स्वप्निल घंगाळे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाजमाध्यमांतून बाहेर पडण्याचे संके त दिले होते. समाजमाध्यमांवर सर्वात जास्त सक्रिय आणि लोकप्रिय नेत्यापैकी एक असणाऱ्या मोदींनी या माध्यमांचा लोकांशी संवाद सादण्यासाठी प्रभावीपणे वापर केला. आणि अचानक त्यांनी रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूटय़ूब सोडण्याचे संकेत काय दिले.. त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर लगोलग समाजमाध्यमांवर डिजिटल डिटॉक्सची चर्चा पुन्हा नव्याने रंगू लागली.  मोदी खरोखर समाजमाध्यमांवरुन पायउतार होणार नाही आहेत आणि तो महिला दिनानिमित्ताने केलेला प्रचार आहे हेही त्यांनी जाहीर केलं मात्र यामुळे चर्चेत आलेला डिजिटल डिटॉक्स काय प्रकार आहे यावर टाकलेली ही नजर..

नाही मी नाहीय हाइकवर .. व्हॉट्सअ‍ॅप, गुगल चॅट, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम असताना परत आणखी एक अ‍ॅप कशाला उगाच.. असे म्हणत राजेशने चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र राजेशचा मित्र त्याला आपला मुद्दा पटवून देण्यासाठी सर्वच अ‍ॅप्सचा आणि समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करण्याचे फायदे याबद्दल पुढील तासभर सांगत होता. तरीही अती संपर्कात राहण्याला कंटाळलेला राजेश ‘नाही’ वर ठाम राहिला. एकमेकांच्या कायम संपर्कात राहण्यासाठी अनेकजण आज वेगवेगळ्या समाज माध्यमांचा आणि अ‍ॅप्सचा वापर करताना दिसतात. मात्र आता राजेशसारख्या अनेकांना या अती संपर्कात राहण्याचा कंटाळा आला आहे. आज असे तंत्रज्ञानामुळे जवळ आलेले मात्र अती संवादाला आणि सतत संपर्कात राहण्याला कंटाळलेले अनेक राजेश अनेकांच्या फ्रेण्ड सर्कलमध्ये सापडतात. ही मंडळी अगदी मोजक्या अ‍ॅप्सच्या आणि समाजमाध्यमांच्या मदतीने जवळच्यांच्या संपर्कात असतात. इतरांप्रमाणे येणारे प्रत्येक मेसेजींग अ‍ॅप वापरुन पाहण्याची त्यांना गरज वाटत नाही. सर्व अ‍ॅप्स वापरण्यापेक्षा व्यवस्थित जम बसलेली अ‍ॅप्स वापरण्याकडे यांचा कल असतो. यातील अनेकजण तर रुळलेली अ‍ॅप्स वापरण्यातही इंटरेस्टेड नसतात.

सततच्या नोटिफिकेशन्सचा होणारा त्रास..

खूप जास्त वेळ मोबाइल वापरण्यात जातो. अनेकजण अशापद्धतीने समाजमाध्यमांवरुन डिजिटल डिटॉक्सच्या नावाखाली कायमचा किंवा तात्पुरता संन्यास घेतात. आता यामुळे मोबाईल वापराचा वेळ कमी होतो अन् तो वेळ अनेकजण छंद जोपासण्यासाठी, वाचनासाठी किंवा इतर कामांसाठी वापरतात. अशा पद्धतीने मूड स्वींगनुसार डिजिटल डिटॉक्स वापरुन पाहणारेही बरेच आहेत. म्हणजे परिक्षेच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप किंवा फे सबुकपासून लांब राहणे हा डिजिटल डिटॉक्सचाच प्रकार आहे. अनेकजण वेगवेगळ्या कारणांसाठी समाज माध्यमापासून लांब राहण्याचा प्रयोग करुन बघतात. काही फसतात तर काही यशस्वी होतात. आता थेट पंतप्रधानांनीच समाजमाध्यमांपासून काढता पाय घेण्याची वाच्यता केली म्हणून.. या चर्चेला उजाळा मिळाला. मात्र खरोखरच तरूणाईला अशाप्रकारे डिजीटल डिटॉक्सचा प्रयोग करुन पहायला हरकत नाही.

कारणे काय?

वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन त्याच त्याच व्यक्तींशी संपर्क साधणे कंटाळवाणे वाटते. सर्वच अ‍ॅप्स आणि समाजमाध्यमांमध्ये आता थोडय़ाफार फरकाने सर्व फीचर्स उपलब्ध आहेत. व्हॉइसकॉल, व्हिडीओ चॅट, फोटो पाठवणे यासारख्या कामांसाठी वेगळ्या अ‍ॅप्सची गरज राहिली नाही. खूप सारे अ‍ॅप्स डाऊनलोड करुन मोबाईलची मेमरी फु ल करण्यात काही अर्थ नसतो. अ‍ॅप डाऊनलोड करुन ते ओळखीचे होईपर्यंत ते आऊटडेटेड झालेले असते.

viva@expressindia.com