सौरभ करंदीकर

वेळेच्या आधी लढवलेल्या अनेक कल्पनांना त्या त्या काळी जरी ‘निव्वळ कविकल्पना’ म्हणून हिणवलं गेलं असलं तरी कालांतराने त्या कल्पना मांडणाऱ्या व्यक्तींना, अनेकदा त्यांच्या पश्चात द्रष्टे म्हणून घोषित करण्यात येतं.

प्रसिद्ध फ्रेंच साहित्यिक व्हिक्टर ुगो एकदा असं म्हणाले होते, की एखाद्या कल्पनेची ‘वेळ’ आली असेल, तर त्या कल्पनेला जगातली कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही. कलाकार, नेते, शास्त्रज्ञ, साहित्यिक या सर्वाना सुचलेल्या कल्पना उदयाला येण्यासाठी पोषक वातावरण असावं लागतं. प्रत्येक कल्पनाविष्काराची एक ‘वेळ’ यावी लागते. वेळेच्या आधी, जबरदस्तीने जन्माला घातलेलं तंत्रज्ञान तग धरत नाही. आणि वेळेनंतर उदयाला आणलेलं तंत्रज्ञान कुचकामी ठरू शकतं. उदाहरणार्थ, उद्या जर कुणी छपाईचं एखादं नवीन तंत्रज्ञान विकसित केलं, तर त्याकडे मोबाइल आणि टॅबलेटच्या स्क्रीनवर वाचायची सवय झालेली नवी पिढी अजिबात लक्ष देणार नाही.

वेळेच्या आधी लढवलेल्या अनेक कल्पनांना त्या त्या काळी जरी ‘निव्वळ कविकल्पना’ म्हणून हिणवलं गेलं असलं तरी कालांतराने त्या कल्पना मांडणाऱ्या व्यक्तींना, अनेकदा त्यांच्या पश्चात, द्रष्टे म्हणून घोषित करण्यात येतं. १७९९ साली विल्यम मरडॉक याने सर्वप्रथम ‘न्यूमॅटिक टय़ूब’ची संकल्पना मांडली. काही कागदपत्रं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी त्याने धातूच्या पाइपमध्ये निर्वात पोकळी तयार केली, आणि कागदपत्रं कॅप्सूलमध्ये घालून ती त्या पाइपातून ढकलली. १८५४ साली जोसिया लिटमर क्लार्क याने कागदपत्रंच नव्हे, तर छोटी पार्सल्सदेखील निर्वात पाइपच्या साहाय्याने वेगाने कशी पाठवता येतील, याचं तंत्रज्ञान विकसित केलं आणि पेटंट केलं. १८६० पर्यंत ‘लंडन स्टॉक एक्स्चेंज’ आणि ‘इलेक्ट्रिक टेलिग्राफ’ कंपनी बाजारभाव आपल्या ग्राहकांपर्यंत चटकन पोहोचवण्यासाठी अशाच न्यूमॅटिक टय़ूब्सचा सर्रास वापर करत.

१८१२ साली जॉर्ज मेडहर्स्ट याने अशाच निर्वात, परंतु काहीशा मोठय़ा पाइपातून माणसांनासुद्धा पाठवता आलं तर? अशी कल्पना मांडली, परंतु त्या काळातल्या परिवहन व्यवस्थेला ते अजिबात पटलं नसावं. अशा पाइपातून माणसं प्रवास करू लागली तर बाकीच्या वाहनांचं काय होईल? शिवाय असा ‘पाइपातला प्रवास’ कितपत सुरक्षित असेल?, इत्यादी शंका काढल्या गेल्या. १८४० च्या दशकात त्या काळची रेल्वे आणि निर्वात टय़ूबची संकल्पना एकत्र केली गेली. १८४७ साली ‘इझमबर्ड किंग्डम ब्रुनेल’ नावाच्या एका अतिउत्साही इंजिनीअरने माणसांना न्यूमॅटिक पाइपमध्ये न घालता ट्रेनमध्ये बसवलं. परंतु ट्रेनला ढकलायचं काम रुळालगत जाणाऱ्या न्यूमॅटिक पाइपनं करायचं असं ठरवलं.

कोळसा, वाफेवर किंवा नुकत्याच नावारूपाला आलेल्या विजेवर  खर्च न करता ट्रेन केवळ हवेच्या दाबाने पुढे जावी यासाठी इंग्लडमधील एक्सटर आणि प्लिमथ या मार्गावर दर तीन किलोमीटरवर एअर पम्पिंग स्टेशन्स बसवली गेली. ब्रुनेलची ही ‘अ‍ॅटमॉस्फेरिक ट्रेन’ काही काळ चालली, पण निर्वात टय़ूब जागोजागी फाटू लागल्या. त्यांच्या दुरुस्तीचा त्रास आणि खर्च वाढत गेला, आणि ही न्यूमॅटिक ट्रेन बंद पडली.

थोडक्यात या कल्पनेची ‘वेळ’ आलेली नव्हती. त्यासाठी २०१२ साल उजाडावं लागलं. प्रसिद्ध उद्योगपती, स्पेस एक्स आणि टेस्ला कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांनी जमिनीवरचा प्रवास अधिक जलद व्हावा यासाठी ‘हायपरलूप’ नावाच्या तंत्रज्ञानाविषयी प्रथम वाच्यता केली. त्यांनी २०१३ साली प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत ‘हायपरलूप’ प्रवासाविषयी सर्व माहिती दिली होती. कल्पना अशी होती की दोन शहरांदरम्यान एक लांबलचक पाइप उभारण्यात यावा. या पाइपमध्ये प्रवाशांना आरामात बसता येईल असे डबे असावेत.

पाइपातील हवा त्या डब्यासमोरील मोठय़ा पंख्याद्वारे खेचली जावी, त्याच हवेचा वापर करून डबा काहीसा अधांतरी उचलला जावा आणि कमीतकमी ऊर्जेचा वापर करून तो डबा त्या पाइपातून ढकलला जावा. असं वाहन लॉस एंजेलिस ते सॅन फ्रॅन्सिस्को हे अंतर २० मिनिटांत कापेल, असा इलॉन मस्क यांचा दावा होता. (संदर्भ : बस हे अंतर ८ तासांत पार करते, ट्रेनने ४ तास लागतात आणि दोन्हीकडच्या एअरपोर्टपर्यंतचा प्रवास धरला तर विमान हाच प्रवास ३ तासांत पार पाडतं).

ही कल्पना सत्यात आणण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाची आणि कल्पकतेची गरज होती. हेच ओळखून मस्क यांनी ‘हायपरलूप ही संकल्पना माझ्या मालकीची नाही (ओपन सोर्स असेल), ज्यांना हवं त्यांनी यावर काम करावं’, असं जाहीर केलं. अनेक संशोधक, विद्यार्थी, इंजिनीअर याखेरीज स्वत: मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या कंपनीने हायपरलूपवर काम केलं. या तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये सर्वात पुढे गेली ती २०१४ साली स्थापन झालेली ‘हायपरलूप वन’ ही कंपनी. २०१७ साली व्हर्जिनच्या सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मोठी गुंतवणूक केल्यानंतर या कंपनीचं नाव ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ असं ठेवलं गेलं. इलॉन मस्क यांच्या कल्पनेत फेरफार केले गेले. मोनोरेल ज्या चुंबकीय शक्तीवर (काहीशी तरंगत) चालते, त्या मॅग-लेव्ह तंत्रज्ञानाचा वापर करून ८ नोव्हेंबर २०२० रोजी नेवाडा येथील कंपनीच्या टेस्ट ट्रॅकवर जवळजवळ ‘निर्वात’ पाइप-वेमध्ये हायपरलूपची मानवी चाचणी घेतली गेली. कंपनीचे अधिकारी जॉश गायगल आणि सारा लुसियन हे हायपरलूपचे पहिले प्रवासी ठरले. ही पहिली फेरी ताशी १७२ किमी वेगात चालवली गेली, परंतु काही मानवरहित चाचण्या ताशी ३८० किमी या वेगानेदेखील घडल्या आहेत! भविष्यात हायपरलूपचा वेग ताशी १,२०० पर्यंत जाऊ शकेल.

भारतात हायपरलूपसाठी मुंबई-चेन्नई आणि बंगळूरु-चेन्नई हे दोन मार्ग निवडले गेले आहेत, परंतु त्यासाठी २०३० साल उजाडावं लागेल. त्याचबरोबर तंत्रज्ञानातील सुधारणा, सामाजिक स्वीकार आणि राजकीय इच्छाशक्ती या साऱ्या गोष्टी एकत्र झाल्या, तरच आपल्याला हा सुखलो‘लूप’ प्रवास घडू शकेल.

viva@expressindia.com