News Flash

क्षितिजावरचे वारे : भूगोल झाला इतिहासजमा

इंटरनेटचं आजचं स्वरूप लक्षात घेतलं तर ध्वनिलहरींच्या देवाणघेवाणीपेक्षा डेटाची देवाणघेवाण अधिक महत्त्वाची ठरली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सौरभ करंदीकर

कल्पना करा की आपण हिमालयाच्या शिखरावर, आफ्रिकेच्या जंगलात किंवा कुठल्यातरी वाळवंटाच्या मध्यभागी उभे आहात. अशा परिस्थितीत ‘नेटवर्क’ असणे किंवा नसणे हा जीवन-मरणाचा प्रश्न ठरू शकतो. आणि याच परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘इरिडियम’ जन्माला आली. पृथ्वीवर कुठेही असलात तरी नेटवर्क मिळवून देऊ शकेल अशा ६६ उपग्रहांची मालिका इरिडियमने अवकाशात प्रक्षेपित केली.

‘जिओग्राफी इज हिस्ट्री’ – ‘भूगोल झाला इतिहासजमा’! १९९८ साली ‘इरिडियम’ या दूरसंचार कंपनीच्या जाहिरातीचं हे घोषवाक्य जगभरात झळकलं. ‘जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी जगातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर संभाषण करणं आता शक्य झालं आहे’, अशी खात्री देऊ  शकणारी दूरसंचार सेवा प्रथमच अस्तित्वात आली. मोबाइलच्या जमान्यात अशा वाक्यांनी आपण फारसे प्रभावित होणार नाही, कारण ‘जगाच्या पाठीवर कुठेही’ या शब्दांचा अर्थ आपल्याला चटकन लक्षात येणार नाही. आपण राहतोच मुळी ‘नेटवर्क’च्या जगात. आपल्या घरात टेलिफोन कंपन्या वायरच्या साहाय्याने आणि आपल्या गावागावात आणि शहरभर मोबाइल टॉवरच्या माध्यमातून आपल्याला सतत ‘कनेक्टेड’ ठेवत असतात. परंतु कल्पना करा की आपण हिमालयाच्या शिखरावर, आफ्रिकेच्या जंगलात किंवा कुठल्यातरी वाळवंटाच्या मध्यभागी उभे आहात. अशा परिस्थितीत ‘नेटवर्क’ असणे किंवा नसणे हा जीवन-मरणाचा प्रश्न ठरू शकतो. आणि याच परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘इरिडियम’ जन्माला आली. पृथ्वीवर कुठेही असलात तरी नेटवर्क मिळवून देऊ  शकेल अशा ६६ उपग्रहांची मालिका इरिडियमने अवकाशात प्रक्षेपित केली. १९९८ ते २००२ या कालावधीत ७७ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा त्यांचा मानस होता. म्हणूनच ७७ आण्विक क्रमांक असलेल्या ‘इरिडियम’ या मूलद्रव्याचे नाव त्यांनी धारण के ले होते, परंतु प्रत्यक्षात पृथ्वीभोवती एकमेकांशी सतत संपर्कात राहणाऱ्या केवळ ६६ दूरसंचार उपग्रहांची गरज आहे हे त्यांच्या नंतर लक्षात आलं. आज ७८१ किलोमीटर एवढय़ा अंतरावर हे उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत.

मानवनिर्मित उपग्रहांचा वापर दूरसंचारासाठी करणं हे काही नवीन नव्हतं. पृथ्वीच्या कक्षेत पृथ्वीच्या गतीने फिरणारी (जिओ-सिंक्रनस ऑर्बिट) केवळ तीन स्पेस स्टेशन्स एकमेकांबरोबर, तसेच कुठल्याही भूभागाबरोबर संदेशांची देवाणघेवाण करू शकतील असं भाकीत प्रसिद्ध ब्रिटिश विज्ञानकथा लेखक आर्थर सी. क्लार्क यांनी १९४५ साली केलं होतं. तब्बल ५० वर्षांनंतर त्यांचं भाकीत खरं ठरलं, पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे स्पेस स्टेशनऐवजी चिमुकले उपग्रह पुरेसे ठरले आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी अंतराळवीरांची गरजदेखील उरली नाही. या उपग्रहांमार्फत दूरचित्रवाणी, ध्वनी, इंटरनेट (डेटा) आणि सैन्यदलांच्या उपयोगाच्या इतर रेडिओलहरी यांची देवाणघेवाण होते.

इरिडियम ही ‘कंपनी’ म्हणून तग धरू शकली नाही. त्यांचे सॅटेलाइट फोन त्या काळात कमालीचे महाग होते (१,००० डॉलर्स म्हणजे ७०-७५ हजार रुपयांच्या आसपास) आणि एका कॉलची किंमत दर मिनिटाला कमाल दीडशे रुपये इतकी होती. शिवाय पृथ्वीतलावर ‘कुठूनही’ कॉल करायची गरज वार्ताहर, सैन्य, धाडसी प्रवासी, इत्यादी ठरावीक लोकांनाच होती. म्हणावा तसा धंदा ते कधीच करू शकले नाहीत. सुरुवातीला मोटोरोलाने त्यांना आर्थिक साहाय्य केलं होतं. कंपनी डबघाईला आल्यानंतर थेल्स आलेनिया या कंपनीने त्यांनी प्रक्षेपित केलेले उपग्रह सांभाळण्याची जबाबदारी घेतली. आज ‘इरिडियम नेक्स्ट’ या नावाने ही सुविधा उपलब्ध आहे आणि वरती उल्लेख केलेले ठरावीक ग्राहक तिचा स्वीकार करत आहेत. प्रत्येक देशाने पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केलेले उपग्रह, याशिवाय इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशनचे इन्मरसॅट उपग्रह या सर्वाची पोहोच ज्या भूभागांवर नाही, तिथेही इरिडियमचे उपग्रह संदेश पाठवू शकतात.

इंटरनेटचं आजचं स्वरूप लक्षात घेतलं तर ध्वनिलहरींच्या देवाणघेवाणीपेक्षा डेटाची देवाणघेवाण अधिक महत्त्वाची ठरली आहे. टेलिफोन कंपन्यांनासुद्धा याची जाणीव आहे. आजकाल त्यांचे एसएमएस डावलून सर्वजण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनच मेसेज, ऑडिओ कॉल आणि व्हिडीओ कॉल करतात. तरीही ‘अमुक एसएमएस केल्यास अमुक पैसे द्यावे लागतील’, इत्यादी हास्यास्पद जाहिराती आजही टेलिफोन कंपन्या प्रसिद्ध करत आहेत. त्यांनी काळाची पावलं ओळखायला हवीत.

आजकाल इंटरनेट म्हटलं की चार बलाढय़ शक्तींचा उल्लेख नेहमीच केला जातो – गूगल, फेसबुक, अ‍ॅमेझॉन आणि अ‍ॅपल. पृथ्वीच्या कक्षा पादाक्रांत करण्यातही हे चौघे मागे नाहीत! अ‍ॅपलने उपग्रहांच्या मदतीने टेलिफोन कंपन्यांना आपल्या फोनपासून वेगळं करायचं ठरवलं आहे. अ‍ॅपलची ही मोहीम यशस्वी झाली तर सगळे आयफोन सिमकार्डशिवाय एकमेकांशी संपर्क साधू शकतात. असं झालं तर टेलिकॉम क्षेत्रात कमालीची उलथापालथ घडू शकते. गूगलच्या स्वत:च्या मालकीचे उपग्रह नाहीत, पण अनेक उपग्रह – तंत्रज्ञानविषयक उद्योगात त्यांनी गुंतवणूक केली आहे. ‘लून’ नावाच्या गरम हवेच्या साहाय्याने उंच जाऊ शकणाऱ्या फुग्यावर गूगलचे काम सुरू आहे. एकदा उड्डाण पावले की त्यांचे लून फुगे १०० दिवस तरंगत राहू शकतील आणि नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर इंटरनेट पुरवतील. फेसबुकने गेल्या वर्षी ‘अथेना’ नावाच्या त्यांच्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची घोषणा केली होती. अ‍ॅमेझॉनदेखील गेल्या वर्षी त्यांच्या ‘प्रोजेक्ट क्युइपर’अंतर्गत या शर्यतीत उतरला आहे. याशिवाय बोइंगने सौर ऊर्जेवर चालणारं आणि कधीही जमिनीवर न उतरणारं ड्रोन विमान तयार केलं आहे. थोडक्यात, आपल्या डोक्यावर शेकडो उपग्रह आणि इतर उडत्या गोष्टी आपल्याला इंटरनेट सुविधा देऊ  पाहत आहेत. ही प्रगती आपलं इंटरनेट डेटाचं ‘बिल’ किती वाढवते ते आता पाहायचं, बस्स!

karandikar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 4:22 am

Web Title: article on geography became history abn 97
Next Stories
1 फॅशन ‘परेड’
2 संशोधनमात्रे : सावर रे..
3 ‘मी’लेनिअल उवाच : विचारांचे पराठे
Just Now!
X