|| मितेश जोशी

२०१९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बोलीभाषांचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्याचबरोबरीने २७ फेब्रुवारीचा ‘मराठी राजभाषा दिन’ही पुढय़ात येऊन ठेपला आहे. या दोन्हीचं औचित्य साधून आजच्या काळात बोलीभाषांचं आपल्या प्रमाणभाषेशी असलेलं नातं शोधण्याचा प्रयत्न व्हिवा टीमने केला असता या बोलीभाषेच्या प्रेमात असलेल्या, त्यात अभ्यास-संशोधन करणाऱ्या अनेक तरुण मंडळींचं कार्य आश्चर्य करावं इतकं वेगळं असल्याचं लक्षात आलं..

परदेशी भाषा शिकण्याचं वेड असलेल्या आणि आम्हाला एक, नव्हे दोन-तीन परदेशी भाषा येतात, असं अभिमानाने मिरवणाऱ्या तरुणाईच्या जगात बोलीभाषेत पदवी शिक्षण घेणारी, संशोधन करणारी मुलं-मुली पाहिल्यावर नवल वाटल्याशिवाय राहत नाही. बोलीभाषा शिकण्यामागे त्यांची नेमकी प्रेरणा काय असेल, यातून करिअरचा मार्ग त्यांनी कसा शोधला असेल, अशा अनेक प्रश्नांवर उत्तरं शोधताना उरणमधील समृद्धी म्हात्रेशी गाठ पडली. समृद्धीने केवळ आगरी भाषेच्या प्रेमाखातर आणि त्यातील अनेक रहस्यांची उकल करण्यासाठी आगरी भाषेत पीएच.डी. केली आहे. तिच्या या निर्णयामागचं कारण विचारलं असता, ‘मुळात मी आगरी असल्यामुळे लहानपणापासूनच ही भाषा सतत कानावर पडत होती. या भाषेचं व ज्ञातीचं वैशिष्टय़ म्हणजे पूर्वी आमच्याकडे पौरोहित्य करायला ब्राह्मण येत नसे. लग्नाची हळद या भाषेत शब्दबद्ध झालेली ‘धवलगीतं’ म्हणून साजरी केली जायची. ही धवलगीतं म्हणणारी धवलारीणच आमची पुरोहित असायची. ही धवलारीण जी गाणी म्हणते त्यांची मोहिनी माझ्यावर पडली. त्या वेळी मी आगरी भाषेतील लोकगीतांमध्ये अधिक सखोल संशोधन करून पीएच.डी. करण्याचा निर्णय घेतला’, असं समृद्धी सांगते. अर्थात त्या वेळी आगरी समाजाचं दर्शन घडवणारी, त्या साहित्याचा आनंद देणारी ही गीतं नामशेष होऊ नयेत हे महत्त्वाचं कारण पीएच.डी.मागे होतं, असं तिने सांगितलं. मात्र बोलीभाषेतील पीएच.डी.चा निर्णय इतका सोपा नव्हता. या पीएच.डी.साठी रिसर्च करताना मी लाजऱ्या स्वभावाच्या धवलारिणींच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेत असे. त्या वेळी एक तर त्यांची भाषा बोलण्याची शैलीच नेमकी कळायची नाही, काही शब्दांचे अर्थच लागायचे नाहीत. मग आधी ती गाणी लाइव्ह रेकॉर्ड करायची आणि नंतर त्याचा अभ्यास असा मार्ग निवडल्याचं तिने सांगितलं. आगरी स्त्रिया निरक्षर असल्या तरी त्यांनी मौखिक परंपरेतून धवलगीतं जपली. आता हा वारसा त्या नवीन पिढीकडे संक्रमित करीत आहेत, असं सांगणाऱ्या समृद्धीने मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्गाला आगरी बोली अभ्यासाला असल्याचं सांगितलं. सध्या ती विक्रोळीच्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत आहे.

काही प्रदेशांपुरत्याच घराघरांत बोलल्या जाणाऱ्या या भाषा किती वेगवेगळ्या आणि जुन्या आहेत याकडे आपलं लक्षही जात नाही. पूर्व खानदेशातील अजिंठा डोंगररांगा ते सातपुडा पर्वत पायथा यादरम्यानच्या भागात ‘तावडी’ बोली बोलली जाते. जळगाव जिल्ह्य़ातील पूर्वेकडील तालुक्यांचा व विदर्भ-मराठवाडय़ातील सीमावर्ती भाग ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या भागात ही बोली बोलली जाते. मात्र प्रामुख्याने जामनेर तालुका आणि त्याच्याभोवतीचा परिसर हा तावडी बोलीचा मुख्य प्रदेश मानला जातो. जामनेरच्याच किरण पाटीलने तावडी बोलीत पीएच.डी. केली आहे. तावडी या शब्दाच्या उगमामागे एक रंजक कहाणी आहे, याचविषयी किरण सांगतो, ‘पूर्व खानदेश हा कायम दुष्काळी भाग राहिला आहे. तपाड, खडकाळ जमीन असलेला हा भूप्रदेश या अर्थाने ‘तावडी प्रदेश’ होतो. रणरणत्या उन्हात तापणारी येथील तपाड भूमी ‘तावडी पट्टी’ म्हणून ओळखली जाते. या पट्टीत बोलली जाणारी म्हणून ही तावडी भाषा असं तो सांगतो. या भाषेचा अभ्यास का करावासा वाटला हे स्पष्ट करताना मराठीत मास्टर्स करत असताना इंग्रजी, हिंदी भाषेचा तुलनात्मक अभ्यास केला. आणि त्या वेळी प्रमाण मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम बोलीभाषेने केलं असल्याचं माझ्या लक्षात आलं. आणि उच्चार-लकब यात वैविध्य असलेल्या तावडी भाषेत ८ वर्ष संशोधन करून पीएच.डी. केल्याचं त्यानं सांगितलं. थोडीशी राकट, अनवट असलेल्या या बोलीभाषेच्या प्रचार-प्रसाराचं उद्दिष्ट डोळ्यासमोर असलेला किरण सध्या जामनेर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

बोलीभाषेचे अनेक पैलू आहेत. अनेकदा माणसांबरोबर बोलीभाषाही स्थलांतरित होते. असाच काहीसा प्रकार हा कोकणपट्टय़ातील मुरूड ते संगमेश्वर भागातील कोकणी मुस्लीम बोलीच्या बाबतीत झाला आहे. ही बोली बोलणारी मराठी माणसं काही कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेत सेटल झाली. तेव्हा तिथं हीच भाषा त्या मंडळींनी वाढवली. याच कोकणी मुस्लीम बोलीभाषेचा अभ्यास करणारी पुण्यातील तरुणी ऋता पराडकर या भाषेचं आणि दक्षिण आफ्रिकेचं नातं विस्तृतपणे समजावून सांगते. ही भाषा खरं तर आता शेवटच्या घटका मोजते आहे, असं ती सांगते. दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकान्स व इंग्लिश या दोन भाषा बोलल्या जातात. तरीही तिथं स्थलांतरित लोकांनी महाराष्ट्राची बोली असलेल्या कोकणी मुस्लीम बोलीचा झेंडा रोवला. समाजभाषाशास्त्राच्या दृष्टीने ऋताला हे खूप महत्त्वाचं वाटलं. तिने याच विषयात पीएच.डी. करण्याचा निर्णय घेतला. आणि या अभ्यासाच्या निमित्ताने ती थेट दक्षिण आफ्रिकेत पोहोचली. ‘दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात ही बोली बोलली जाते. या शहरात खूप भारतीय आहेत. मी दोनदा महिनाभर केपटाऊनमध्ये राहिले. माझ्या पीएच.डी.च्या प्राध्यापिका सोनल कुलकर्णी जोशी यांची खूप मोलाची मदत मला मिळाली. तिथं ज्या स्थायिक मराठी लोकांच्या मुलाखती मी घेतल्या त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपलं मूळ कोकणात आहे, याची माहिती होती. त्याच्याउलट त्यांच्या गावी जाऊन मी या भाषेची माहिती गोळा केली, तेव्हा इथल्या लोकांनाही आपले नातेवाईक दक्षिण आफ्रिकेत स्थायिक असल्याचं माहिती होतं. थोडक्यात, घरटी एक व्यक्ती दक्षिण आफ्रिकेत आहे हे माझ्या लक्षात आलं, असं ऋता सांगते. केपटाऊनमध्ये तर ‘जंजिरा’ नावाचं दुकान आहे. एका कोकणी मुसलमानाने आपल्या व्यवसायाला मायभूमीचं नाव दिलं आहे. आपली मुळं कशी टिकवली आहेत व तरुणाईने ती कशी टिकवायला हवीत याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं तिने सांगितलं.

माझे मित्रमैत्रिणी कला शाखेच्या व्यतिरिक्त क्षेत्रात काम करणारे आहेत. त्यामुळे त्यांना नेहमी प्रश्न पडायचा. भाषाशास्त्र शिकून, बोलीभाषेत पीएच.डी. करून पुढे काय, हा प्रश्न त्यांनी मला अनेकदा विचारला आहे. पण मी जसे माझे अनुभव, या भाषेच्या गमती, अभ्यास त्यांच्याबरोबर शेअर करत गेले तसं यातही करिअर करता येतं, यावर त्यांचा विश्वास बसला. अर्थात या क्षेत्रात संयमाने आणि भक्कम विचाराने उभं राहायला हवं, हेही ऋताने स्पष्ट केलं.

काही बोलीभाषा कितीही कान देऊन ऐकल्या तरी कळत नाहीत. ‘गुप्तकालीन व सांकेतिक भाषा’ ही यात मोडते. मराठीतील अनेक बोलीभाषा ज्या नामशेष होताहेत त्यात या दोन भाषांचा समावेश असल्याचं या भाषेत पीएच.डी. करणाऱ्या अहमदनगरच्या सचिन कोतकर यांनी सांगितलं. सांकेतिक व गुप्तकालीन या दोन्ही भाषांची ओळख करून देताना ही भटक्या विमुक्त लोकांची बोलीभाषा असल्याचं त्याने सांगितलं. हे लोक दरोडा टाकणं, चोरी करणं अशी कामं करून जगत. तेव्हा आपली भाषा इतरांना कळू नये म्हणून या सांकेतिक बोलीभाषेचा जन्म झाला असावा, असं तो म्हणतो. गोंधळी लोकांची ‘करपल्लवी’ ही बोलीभाषा असते. पूर्वी दररोजच्या व्यवहारासाठी बोलली जाणारी ही भाषा केवळ गोंधळात मनोरंजन करण्यासाठी बोलली जाते. ही एक प्रकारची सांकेतिक बोलीच आहे. मी पहिल्यांदा ही बोली अनुभवली ती म्हणजे प्राण्यांच्या बाजारात. दलाल जास्त मोबदला मिळवण्यासाठी ही भाषा बोलतात. नेमकी ही भाषा कोणती आहे. ती अशी का बोलतात, या कुतूहलापोटी शिकायला घेतलेल्या या भाषेने मला पीएच.डी. करायला भाग पाडलं, असं तो म्हणतो.

या भाषेतील अंकांमध्ये व अरबी अंकांमध्ये साम्य आढळून येतं. कदाचित अनेक वर्षांपूर्वी अरबी लोकांशी दलाली करताना त्यांच्याकडून हे अंक त्यांना ज्ञात झाले असावेत, असा अंदाज आहे. सचिनच्या या अभ्यासासाठी त्याला न्यू यॉर्क विद्यापीठाने दोन लाखांची फेलोशिप दिली आहे. सध्या अहमदनगरमधील महिला महाविद्यालयात मराठी प्राध्यापक म्हणून तो कार्यरत असून सांकेतिक व गुप्त भाषेचा स्वतंत्र कोश निर्माण करण्याचं त्याचं स्वप्न आहे.

केवळ करिअर म्हणून नव्हे तर बोलीभाषांच्या प्रेमाखातरही नवनवे प्रकल्प राबवणारे अनेक जण आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील तेजस चव्हाण हा सध्या ‘रेल्वे, महामार्गाने बोलीभाषेत केलेला हस्तक्षेप’ या विषयावर संशोधन करीत आहे. अकरावी-बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेऊन केवळ मराठी भाषेच्या प्रेमापोटी त्याने तेरावीला कला शाखेत प्रवेश घेतला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्याने मास्टर्स केले. ‘आमचा पश्चिम महाराष्ट्र कृष्णा नदीमुळे सुजलाम सुफलाम बनला आहे. कृष्णाकाठच्या खोऱ्यात आजी-आजोबांच्या, आईवडिलांच्या व आताच्या पिढीच्या बोलीत कमालीचं वैविध्य आढळून येतं. किर्लोस्करवाडीसारख्या विविध कंपन्यांमुळे इथून लोहमार्ग सुरू झाला. आमच्या गावापासून २०-२५ किमीवर राज्य महामार्ग आहे. या दोन्ही आधुनिकीकरणांमुळे येथील बोलीभाषेत गमतीशीर वाक्प्रचार व शब्द रुळले आहेत. जसं ‘वाईवरून सातारा’ याचा अर्थ असा की, सातारा शहर पहिलं येतं, त्यानंतर वाई. म्हणजेच तुझं बोलणं सरळ नसून उलट होतंय, हे सांगण्याचा हा प्रयत्न. ट्रॅक सोडून बोलू नकोस हा वाक्प्रचारही रेल्वेमुळे आला आहे. अवांतर बोलू नकोस, मुद्दय़ाचं काय ते बोल असा त्याचा अर्थ होतो. ‘फिरून फिरून गंगावेश’, लहान मुलांच्या खोडकर वृत्तीला उद्देशून वापरला जाणारा ‘डांबरट’ हे शब्द म्हणजे रेल्वे, महामार्गाने बोलीभाषेत केलेले हस्तक्षेप आहेत, असं तो म्हणतो. आता त्याला या विषयावर पुस्तकही लिहायचं आहे आणि पीएच.डी.ही पूर्ण करायची आहे.

अहिराणी भाषेतून बालसाहित्य निर्माण करणाऱ्या मालेगावच्या आबा महाजनला मराठीतून कथा-कविता लिहिल्यावर जो प्रतिसाद मिळाला नाही तो अहिराणी भाषेतील साहित्यनिर्मितीतून मिळाला. मालेगावचा तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या आबालाही आता अहिराणी भाषेत अधिक संशोधन करण्याची इच्छा आहे. भाषा हे समाजाचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि त्यामुळे भाषेकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होणं गरजेचं असल्याचं मत ही तरुण मंडळी व्यक्त करतात. एकीकडे बोलीभाषेत शिक्षण, संशोधन करण्याचं धाडस दाखवणारी ही मंडळी आपलं उत्तम प्रकारे करिअर करून या भाषा जपण्याचं, वाढवण्याचं जे मोलाचं काम करताहेत ते दाद देण्यासारखंच आहे. याच प्रयत्नांतून हे बोली भाषेचं विश्व अधिक विस्तारत जाईल, आणखी नवे प्रवाह खुले करीत राहील..!