वेदवती चिपळूणकर

टीव्हीवरच्या दैनंदिन मालिकेतून ‘आदित्य’च्या रूपाने तरुणाईवर गारूड केलेला चॉकलेट बॉय ते ‘गोपाळराव जोशीं’च्या रूपाने सक्षम कलाकार अशी ओळख निर्माण करणारा विचारी अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर! अनेक शाखांमधलं शिक्षण घ्यायचा प्रयत्न करताना केवळ नाटकच त्याला प्रिय वाटत राहिलं आणि त्यातूनच त्याचा या क्षेत्रात प्रवेश झाला. रंगमंच ते रुपेरी पडदा हा प्रवास त्याने केला आहे, मात्र रंगमंचाशी त्याचं नातं अजूनही कायम आहे. आपण करतो त्या कामातून स्वत:ला व्यक्ती म्हणूनही समृद्ध होता यावं हा त्याचा आग्रह आहे.

सामान्यत: सर्वच मुलं जे करतात तेच ललितनेही केलं. अभ्यासात चांगले मार्क  मिळताहेत आणि नंबरात येतोय म्हटल्यावर साहजिकच सगळ्यांची अपेक्षा होती की त्याने विज्ञान शाखा निवडावी आणि नंतर इंजिनीअरिंग करावं. त्याप्रमाणे त्याने सायन्सला अ‍ॅडमिशन घेऊन बारावीनंतर इंजिनीअरिंगची प्रवेश परीक्षाही दिली. आपल्या करिअर निवडीबद्दल ललित सांगतो, ‘सीईटीमधून मला पुण्याला अ‍ॅडमिशन तर मिळत होती. अ‍ॅडमिशनसाठी मी गेलो तेव्हा मी पोहोचेपर्यंत काउंटर बंद झाला आणि मग माझा विचार बदलला. पुन्हा अ‍ॅडमिशन घ्यायला मी गेलोच नाही. घरच्यांच्या आग्रहानुसार मी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. नावापुरतं एमसीएसुद्धा केलं, पण त्या पदवीच्या कालावधीतच मला नाटकाचं वेड लागलं होतं.’ ललितने एखादी सरकारी नोकरी करून दुसऱ्या बाजूला अभिनयाचे प्रयत्न करावेत अशी घरच्यांची इच्छा होती. नोकरीचा विचार त्यांच्या मनातून काढून टाकण्यासाठी ललितने लॉ करायचं ठरवलं. पहिल्या सेमिस्टरचे दोन पेपर दिल्यानंतर आजतागायत लॉ कॉलेजमध्ये पुन्हा पाऊल टाकलं नाही, असं ललित सांगतो. ‘गणिताचा प्रोफेसर व्हायचं असं ठरवून त्याने मास्टर्सला प्रवेश घेतला आणि खूप काळानंतर एकदाच लेक्चरला गेलो. मी नेहमी येत नाही हे पाहून मला त्या लेक्चरलाही बसू दिलं नाही आणि मग मी परत तिकडे गेलोच नाही’, असा किस्साही ललित सांगतो. हे नाही, ते नाही करत पुढे जाणाऱ्या ललितची अभिनयाच्या क्षेत्राशी गाठ कशी पडली हे जाणून घेणंही तितकंच रंजक आहे.

अभिनय क्षेत्राशी ललितची ओळख ही कॉम्प्युटर सायन्समधली पदवी घेत असताना बिर्ला कॉलेजमध्ये झाली. पहिल्याच दिवशी त्याने कॉलेजमधला नाटकाचा ग्रुप शोधून काढला आणि कल्याणमध्ये ‘मितीचार’ या संस्थेशीही स्वत:ला जोडून घेतलं. ‘सुरुवातीला वर्ष-दीड वर्ष तर मी फक्त बॅकस्टेजच करत होतो. कॉलेजमध्ये असताना एखादा मुलगा नाटकासाठी जे जे करेल ते सगळं मी करत होतो. एकदा सकाळी गेलो की थेट रात्री उशिराच घरी यायचो, नेपथ्यात हवी असलेली एखादी वस्तू घरात असेल तर ती घेऊन जायचो आणि अर्थातच ती परत कधी घरी आणायचो नाही’, अशी आठवण सांगतानाच ललित म्हणतो, ‘या सगळ्या कालावधीत मला एवढं मात्र नक्की कळलं होतं की मला नाटकातच काहीतरी करायचं आहे. त्यामुळे मी एनएसडीची प्रवेश परीक्षा द्यायची ठरवली आणि त्याच वेळी केंद्र सरकारच्या यंग आर्टिस्ट स्कॉलरशिपसाठीही प्रयत्न करायचं ठरवलं. एनएसडीची परीक्षा अजिबातच मनासारखी झाली नाही, मात्र स्कॉलरशिपची मुलाखत अगदी मनासारखी झाली आणि संपूर्ण देशातून केवळ तीस कलाकारांना मिळणारी ती स्कॉलरशिप मला मिळाली.’ या स्कॉलरशिपमुळे ललितचा आत्मविश्वास वाढला आणि सगळा वेळ नाटकालाच देऊ न त्याच क्षेत्रात काहीतरी करायचा निर्णय त्याने ठामपणे घेतला.

केंद्र सरकारच्या स्कॉलरशिपमुळे कला क्षेत्रात सतत कार्यरत राहणं आणि ठरावीक कालावधीने त्याचे रिपोर्ट्स पाठवणं ललितला बंधनकारक होतं. त्यामुळे संपूर्ण लक्ष यावर केंद्रित करून त्याने नवनवीन गोष्टी करून पाहायला सुरुवात केली. काही मालिकांमधून लहानशा भूमिका करून त्याने स्वत:च्या नावाला ओळख मिळवून द्यायला सुरुवात केली होती. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने मात्र त्याच्या नावाला मोठं वलय प्राप्त करून दिलं. ‘संपूर्ण मालिकेत चॉकलेट बॉय या पठडीची भूमिका केल्यानंतर मला पुन्हा त्याच प्रकारची भूमिका करायची नव्हती. मी काही फार मोठा स्टार नव्हतो किंवा प्रस्थापित कलाकार वगैरेही नव्हतो. तरीही प्रत्येक भूमिका निवडताना मी खूप विचार करायचो. एकही भूमिका अशी असता कामा नये ज्याबद्दल मला स्वत:ला नंतर पश्चात्ताप होईल. माझ्यात प्रचंड पेशन्स होते, मला काही प्रसिद्धीची घाई नव्हती आणि मला आवडणार नाही असं कोणतंच काम करायची इच्छा नव्हती. मालिका करताना मी नाटकाकडे दुर्लक्ष करतोय अशी टोचणीही मला होती, मात्र ‘रेशीमगाठी’चा सेट हा वाडय़ाला शांत ठिकाणी असल्याने मला विचार करायला शांतता मिळत होती आणि मी त्या गिल्टमधून स्वत:ला बाहेर काढलं’, असं तो सांगतो.

‘एका मालिकेनंतर घरच्यांना वाटलं होतं की मी सेटल झालो. पण मला असं सेटल व्हायचंच नव्हतं’, ललित म्हणतो. स्वत:मधला नवीन पैलू जाणून घेण्याची संधी देणारी भूमिकाच ललितला हवी होती. त्यासाठी कितीही थांबायची त्याची तयारी होती आणि कोणीही काहीही बोललं तरी त्याची मतं आणि त्याचे विचार पक्के होते. ‘माणसाला सगळ्या प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे, कमीत कमी तसा प्रयत्न तरी असला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ज्ञान नाही तोपर्यंत आपण स्वत:साठी कोणताच स्टँड घेऊ  शकणार नाही. स्वत:साठी खंबीरपणे उभं राहायला आपल्याकडे लॉजिक असणं आणि आपल्याला ते सगळ्या कारणांनिशी समोरच्याला पटवून देता येणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवणं हा एकच पर्याय मला योग्य वाटतो. जेव्हा जेव्हा मला स्वत:साठी स्टँड घ्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा मी शांत राहू शकलो, कारण माझे विचार, माझी मतं हे सगळं एका आधारावर उभं होतं. जेव्हा आपल्याकडे ज्ञानाचा आधार नसतो तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विचाराला फॉलो करत असतो. ते आपण थांबवलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे आपला स्वत:चा विचार येईल’, असं तो सांगतो.

एका वेळी एकाच कामाचा विचार करावा म्हणजे प्रत्येक कामात आपण आपले शंभर टक्के  देऊ  शकतो, असं ललितचं मत आहे. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे विचार हवा हा ललितचा आग्रह त्याला निव्वळ एक कलाकार म्हणून मर्यादित ठेवत नाही तर एक ‘हेडस्ट्राँग पर्सनॅलिटी’ म्हणून त्याला समोर आणतो.

माणसाला सगळ्या प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे, कमीत कमी तसा प्रयत्न तरी असला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ज्ञान नाही तोपर्यंत आपण स्वत:साठी कोणताच स्टँड घेऊ  शकणार नाही. स्वत:साठी खंबीरपणे उभं राहायला आपल्याकडे लॉजिक असणं आणि आपल्याला ते सगळ्या कारणांनिशी समोरच्याला पटवून देता येणं आवश्यक आहे. जेव्हा आपल्याकडे ज्ञानाचा आधार नसतो तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विचाराला फॉलो करत असतो. ते आपण थांबवलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे आपला स्वत:चा विचार येईल.

‘आपल्याला आपल्या स्वत:च्या आवडीनिवडींबद्दल प्रश्नच पडत नाहीत आणि म्हणून उत्तरांशीही आपला संबंध येत नाही. आपल्याला आपल्या कामातून नेमकं काय अपेक्षित आहे याबद्दलही आपण विचार करायला हवा. मनासारखं काम, पैसे, प्रसिद्धी अशा सगळ्या गोष्टी एकत्रित मिळणं खूप अवघड असतं. त्यामुळे आपल्याला आपला प्राधान्यक्रम ठरवता यायला हवा. एकदा आपल्याला काय करायचं आहे हे कळलं की त्यासाठी रिस्कही घेता यायला हवी. दुसऱ्याने केलं म्हणून, दुसऱ्याने सांगितलं म्हणून आपण एखादी गोष्ट करणं आणि आपल्याला हवी म्हणून करणं यात खूप फरक आहे. सतत सेफ गेम खेळून आपल्याला हवं ते मिळवता येत नाही’.

-ललित प्रभाकर