23 January 2020

News Flash

टेकजागर : मोबाइल छायाचित्रणाचा आनंद

बाजारात कोणताही नवीन स्मार्टफोन आला की, त्याच्या कॅमेऱ्याची चर्चा जोरात सुरू होते.

(संग्रहित छायाचित्र)

आसिफ बागवान

गेल्या आठवडय़ातील लेखात कॅमेऱ्यापासून मोबाइल कॅमेऱ्यापर्यंतच्या प्रगतीचा प्रवास आणि इतिहास आपण जाणून घेतला. आज मोबाइल कॅमेरा ही प्रत्येकासाठी आवश्यक गरज बनली आहे. त्यामुळे चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन निवडताना काय गोष्टी विचारात घ्यायला हव्यात, याचा थोडक्यात आढावाही आपण घेतला. प्रत्यक्षात हे निकष कसे पडताळून पहायचे, हे आजच्या लेखात जाणू या.

बाजारात कोणताही नवीन स्मार्टफोन आला की, त्याच्या कॅमेऱ्याची चर्चा जोरात सुरू होते. त्यातही मुद्दा असतो त्या कॅमेऱ्याच्या मेगापिक्सेलचा. मोबाइल कॅमेऱ्यांनी ०.३ मेगापिक्सेलपासून २१-२५ मेगापिक्सेलची वैशिष्टय़े गेल्या दशकभरात मिरवली. मेगापिक्सेलच्या वाढत्या आकडय़ांना भुलून ग्राहकांनी मोबाइल खरेदीही केले. मात्र, मेगापिक्सेल म्हणजे नेमकं काय?

कोणत्याही डिजिटल कॅमेऱ्यात फोटो टिपण्याचे काम ‘इमेज सेन्सर’ करतो. हा ‘इमेज सेन्सर’ म्हणजे एक छोटी संगणकीय चिप असते. कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये परावर्तित होऊन आलेला प्रकाश या चिपवर आदळतो, तेव्हा छायाचित्र टिपले जाते. परावर्तित होऊन आलेला प्रकाश टिपून त्याचे डेटामध्ये रूपांतर होते. हे काम इमेज सेन्सरच्या चिपवर बसवलेले ‘रिसेप्टर’ करत असतात. अनेक सूक्ष्म रिसेप्टर मिळून इमेज सेन्सर तयार होतो. अशा असंख्य सूक्ष्म रिसेप्टरनी रूपांतरित केलेला डेटा एकत्रितपणे फोटो अर्थात प्रतिमा निर्माण करतो. हे रिसेप्टर म्हणजेच ‘पिक्सेल’. ‘पिक्सेल’ हे ‘पिक्चर’ आणि ‘एलिमेंट’ या दोन शब्दांचे संयुक्त रूप आहे. प्रत्येक कॅमेऱ्यात लाखो पिक्सेल कार्यरत असतात. अशा दहा लाख पिक्सेलचा (१०,४८,५७६ ) मिळून एक मेगापिक्सेल तयार होतो. जितके अधिक मेगापिक्सेल तितक्या अधिक बारकाईने टिपलेल्या छायाचित्राची प्रतिमा मोबाइलवर किंवा कॅमेऱ्यात उमटत असते. म्हणजेच दहा मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यापेक्षा १२ मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यात जास्त रिसेप्टर असतात आणि ते अधिक बारकाईने प्रकाशाचे डेटामध्ये रूपांतर करतात.

हे वाचल्यानंतर जितके जास्त मेगापिक्सेल तितके चांगले छायाचित्र, असा सरळसोपा अर्थ काढता येऊ शकतो. मात्र, तसे असतेच असे नाही. कारण लेन्समधून इमेज सेन्सरवर आदळलेल्या प्रकाशाचे डेटात रूपांतर करण्यात येत असतानाच्या प्रक्रियेदरम्यान योग्य-अयोग्य अशी छाननी होत नाही. तो सबंध डेटा एकत्रितपणे छायाचित्राच्या रूपात मांडला जातो. त्यामुळे टिपलेले छायाचित्र अंधूक, धुसर येण्याचीही शक्यता असते. याचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. आपल्या आणि आपल्या मित्राकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे सारख्याच मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेले फोन असले तरी, त्याच्या फोनच्या कॅमेऱ्यातून येणारी छायाचित्रे अधिक सुस्पष्ट आणि उठावदार येतात. याचाच अर्थ केवळ मेगापिक्सेलवर कॅमेऱ्याचा दर्जा अवलंबून नाही. तर, कॅमेऱ्यातील ‘इमेज सेन्सर’ हा घटकही महत्त्वाचा आहे. अनेकदा कॅमेऱ्यांचे मेगापिक्सेल कमी अधिक असले तरी त्यांचे इमेज सेन्सर सारखेच असतील तर, येणारे छायाचित्रही सारख्याच दर्जाचे असू शकते.

कॅमेऱ्याचा दर्जा ठरवणारा दुसरा मुद्दा म्हणजे ‘ऑटोफोकस’. आपल्याला ज्या विषयाचे छायाचित्र काढायचे आहे, त्या गोष्टीवरच ‘फोकस’ करण्याचे काम ‘ऑटोफोकस’ यंत्रणा करते.  ‘ऑटोफोकस’मुळे धूसर प्रतिमा उमटण्याचा धोका टळतो. सध्या जवळपास सर्वच स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांमध्ये ‘ऑटोफोकस’ ही यंत्रणा कार्यरत असते. मात्र तरीही स्मार्टफोन खरेदी करताना त्याच्या कॅमेऱ्याचा ऑटोफोकस व्यवस्थित आहे का, याची खात्री करून घ्यायला हवी.

छायाचित्रांचा दर्जा उंचावणारा कॅमेऱ्यातील आणखी एक घटक म्हणजे, त्यातील प्रकाश टिपण्याची क्षमता. स्वच्छ सूर्यप्रकाशात सर्वच स्मार्टफोनमधून चांगली छायाचित्रे येतात. मात्र, नवीन स्मार्टफोन घेण्यापूर्वी कमी प्रकाशाच्या ठिकाणी कॅमेऱ्यातून छायाचित्र काढण्याची चाचणी करणे योग्य ठरते. सध्या अनेक स्मार्टफोनमध्ये ‘ऑटोफोकस’सोबतच प्रकाश वाढवण्याची सुविधाही दिलेली असते. ती अंधारलेल्या ठिकाणी छायाचित्र काढताना उपयुक्त ठरते. त्यामुळे अशी सुविधा असलेल्या कॅमेऱ्यांच्या स्मार्टफोनचा प्राधान्याने विचार करायला हवा.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजन्सने जगभरातील तंत्रज्ञानाला नवीन उंची गाठून दिली आहे. मोबाइल कॅमेऱ्यांच्या बाबतीतही तसे म्हणता येईल. ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ (एआय) असलेले स्मार्टफोनचे कॅमेरे स्वयंचलित पद्धतीने दर्जेदार छायाचित्रे टिपतात. अनेक कॅमेऱ्यांमध्ये ‘बोके’ किंवा पोट्रेट मोड असतो. हा घटक आपल्याला हव्या त्या गोष्टीचे छायाचित्र अधिक सुस्पष्ट करतानाच त्याची पाश्र्वभूमी अस्पष्ट बनवतात. त्यामुळे छायाचित्रांना अधिक उठाव येतो. याखेरीज एचडीआर, फोरके ही सुविधा असलेले कॅमेरे उत्तम छायाचित्रे टिपण्यासाठी उपयुक्त ठरतात.

मागील आठवडय़ातील आणि आजच्या लेखात आपण मोबाइलच्या कॅमेऱ्यांचे तंत्रज्ञान आणि त्यातील बारकावे जाणून घेतले. आपण जेव्हा मोबाइल खरेदी करायला जातो, तेव्हा दुकानातील किंवा मॉलमधील सुप्रकाशित (की अतिप्रकाशित?) जागेवर कॅमेरा तपासून त्यातून येणारी छायाचित्रे छान निघत असल्याच्या विचाराने संबंधित स्मार्टफोन खरेदी करतो. मात्र, तेथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला वेगळाच अनुभव येऊ शकतो. हे टाळायचे असेल तर, वरील गोष्टींचा विचार नक्की करा! तुमच्या मोबाइल छायाचित्रणाचा आनंद द्विगुणित होईल.

viva@expressindia.com

First Published on July 19, 2019 1:46 am

Web Title: article on enjoying mobile photography abn 97
Next Stories
1 फिट-नट : आशुतोष पत्की
2 जगाच्या पाटीवर : संशोधनाची मॅजिक बुलेट
3 अराऊंड द फॅशन : फॅशन इन्फ्लूएन्सर
Just Now!
X