|| आदित्य लेले

‘आधी पोटोबा आणि मग विठोबा’ ही म्हण तरुण पिढीला खूपच आवडत असावी, कारण त्यात खाण्याचे महत्त्व अत्यंत चपखलपणे सांगितले आहे. आपल्याला काळाप्रमाणे खाद्यसंस्कृती जरी बदलताना दिसत असली तरी काही काही शहरं मात्र त्यांच्या खास जुन्या चवीसाठीच प्रसिद्ध असतात. ही चव देशभरातील खवय्यांना त्या शहराकडे आजही ओढून आणते. इंदूरचं नाव या शहरांच्या यादीत अग्रणी आहे..

मध्य प्रदेशातील सगळ्यात प्रसिद्ध आणि तिथली आर्थिक बाजू सांभाळणारं असं इंदूर हे महत्त्वाचं शहर आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या घराण्याने यशस्वीपणे राज्य केलेले हे ऐतिहासिक ठिकाण आहे. आजही या शहरात पारंपरिक संस्कृतीच्या खाणाखुणा तेथील लोकजीवनावरही आहेत आणि खाद्यपदार्थावरही त्या तितक्याच ठळकपणे दिसून येतात. नवीन जागा हुडकून तिथे भ्रमंती करण्यात रमणारा आदित्य लेले हाही इंदूरमध्ये पोहोचला. देवभक्ताला जशी एकदा तरी काशीला जायची इच्छा असते तशीच त्यालाही इंदूरला जायची इच्छा होती आणि तो योग लवकरच आला, त्याविषयी त्याने दिलेली ही खास माहिती..

नवीन नवीन जागा हुडकून तिथे खायला जाणे हा माझा छंद आहे. हा छंद मला माझ्या आईमुळे लागला. माझ्या आईने लहानपणापासूनच वेगवेगळ्या पदार्थाची ओळख मला करून दिली, त्यातले बरेच पदार्थ ती स्वत: घरीदेखील बनवत असे. मी लहान असताना आई अनेक ठिकाणी फक्त मला खायला घेऊन गेली आहे. त्या आठवणी आजही ताज्या आहेत. मी शासकीय विधि महाविद्यालयाचा विद्यार्थी.. त्यामुळे रोजच मुंबईची सफर ठरलेली. मग मोकळ्या वेळेत चर्चगेट, गिरगाव, फोर्ट या भागांची मुशाफिरी आणि तिथली पोटपूजा चुकणं शक्यच नव्हतं. तेव्हाच मला स्वत:चा फूडब्लॉग सुरू करायची कल्पना सुचली. डिसेंबर २०१६ मध्ये मी इन्स्टाग्रामवर स्वत:चा ब्लॉग सुरू केला. या ब्लॉगमुळे खास खाण्यासाठी अनेक ठिकाणी जायची संधी मिळाली. माटुंगा, परळ, मोहम्मद अली रोड अशा ठिकाणी जाऊन तिथल्या प्रसिद्ध खाद्यपदार्थाचा आस्वाद मी घेतला आहे; पण इंदूरची गोष्टच वेगळी..

इंदूरला सगळ्यात सुप्रसिद्ध जागा म्हणजे सराफा आणि त्याच्याच मागोमाग छप्पन दुकान आहे. सराफा बाजार हे खरं तर सराफांच्या दुकानांसाठी म्हणजेच सोन्याचांदीच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे; पण पूर्वीच्या काळात सोन्याचा बाजार व त्याचे भाव परदेशात ठरत व त्याचा व्यापारही रात्रीच चाले. हा व्यापार करता करता चहाबरोबर भूकही लागत असे. त्यामुळे इथे हळूहळू खाण्याचे ठेले वाढले.

बघता बघता रोज रात्री इथे शेकडय़ाच्या संख्येने खाण्याची दुकाने लागू लागली. आजही लागतात. यात प्रसिद्ध भुट्टे की खिचडी म्हणजे कणसाच्या किसाची खिचडी, जोशी यांचा दहीवडा अत्यंत प्रसिद्ध आहे. हा दहीवडा बनवणारा इसम ती वाटी वर उंच उडवून दुसऱ्या हातात सहज झेलतो आणि वाटीतला दह्य़ाचा एकही थेंब खाली सांडत नाही. ही मजा बघायला अनेक पर्यटक इथे गर्दी करतात. तिथल्या थंडीत आवडीने खावा असा ‘गरादु’ नावाचा खमंग पदार्थ मी चाखून पाहिला. महाराष्ट्रात कमी ऐकलेले गराडू नावाचे एक कंदमूळ इंदूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या कंदमुळाचे तुकडे करून ते तेलात तळून त्यावर मसाला आणि लिंबू पिळून तुम्हाला तिथे खायला देतात.

त्याचबरोबर मी तिथे पोटभर ‘पोहा जलेबी’, ‘खट्टा समोसा’, ‘मुगभजी’,  ‘दाल बाफला’ असं स्ट्रीट फूड खाल्लं आहे. विशेष म्हणजे ‘खोबऱ्या’पासून तयार केलेलं पॅटीसही मी इथे खाल्लं आहे. यापलीकडे आपण जे रोज खातो ते म्हणजे समोसे, शिरा, चिवडा, कचोरी, भेळ, छोलेभटुरे, गरम दूध, जलेबी, गुलाबजाम असे अनेक पदार्थ इथे गरमागरम आपल्यासमोर हजर होतात. इथल्या पदार्थाची चवच न्यारी आहे. त्यामुळे तुडुंब पोट भरलं तरी रबडी आणि मालपुवा खायला विसरू नका! गरम दाट पाकातला गोड मालपुवा जगात भारी लागतो. इंदूरमधल्या कडाक्याच्या थंडीत सराफ्यातून हॉटेलला परत जाताना खाल्लेली मलई कुल्फीसुद्धा तितकीच अप्रतिम होती.

छप्पन दुकान हे तसं मुंबईकरांना फार अप्रूप वाटेल अशी जागा नाही. पाणीपुरी, पावभाजी, डोसा अशा पदार्थाची मांदियाळी इथे आहे; पण यातील एक खासियत म्हणजे इंदूरचा एक वेगळा स्वाद त्याला आपोआप येतो. मुंबईत ५० रुपयाला जिथे अर्धी प्लेट मिळत नाही ती इथे एवढय़ाच पैशात पोटभरून आणि तितकेच स्वादिष्ट पदार्थ खायला मिळतात आणि अगदी महत्त्वाचे सांगायचे झाले तर इथे मात्र मांसाहार करणाऱ्या खवय्यांना सांगितले पाहिजे की, इंदूरच्या या सराफ्यात तुम्हाला फार स्कोप नाही.

असं हे इंदूर शहर जेवढं तिथल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, किंबहुना त्याहूनही अधिक खाद्यभ्रमंतीसाठी सुप्रसिद्ध आहे. तर मग इंदूरला भेट द्यायला विसरू नका जिथे तुमच्या जिभेचे चोचले शंभर टक्के पुरवले जातील. थोडक्यात काय, तर इंदूरसारख्या ठिकाणी ‘खाणे’ या गोष्टीला मरण नाही.

संकलन : विपाली पदे

viva@expressindia.com