05 August 2020

News Flash

डिझायनर मंत्रा : नाविन्याचा ध्यास हवा! – गौरव गुप्ता

भारतीय फॅशनइंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर्समध्ये त्याचं नाव आदराने घेतलं जातं.

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

भारतातील वस्त्रं आणि फॅशनइंडस्ट्रीमधील एक भक्कम आवाज म्हणून उदयास आलेला आणि जगभर त्याच लौकिकाने ओळखला जाणारा डिझायनर म्हणजे गौरव गुप्ता. अनेक मोठमोठय़ा फॅ शनशोज, मासिकं  आणि इव्हेंट्ससाठी त्याने काम केलेलं आहे. आणि त्यातही  एम्ब्रॉयडरीजमध्ये नेहमीच वेगळे प्रयोग करणारा फॅशनडिझायनर म्हणूनही गौरव गुप्ता हे नाव वेगळं ठरलं आहे. भारतीय फॅशनइंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर्समध्ये त्याचं नाव आदराने घेतलं जातं.

लहान वयात, करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळातच  फॅशन इंडस्ट्रीमधल्या मोठमोठय़ा लोकांसोबत त्याला काम करायला मिळालं. त्याच्या या प्रवासाबद्दल गौरव सांगतो, ‘सेंट्रल सेंट मार्टिन्स कॉलेज ऑफ आर्ट अ‍ॅण्ड डिझाइन’मधून मी माझी पदवी घेतली. मला बऱ्यापैकी लहान वयातच हुसेन चालयान यांच्याबरोबर काम करायला मिळालं. अल्टोरोमा अल्तामोडाने तर मला ‘फ्युचर ऑफ कुतूर’ म्हणूनच मान दिला होता. तसं बघायला गेलं तर मागे वळून पाहताना माझा गेल्या १५ वर्षांतील या क्षेत्रातील प्रवास अप्रतिम आहे. आम्ही आता मेन्सवेअर लाँच केलं आहे. याशिवाय आम्ही आमचं पहिलं फ्लॅगशिप स्टोअरसुद्धा सुरू केलं आहे. फॅ शन डिझायनर म्हणून माझा प्रवास खूप मोठय़ा आणि महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. त्याचंही विशेष कारण म्हणजे माझा ब्रॅण्डही आता १५ वर्षे पूर्ण करतो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे वर्ष म्हणजे एकप्रकारे मैलाचा दगड ठरले आहे, या शब्दांत त्याने आपली भावना व्यक्त केली. फॅशन इंडस्ट्री ही समाजासाठी खूप महत्त्वाच्या अर्थाने जोडली गेली आहे, अशी भावनाच सर्वसामान्यांमध्ये नसते. म्हणजे या क्षेत्रात राहून आपण सर्वसामान्यांसाठी काही करू शकणार नाही, अशीच भावना लोकांमध्ये मूळ धरून असते. मात्र गेली १५ वर्ष जोमाने या इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर फॅ शनकडे व्यर्थ आहे हे सगळं या दृष्टीने पाहणारे चुकीचे आहेत, असं स्पष्ट मत तो व्यक्त करतो. हे क्षेत्र सर्जनशील आहे, त्यामुळे यात काहीच नाही, असं अजिबात नाही. उलट या क्षेत्राच्या माध्यमातून आपण नवनवीन मोठे प्रकल्प निवडून समाजासाठी अर्थपूर्ण काहीतरी करू शकतो. आणि हे चांगले काम तर आहेच, पण एकाच वेळी सर्जनशीलतेचा आनंद आणि कामाचे समाधान देणारे असे हे क्षेत्र असल्याचे गौरव सांगतो.

१७५ अशी भली मोठी संख्या असलेल्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन गौरव त्याच्या मुंबई आणि दिल्लीमधल्या स्टोअरचं काम बघतो. एवढय़ा मोठय़ा व्यवसायाची सुरुवात करताना आणि तो यशस्वीपणे चालवताना मला अनेक गोष्टींची मदत झाली. त्यातल्या  महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे २०१३ साली मी भाग घेतलेला ‘कुतूर वीक’ आणि २०१५ साली भाग घेतलेला ‘लॅक्मे फॅशनवीक’, असं तो म्हणतो. या दोघांमुळे मला नवीन दिशा मिळाली. यातच माझं मेन्स वेअर कलेक्शनसुद्धा हायलाइट झालं. हे क्षण माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय आहेत, असं तो म्हणतो. डिझाईनिंगमध्येही अशा अनेक गोष्टी असतात, ज्यात फॅ शन डिझायनर स्वत:चा एक वेगळा विचार मांडण्यात कुशल असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर डिझायनर म्हणून लौकिक मिळवलेल्या गौरवच्या मते, त्याला संकल्पना मांडायला खूप आवडतात.

‘माझ्या संकल्पना या माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींपासून प्रेरणा घेणाऱ्या असतात. हीच प्रेरणा माझ्या कलेक्शनच्या स्केचेसमधूनही उमटते, असं तो सांगतो. आपल्या आजूबाजूला सातत्याने अनेकविध गोष्टी घडत असतात. याच गोष्टी मला डिझाइन करायला मार्गदर्शन करतात, असं सांगणारा गौरव गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने वेडिंग ड्रेसमध्ये प्रयोग करत आला आहे. त्याने नुकत्याच झालेल्या ‘द व्होग वेडिंग शो’ मध्ये भाग घेत त्याचं कलेक्शन सादर केलं होतं. त्याबद्दल तो सांगतो, वेडिंग कलेक्शनमध्ये मोठे लेहेंगे, टायर्ड गाऊन, लाइटवेट साडी गाऊन लव्हेंडर, रोझवुड गुलाबी आणि चांदी अशा वेगवेगळ्या रंगात आहेत. कलेक्शनमध्ये अ‍ॅबस्ट्रॅक्ट लाइन्स, फ्लूइड आणि वेव्हसारखे सिल्हाऊट्स आणि ड्रेपसुद्धा आहेत, असे त्याने सांगितले. वधूच्या पोशाखांसाठी व्हर्सायच्या राजवाडय़ाच्या सुशोभित केलेल्या ज्या भिंती आहेत, त्या भिंतीवरचं नक्षीकाम, स्थापत्य कला यातून आपल्याला प्रेरणा मिळाली असल्याचे त्याने सांगितले. आणि हे कलेक्शन जरदोसीने, हातमागाने, टेक्स्चर चिकनकारीने सजवलं आहे, असं तो सांगतो. १५ वर्ष सातत्याने कपडय़ामध्ये प्रयोग करत नवनवीन कलेक्शन बाजारात आणल्यानंतर गौरवने यावर्षी जुलै महिन्यात ज्वेलरी लाइनसुद्धा बाजारात आणली आहे. त्याने ‘गौरव गुप्ता ओकेजन फाइन ज्वेलरी’ एका फॅ शन वीकमध्ये लॉन्च केली. त्याविषयी तो म्हणतो, मला बऱ्याच वर्षांपासून कुतूर ज्वेलरी लाइन सुरू करण्याची इच्छा होती. आणि फायनली तो क्षण आला. ही खास ग्राहकांसाठी त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन बनवलेली ज्वेलरी आहे, असे त्याने सांगितले. यातले स्टेटमेंट पीस अगदी कधीही आऊट ऑफ फॅशन जाणारे नाहीत. हे कलेक्शन माझ्या मेहरौली येथील दुकानात किरकोळ विक्रीसाठीही उपलब्ध आहे, असे तो सांगतो. एरव्ही ‘व्होग’, ‘एल’ऑफिएल, ‘एले’ अशी बरीच प्रकाशने आहेत जी नियमितपणे त्यांच्या कव्हर्स आणि संपादकीयांवर वेगवेगळे  ब्रॅण्ड घेऊन येत असतात. त्यामध्येही गौरव गुप्ताचं कलेक्शन अनेकदा झळकत असतं.  तर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी सातत्याने रेड कार्पेटवर हजेरी लावतात. त्यापैकी काही म्हणजे स्काइलर ग्रे, ऐश्वर्या राय, निकोल शेरझिंगर, ज्युली बर्मन, दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर असे सेलिब्रिटी आवर्जून गौरवच्या कलेक्शनला पसंती देतात. त्यांच्यासाठी अनेकदा गौरव गुप्ता खास डिझायनर पीस बनवतो.

एवढी वर्ष फॅ शन इंडस्ट्रीतकाम केलेल्या गौरव गुप्ताचं नव्याने या क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या डिझायनरसाठी एकच ठाम सांगणं आहे ते म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये कुठलेही शॉर्ट कट नाहीत. अखंड मेहनतच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. त्यामुळे अखंड मेहनतीची तयारी, यशापयश बाजूला ठेवून सातत्याने आपण वेगळं काय देऊ शकू याचा अभ्यास करत ते लोकांसमोर आणत राहणं हाच या क्षेत्रातील यशाचा मंत्र आहे, असे तो पुन:पुन्हा सांगतो.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 1:33 am

Web Title: article on designer gaurav gupta abn 97
Next Stories
1 फ्युजन फराळ आणि आम्ही दोघी..
2 गोड खाणार त्याला..
3 व्हिवा दिवा : प्रिया शिंदे
Just Now!
X