10 April 2020

News Flash

डाएट डायरी : हेल्दी राहण्याचा कानमंत्र

जेवढा व्यायाम महत्त्वाचा तेवढाच किंवा त्यापेक्षा कणभर अधिकच आपण घेत असलेला आहार महत्त्वाचा आहे.

|| गायत्री बर्वे-गोखले

एखादा हिरो मुलींना का आवडतो? तर त्याला छान सिक्स पॅक्स अ‍ॅब असतात म्हणून. मुलांना हिरॉइन का आवडतात तर त्यांची फिगर मेन्टेन्ड असते म्हणून.. पण फक्त सिक्स पॅक्स असले किंवा झिरो फिगर असली म्हणजे आपण हेल्दी झालो का? साफ चूक. हेल्दी असण्याची मूळ व्याख्याच अशी आहे की अशी व्यक्ती जी फक्त शरीरानेच नाही तर मनाने, आचारांनी आणि विचारांनीदेखील निरोगी आहे. त्यामुळे हेल्दी असण्यासाठी फक्त फिगरच्या मागे धावणं किंवा कॅ्रश डाएट्स करत राहणं नक्कीच योग्य नाही.

हेल्दी असणं म्हणजे आपल्या फिजिकल, सोशल आणि इमोशनल लाइफमध्ये योग्य संतुलन असणं. जी व्यक्ती अगदी सिक्स पॅक असलेली आहे, पण बाकी आयुष्यात नैराश्याने ग्रासलेली, एकलकोंडी आहे अशा व्यक्तीला केवळ शारीरिक स्तरावर फिट आहे म्हणून हेल्दी म्हणता येणार नाही. असे सिक्स पॅक अ‍ॅब्स गोळ्या, इंजेक्शन घेऊनदेखील बनवता येतात. याउलट एखादी व्यक्ती जी भले झिरो फिगर नसेल, पण ज्यांचं वजन उंचीच्या प्रमाणात आहे, जिला कोणतेही शारीरिक आजार नाहीत, जिचं मन स्थिर, आनंदी आहे आणि जी व्यक्ती चार लोकांत मिळून -मिसळून राहते अशी कोणतीही व्यक्ती ही ‘हेल्दी’ म्हटली पाहिजे.

अशा व्यक्तीला का नाही दीर्घायुष्य लाभणार? असं हेल्दी बनायचं असेल तर कठोर परिश्रम करावे लागतील आणि ते करणं अशक्य आहे असं जर वाटत असेल तर ते खरं नाही. आपल्या रोजच्या जीवनात थोडेसे सकारात्मक बदल केले तर हे सहज शक्य आहे.

असं म्हटलं जातं की आपलं हेल्दी असणं हे ७० टक्के  आपण जो आहार घेतो आणि ३० टक्के आपण जो व्यायाम करतो त्यावर अवलंबून असतं. पण म्हणून यापैकी एकच गोष्ट करून भागत नाही. आहार संतुलित ठेवला, पण दुसरी काहीही अ‍ॅक्टिव्हिटी केली नाही तर शरीर लवचीक राहात नाही. तसेच नुसता व्यायाम केला आणि आहाराकडे दुर्लक्ष केलं तर केलेल्या व्यायामाचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे जेवढा व्यायाम महत्त्वाचा तेवढाच किंवा त्यापेक्षा कणभर अधिकच आपण घेत असलेला आहार महत्त्वाचा आहे.

संतुलित आहार आणि व्यायाम करत असताना नेमकं आपल्या शरीरात काय होतं? तर संतुलित आहारामुळे आपल्याला कोणतेही काम करण्याची ऊर्जा मिळते. आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आपली कामे आपण अधिक क्षमतेने आणि कमी वेळात पूर्ण करू शकतो. आवश्यक ती पोषक तत्त्वं त्या संतुलित आहारातून मिळण्याने आपण खूप कमी आजारी पडतो ज्यामुळे आपला वैद्यकीय तापसण्यांसाठी येणारा खर्चदेखील वाचतो.

‘संतुलित आहार’ म्हणजे काय तर आपल्या जेवणातील पोषक तत्त्वांचे चार मुख्य भागांत वर्गीकरण होते ते म्हणजे काबरेहायड्रेट, प्रोटिन्स, फॅट्स आणि फायबर. पोळी, भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, मासे / चिकन असा चौरस आहार घेतल्यास शरीराला योग्य प्रमाणात सर्व पोषक घटक मिळतात. रोजच्या जेवणात सर्व सीझनल भाज्या, फळं यांचा समावेश करणं आवश्यक आहे त्यामुळे शरीराला फायबर मिळून योग्य प्रकारे अन्नपचन होईल. दूध, दही, ताक, पनीर, चीज, कडधान्ये, अंडी, मासे, चिकन यांपासून शरीराला आवश्यक प्रोटिन्स मिळतात. म्हणून रोजच्या आहारात यांचा समावेश गरजेचा आहे.  रोज दूध पिणे, दही खाणे, आठवडय़ातून दोनदा तरी कडधान्याची उसळ किंवा अंडी/ मासे खाणे यामुळे शरीराची प्रोटिन्सची गरज पूर्ण होते. रोज एक चमचा तूप खाणे आवश्यक आहे त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले वंगण यातून मिळेल.(भातावर घेणे / पोळीला लावून खाणे) याव्यतिरिक मैदा व त्याचे पदार्थ, बेकरीत मिळणारे पदार्थ, पाव, गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, बाहेर मिळणारे कोणतेही पॅकेट बंद/ प्रोसेस केलेले पदार्थ रोज खाणं टाळावं. महिन्यातून एखाददोन वेळा त्यांचे सेवन केल्यास हरकत नाही. सतत हॉटेलमध्ये जेवण करणे, बाहेरून जेवण ऑर्डर करणे टाळावे ज्यामुळे अनावश्यक तेल, मीठ, प्रिझव्‍‌र्हेटिव्ह्ज शरीरात जाणे टळेल. पण असा संतुलित आहार घेताना एखादा ‘चीट डे’ नक्की असावा ज्यामुळे जेवणात तोच तोचपणा येणार नाही. आहार हा शरीराबरोबरच मनालाही आनंद देत असतो. मन आनंदी, सकारात्मक असल्यास आपली कार्यक्षमता वाढते, त्यामुळे आपल्या आवडीचे पदार्थ खाणे आनंदी राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते.

आपण कोणत्या प्रकारचा व्यायाम करतो हेसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. चालणे, धावणे, सायकलिंग हे व्यायाम कार्डिओ प्रकारात मोडतात. हे व्यायाम करत असताना आपला हार्ट रेट वाढतो आणि सतत असे व्यायाम प्रकार केल्याने शरीराचा कोणतेही काम करण्याचा स्टॅमिना वाढतो, आपली सहनशक्ती वाढते. परंतु कार्डिओ केल्याने म्हणावा तसा फॅट लॉस होत नाही. रोज एक तास कार्डिओ केल्यास त्याचे परिणाम हे त्या एका तासापुरतेच मर्यादित राहतात. याउलट वेट ट्रेनिंग, पॉवर योगा, क्रॉसफिट यांसारखा इंटेन्स व्यायाम प्रकार जरी एक तास केला तरी त्याचा फायदा दिवसाचे उरलेले २३ तास शरीराला होत असतो. ज्या वेळी आपण व्यायाम करतो त्या वेळी आपल्या मेंदूतून डोपामाईन एन्डोर्फिन्स आणि सेरोटोनिन अशी द्रव्ये सिक्रेट होतात ज्यामुळे आपल्या मनावरचा ताण हलका होतो, औदासीन्य जातं, जास्त आनंदी वाटू लागतं, आळस झटकला जातो आणि नवीन उत्साह निर्माण होतो. म्हणजेच व्यायामामुळे शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यसुद्धा सुधारते.

आहार आणि व्यायाम करूनसुद्धा भागत नाही. फिटनेस क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले फिटनेस एक्सपर्ट विवेक सारंग एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात तो असा की व्यायाम आणि संतुलित आहारासोबतच शरीराला पुरेसा आराम म्हणजेच रेस्ट देणं महत्त्वाचं आहे. ज्या वेळी आपण व्यायाम करतो त्या वेळी आपले स्नायू म्हणजेच मसल्स ब्रेक होतात. अशा वेळी हे स्नायू पुन्हा बांधण्यासाठी आपलं शरीर आपण घेतलेल्या संतुलित आहारातील कॅलरीजचा वापर करते. या वेळी हे स्नायू अधिक बळकट होतात जेणेकरून पुन्हा व्यायाम करतानाची शरीराची क्षमता वाढलेली असेल. परंतु ही स्नायू बळकट होण्याची क्रिया ही रेस्टिंग पिरिअडमध्ये होत असते. त्यामुळे कमीतकमी ७-८ तास झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. शरीराला अशी रेस्ट न मिळाल्यास पुढच्या वेळी व्यायाम करताना शरीराची क्षमता वाढणार नाही व हवे तसे रिझल्ट्स मिळणार नाहीत.

वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी थोडय़ा दिवसांसाठी केलेलं डाएट आणि वर्कआऊट हा निराळा भाग झाला, परंतु संतुलित आहार आणि व्यायाम हे काही काळापुरतेच मर्यादित न ठेवता ते आपल्या जीवनशैलीचाच एक भाग बनणं आवश्यक आहे. हाच धागा घेऊन आम्ही चालवत असलेल्या ‘राइट बाइट’ या हेल्थ कॅफेचा मूळ उद्देश हाच आहे की लोकांना त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये चेंजेस करून हेल्दी होण्यास प्रवृत्त करणे.

आहार, व्यायाम आणि आराम या तिन्हीचं संतुलन राखल्यास आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्याला अधिक फ्रेश वाटतं व आपण आनंदी राहतो, आपली स्ट्रेस लेव्हल कमी होण्यास मदत होते ज्यामुळे आपण डायबेटिस, हार्ट डिसीज, हायपरटेन्शन, कॅन्सर अशा अनेक आजारांपासून दूर राहतो. अशा प्रकारे मिळवलेली शारीरिक आणि मानसिक हेल्थ हीच खरी हेल्थ आहे आणि हेच खरं हेल्दी असणं आहे. तेव्हा आजपासून हेल्दी असण्याचा का कानमंत्र लक्षात ठेवूया – ‘ ट्रेन – इट – स्लीप – रिपीट’.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2020 1:27 am

Web Title: article on ear mantra of staying healthy abn 97
Next Stories
1 कोकणी हौस.. जाऊ तिथे खाऊ
2 व्हिवा दिवा : प्रणती केदार
3 थंडीतली खवय्येगिरी
Just Now!
X