वैष्णवी वैद्य

‘नावात काय आहे?’, हा शेक्सपिअरने विचारलेला अजरामर प्रश्न. पिढय़ान्पिढय़ा हा प्रश्न वेगवेगळ्या संदर्भाने तरुणाई वापरत आली आहे. मात्र सध्याच्या तरुण पिढीसाठी आपलं नाव कशा पद्धतीने उच्चारावं, त्यात कोणाच्या नावाचा उल्लेख असावा या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरत आहेत. नावातून आपली ओळख कशी असावी, याबद्दल ते कमालीचे आग्रही असल्याचे दिसून येते.

मुलींच्या नावात लग्न झाल्यावर बदल होतात. त्यातही माहेरचंच नाव लावायचं की किंवा माहेरचं आणि सासरचं अशी दोन्ही अडनावं लावायची याबद्दलचा निर्णय मुली ठामपणे घेत आल्या आहेत. मात्र सध्या नावातला हा बदल केवळ विवाहित तरुणींपुरती मर्यादित राहिलेला नाही. तर मुलगा असो वा मुलगी आपल्या नावात कोणा-कोणाचा उल्लेख असावा, याबद्दल सजग झाले आहेत. आपले नाव हीसुद्धा आपली एक महत्त्वाची ओळख आहे या विचारानेच नावात जाणीवपूर्वक बदल केले जात आहेत.

आपण आपलं नाव कसं लावतो? सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय मुलं-मुली स्वत:चं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशीच ओळख देतात. पण आता त्यात बदल म्हणजे पूर्ण नाव लावताना आईच्या नावाचाही समावेश केला जातो आहे. एवढं मोठं नाव लावण्याचा अट्टहास का असावा? किंबहुना त्याच नावाने आपल्याला जगाने ओळखावं असं का वाटत असावं? काहीजण इतकं  मोठं नाव लावण्यापेक्षा केवळ आपलं नाव आणि मग पुढे फक्त वडिलांचं किंवा आईचं नाव एवढंच लावणं पसंत करत आहेत. या सगळ्यातून आपली प्रतिमा आणि ओळख यावर नेमका काय फरक पडत असेल? आपलं नाव आणि आपली ओळख याचा परपस्परांशी संबंध असतो का?,  हे सगळे प्रश्न व्यक्तिनिष्ठ आहेत. त्याबद्दल प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन, विचारधारा आणि मतं आहेत. नावाभोवती किंवा नावामुळे ओळख निर्माण करण्याच्या या प्रवाहात आजच्या तरुण पिढीतील कलाकारांपासून अनेकजण सामील झाले आहेत.

अभिनेता ललित प्रभाकर यानेसुद्धा असंच नाव लावलंय. तो म्हणतो, ‘‘मी कॉलेजपासून असंच नाव लावतो आहे. आपल्या नावात आणि कर्तृत्वात आडनावाचं असं वेगळं काही योगदान नसतं असं मला वाटतं. आडनाव हे जात समजण्यापलीकडे काही विशेष उपयोगी ठरत नाही. अर्थात, प्रत्येकाची ही विचारधारा असेलच असं नाही, पण महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट फक्त ट्रेण्ड आहे म्हणून करू नये, ती निरुपयोगी किंवा अर्थहीन असते. त्यामागे स्वत:चे असे ठाम मत किंवा विचार असायला हवेत.’’

आपल्या नावापुढे वडिलांचं नाव लावणारी अभिनेत्री सायली संजीव सांगते, ‘‘मुलगी ही नेहमी बाबांच्या जास्त जवळ असते. या क्षेत्रात येण्याआधीपासून माझं नाव सायली संजीव असंच आहे. आज प्रत्येक वेळी माझ्या नावासोबत बाबांचही नाव उच्चारलं जातं ही आम्हा दोघांसाठी समाधानाची गोष्ट आहे. आडनाव लावलं असतं तर कदाचित बाबांची ओळख प्रकर्षांने झाली नसती, मग ती फक्त नाव आणि आडनाव एवढीच मर्यादित राहिली असती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी जात मला शाळेपर्यंत माहीत नव्हती, पण आडनावावरून आपसूकच एखाद्याला जज केलं जातं जे नको वाटतं. कॉलेजमध्ये असताना मी असं नाव लावायला सुरुवात केली. बाकी ओळखपत्र किंवा इतर कायदेशीर कागदपत्रांवर माझं अडनाव लागतं.’’

तरुण पिढीतील गायिका सावनी रवींद्र हीसुद्धा आपल्या नावापुढे केवळ वडिलांचं नाव लावते. ‘‘सावनी रवींद्र असं नाव लावणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण ते फक्त माझे वडील नाहीत तर माझ्या क्षेत्रातले माझे गुरूसुद्धा आहेत. आमचं घराणं सांगीतिक आहे. मी लहानपणापासूनच या क्षेत्रात यायचं ठरवलं होतं. त्यामुळे वडिलांचा खूप प्रभाव आहेच माझ्यावर.. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अशा पद्धतीने वडिलांचं नाव लावावं हा माझ्या आईचासुद्धा आग्रह होता. त्यामुळे शाळेपासूनच माझं असं नाव आहे,’’ असं सावनी सांगते. या नावामुळे अनेक मजेशीर किस्सेसुद्धा घडले असल्याचे तिने सांगितले. बऱ्याचजणांना या नावामुळे मी दाक्षिणात्य वाटते, पण काहीही असलं तरी माझ्या नावासोबत माझ्या वडीलरूपी गुरूंचं नाव लागणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, असं ती सांगते.

कॉलेजविश्वात धडाडीने वावरणारी आणि ज्ञानग्रहणाचे आपापले मार्ग निवडणारी तरुण पिढी तरी या गोष्टीला अपवाद कशी असेल. त्यांच्याकडेही असं नाव लावण्यामागे त्यांची अशी ठोस कारणं आहेत. कल्पेश पल्लवी प्रमोद घाग हे असं नाव लावण्यामागचं कारण सांगताना कल्पेश म्हणतो, ‘‘साधारण तीन महिन्यांचा असताना बाबा गेले, मला कळायला लागलेल्या वयापासून आईलाच दोन्ही भूमिका पार पाडताना मी पाहिलं आहे. आईची माया देत असताना घरातील कर्ता पुरुष या सामर्थ्यांने तिने मला वाढवलं. साहजिकच वडिलांचं माझ्या आयुष्यातलं स्थान जन्म देण्यापुरतच राहिलं. आज मला एक मुलगा म्हणून वडिलांच्याही पुढे तिचं नाव लावावंसं वाटतं.’’

अदिती अरुण अशी ओळख सांगणारी अदिती म्हणते, मी अनेक सेलिब्रिटींनी अशा पद्धतीने नावं लावलेली पाहिली आहेत. मला ते खूप छान वाटलं. आपल्या सोबत आपल्या बाबांचं नाव असणं एका मुलीसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असू शकते. चारचौघात अशा नावाने संबोधल्यावर आपली इतरांपेक्षा थोडी वेगळी ओळख आहे असं वाटत असल्याचंही अदिती सांगते.

राधिका भूषण हिने कायदेशीररीत्या आपलं अडनाव काढून आता ती फक्त राधिका भूषण असं वडिलांचंच नाव लावते. ती सांगते, आमचं सुरपूर या अडनावाचा कुळवृत्तांत आहे. माझे खापर पणजोबा कर्नाटकात सुरपूर या गावी कामानिमित्त गेले होते. तेव्हापासून आम्हाला ते नाव लागलं आणि त्यामुळे लोक आम्हाला कर्नाटकातले कानडी ब्राह्मण समजायचे. त्या नावाचा आमच्याशी थेट संबंध नाही. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मला वाटलं आपण हे नाव का लावावं? माझ्या आईनेसुद्धा लग्नानंतर नाव बदललेलं नाही. मुळात आडनाव ही आपली ओळख आहे असं मला वाटत नाही. म्हणूनच केवळ वडिलांचं नाव लावणं तिने स्वीकारलं असल्याचं सांगितलं.

अमुक एका पद्धतीनेच नाव लावण्याचा हा प्रकार कोणी सो कॉल्ड इमेज बिल्डिंग या अर्थाने तर कोणी हटके आणि ट्रेण्डी म्हणून करतं. तर कोणी व्यक्तिस्वातंत्र्याच्या चषम्यातून नाव-आडनावाचा प्रकारही अजमावून पाहतं किंवा कोणी अगदी त्याला स्वविचारांची शिदोरी जोडतं. त्यामागे काही भावनिक, काही तात्त्विक, काही कालसापेक्ष कारणंही आहेतच. आडनावाला वर्षांनुवर्ष चिकटलेला जातिवाद, धर्मभाव हा समाजाच्या प्रगतीवर घालाच आहे. त्यामुळे स्वत:ची जातिवाचक ओळख काढून टाकून वेगळी ओळख निर्माण करणं हा आजच्या कलाकारांचा आणि तरुणाईचा दृष्टिकोन नक्कीच खोल विचार करणारा आणि समाजाला सकारात्मक दिशेने पुढे नेणारा आहे.

बालपणापासून ते अगदी यशापयशाची शिखरं गाठल्यावर आपण आपल्या कर्तृत्वाने मिळवलेली ती ओळख असते. ती कधी परिस्थितीने बदलली जाते किंवा कधी काही विशिष्ट हेतूंनी.. पण हे सगळे बदल तरुण पिढीने अनुकूलतेने आत्मसात केले. येत्या १२ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय ‘युथ डे’ आहे. या दिवसाचं महत्त्व म्हणजे भारतीय  विचारवंतांपैकी तेजांकित नाव स्वामी विवेकानंदांची जयंती. त्यांनीसुद्धा वेदान्तामध्ये हेच सांगितले आहे की आपल्या विचारांच्या मुशीतून आपली जडणघडण होत असते. आजच्या तरुण पिढीचे विचार उद्या देशाला नव्या परिवर्तनाकडे नेऊ  शकतात.

आजच्या तरुण पिढीइतकी विचारांची स्पष्टता तशी कित्येक दशकांमध्ये दुर्मीळच. प्रत्येक गोष्टीत चिकित्सक दृष्टिकोनातून पाहणारी, अभ्यासू वृत्तीने समजून घेणारी तरुण पिढी आपल्या ओळखीच्या बाबतीत तरी कालबाह्य़ कशी राहील. आपण स्वत: तेच असतो किंवा आपली नाती तीच असतात, पण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून केलेला आपल्याच बाबतीतला हा बदल ‘ओळख’ म्हणून स्वीकारायला काहीच हरकत नाही.