ओमकार भाटवडेकर

संशोधन म्हटलं की त्याला लागणारा काळ, वेळ, स्थिर चित्त, मेहनतीची तयारी आणि चिकाटी हे गुण आवश्यक ठरतात. तसंच अनेकदा त्यासाठीचा निधी आणि साधनसामुग्रीही महत्त्वाची ठरते. हे सगळे मुद्दे विचारात घेतले तरी मला फर्स्ट इयरपासून संशोधनाची गोडी लागली होती. मी एस.पी.महाविद्यालयातून बारावी झालो. केमिकल इंजिनिअरिंगची आवड होती. गुणही चांगले मिळाले. आयआयटी, बिट्स वगैरे संस्थांचा विचार सुरू होता. आयसीटी उत्कृष्ट आहे ही कल्पना होतीच. तिथून पुढे थेट पीएचडीला वळणाऱ्यांची आणि मास्टर्स करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पुण्यातून मुंबईतल्या युडीसीटीमध्ये शिकायला आलो.

मला लॅबमधल्या संशोधनात रस होता. अर्थात हे संशोधन किती वेगाने होऊ  शकेल, त्याचे संभाव्य निष्कर्ष किती परिणामकारी आहेत, त्याची उपयुक्तता किती आहे इत्यादी मुद्दे या कामात पडताळले जातात. या शास्त्रीय दृष्टिकोन आणि निकषांवर आधारित असलेल्या कामाला युरोपमध्ये चांगली संधी उपलब्ध आहे. मात्र संशोधनासाठी उपलब्ध साधनसामुग्री आणि बळकट आर्थिक निधी यामुळे अमेरिकेचं पारडं अधिक जड आहे. सिंगापूरच्या पर्यायाचाही विचार करून ठेवला होता. पण त्याची गरज पडली नाही. मी अर्ज केला होता त्या वर्षभर आधी ब्रेक्झिट करार झाला होता. युरोपातील परिस्थिती स्थिरावलेली नव्हती. शिवाय युरोपमध्ये थेट पीएचडी करायला मिळत नाही. त्यामुळे अमेरिका हा पर्याय होता.

जवळपास १३ विद्यापीठांत अर्ज केले होते. किंचितशी धाकधूक वाटत होती. त्यापैकी चार ठिकाणांहून प्रवेशअर्ज मंजूर झाला. ‘जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ची निवड करण्याचं कारण म्हणजे मला औषधनिर्माण, कॅन्सर थेरपी आदी गोष्टींमध्ये रस होता. इथलं मेडिकल कॅम्पस जगप्रसिद्ध आहे. पुस्तकी ज्ञानाइतकंच भोवतालच्या लोकांशी संवाद साधून, चर्चा करून बरीच माहिती मिळते. संधीची वाट दिसू शकते. लोकारोग्यासाठी काम करायचं मनात आहे. त्यासाठी लोकांशी बोलणं, त्यांना बोलतं करणं गरजेचं आहे. माझे तीन प्रवेशअर्ज मंजूर झाले ती ठिकाणं तुलनेने तितकीशी शहरी नव्हती. त्यामुळे बाल्टिमोरचा पर्याय पक्का केला. माझ्या निर्णयाला घरच्यांचा भक्कम पाठिंबा होता.

मुंबईला हॉस्टेलवर चार वर्ष राहिल्याने एकटं राहण्याची सवय होती. एका अर्थी ती रंगीत तालीम झाली. त्यामुळे इथे आलो तरी फारसं काही वेगळं वाटलं नाही. भारतातून इथे व्हिडिओ कॉल झाले असल्याने लोकांशी तोंडओळख झाली होती. बाल्टिमोर फार श्रीमंती थाटाचं शहर नाही. त्यामुळे मी अमेरिकेत आलो असं ‘वॉव’वालं फिलिंग आलं नाही. ते आपल्या आधीच्या पिढीला वाटत होतं; कारण तेव्हाचं तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण त्यांना नवीन होतं. आता या गोष्टी आपल्याकडेही असल्यामुळे फारसा फरक पडत नाही. मात्र काही गोष्टी जाणवल्या. इथे सगळे नियम कटाक्षाने पाळले जातात. लोक आपापल्या कामाशी मतलब ठेवतात. कुणी कुणाच्या आयुष्यात नाक खुपसत नाही. एका अर्थी हे चांगलंच आहे. मात्र दुसरीकडे आपल्याला या गोष्टीशी सवय असल्याने सुरुवातीला याचं थोडं दु:खमिश्रित आश्चर्य वाटलं होतं. हळूहळू एकेक नियम, सवयींचं आकलन होत गेलं आणि मी स्थिरावत गेलो.

सुरुवातीच्या काळात मला स्वयंपाक यायचा नाही. त्यामुळे दोन ते तीन महिने त्या आघाडीवर तोंड द्यावं लागलं. व्हिडिओ कॉलवरून आई शिकवायची. शिवाय युटय़ुबचा सहारा मिळाला. शिवाय तेव्हा खरं आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव आणि महती कळली. आपण उगीचच केलेल्या कटकटीची आठवण झाली. घर भारतातूनच शोधून ठेवलं होतं. सुदैवाने रुममेट चांगले मिळाले. ते नुकतेच मास्टर्स झाले आहेत. आता मी एकटाच स्वत:च्या स्टुडिओमध्ये राहायला आलो आहे. ऑगस्टमध्ये इथे येऊन दोन वर्ष पूर्ण होतील. इतका स्वावलंबी होईन, असं वाटलं नव्हतं. स्वत:चा स्टुडिओ घेणं आणि आईपेक्षा स्वयंपाक चांगला करणं या गोष्टींमध्ये टप्प्याटप्प्याने प्रगती झाली आहे. आता मीच आईला काही पाककृती सांगतो. त्यासाठीच्या सूचना करतो. पुढचं लक्ष्य आहे उकडीचे मोदक शिकणं..

आपण इतक्या मोठय़ा विद्यापीठात शिकायला आलो आहोत, याचं सुरुवातीला थ्रिल वाटत होतं आणि तितकंच त्या जबाबदारीचं भानही होतं. इथे साध्याला खूप महत्त्व दिलं जातं, तेही व्यावसायिकतेपेक्षा कणभर सरसच. विद्यार्थ्यांना त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी विद्यापीठाकडून यथायोग्य सहाय्य मिळतं. प्रा. स्तावरौला सोफू आणि प्रा. यान्निस केवरेकिडीस हे माझे दोन गाईड आहेत. मॅडम आमची सतत काळजी घेणाऱ्या, विचारपूस करणाऱ्या आणि आम्हा विद्यार्थ्यांंना वेळ देणाऱ्या आहेत. तर सरांच्या कामांच्या व्यवधानांमुळे त्यांना आम्हाला फार वेळ देता येत नाही. पण त्यांचं आमच्या कामावर बारीक लक्ष असतं. आमची लॅब मुख्यत्वे ब्रेस्ट आणि प्रोटेस्ट कॅन्सरवर काम करते. या विषयासंदर्भात अगदी मोजकेच लोक संशोधन करत आहेत. मी केमिकल आणि बायोमॉलिक्युलर इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी करतो आहे. त्यामुळे इतर संशोधकांना त्यांच्या संशोधनात मदत होऊ शकते. संशोधक एखाद्या गोष्टीवर संशोधन करतो, तेव्हा त्याआधी अनेक कामं झालेली असतात. अनेक पर्याय उपलब्ध असतात. ते माहिती नसतील तर खूप वेळ, श्रम, पैसे वाया जातात. नैराश्य घेरू शकतं, हे आणखी वेगळंच. काही वेळा हे संशोधन पूर्णत्वाला जातं असंही नाही. हे सगळं टाळण्यासाठी संगणकाच्या मदतीने काही माहिती देता येईल का, असा विचार मनात आला. म्हणजे या सगळ्या शक्य-अशक्य गोष्टी विचारात घेतल्या जात आहेत. त्यानंतर एक प्रोग्रॅम तयार करणार असून त्यामुळे कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या संशोधकांना त्यांचं संशोधन करताना गोष्टी थोडय़ा सुकर होऊ  शकतील. अद्याप हे संशोधन बाल्यावस्थेत आहे. म्हटलं तर हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. या संशोधन विचारांची मॅजिक बुलेट कधीतरी नक्कीच इतरांच्या कामी येईल, असा विचार यामागे आहे. त्यामुळे संशोधनाच्या मंदावणाऱ्या वेगाला अधिक गती मिळेल.

माझे दोन्ही गाईड त्यांच्या क्षेत्रात नामांकित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. संशोधनाच्या एका टप्प्यावर लॅबमध्ये उंदरांवर काम केलं. त्याआधी मी कधी उंदराला हात लावला नव्हता. आता कामाचा तो एक टप्पा संपला. मी प्रोग्रॅमिंगही करतो. खूप कमी लोकांना अशा दोन्ही गोष्टी करायची संधी मिळते.  त्यामुळे थोडासा ताणही वाढतो. कारण सुरुवातीला माझ्याकडे या दोन्ही गोष्टी करण्यासाठी कौशल्य नव्हतं. कालांतरानं ते आत्मसात होत गेलं. त्यासाठी गाईडनी चांगलं मार्गदर्शन केलं. आमच्या दर आठवडय़ाला भेटीगाठी होतात. व्यावसायिकपणा आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेलं काम या दोन चक्रांवर इथल्या संशोधनाचा रथ चालतो. त्यामुळे अर्थात कामही तितकंच करावं लागतं. फक्त त्या कामाचा आनंद घेत ते करता आलं पाहिजे.

जॉर्डन, कॅनडा, चीन, ग्रीस, इटली आदी देशांतील सहाध्यायांसोबत बोलताना जाणवलं की, प्रत्येकाची संस्कृती, बौद्धिक क्षमता, विचारशक्ती, सामाजिक – राजकीय परिस्थिती भिन्न आहे. आमच्या विद्यापीठात या सांस्कृतिक वैविध्याला कायमच जागा दिली जाते. विद्यार्थ्यांच्या विचारांना, कलागुणांना वाव दिला जातो. कधी कुणाची खाद्यसंस्कृती मराठी पदार्थांच्या जवळपास जाणारी आहे, असं दिसतं. कधी एखाद्या संगीतातली धून भारतीय धूनीची आठवण करून देते. कधी बोलता बोलता एकमेकांची भाषा आपसूक शिकली जाते. ज्याचे – त्याचे प्रश्न कळायला लागतात. परस्परांबद्दलचे – देशाबद्दलचे काही गैरसमज दूर होतात. एका अर्थाने जगाचे नागरिक म्हणून वावरता येतं. एक जाणवलं की, भारतीयांना इतरांबद्दल बरीच माहिती असते. मात्र त्यांना विशेषत: अमेरिकन लोकांना इतरांची फारशी माहिती नसते. माझा बराचसा वेळ संशोधनात जात असल्यामुळे विद्यापीठातल्या इव्हेंट्सना जायला जमत नाही. मात्र तज्ज्ञांची व्याख्यानं, परिषदा आदी उपक्रमांमध्ये सहभागी होतो.

शाळेत असताना मी डॉसबॉल खेळायचो. आता इथल्या डॉसबॉल टुर्नामेंटमध्ये वेळ मिळेल तसा भाग घेतो. त्यात काही वेळा सगळ्या विभागांच्या स्पर्धा घेतल्या जातात, त्या खेळताना जाम मजा येते. इथे फिटनेसला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपली फिटनेस लेव्हल खूपच कमी आहे, हे मला जाणवलं. तेव्हापासून जिमला जाणं न चुकवल्याने मीही फिट झालो आहे. मला पेटी वाजवायची आवड होती. इथे फावल्या वेळात पियानो वाजवायला शिकलो. इथल्या थंडीचा पहिला मोसम फार कठीण होता. इतक्या थंडीची आणि बदलत्या हवामानाची आपल्याला सवय नसते. त्याचा थोडाफार परिणाम मन:स्वास्थ्यावरही होतो. किचिंतसं नैराश्याचं मळभ दाटून येतं. त्यातून सावरायला छंदांची मदत होते. क्रिकेटची खूप आवड असल्याने सगळ्या मॅच आवर्जून बघतो. क्वचित कधी वॉशिंग्टनला जातो. बाकी आठवडय़ातला बराचसा वेळ लॅबमध्येच जातो. गेल्या वर्षी भारतात आलो होतो. आता वर्षांखेरीस येणार आहे. पीएचडी झाल्यानंतर पोस्टडॉक करायचा विचार आहे. नोकरीचा पर्यायही आहे. मात्र पुढे भारतात परतून एखाद्या संस्थेत किंवा स्वत:च्या संस्थेत प्राध्यापक व्हायचा विचार आहे. किंवा फार्मास्युटिकल कंपनीत कामाचा पर्यायही उपलब्ध आहे. येत्या काही वर्षांत लोकारोग्याचा प्रश्न फार जटिल होणार असल्यामुळे त्यासाठी काही करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. आपल्यासारख्या भारतात परतू इच्छिणाऱ्यांची संख्या पाहून वाटतं आहे की, काही सकारात्मक बदल नक्कीच घडतील. बी पॉझिटिव्ह!

कानमंत्र

* केवळ अभ्यासावर लक्ष्य केंद्रित न करता प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायची किंवा काही नवीन गोष्टी शिकायची संधी मिळाल्यास ती सोडू नका.

* भविष्यातल्या संधी आणि आपल्या आवडीचा बारकाईने अभ्यास करून पुढचा आराखडा आखून निर्णय घ्या.

 शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com