गायत्री बर्वे-गोखले

या स्पर्धेच्या युगात एकेका गुणांकाने एखाद्या कोर्सला अ‍ॅडमिशन मिळणार की नाही? यावर सर्वकाही अवलंबून असतं आणि पर्यायाने त्या मुलाचं संपूर्ण करिअर आणि भवितव्य पणाला लागलेलं असतं. अशा वेळी भरपूर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि मोठय़ांच्या आशीर्वादाबरोबरच आपला पाल्य काय खातो हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

शिक्षण घेणे म्हणजे काय तर नवीन गोष्टी शिकणे आणि त्या एकाग्र होऊन लक्षात ठेवणे. पण सगळ्याच पालकांची तक्रार असते की गोष्टीची पुस्तकं आवडीने वाचणारी मुलं अभ्यासाचं पुस्तक समोर आलं की मात्र झोपी जातात. याचं कारण गोष्टी वाचण्यात आपल्याला मुळातच इंटरेस्ट असतो, पण अभ्यास हा जिव्हाळ्याचा विषय नसल्याने आपण त्याकडे लक्ष देत नाही. अशा वेळी या नावडत्या गोष्टी म्हणजेच अभ्यास लक्षात राहण्यासाठी आपला मेंदू जागा आणि सजग असणे महत्त्वाचे ठरते. नेमकी हीच गोष्ट आपण काय खातो आणि त्यात केलेल्या बदलांमुळे सुधारू शकते.

सकाळी लवकर उठून केलेला अभ्यास लक्षात राहतो हे जरी खरं असलं तरी कित्येक विद्यार्थ्यांना रात्री जागून अभ्यास करायची सवय असते. पण असे जागून मग दुसऱ्या दिवशी उशिरा उठल्याने किंवा पुन्हा लवकरच उठल्याने दिवसाचे शरीराचे गणित पूर्ण बदलते त्यामुळे पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो. पण आपण खात असलेल्या गोष्टी आणि काही सवयी थोडय़ा बदलल्या तर आपण आपल्या शरीराला काहीही त्रास न होता आपल्या झोपेचा कोटा ७ ते ८ तासांवरून ४ ते ५ तास इतका कमी करू शकतो. अतिशय हलका आणि सात्त्विक आहार, मेडिटेशन, ताठ बसणे या गोष्टींनी अनाकलनीय फरक पडलेला आपल्याला जाणवेल.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शिक्षणाच्या वयात आपण शाकाहारी असणं फायद्याचं आहे. हे विधान कदाचित बिनबुडाचं वाटू शकेल, पण याची कारणं सांगते. आपलं शरीर म्हणजे एक प्रकारचं मशीन आहे. आणि अन्न हे ते शरीर चालण्यासाठी लागणारं इंधन आहे. समजा पेट्रोलच्या गाडीत डिझेल घालून ती चालवली तर ती जशी तिच्या पूर्ण क्षमतेने चालणार नाही तेच शरीराच्या बाबतीत घडेल. काही विशिष्ट कम्युनिटीजच्या आहाराच्या सात्त्विक, चांगल्या सवयी, त्यांची कामाची पद्धत, त्यांचा इंटेलिजन्स आणि त्यांना मिळालेलं यश पाहिलं तर फरक जाणवेल की शाकाहाराचे किती फायदे असू शकतात. आपल्याला अभ्यासावर फोकस करण्यासाठी संतुलित ऊर्जेची गरज असते जी आपल्याला सात्त्विक अन्नातून मिळते. त्याशिवाय आपली शरीररचना ही नैसर्गिकरीत्याच शाकाहारासाठी बनलेली आहे. आपल्याला प्राण्यांप्रमाणे मांसाहार करण्यासाठी दात आणि नखे नाहीत. निव्वळ जगण्यासाठी पर्याय म्हणून मांसाहारास सुरुवात झाली, असे इतिहास सांगतो.

याशिवाय एक महत्त्वाचा मुद्दा असा की शाकाहार म्हणजे भाज्या, फळे ही सजीव स्थितीत असतात. आपण जेव्हा कच्च्या भाज्या, फळे खातो तेव्हा शरीराला ते पचवण्यासाठी तितकेसे कष्ट पडत नाहीत, कारण वनस्पतींची रचना ही खूप साधी आहे. त्यामुळे त्या खाऊन पचवल्यावर जडत्व किंवा सुस्ती येत नाही अशा वेळी आपल्या शरीराला जास्त झोपेची गरज भासत नाही. कमी झोप घेऊनही आपण उत्साही राहतो. याउलट मांसाहार करताना तो निर्जीव स्थितीत असतो आणि अशी क्लिष्ट निर्जीव शरीररचना जेव्हा आपलं शरीर पचवण्याचा प्रयत्न करते तेव्हा पचनसंस्था दमते आणि जडत्व येते, सुस्ती येते व आपण कोणत्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आपल्याला झोप येते. म्हणूनच आपला फोकस जास्तीतजास्त वाढवण्यासाठी विद्यार्थी अवस्थेत शाकाहार केलेला उत्तम. इतिहासात आपण वाचतो की पूर्वीच्या काळी ऋषीमुनी कंदमुळे खाऊन जगत असत आणि तसे करून ते कित्येक दिवस ध्यानस्थ बसू शकत असत. त्याचप्रमाणे विद्यार्थीवर्गाने निदान परीक्षांच्या काळात शाकाहाराचे पालन केल्यास जास्तीतजास्त जागून अभ्यास करणे आणि तो सहज लक्षात ठेवणे सोपे होईल आणि त्याचा चांगला परिणाम त्यांच्या रिझल्ट्सवर नक्कीच दिसून येईल.

परीक्षेच्या आधीपासून आणि परीक्षेच्या काळात एक नियोजित रूटीन सेट करून ठेवल्यास विद्यार्थ्यांचा ताण कमी होऊन त्यांना फोकस करणं सोप्पं जाऊ  शकेल.अशा वेळी पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मानसिक आधार देणे आणि त्यांच्या आहाराची काळजी घेणे या दोन गोष्टी सांभाळल्या की झालं.

परीक्षा काळात आहाराची काळजी कशी घ्यावी?

* ब्रेकफास्ट हा प्रोटिन्सयुक्त असावा. मोड आलेली कडधान्ये, अंडी, दूध, फळे भाज्या यांचा वापर करावा.

* एकाच वेळी भरपूर जेवण्यापेक्षा दिवसातून ४ ते ५ वेळा थोडे थोडे खावे.

* जंक फूड खाण्यापेक्षा भूक लागेल तेव्हा सुकामेवा, फळे खावीत.

* चहा-कॉफी सेवन करण्याचे प्रमाण कमी करावे. अभ्यास करताना जागायचे म्हणून सारखे कॉफी किंवा चहा पिणे टाळावे.

* रात्रीच्या वेळी हलका आहार घ्यावा. जेवण आणि झोप यामध्ये कमीतकमी दोन तासांचे अंतर असणे आवश्यक आहे.

* तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

* अभ्यास करताना मध्ये मध्ये पाणी प्यायला विसरू नये. बहुतेक परीक्षा या भर उन्हाळ्यात असल्याने नारळपाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत यांचे सेवन करावे.

* बाहेरचे पदार्थ खाणे, हॉटेलमधून अन्न मागवणे टाळावे. यामुळे पोट बिघडणे, अ‍ॅसिडिटी असे आजार होऊन ऐन परीक्षेत संकट येऊ  शकते. त्यामुळे काही दिवस मनावर ताबा ठेवून बाहेरचे खाणे पूर्ण बंद करावे.

* योगा, मेडिटेशन किंवा मनाला शांती देणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा अवलंब करावा ज्यामुळे मन उत्साही राहील.

* पालकांनी मुलांवर ओरडणे, ताण देणे टाळावे यामुळे मुलांचा आत्मविश्वास डगमगणार नाही. आणि ती टेन्शन न घेता परीक्षा देऊ  शकतील.

अशी काही सुपर ब्रेन फू ड्स आहेत ज्यांच्या सेवनाने मेंदू जास्तीतजास्त कार्यक्षम राहण्यास मदत होईल. या पदार्थाचा विद्यार्थ्यांच्या आहारात जरूर समावेश करावा ज्यामुळे त्यांची आकलनशक्ती वाढेल आणि चित्त एकाग्र होईल.

दही : लढाईवर जायचे असो किंवा परीक्षेला, आपल्याकडे घरातून निघताना हातावर दही द्यायची पद्धत आहे. ही पद्धत का असावी? दही आपली इम्युनिटी, आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवतं. परीक्षेला जाताना आपल्या आजूबाजूला असंख्य इतर विद्यार्थी, त्यांचे पालक असतात अशा वेळी आपल्याला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ  नये यासाठी फक्त घरातून निघतानाच नाही तर रोजच्या आहारातही दही खाणं फायद्याचं आहे.

बदाम आणि अक्रोड : बुद्धी तल्लख होण्यासाठी रोज बदाम आणि अक्रोड खावा हे आपले पूर्वज सांगत आलेले आहेत. यातील व्हिटामिन ईमुळे आपली मेमरी स्ट्राँग होण्यास मदत होते.

बीटरूट : बिटातील नायट्रेट्स मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढवतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

शेंगदाणे : महागडय़ा सुक्या मेव्याला स्वस्त आणि अतिशय पौष्टिक असा उत्तम पर्याय म्हणजे शेंगदाणे. मेंदूतील पेशी कार्यरत राहण्यासाठी शेंगदाण्यातील रिव्हरेट्रॉल मदत करते.

अंडय़ाचा बलक : अंडय़ाच्या बलकातील झिंक आणि कोलीन नावाचा घटक आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यास मदत करतं.

अळशी किंवा फ्लॅक्स सिड्स : यातील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्समुळे आकलनशक्ती वाढते.

शाळा-कॉलेज असो वा त्यापुढील उच्च शिक्षण, आपण पाहतो की एकंदरीत हल्लीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षांचा प्रचंड ताण असतो, त्या प्रेशरमुळे आत्महत्येसारख्या घटनासुद्धा घडतात अशा वेळी जेवणातील साधे सोपे बदलसुद्धा आपलं शरीर आणि मन निरोगी ठेवण्यास खूप उपयोगी ठरतात. शेवटी परीक्षेत किती मार्क  मिळतात यापेक्षा तुम्ही जीवनात किती यशस्वी होता हे महत्त्वाचं आहे आणि या यशाचा उत्तम आहार आणि निरोगी शरीर असल्याशिवाय काहीही उपयोग नाही. शेवटी शिर सलामत तो पगडी पचास.

viva@expressindia.com