मितेश रतिश जोशी

शरद ऋतूतली कडाक्याची थंडी आणि त्या थंडीत पहाटे लवकर उठून सगळ्यात पहिला अ‍ॅटमबॉम्ब कोण फोडणार, याची लागलेली स्पर्धा, सुगंधी तेल आणि उटणे लावून कुडकुडवणाऱ्या गारठय़ात केलेले अभ्यंगस्नान, त्यानंतर देवपूजा, घरातील मोठय़ांना नमस्कार, सगळ्यांचा एकत्र फराळ, शेजारी फिरणारी फराळाची ताटं, न चुकता देवळात जाणं असं रंगीबेरंगी आनंदी, उत्साहाने उधाणलेलं चित्र घरोघरी पाहायला मिळतं. मात्र तरीही प्रत्येक ठिकाणी दिवाळीचं असं काही ना काही वेगळं सेलिब्रेशनही पाहायला मिळतं..

दिवाळीचा सण सर्जनशीलतेलाही भरभरून वाव देणारा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबई, ठाणे, पुणे या शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम दिवाळीतला आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. या विविध कार्यक्रमांतून रसिक मनाला मिळणारी सांस्कृतिक ठेव खूप काही देऊन जाते. ही परंपरा उत्साहाने रसिक श्रोत्यांनी जपली आहे. गीत-संगीत, किस्से-आठवणी, अभिवाचन, शास्त्रीय गायन अशा विविध संकल्पनांवर आधारित दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना तरुण रसिकांचा उदंड प्रतिसाद नेहमी मिळतो. अजून तरी या दिवाळी पहाटचं प्रमाण कमी झालेलं नाही. उलट ते वर्षांगणिक वाढतच चाललंय.

मुंबईतल्या मांगेला कोळी समाजामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यावर भर दिला जातो. विनायक मेस्त्री हा तरुण सांगतो, ‘घरातली स्त्री धनत्रयोदशीच्या दिवशी घरात असणारी धूळ, कचरा एका जुन्या टोपलीमध्ये गोळा करते. शेवटी त्यात जुनी केरसुणी, फराळ व पणती ठेवली जाते. त्याला अलक्ष्मी मानून त्याची पूजा केली जाते. फटाक्यांची माळ लावून जल्लोष केला जातो. व नंतर ही टोपली दर्याच्या किनाऱ्यावर आणून ठेवली जाते. घरी परतल्यावर आंघोळ करून धन्वंतरी आणि धनाची पूजा केली जाते. नरकचतुर्दशीला ज्याप्रमाणे आपण अभ्यंगस्नान करतो तसंच अभ्यंगस्नान आम्ही आमच्या नावेला घालतो. तेल, उटणं, नारळाचं दूध याने होडीला एक प्रकारे आंघोळच घातली जाते. आणि लक्ष्मीपूजनाला तिची साजशृंगारात पूजा केली जाते. आमच्याकडे पूर्वीपासून करंजी व बेसनाचे लाडू हा मुख्य फराळ केला जातो. आता तर चकली, शंकरपाळे, अनारसे हे पदार्थही आम्ही करतो, असं तो सांगतो.

नवी मुंबईत बेलापूर खाडीला लागून असलेले दिवाळे या गावामध्ये एक अनोखी श्रद्धा जपत दिवाळी साजरी केली जाते. येथे दिवाळीत भर समुद्रात बहिरीदेव (भैरीदेव) प्रगट होतो, असे मानले जाते. याची माहिती सांगताना याच गावातला अमित मोकल हा तरुण सांगतो, ‘वसुबारसच्या दिवशी आमच्या दिवाळे गावात प्रचंड गर्दी होते. माहुल आणि घारापुरीच्या मधोमध दर वर्षी बहिरी देव, खंडोबा, मादुहीर आणि जलचरांची बहीण असे चार देवांचे मुखवटे सापडतात. हे मुखवटे वाजतगाजत गावात आणले जातात. गणपतीत जसं वातावरण असतं, तसंच वातावरण घरोघरी पाहायला मिळतं. त्याची विधिवत पूजाअर्चा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या देवाचे विसर्जन केले जाते. त्यानंतर गावात दिवाळी साजरी केली जाते. त्यामुळे बहिरीदेवाचे किंवा भैरीदेवाचे गाव अशी आमच्या गावाची ओळख झाली आहे, असं तो सांगतो. एखाद वर्षी देव प्रकट झाला नाही तर गावात कोणीच दिवाळी साजरी करत नाही. जत्रेच्या दिवशी सातरा विधी करण्याची परंपरा आजही कायम आहे. गावातील इडा पीडा टाळण्यासाठी हा सातरा विधी केला जातो. ही परंपरा गेल्या २०० वर्षांपासून आम्ही जपतो आहे, असंही त्याने सांगितलं.

पश्चिम महाराष्ट्रातील पलूस तालुक्यातील कृष्णाकाठच्या काही गावांत दिवाळीत दिवटे ओवाळण्याची मजेशीर पद्धत आहे. याची माहिती देताना दुधोंडी गावचा तेजस चव्हाण हा तरुण सांगतो, पश्चिम महाराष्ट्र हा शेतीने समृद्ध असलेला प्रदेश आहे. दिवाळी जवळ आली की गावचा नूर बदलतो. शेतातल्या कामांची लगबग सुरू होते. दिवाळीच्या अगोदर सूर्य उजाडल्यापासून मावळेपर्यंत घरातला प्रत्येकजण वेगवेगळ्या कामांत व्यग्र असतो. पोरंटोरं दिवटा बनवून तो ओवाळण्याच्या कामात असतात. दिवटा ओवाळणे ही एक भन्नाट प्रथा परिसरातील काही गावात आहे. मुलं एकत्र येऊन चिंध्यांचा एक दिवटा करतात. तो दिवटा दिवाळीआधी आठ-दहा दिवस दारोदार फिरतो. मुलं प्रत्येक घरी बडबडगीते बोलून दिवटय़ाने ओवाळतात. त्याच्या बदल्यात त्यांना साखर, खोबरे, रॉकेल किंवा पैसे दिले जातात. बलिप्रतिपदा हा दिवटा ओवाळण्याचा शेवटचा दिवस. या दिवशी सगळी लहान-मोठी पोरं शेतातून वेळूचं गवत जमवतात. मोठी मुलं गवतापासून नागाची फडी बनवतात. हा नागोबा संपूर्ण गावात फिरवला जातो. घरातील स्त्रिया नागोबाला ओवाळतात. शेताचं, घरादाराचं रक्षण कर, अशी प्रार्थना करतात. दिवटा ओवाळणाऱ्या मुलांच्या हातात फराळ ठेवतात. असं प्रत्येक घर ओवाळून झाल्यानंतर सर्व मुलं एकत्र जमतात. मिळालेले पैसे, फराळ आपापसात वाटून घेतात. एकत्र सण साजरा करतात. मुळात यात कोणत्याही धार्मिकतेचा थेट संबंध नाही. शेतकऱ्यांनी स्वत:च्या मनोरंजनासाठी, समाधानासाठी व रक्षणाच्या हेतूने ही परंपरा सुरू केली असावी, असं तो आवर्जून सांगतो.

प्रत्येक सणामध्ये कोकण आणि गोवा आपली वेगळी परंपरा, ओळख जपत आलं आहे. उत्तर भारतात दसऱ्याला जसं रावणाचं दहन केलं जातं, त्याच धर्तीवर गोव्यात व कोकणातील काही भागांत नरकासुराचं दहन केलं जातं. गोव्यात दिवाळीचा दिवस म्हणजे ‘नरक चतुर्दशी’. या दिवशी नरकासुराची काढली जाणारी मिरवणूक आणि त्यानंतर होणारं त्याचं दहन हा मोठा आकर्षणाचा भाग होऊ  लागला आहे. तळकोकणात नरकासुराची अनोखी स्पर्धा दर वर्षी आयोजित केली जाते. याची माहिती प्रा.अक्षय शहापूरकर देताना म्हणाला, ‘धनत्रयोदशीलाच मोठमोठे नरकासुर चौका-चौकात पाहायला मिळतात. काही नरकासुर हे त्या वर्षी घडलेल्या नकारात्मक गोष्टींचं प्रतीक असतात. या नरकासुरांची गावातून पुण्यातील गणपती मिरवणुकीसारखी भलीमोठी मिरवणूक काढली जाते. हे नरकासुर तब्बल २२ फूट उंच असतात. प्रत्येक चौकात, गल्लीत असे नरकासुर तयार होत असल्याने गावात या नरकासुरांच्या देखाव्याची स्पर्धा लागते. जो नरकासुर उंच, रेखीव, विषयाला अनुरूप असतो त्या नरकासुराचं मंडळ पारितोषिक पटकावतं, अशी माहिती त्याने दिली.

नरकासुराचं असंच दहन गोव्यामध्येही केलं जातं. पहाटे नरकासुराचं दहन झालं की घरी येऊन अभ्यंगस्नान करून सगळे जण या ‘फोव’चा फराळ करतात. या आगळ्यावेगळ्या फराळाची माहिती देताना भक्ती दाते ही तरुणी सांगते, शहरामध्ये दिवाळीचा फराळ म्हटलं की, चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे हेच पदार्थ माहिती असतात. पण गावी गोव्याला वेगवेगळ्या चवीचे फोव तयार केले जातात. गोडाचे फोव ज्यात गूळ, ओल्या नारळाचं खोबरं असतं. तिखशे फोव ज्यात हिरवी मिरची आणि ओल्या नारळाचं खोबरं असतं. ताकाचे फोव जे ताकात कालवलेल्या पोह्य़ांमध्ये हिरवी मिरची बारीक वाटून, कोथिंबीर घालून तयार केले जाते. कढीचे फोव म्हणजे सोलकढी करून त्यात कालवलेले पोहे आणि फोण्णे फोव म्हणजे फोडणी घालून केलेले पोहे असे प्रकार गावी गोव्याला घरोघरी चाखायला मिळतात. ज्याप्रमाणे होळीला पुरणपोळी हवीच तसंच दिवाळीला फोव हवाच. त्याचसोबत पाकातले फोव, फोंवा खीर, रोसा फोव, फोवा चिवडो या अनेक प्रकारातील किमान पाच प्रकार तरी घराघरांत नरक चतुर्दशीला बनवले जातात. वर्षभरात घरात कधी पोहे केले जात नाहीत, पण दिवाळी आणि पोहे हे एक समीकरण हमखास घरी असतं, असं तिने सांगितलं.

असंच काहीसं दिवाळीतलं वेगळेपण तळकोकणातील तेंडोली गावात बघायला मिळतं. नितीन सर्वेकर हा तरुण सांगतो, दिवाळी सणाच्या कामाची नांदी आमच्या गावी शेतात उगवलेल्या धान्यापासून गिरणीत जाऊन पोहे बनवणे या कामापासून होते. हल्ली मुंबईमध्ये घराबाहेर तुळशी वृंदावन नसतं, पण गावी हमखास असतं. त्यामुळे गावी अभ्यंगस्नान झाल्यावर ओलेत्याने तुळशीचं दर्शन घेऊन तुळशीच्या पुढय़ात गोविंद गोविंद म्हणत पुरुष चिराटी फोडतात. मुंबईत मात्र बाथरूममध्येच फोडतात. गावी दिवाळीत पोळ्याचा सण हा बघण्यासारखा असतो. शेतकरी मंडळी आपापल्या गोठय़ामध्ये शेणाचा एक छोटासा गोठा तयार करतात. त्या गोठय़ात चिराटीचे बैल असतात व हा गोठा पानाफुलांनी सजवतात. गाई-बैलांना अभ्यंगस्नान घालून त्यांना नवीन कपडे घालून पोळा नावाचा पदार्थ खायला दिला जातो व त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तसंच तुळशीचं लग्न हाही सण कोकणामध्ये खूप थाटात संपन्न होतो, असं तो सांगतो.

दिवाळी म्हणजे किल्ला आलाच. पूर्वी दिवाळीची सुट्टी सुरू होताच दगड, माती, मावळे, शिवाजी यांची जमवाजमव करायची, मित्रांच्या घोळक्याने एकत्र येऊन दूरवरून आपल्या इलाख्यात माती आणायची आणि मातीचं लिंपण करून मेहनतीने साकारलेला किल्ला सजवायचा, १०-१५ दिवस त्याची राखण करायची, हा सगळा आनंद आता मुंबईत जरी मोठय़ा प्रमाणात पूर्वीसारखा दिसत नसला तरी पुण्यात दिसतोय. पुण्यातील सुरेश तरलगट्टी हा तरुण फोटोग्राफर आहे. दर वर्षी ट्रेकिंगच्या माध्यमातून तो महाराष्ट्रातील अनेक अपरिचित किल्ल्यांवर भटकंती करतो व दसरा झाला की किल्ले बांधणीच्या मोहिमेला सुरुवात करतो. सुरेशचे किल्ले अतिशय हुबेहूब असतात. सुरेश सांगतो, महाराष्ट्राच्या संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. पराक्रम आणि संघर्षांची ही प्रतीकं आहेत. या गडकोटांच्या स्मृती जपाव्यात आणि पूर्वजांच्या पराक्रमाच्या नौबती पुन्हा झडाव्यात जणू यासाठीच या किल्ले बनवण्याच्या परंपरेचा उदय झाला असावा. पुण्यात अजूनही किल्ले प्रदर्शन भरवलं जातं. आणि या प्रदर्शनामध्ये दर वर्षी कॉलेज आणि नोकरी करणारे तरुण तुर्क  मोठय़ा संख्येने सहभागी होतात, असं तो सांगतो. मातीचे किल्ले विस्मृतीत जाऊ  नयेत म्हणून त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जातात, असंही तो म्हणतो.

दिवाळीचा उत्साह सगळीकडे सारखाच असला तरी कुठे पारंपरिक प्रथा जपण्याचा तर कुठे काळाची गरज ओळखून आधुनिक विचारांची कास धरण्याचा तरुणाईचा प्रयत्न हा विशेष वाखाणण्याजोगा आहे.