विशाखा कुलकर्णी

तनवीर सिद्दिकी हे नाव फेसबुकवर असणाऱ्या मराठी माणसांनी नक्कीच वाचलेले असेल. ‘एक टप्पा आऊट’ हे तनवीर सिद्दिकी यांच्या लिखाणाचे संकलन. यात लहान लहान किस्से, लेख, गोष्टी, प्रसंग या सगळ्याचाच समावेश आहे. पुस्तकाचे नाव वाचून खरंतर या पुस्तकात काय असेल याचा अंदाज येत नाही, पुस्तकाच्या सुरुवातीलाच या नावाचा अर्थ उलगडून दाखवला आहे, ‘एक टप्पा आऊट’ हा क्रिकेटमधला लहान मुलांनी आपल्या सोयीसाठी काढलेला नियम. आपण जीवनातसुद्धा अशा लहान मोठय़ा तडजोडी पावलोपावली करत असतोच, या तडजोडी करणे, म्हणजे काही आयुष्यातली हार नव्हे! पुस्तकाच्या नावासोबतच असलेले वाक्य, म्हणजे ‘माणसाकडे हरण्याची ताकद पाहिजे, जिंकता कधीही येतं’.. सुरुवातीचं हे वाक्य वाचताच पुस्तक हृदयाला हात घालतं.

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व

यशस्वी कसं व्हावं, आनंदाने कसं जगावं, सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा, असे संदेश देणारी पुस्तकं अनेक असतात, पण यात दिलेले संदेश, केलेलं मार्गदर्शन म्हणजे केवळ कोरडा उपदेश असतो. ‘एक टप्पा आऊट’ हे पुस्तक इथेच आपला वेगळेपणा दाखवतं. आयुष्यातल्या लहानसहान गोष्टीतून, आपल्याला आजूबाजूला भेटणाऱ्या माणसांकडून, प्रसंगांमधून मिळत जाणारी सकारात्मकता या पुस्तकात मिळते. यात कुठेही काहीतरी उपदेश करण्याचा प्रयत्न दिसत नाही. पुस्तकातील अनेक लेख लेखकाच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित आहेत, अगदी दैनंदिन जीवनातील गोष्ट, परंतु त्यामागे असलेला दृष्टिकोन खूप वेगळा विचार देऊन जातो. या पुस्तकामध्ये एखादी गोष्ट सांगताना ती लिहिण्यात असलेल्या सहजपणामुळे कुठलाही आव आणून लिहिलेले नाही हे जाणवत राहते. एखाद्या मित्राला दिवसातली एखादी गोष्ट सांगावी अशा पद्धतीने लिहिल्याने ती वाचकाला लेखकाच्या अगदी जवळ आणते.

या पुस्तकात भेटणारी पात्रं, म्हणावी तर लेखकाला भेटलेली असतात, पण खरे पाहता ही आपल्या सगळ्यांनाच कधी न कधी भेटत असतात. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, आपले लक्षही ज्यांच्याकडे जात नाही अशा व्यक्ती, पात्रं आपल्याला इथे भेटतात, त्याचं अस्तित्व आपल्याला एरवी जाणवतही नाही, जे लेखकाच्या संवेदनशीलपणातून आपल्यासमोर उभं राहिलेलं असतं. ही पात्रं कोण? आपण मनापासून ज्याच्याकडे प्रार्थना करतो त्या देवापासून ते रोजचा डबा तयार करणाऱ्या काकू , त्यांची मुलं, हॉटेलच्या रूम सव्‍‌र्हिससाठी येणारे काका, बॉस, कलीग्ज, बांधकाम करणारे कामगार, फेसबुकवरील मित्रमैत्रिणी एवढंच काय, घरातलेच- आई, बाबा, बहीणभाऊ , मुलगी, बायको.. अगदी आपणसुद्धा. या सगळ्या पात्रांना आपल्या आयुष्यात काहीतरी स्थान असेल-नसेल, त्यांना काही चेहरा असेल नसेल, यातल्या काही जणांसोबत आपण एखादा मिनिट घालवलेला असतो, तर कधी आयुष्य! या पात्रांच्याच गोष्टी या पुस्तकात सांगितलेल्या आहेत.

पुस्तकातील लेखांची सुरुवात एखादा किस्सा सांगितल्यासारखी होते, पण गोष्ट पुढे सरकते तसा अचानक ‘ट्वीस्ट’ येतो आणि नकळत तो किस्सा मनात घर करून राहतो, कधी डोळ्यात पाणी आणतो, तर कधी विचार करण्यास भाग पाडतो. ‘हलाल’सारखी एखादी गोष्ट अंगावर सर्रकन काटा उभा करते, तर ‘इलायची क्रीम’ नावासारखाच गोड विचार मनात सोडून जाते. ‘इफत का भाई’, ‘ए लेटर फ्रॉम गॉड’, ‘किती वाजले’ असे अनेक लेख अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. ‘पोक’ या गोष्टीत एका छोटय़ाशा प्रसंगातून एका लहान मुलीचे बदलणारे भाव लेखकाने अचूक टिपले आहेत, या लहानशा मुलीच्या भावभावनांचे हे सूक्ष्म चित्रण लेखकाची या भावना अचूक टिपणारी नजर आणि त्याचा वेध घेणारा वेगळाच दृष्टिकोन दाखवून देते. ‘मॅनेजर’ या आणखी एका लहानशा कथेमध्ये मॅनेजरपदाचा, त्या शब्दाचा अर्थच उलगडून दाखवला आहे! आणखी काही कथांमध्ये लेखकाच्या संघर्षांची गोष्ट सांगितली आहे, या कथा खूप सकारात्मक विचार देतात. प्रामाणिकपणे सांगितलेल्या या प्रसंगांमध्ये कुठेही मोठे तत्त्वज्ञान सांगितल्याचा आविर्भाव दिसत नाही. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये, गरिबी-श्रीमंती दोन्ही त्रयस्थपणे बघत, केवळ एक माणूस म्हणून जगताना आलेले अनुभव वाचकाला समृद्ध करतात. आपल्या लहान लहान कृतींमधून माणुसकी दाखवणे, ती पसरवणे फार सोपे असते, याची जाणीव ‘एक टप्पा आऊट’ वाचताना होत राहते. कोणत्याही दोन अनोळखी माणसातील नि:स्वार्थ प्रेम, उल्लेखही न करता असलेली प्रचंड माया यासारख्या गोष्टी जगण्याच्या गतीमध्ये लक्षातही येत नाहीत, हे पुस्तक वाचल्यावर अशा अनेक गोष्टींचे महत्त्व प्रकर्षांने जाणवू लागते.

या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे यातील गोष्टी अगदी लहान लहान आहेत. वाचताना अजिबात कंटाळा येणार नाही, कुठल्याही वेळी कुठलीही गोष्ट वाचावी, अशी या पुस्तकाची रचना आहे. प्रवासात, अगदी थोडाच वेळ हाताशी असतानासुद्धा एक-दोन गोष्टी वाचून व्हाव्यात एवढय़ाच माफक लांबीच्या या गोष्टी कुठेही लांबलचक होत नाहीत.

पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे गोष्टीच्या शेवटी ठळक अक्षरात लिहिलेली वाक्ये. गोष्टीचे सार अशा एका वाक्यात सांगितले आहे, जे मनावर कोरले जाते.

समाजमाध्यमांवर तनवीर सिद्दिकी यांचे चाहते खूप आहेत, यात तरुणाईचा समावेश मोठय़ा प्रमाणावर आहेच. पण चाहत्यांचे एवढे प्रेम असलेल्या या लेखकाची नम्रता आणि माणुसकीचे दर्शन त्यांच्या या पुस्तकातील गोष्टीतून होते. तरुणाईच्या वाचनाच्या लिस्टमध्ये असलेले हे पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे.

viva@expressindia.com