29 March 2020

News Flash

वस्त्रांकित : लावणीतील वस्त्रबोली

पेशवाई आणि उत्तर पेशवाईमध्ये लावणी बहरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. तसेच या काळात नवीन वस्त्र परंपराही निर्माण झाल्या

(संग्रहित छायाचित्र)

विनय नारकर

पेशवाई आणि उत्तर पेशवाईमध्ये लावणी बहरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. तसेच या काळात नवीन वस्त्र परंपराही निर्माण झाल्या. त्या वेळी अस्तित्वात असलेल्या आणि निर्माण झालेल्या वस्त्रपरंपरा यांचे प्रतिबिंब लावणी साहित्यात उमटले आहे.

पेशवाई आणि उत्तर पेशवाईमध्ये लावणी बहरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. तसेच या काळात नवीन वस्त्र परंपराही निर्माण झाल्या. त्या वेळी अस्तित्वात असलेल्या आणि निर्माण झालेल्या वस्त्रपरंपरा यांचे प्रतिबिंब लावणी साहित्यात उमटले आहे. शाहिरांनी आपल्या प्रतिभेने वस्त्रविषयक प्रतिमा लावण्यांमध्ये वापरून काव्यसौंदर्य फुलविले आणि त्या वेळच्या उच्चभ्रू जीवनशैलीचे चित्रही आपल्यासमोर ठेवले.

‘लावणीतील वस्त्रबोली’ या लेखाच्या पहिल्या भागात आपण पाहिले की, शाहीर परशरामाने त्याच्या आध्यात्मिक लावणीत विठ्ठल, तुकाराम यांच्यातील काल्पनिक प्रसंग, वस्त्रांचे प्रतीक वापरून किती खुलवला आहे. मग ज्या प्रसंगात वस्त्राचेच महत्त्व आहे तिथे तो मागे कसा राहील?  द्रौपदी वस्त्रहरणाचे वर्णन करणाऱ्या लावणीत त्याने कृष्णाने द्रौपदीस पुरवलेल्या वस्त्रांबद्दल ‘अतिरिक्त माहिती’ देऊन, लावणी वास्तववादी करण्याचा मनोरंजक प्रयत्न केला आहे.

धन्य धन्य श्रीरंग अनंता होय श्रीरंगे ।

न नेसवी वस्त्रे हरी अंगे ।

पर्वत वस्त्रांचे पडले शत्रु झाले दंग ।.

मथुरेची साडी आणली जरी पिवळा रंग ।

येल नक्षीची चोळी वरी भिंग ।.

सप्तपुऱ्याची वस्त्रे आणली त्याने पूर्ण । शेला नेसविला शंख चक्र वरी गदा पद्म खूण।

मथुरेची वस्त्रपरंपरा खरे तर बनारसहूनही जुनी. प्राचीन साहित्यातही मथुरेच्या वस्त्रांचा उल्लेख येतो. अठराव्या शतकापर्यंत मथुरेच्या साडय़ा मिळायच्या ही नोंद या लावणीतून झाली आहे. इंग्रजांच्या दमनकारी धोरणांमुळे भारतीय वस्त्रपरंपरांची जी वाताहत झाली त्यात मथुरेची वस्त्रपरंपराही नामशेष झाली.

शाहीर परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे होनाजी बाळा. होनाजी शिलारखाने हा व्यवसायाने गवळी होता. थोरल्या माधवरावांच्या काळातच होनाजी नावारूपाला आला होता. उत्तर पेशवाईमध्ये होनाजीच्या नावाचा फारच दबदबा होता. दुसऱ्या बाजीरावाची होनाजीवर खास मर्जी होती. त्याच्या काही रचना आजही लोकप्रिय आहेत. होनाजी आपल्या लावण्यांमधून बऱ्याचदा वस्त्रांचे दाखले देतो. स्त्री-सौंदर्याचे वर्णन करताना होनाजीने वस्त्र-प्रतिमांचा वापर अतिशय चपखलपणे केला आहे. लावणीचा रसरशीतपणा त्यामुळे निश्चितच वाढला आहे.

‘भरज्वानीमधिं मस्त तुझा भर.’

या लावणीत तो म्हणतो.

सरळ भांग वेणीचा बुचडा मानेच्या मिसलीं।

अनार दाणेदार तुझ्या गे माषुक मुखडय़ामधिं बसले।

तंग चोळी छातीवर जोवन कवळे रसरसले।

आधिंच कंबर बारिक त्यावर महेश्वरी पातळ कसलें।

बारीक कटीला महेश्वरी पातळ शोभून दिसेल, हे होनाजीला नेमके समजले. कारण काय तर महेश्वरी पातळ तलम असते. बारीक कटीचे सौंदर्य आणि डौलदारपणा अधोरेखित करण्यासाठी हेच वस्त्र वापरले पाहिजे हे या रसिक शाहिराला समजले.

लुगडे नेसताना स्त्रिया काही लकबी वापरतात, त्यांचे वर्णनही होनाजी काही ठिकाणी करतो. जसं ‘सखे गुलअनार गुलचमन’.. या लावणीमध्ये म्हटलंय..

बांधिव बुचडय़ाची लबक पदर सुबक

खोविला तीपदरी वेणिचा।

चंदनढाळीस जसा लपेटा काळे नागिणिचा।

पुरुषांच्या रुबाबाचे वर्णनसुद्धा होनाजीने वस्त्रांच्या आणि दागिन्यांच्या प्रतिमा वापरून जिवंत केले आहे.

पगडि कंगणीदार अंगावर ज्वाहार छबेला गडी

करून सज्ज पोषाख घेतली हातिं फुलांची छडी

मुक्त तुरा शिरपेच कानिं चौकडा सुरत फांकडी।

गळां पाचुचे हार सदोदित एकाहुन एक चढी॥

हातिं हिऱ्याच्या अंगठय़ा पेटय़ा पाहुन पडलें झडी।

असें वाटते सखा मजकडे पाहतो घडोघडी॥

आणि

मुशाफिर पाहून दिल खुशियाल।

कोण्या लालडीचे लाल॥

शिरी मंदिल बांधिल मजेचा।

शुभ्र दुपेटा जरी पैठणीचा॥

पुरुषांची अनेक प्रकारची शिरोभूषणे असायची, जसे रुमाल, पगडी, पागोटे, तिवट, पटका, फेटा, बत्ती, मंदिल आदी. यांपैकी तिवट आणि मंदिल हे मानाचे पण खास तरुणांसाठी असलेले शिरोभूषण होते. यावरून या लावणीत वर्णन केलेला पुरुष हा प्रौढ नसून कुणी तरुण असावा हे लक्षात येते.

याशिवाय त्याने स्त्री-पुरुषांच्या वस्त्रांचे, पेहरावाचे प्रकार, त्याबद्दलचे रिवाज व त्यासंबंधीच्या म्हणी, अशा संदर्भानी लावणीतील काव्यसौंदर्य खुलविले आहे. या प्रतिमा वापरताना विविध रंगांची प्रतीकात्मकतासुद्धा त्या त्या प्रसंगानुसार होनाजीने जपली आहे.

या सगळ्या लावण्यांमध्ये मला महत्त्वाची वाटते त्याची द्रौपदी वस्त्रहरणाची लावणी. होनाजीने यात वस्त्रांचे अतिशय लालित्यपूर्ण वर्णन केले आहे. या कामी त्याला त्याचे वस्त्रप्रावरणाचे ज्ञान फार कामी आले आहे.

तव दुर्जन दु:शासन सरसी निरी

ओढीत फेडीत वसनाशी।

नेसवी वस्त्रे हरी भगिनीशी॥

डाळींबी मोती चुरनकसीं।

राघावळ गुजरी खसखसी।

कंबुवर्ण पटवस्त्र प्रकाशी। निळी हिरवी अंजिरी पानसी। सोनवळी रानघडीसरसी॥

नानाजाती पुरविली भगिनीसी वस्त्रें। श्रीरंगे।

आपल्या पीतांबरे झाकिली द्रौपदी गात्रे।

भगवंते।

हे फेडतील म्हणून करी बसविली शस्त्रास्त्रे।।

वस्त्राशी संबंधित असणाऱ्या या लावणीमधून होनाजीने उत्तर पेशवाईत आढळणाऱ्या साडय़ांची एक जंत्रीच दिली आहे.

इथे किती प्रकारच्या लुगडय़ांचे उल्लेख आले आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. या सगळ्या साडय़ांची नावे आणि रंग होनाजीने लावणीच्या वृत्तात बसवून बहार उडवून दिली आहे. डाळींबी आणि मोती रंगाची चुरनकसीं म्हणजे बहुधा चंदेरी साडी, महाराष्ट्रात त्या काळी चंदेरी साडी खूप लोकप्रिय होती. विशेषत: मराठा सरदारांच्या स्त्रियांमध्ये.

राघावळ, गुजरी आणि खसखसी या प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्रात विणल्या जाणाऱ्या साडय़ा होत्या. राघावळ ही निळीमध्ये (Indigo Blue) रंगवलेली साडी असायची. गुजरी म्हणजे लाल व पांढऱ्या रंगाची विशिष्ट प्रकारची साडी, खसखसी म्हणजे अगदी लहान चौकडा असणारी साडी होती. कंबुवर्ण म्हणजे शंखाच्या रंगाची साडी, पानसी म्हणजे फिकट निळ्या, आकाशी रंगाची साडी. सोनवळी ही जरीची (टिश्यू) असलेली साडी होती.

एवढेच नव्हे तर या लावणीतून वस्त्रांचे अनेक प्रकार व त्यातून तयार झालेल्या काही म्हणी, हेही सापडतात. पण कृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पुरवताना, त्या प्रसंगातही तो वस्त्रांचे वैविध्य जपतो, ही कल्पना कवीच करू शकतो. भगिनीप्रेम व्यक्त करण्याची ही वेगळीच तऱ्हा. इतक्या प्रकारच्या लुगडय़ांच्या उल्लेखाने फक्त दस्तऐवजीकरण साध्य होते असे नाही. तर त्यामुळे, त्या विशिष्ट नावांमुळे या लावणीमध्ये एक मन लुभावणारं लालित्य निर्माण झालं आहे.

होनाजीमुळे हे साडय़ांचे त्यातही आज प्रचलित नसलेल्या साडय़ांचे इतके प्रकार आपल्यापर्यंत पोहोचतात. या साडय़ा कालौघात नामशेष झाल्या, पण या लावणीमुळे त्या अजरामर झाल्या आहेत.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:29 am

Web Title: article on lavni textiles abn 97
Next Stories
1 व्हिवा दिवा : प्राजक्ता राणे
2 पत्रास कारण की..
3 क्षितिजावरचे वारे : स्वयंचलित घोडं अडलंय कुठं?
Just Now!
X