दिवाळीच्या निमित्ताने गोडाची मात्रा फराळाच्या ताटात अधिक असते हे खरेच आहे. मात्र दिवाळीत हा गोडवाच जास्त भावतो. किंबहूना तिखट पदार्थानी पोट भरत असले तरी गोड पदार्थानी मन अधिक भरतं. म्हणून दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये काही वेगळे तिखट-गोड पदार्थ घरच्या घरी बनवता यावेत, यासाठी ‘टाटा संपन्न’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या शेफ संजीव कपूर यांनी काही रेसिपीज व्हिवाच्या वाचकांसाठी दिल्या आहेत.

हिरव्या मुगाचा हलवा

साहित्य : एक कप हिरवे मूग, पाव कप तूप, एक – दोन टेबलस्पून्स फुल फॅट मिल्क पावडर, पाऊण कप साखर, दोन टेबलस्पून्स पिस्त्यांचे काप (सजावटीसाठी), दोन टेबलस्पून्स बदामाचे काप (सजावटीसाठी), दोन टेबलस्पून्स अक्रोडाचे बारीक तुकडे (सजावटीसाठी), हिरव्या वेलचीची पूड (हलवा तयार झाल्यानंतर वरून भुरभुरवण्यासाठी) आणि गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्यांचा चुरा (सजावटीसाठी).

कृती : नॉन-स्टिक कढई गरम करून घ्या व त्यामध्ये हिरवे मूग भाजून घ्या. गॅसची आच मंद ठेवून मूग सोनेरी बदामी रंगाचे होईस्तोवर सतत हलवत रहा.

चांगले भाजून झाल्यावर मूग मिक्सरमध्ये फिरवा, बारीक पूड न करता खडबडीत रवाळ होतील इतपत बारीक करा. नंतर नॉन-स्टिक कढईमधे तूप गरम करा आणि त्यामध्ये मिक्सरमध्ये तयार केलेला हिरव्या मुगाचा रवा घाला व तीन ते चार मिनिटे सतत हलवत तूप व मूग एकजीव करून घ्या. मूग व तुपाच्या मिश्रणात दुधाची पावडर घालून नीट मिसळून घ्या. या मिश्रणामध्ये उकळते पाणी सावकाश घाला आणि गुठळ्या राहणार नाहीत अशा बेताने नीट हलवून मऊ शार मिश्रण तयार करून घ्या. आता यामध्ये साखर घालून चांगले हलवून एकजीव करा. पिस्ते, बदाम, अक्रोड यांचे काप, वेलची पूड घाला आणि नीट मिसळून घ्या. साधारण दहा मिनिटे सतत हलवत शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करा. हिरव्या मुगाचा हलवा तयार आहे. हलवा सव्‍‌र्ह करताना त्यावर पिस्ते, बदाम, अक्रोडाचे काप, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या चुरडून त्यांची सजावट करा.

मेथी आलू भुजिया

साहित्य : एक चमचा कसुरी मेथी, भाजून हाताने चुरून घ्या, पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे, उकडून, साले काढा व किसून घ्या, एक टेबलस्पून गरम मसाला पूड, एक टेबलस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून हिंग, चवीनुसार मीठ, चार कप बेसन, तळण्यासाठी व चकली साच्याला आतून लावण्यासाठी तेल

कृती : उकडून, साले काढून किसलेले बटाटे, गरम मसाला पूड, लाल मिरची पूड, हिंग, मीठ आणि कसुरी मेथी हे सर्व साहित्य एका मोठय़ा भांडय़ात एकत्र करा. त्यात बेसन घालून नीट एकजीव करून घ्या. या सर्व मिश्रणाचा मऊ  गोळा होईस्तोवर मळून घ्या. कढईमधे तेल गरम करून घ्या. चकलीच्या साच्यामध्ये शेवेची चकती घाला आणि साच्याला आतील बाजूने सर्वत्र तेलाचा हात फिरवा. मळलेल्या पिठाचा साच्यामध्ये मावेल इतका गोळा साच्यात भरून थेट गरम तेलामध्ये शेव पाडा. सगळी शेव सोनेरी बदामी रंगाची होईस्तोवर तळा. शेव काढून व्यवस्थित थंड होऊ द्या. खमंग आलू भुजिया तयार आहेत.

मूग खोबरे बर्फी

साहित्य : एक कप हिरवे मूग, सुक्या खोबऱ्याचा एक कप किस, एक कप अख्खे गहू, एक कप कोलम तांदूळ, दहा – पंधरा बदाम, दहा – पंधरा अक्रोड, तीन कप किसलेला गूळ, पाव टीस्पून हिरव्या वेलचीची पूड, एक टेबलस्पून तूप आणि बर्फीच्या भांडय़ाला आतून लावण्यासाठी थोडे तूप.

कृती : नॉन-स्टिक कढईमध्ये मंद आचेवर हिरवे मूग सोनेरी बदामी रंगाचे होईस्तोवर भाजून घ्या. संपूर्ण भाजले गेल्यानंतर मूग दुसऱ्या भांडय़ात काढा आणि थंड होऊ  द्या.  त्याच कढईमध्ये खोबऱ्याचा किस, अख्खे गहू, तांदूळ हे सर्व साहित्य एकेक करून सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या भांडय़ात काढून ठेवा आणि थंड होऊ  द्या. तोपर्यंत त्याच नॉन-स्टिक कढईमध्ये बदाम आणि अक्रोड थोडेसे परतून घ्या. थंड झाल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून बाजूला ठेवा. दुसऱ्या एका नॉन-स्टिक भांडय़ामध्ये गूळ, अर्धा कप पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. अधूनमधून हलवत रहा.  गूळ पूर्णपणे विरघळून थोडे घट्ट झाले पाहिजे. भाजून घेतलेले तांदूळ मिक्सरमध्ये रवाळ होतील इतपत फिरवून घ्या आणि एका मोठय़ा भांडय़ात काढा.  त्यानंतर भाजलेले अख्खे गहू, मूग असे एकेक करत मिक्सरमधून फिरवून काढा. बारीक पूड न करता, खडबडीत होतील इतपत मिक्सरमध्ये फिरवा. बारीक केलेले तांदूळ, गहू, मूग एकाच भांडय़ात नीट मिसळून घ्या. यामध्ये खोबऱ्याचा किस मिक्स करा.  बारीक केलेल्या सुक्या मेव्यापैकी अर्धा भाग देखील या मिश्रणात घाला. आता यामध्ये गुळाचा पाक, वेलची पूड घाला.  हे सर्व मिश्रण गॅसवर ठेवा. गॅसची आच मंद ठेवा. आता या मिश्रणात तूप घालून ते सतत हलवत रहा.  पाच ते सहा मिनिटे किंवा मिश्रणाचा गोळा होईपर्यंत ते शिजू द्या.  नंतर गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होईपर्यंत हलवत रहा. मिठाई ट्रे किंवा उंच कडा असलेल्या ताटाला आतल्या बाजूने सगळीकडे तूप लावा. बर्फीचे मिश्रण या ट्रेमध्ये एकसमान, हवी तितकी जाडी ठेवून पसरवून घ्या. सुक्या मेव्याचे तुकडे या मिश्रणावर सर्वत्र पसरवा. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे कापा. स्वादिष्ट आणि पौष्टिक मूग खोबरे बर्फी तयार आहे.

जर्दाळू जॅम नानखटाई

साहित्य : जर्दाळूचा जॅम आवश्यकतेप्रमाणे, अर्धा कप बेसन, दीड कप मैदा, पाऊण कप पिठी साखर, पाव टीस्पून हिरव्या वेलचीची पूड, एक टीस्पून बेकिंग पावडर, चिमूटभर बेकिंग सोडा, पाव कप पिस्ता पावडर, पाऊण कप तूप, पिस्त्यांचे काप सजावटीसाठी.

कृती : ओव्हन १८० डिग्री सेल्सियसला गरम करून घ्या. बेकिंग ट्रेमध्ये सिलिकॉन मॅट घालून ठेवा. एका मोठय़ा भांडय़ात बेसन घेऊन त्यात मैदा, पिठी साखर, वेलची पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि पिस्त्यांची पावडर नीट मिसळून घ्या. आता यामध्ये तूप घालून घट्ट गोळा तयार होईपर्यंत मळा. मिश्रणाच्या गोळ्याचे छोटे छोटे समान भाग करा. प्रत्येक गोल थोडासा दाबून त्याच्या मध्यभागी एका बोटाने हलका दाब देऊन छोटा खड्डा तयार करा.  हे सर्व गोळे बेकिंग ट्रेमध्ये योग्य प्रकारे मांडून ओव्हनमध्ये सहा ते आठ मिनिटे बेक करून घ्या. सहा ते आठ मिनिटांनी ट्रे ओव्हनमधून काढा आणि प्रत्येक नानखटाईच्या मध्यभागी तयार केलेल्या खड्डय़ात जर्दाळूचा जॅम भरा.  हा ट्रे पुन्हा ओव्हनमध्ये ठेवून अजून चार ते पाच मिनिटे बिस्किटे भाजू द्या. बेकिंग पूर्ण झाल्यानंतर ट्रे ओव्हनमधून बाहेर काढा व प्रत्येक बिस्किटावर पिस्त्याच्या कापांची सजावट करा. ही नानखटाई पूर्णपणे थंड होऊ  द्या. तयार स्वादिष्ट, खुसखुशीत जर्दाळू जॅम नानखटाई तयार आहे.