्कार होतात. एक जाहिरात तयार होण्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या जाहिरातदाराची संमती आणि पसंती आवश्यक असते, असं त्या सांगतात. या सगळ्यासाठी मेहनत तर लागतेच, मात्र त्याचबरोबर कमालीचा संयम आणि प्रत्येक नकारानंतर नवीन काहीतरी देण्याची मानसिक तयारी असावी लागते. या सगळ्या अग्निदिव्यातून तावूनसुलाखून प्रीती नायर यांची ‘करी नेशन’ जाहिरात क्षेत्रात भक्कम उभी आहे.

क्रिएटिव्ह क्षेत्रात असणाऱ्यांना सतत काहीतरी नवीन ‘इन्स्पिरेशन’ची गरज असते, कामात तोचतोचपणा येऊ  नये म्हणून ‘रिफ्रेश’ होण्याची गरज असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापले मार्ग शोधत असतो. प्रीती नायर यांना प्राण्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. वेळ मिळेल तसं ‘रेस्क्युअर’ म्हणूनही त्या काम करतात. प्राण्यांना मदत करून त्यांना समाधान मिळतं आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीला आवश्यक असणारी ऊर्जाही मिळते.

या क्षेत्रात नवीन येणाऱ्या मुलींनी भरपूर कामाची मानसिक तयारी ठेवायला हवी. वेळा झेपत नसतील, घरच्या अडचणी असतील, सगळ्यावर मार्ग काढत काम करत राहायला हवं. कोणत्याही कारणासाठी ब्रेक घेतला तरी परत काम सुरू करण्याची इच्छा आणि जिद्द दोन्ही असायलाच हवं. आपण करत असलेल्या प्रत्येक कामाला काहीतरी उद्दिष्ट असायला हवं. कोणत्याही हाऊसवाईफने मी काहीच करत नाही असं म्हणता कामा नये. हाऊसवाईफ असणं हाच खरं तर सगळ्यात मोठा आणि तरीही फारसा मान दिला न जाणारा जॉब आहे. सारांश म्हणजे, स्त्रीनेच स्वत:च्या कामाला व्हॅल्यू दिली पाहिजे, मग ते काम घर सांभाळण्याचं असो किंवा ऑफिसमधलं असो.

– प्रीती नायर

viva@expressindia.com