29 March 2020

News Flash

जाऊ तिथे खाऊ : आम्ही पोहेकर!

पोह्य़ांचे वेगवेगळे १४ अवतार मला पुण्यात एकाच छताखाली चाखायला मिळाले.

(संग्रहित छायाचित्र)

मितेश रतिश जोशी

पिवळ्याधम्मक पोह्य़ांवर ओल्या खोबऱ्याची पखरण, जिव्हातृप्ती वाढवायला हिरव्याकंच कोथिंबिरीची आणि चटकदार लिंबाच्या रसाची सोबत लाभलेले ‘पोहे’ हा महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचा एक मोठा भाग आहे. याच पोह्य़ांचे वेगवेगळे १४ अवतार मला पुण्यात एकाच छताखाली चाखायला मिळाले.

सकाळी उठल्यावर नाश्त्याला जसे पोहे हवेत तसेच बघण्याच्या कार्यक्रमालासुद्धा पोहे हवेच, कारण ‘शास्त्र आहे ते’. पोहे म्हणजे मराठी घरांमध्ये उठता बसता खाल्लं जाणारं आजच्या भाषेतलं इन्स्टन्ट फूड. पोह्य़ांना आजच्या भाषेत बोलायचं तर एकदम ग्लॅमरच आलं आहे. घरचे पोहे, दडपे पोहे, नागपुरातले र्ती पोहे, इंदुरी पोहे, फार फार तर कुरमुरे घालून केलेली पोह्य़ाची भेळ एवढीच पोह्य़ातली विविधता सर्वाना ठाऊक आहे; पण हेच पोहे बर्गरच्या रूपात, लाडूच्या रूपात, नगेट्सच्या रूपात, न्यूट्री प्लेटच्या रूपात ताटात आले तर? नवल वाटेल ऐकून, पण हो..! पुण्यात हे प्रकार ‘आम्ही पोहेकर’ नामक ठेल्यावर आता मिळू लागले आहेत.

ही संकल्पना आहे पुण्यातल्या सहा इंजिनीअरिंगच्या जिवलग मित्रांची, जे अभ्यासही एकत्र करायचे आणि खाबूगिरीसुद्धा एकत्र करायचे. त्यातल्याच एका मित्राच्या घरी पोहे खाण्याच्या निमित्ताने ही टोळी एकत्र आली होती. आईच्या हातचे गरमागरम पोहे खाऊन झाल्यावर एका मित्राच्या मनात आले की, याच पोह्य़ांवर अधिक रीसर्च करून आपण हॉटेललाइनमध्ये शिरलो तर? त्याने त्याची कल्पना सगळ्यांच्या पुढय़ात मांडली व प्रत्येक जण पोह्य़ाला वेगवेगळ्या चवींत आणि रूपात आणण्यासाठी मेहनत घेऊ  लागला आणि अखेर मेहनतीचं फळ ‘आम्ही पोहेकर’ या ब्रॅण्डच्या रूपाने साकार झालं. १७ एप्रिल २०१९ या दिवशी पुण्यातील नारायण पेठेत, पत्र्या मारुती मंदिराच्या मागे त्यांची पहिली शाखा सुरू झाली आणि आज ‘आम्ही पोहेकर’च्या एकूण ९ शाखा सर्वत्र आहेत.

नवीन आणि हटके काही तरी ट्राय करण्यासाठी माझ्यातला फुडी आत्मा नेहमीच तयार असतो. म्हणून मी हे विशेष पोहे खाण्यासाठी मुंबई ते पुणे प्रवास केला. पत्र्या मारुतीजवळची ‘आम्ही पोहेकर’ची मुख्य शाखा अतिशय लहान आहे. गर्दीच्या वेळी लोक रस्त्यावर उभे राहतात. कूपन घ्यायलाच १५ मिनिटं जातात. हे अनुभव माझ्या वाटय़ाला येऊ  नयेत म्हणून मी मुद्दाम साडेअकरा वाजता तिथे गेलो. तरीही तिथे मुंगी शिरायलासुद्धा जागा नव्हती. इथे मेनुकार्ड हा काही प्रकार नाही. भलीमोठी मेनूची पाटी भिंतीला लावली होती. त्यातूनच मी इंदोरी पोहे, कोकणी पोहे, र्ती पोहे, भेळ पोहे मागवले. जागेचा माहौल अगदी साधा होता; पण पोहे मात्र लाजवाब होते. सुरुवात मी इंदोरी पोह्य़ांपासून केली. इंदोर म्हटलं की चटपटीत पदार्थाची राजधानी आपल्या डोळ्यासमोर येते. हाच चटपटीतपणा जिभेवर अनुभवायला मिळाला. इंदोरी मसाला, इंदोरी शेव आणि मध्येच सुखद धक्का द्यायला बडीशेपचे दाणे यांनी पोहे परिपूर्ण झाले होते. कोकणी पोह्य़ात खोबऱ्याचा केलेला सढळ वापर आणि बटाटय़ाचा मऊसूत स्पर्श प्रत्येकालाच कोकणात एक चक्कर टाकून आणतो. र्ती पोह्य़ांनी तर नाकाडोळ्यांतून पाणीच काढलं.

यावर लिंबाचा रस टाकला तर तिखटपणा कमी होईल असं मला वाटलं म्हणून मी लिंबाची फोड मागितली. तर मॅनेजरने लिंबू रसाने भरलेला स्प्रे दिला. हा स्प्रे काही सेकंद मी न्याहळतच बसलो होतो. लिंबाची फोड कोणत्याही पदार्थावर पिळायला घेतली तर रसाऐवजी पहिल्यांदा बीच झेप घेते आणि प्रत्येक फोडीत असलेला रस प्रत्येक खवय्याला पुरेलच असं नाही. तर यावर काढलेला हा स्प्रेचा तोडगा मला जाम आवडला.

र्ती पोहे आपला तिखटपणा काही सोडायला तयार नव्हते म्हणून वैतागून मीच त्यांना सोडून दिलं व भेळ पोह्य़ांकडे वळालो. भेळ आणि पोहे या दोन्ही पदार्थाचं फ्यूजन असलं तरीही दोन्ही पदार्थाना समान पातळीवर न्याय देण्याचा केलेला प्रयत्न आवडला. सी.के.पी. ज्ञातीमध्ये सोडय़ाचे पोहे करतात किंवा वसई ते पालघर पट्टय़ात चिकन पोहे मिळतात. मला वाटलं असे नॉनव्हेज प्रकारसुद्धा इथे मिळत असतील; पण इथे शुद्ध शाकाहारीच पोहे मिळतात. पुणे आणि मिसळीचं नातं अतूट ठेवण्यासाठी इथे खास पोहे मिसळसुद्धा आहे. अचानक भूक लागल्यावर पटकन करता येणारा पोटभरीचा प्रकार म्हणजे दही पोहे. हेच दही पोहे इथे ‘पोहे दही तडका’च्या रूपात मिळतात. त्याचसोबत ‘आज मी बाबा डाएटवर आहे,’ असं म्हणणाऱ्यांनासुद्धा इथे पोहे न्यूट्री प्लेट आहे.

पोह्य़ांचं वैशिष्टय़ म्हणजे पोहे खाऊन पोट बिघडलं असं कधी कानावर येत नाही. काही अपवाद वगळले तर कधी पोहे खाऊन कोणाचं पित्तही सहसा खवळत नाही, तर इंजिनीअरच्या सहा तरुण विद्यार्थी मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा ब्रॅण्ड अगदी कमीत कमी वेळात पुण्यात लोकप्रिय झाला आहे. इथे सर्वसाधारण द्रोणामध्ये पोहे दिले जातात जे बऱ्यापैकी पोटभर आहेत आणि खर्चही जास्त नाही. १५ रुपये ते ६० रुपयेदरम्यानच प्रत्येक डिशचा भाव आहे. ‘आमची शाखा कुठेही नाही’ या तत्त्वाची चौकट ‘आम्ही पोहेकर’ने मोडून काढली आहे. पुणे, बारामती, नवी मुंबई या भागांतसुद्धा यांच्या शाखा आहेत. दर दिवशी ३०० किलो पोहेविक्रीचा विक्रम गाठणाऱ्या ‘आम्ही पोहेकर’ला आवर्जून भेट द्या.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 1:02 am

Web Title: article on different 14 avatars of poha abn 97
Next Stories
1 व्हिवा दिवा : मनाली नागांवकर
2 बदलती वाचनसंस्कृती
3 सदा सर्वदा स्टार्टअप : शोध गुंतवणूकदारांचा!
Just Now!
X