10 April 2020

News Flash

पत्रास कारण की..

नवीन नाइट लाइफ धोरणाप्रमाणे काही ठिकाणचे मॉल २४ तास सुरू ठेवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्यात आली आहे.

प्रिय पर्यटनमंत्री, पत्रास कारण की तुमचा आवडता विषय मुंबईची नाइट लाइफ..

सर्वात आधी पर्यटनमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. मुंबईला शांघाय बनवण्याच्या गप्पा हरवल्यानंतर आता तुम्ही मुंबईमधील नाइट लाइफला चालना देण्यासाठी पुढाकार घेत नव्याने प्रयत्न करत आहात हे कौतुकास्पद आहेच त्याबद्दल शंका नाही; पण मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने रात्री भटकंती करताना अनेक समस्या जाणवतात त्याबद्दल आधी बोलावंसं वाटतंय म्हणून हा पत्रप्रपंच समजा.

नवीन नाइट लाइफ धोरणाप्रमाणे काही ठिकाणचे मॉल २४ तास सुरू ठेवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक मॉलमालकांनी यासाठी तयारी दर्शवली नाही असंच चित्र सुरुवातीला दिसतं आहे. मुळात तुम्ही कोणता विचार करून मॉल आणि नाइट लाइफचा संबंध जोडला हे माझ्यासारख्या सामान्य मुंबईकरासाठी ‘अनाकलनीय’ आहे. खरं तर तुम्ही आमच्याच वयाचे आहात. त्यामुळे आता तुम्हीच विचार करा की, मुंबईत रात्री ‘चल नाइट मारू’ म्हटल्यावर एखादा मित्रांचा ग्रुप खरंच मॉलमध्ये जाईल की मरिन ड्राइव्हला. अर्थात मरीन ड्राइव्हला. पण एकीकडे तुम्ही नाइट लाइफ सुरू करायची म्हणता आणि दुसरीकडे मरिन ड्राइव्हसारख्या ठिकाणी एक फूड ट्रक सोडून बाकी काही ठोस निर्णय घेत नाही हे खटकण्यासारखं आहे. तुम्ही मुंबई आणि उपनगरातील कोणत्याही कॉलेजवयीन तरुणाला मुंबई नाइट लाइफबद्दल विचारलं तर मोजकी ठिकाणे त्यांच्या डोक्यात येतात. मरिन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी अन् आणखी काही मोजकी ठिकाणं. मात्र यापैकी अनेक ठिकाणी तुमच्या नाइट लाइफ योजनेमध्ये केवळ फूड ट्रक एवढीच अपडेट दिसतेय.

मुंबईकर तरुणांसाठी आजही नाइट लाइफ अस्तित्वात आहे. म्हणजे तुम्ही वीकेण्डला मरिन ड्राइव्हला गेल्यावर तुम्हाला अंदाज येईल की सरकारने योजना चालू करण्याची वाट मुंबईकरांनी कधीच पाहिली नाही. ते त्यांच्या पद्धतीने नाइट लाइफ एन्जॉय करतात. ‘मरिन ड्राइव्हला जाऊ ’ हा अनेक तरुणांच्या ग्रुपचा ‘गोवा प्लॅन’च आहे. फरक इतकाच की मरिन ड्राइव्ह प्लॅन अनेकदा यशस्वी होतो जे गोव्याबद्दल क्वचितच होतं. तर सांगायचा मुद्दा असा की, मरिन ड्राइव्हला रात्री भटकंतीला आल्यावर आधी दीडनंतर पोलीसच येऊन तुम्हाला तिथून उठवतात, या नियमांमध्ये काही बदल करणार आहात का? कारण मोठा ग्रुप असेल तर तुम्ही कितीही मॉल सुरू ठेवले तरी मरिन्सच्या कट्टय़ावर संपूर्ण रात्र गप्पा मारण्यालाच प्राधान्य दिलं जाईल यात शंका नाही. त्यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छतागृहांचा. तुम्ही रात्री मुंबई सुरू करण्याचा विचार करताय, पण आजही मुंबईमध्ये रात्री भटकंती करायला आल्यावर सीएसएमटी स्थानकावरील स्वच्छतागृह वगळता इतर कोणतेही सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध असलेलं दिसत नाही. मुंबईमध्ये भटकंती करणाऱ्यांना अनेकदा ही अडचण आलीच असणार याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. मूलभूत सुविधाच उपलब्ध नाही तर थेट मॉल उघडे ठेवण्यावर उडी मारण्यात काय अर्थ आहे. आता मॉलमध्ये ‘वॉशरूम्स’ असतीलही उघडे (भविष्यात) पण मॉलमध्ये का जावं रात्री दीड-दोन वाजता असा प्रश्न आहेच. मुंबई फिरायला येणारा तरुण हा मॉलमध्ये जाण्यापेक्षा लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेटी देण्यास जास्त उत्सुक असणार.

पुढचा मुद्दा सांगायचा झाल्यास सुरक्षेचा. मुंबईमध्ये नाइट शिफ्ट करणाऱ्या महिलांची संख्या बरीच आहे आणि इतर शहरांच्या तुलनेत मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र असं असलं तरी नाइट लाइफचा विषय निघाल्यावर सुरक्षेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. यावरूनच अगदी दिल्लीसारख्या घटना घडतीलपासूनची वक्तव्यं नेत्यांनीच बोलू दाखवल्याने हा विषय नेत्यांपासून सर्व सामान्यांच्या मनातही आहे हे उघड झाले. या वक्तव्यावर तुम्ही उत्तरही दिले. पण ऑन ग्राऊण्ड नक्की काय योजना आहे सुरक्षेच्या हे तरुणांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून, जाहिरातींमधून पोहोचवले पाहिजे. आजही मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणात रात्री पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅन दिसतात. मात्र त्याच वेळी वर नमूद केलेल्या अनेक ठिकाणी कायमचा पोलीस बंदोबस्त असणे जास्त फायद्याचे म्हणण्याऐवजी गरजेचे आहे.

तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे प्रवासाचा. मुंबईमध्ये आजच्या घडीला कॉलेजवयीन मुलं ज्याला नाइट लाइफ म्हणतात त्या भटकंतीसाठी येणारा बराचसा क्राऊड हा उपनगरातील आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बोरिवली, भाईंदर, विरार यांसारख्या मुंबईच्या परिघाबाहेरच्या शहरांमधून मुंबईमध्ये रात्री भटकंतीला येणाऱ्या तरुणांची संख्या आजही खूप आहे. रात्री शेवटच्या ट्रेनने मुंबईमध्ये दाखल व्हायचं आणि पहाटे परत जायचं असा या मुलांचा नाइटचा प्लॅन असतो. आज अनेक जण असे प्लॅन्स करत असले तरी ट्रेनची संख्या, ट्रेनमधील सुरक्षा हा प्रश्न आजही आहेत. पुढे बोलायचे झाल्यास सीएसटी किंवा चर्चगेटला आल्यानंतर मुंबईमध्ये भटकायचे झाल्यास टॅक्सीशिवाय (तेही अधिक पैसे देऊन) पर्याय नाही. स्वत:ची गाडी न आणता रात्री मुंबई भटकायची म्हणजे खिसा बराच खाली होतो. रात्री मुंबईतील प्रमुख ठिकाणी भटकंती करून आणणाऱ्या बससेवा सीएसटी आणि चर्चगेटपासून सुरू करण्याचा निर्णय फायद्याचा ठरू शकतो. अगदी केवळ वीकेण्डला या सेवा सुरू ठेवल्या तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. ‘निलांबरी’चे आजही अनेकांना आकर्षण आहे. ही सेवा रात्रीच्या वेळेस सुरू केली तर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल. मरिन ड्राइव्हवर किंवा मुंबईतील किल्लय़ांवर दुर्बिणी लावून अवकाशदर्शनाचे उपक्रम राबवता येऊ  शकतात.

सांगायचा मुद्दा असा आहे की, मुंबईमध्ये आहे ती नाइट लाइफ अधिक सुखकर बनवण्यासाठी पहिले प्राधान्य दिले पाहिजे. अगदी स्वच्छतागृहे, सुरक्षा, प्रवासाची माध्यमे यांपासून ते जागोजागी चहाच्या किंवा अगदी वडापावच्या गाडय़ांना परवानगी देण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येऊ  शकतात. नाइट लाइफ म्हणजे केवळ पब, महागडी झगामगा असणारी हॉटेल्स, मॉलमध्ये भटकणे नाही. मुंबईमध्ये बेसिक नाइट लाइफला खूप जास्त स्कोप आहे. इंदौरसारख्या शहराचा आदर्श घेऊन तेथील सराफा बाझारसारख्या खाऊ गल्लय़ा आपल्या मुंबईमध्ये रात्रीच्या वेळेस सुरू करता येतील, परदेशातील अनेक शहरांप्रमाणे लाइट्स शो ठेवता येतील, अवकाशदर्शनाचे कार्यक्रम राबवता येतील, दर महिन्याच्या ठरावीक वीकेण्डला ठरावीक कार्यक्रम राबवून आहे त्या नाइट लाइफला आणखीन पॉलिश करता येईल. अगदीच हटके पर्यटनाचा विचार करायचा झाल्यास वर्तमानपत्र, दूध व्यवसायाच्या सक्र्युलेशनचे काम कसे चालते यासंदर्भातील नाइट ट्रिप्सही संबंधित संस्थांच्या सहकार्याने आयोजित करता येतील. आज अनेक ग्रुप्सच्या माध्यमातून मुंबईमध्ये नाइट सायकलिंगचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या सायकलिंग कार्यक्रमांसाठी दोन ते अडीच हजारांपेक्षा जास्त तरुण उपस्थिती लावतात. याच धर्तीवर मुंबईमध्ये रात्रीच्या वेळी प्रीपेड सायकल स्टॅण्ड सुरू करता येतील. हळूहळू हा पॅटर्न पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्येही प्रायोगिक तत्त्वावर राबवता येईल.

आज मुंबईमधील तसेच नवी मुंबईमधील वाशी, ऐरोली, रबाळेसाख्या ठिकाणी नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी खाण्यासाठी काहीच पर्याय उपलब्ध नाहीत. या लोकांसाठी कॉर्पोरेट ऑफिसेसजवळ काही दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी दिली तरी ते फायद्याचेच ठरेल. अर्थात यामुळे या भागातील पर्यटन वाढणार नाही, पण सोय नक्की होईल.

आदित्यजी करायला भरपूर आहे, पण झालंय असं की, तुम्ही तरुणांना काय हवंय हे विचारण्याऐवजी सरकारी स्तरावर निर्णय घेताना दिसत आहात. नवीन पर्यटकांना आकर्षित करण्याऐवजी आधी मुंबई भटकणाऱ्या तरुणांशी संवाद साधून वर नमूद केलेल्या अनेक योजना सुरू करता येईल आणि याच योजना भविष्यातील तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या नाइट लाइफचा पाया ठरतील. कॉलेजवयीन तरुण म्हणून मुंबईतील आमच्या स्टाइलची नाइट लाइफ सुखकर झाली तरी आम्ही नक्कीच खूश होऊ  इतकंच सांगू शकतो.

धन्यवाद तुमच्याच दिवसरात्र जागणाऱ्या मुंबईतील एक मुंबईकर तरुण – स्वप्निल घंगाले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2020 1:50 am

Web Title: article on letter to minister of tourism on mumbai night life abn 97
Next Stories
1 क्षितिजावरचे वारे : स्वयंचलित घोडं अडलंय कुठं?
2 फॅशनचं फ्युचर
3 संशोधन मात्रे : बहुत स(सा)रस हैं भाई!
Just Now!
X