|| वैष्णवी वैंद्य

‘हारूकी मुराकामी’ हे नाव सध्या तरूण वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. हा मूलत: एक जपानी लेखक आहे. अर्थातच त्याची सगळी पुस्तके आधी जपानी भाषेत लिहिलेली होती आणि काही काळानंतर ती इंग्रजीत सुद्धा प्रकाशित झाली.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Drunken man's head stuck in garden
दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

एक असाही काळ होता जेव्हा चेतन भगत या नावाची लाट तरुणांमध्ये पसरली होती. विशेषत: महाविद्यालयीन मुलांच्या बॅगेत अगदी हमखास सापडणारी पुस्तके म्हणजे चेतन भगत या लेखकाची कुठली तरी कादंबरी. तसेच काहीसे आता मुराकामीबद्दल झाले आहे. पण त्यात फरक म्हणजे या लेखकाचा वाचकवर्ग थोडा व्यापक आणि प्रौढ आहे. साधारणत: २० ते ३५ वयापर्यंतचा वाचक या पुस्तकांच्या प्रेमात आहे. जपानी लेखक असल्याने त्याच्या कथेत जपानी बाज अगदी सहजपणे जाणवतो. पात्रांच्या नावापासून ते अगदी सभोवतालच्या वातावरणनिर्मितीचे वर्णन जपानी असते. मुराकामीचे ‘साऊथ ऑफ दी बॉर्डर, वेस्ट ऑफ दी सन’ हे पुस्तक याच जपानी पठडीतले. फिलीप गॅब्रीएल यांच्याकडून या पुस्तकाचा अनुवाद केला गेला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून कथेचा अंदाज येतो, पण या लेखकाने त्या प्रथेला थोडे वेगळे वळण दिले आहे. मुखपृष्ठाचा रंग आणि त्यावरचे चित्र पेस्टल रंगाचे आहे. त्यामुळे कुतूहल आणि आकर्षण निर्माण होते. अशा पद्धतीचे मुखपृष्ठ या लेखकाची खासियत आहे जी अगदी सुरुवातीलाच तरुणांना त्याच्याकडे वळवते. लेखनशैलीच्याही आधी तरुण वाचकाला उत्सुकता असते ती पुस्तकाच्या नावाची!

‘साऊथ ऑफ दी बॉर्डर’ म्हणजे ‘दक्षिण दिशेची सीमा’ आणि ‘वेस्ट ऑफ दी सन’ म्हणजे ‘पश्चिमेकडचा सूर्य’ यांच्यापलीकडे काय असू शकते! दोन्हीचा उल्लेख हा शेवटाचे वर्णन करण्यासाठी केला जातो. पश्चिमेचा सूर्य हा मावळतीचा असतो आणि दक्षिण दिशा वेस संपवणारी असते. हाच शेवट लेखकाला कथेतून अभिप्रेत आहे. पण हा शेवटाकडे जातानाचा प्रवास सुंदर आहे. सूर्य मावळताना पृथ्वी जणू एक सोनपरी होते तसे अनेक सोनेरी क्षण लेखकाच्या आयुष्यात आले. गुलाबी आकाशासारखे कोमल आणि हृदयस्पर्शी क्षणसुद्धा लेखकाने अनुभवले. दक्षिण भारतासारखे हरिततृण मखमली गालीचे म्हणजे लेखकाचे शब्दवर्णन! इतके समर्पक आणि तपशिलातले शीर्षक तरुण वाचकांना मोहित करून टाकते. या कथेचा काळ साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाचा आणि जपानमधील भयंकर बॉम्बहल्ल्यांनतरचा आहे. त्याला काही वर्षे झाली असली तरी त्याचे परिणाम त्यानंतरही काही ठिकाणी जाणवत होते.

‘हाजिमे’ हा कथेचा नायक. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला एकुलता एक मुलगा! आजूबाजूच्या कुटुंबात दोन किंवा तीन मुले असताना आपण मात्र एकटेच असा सततचा ताण हाजिमेला जाणवतो. तो एकुलता एक असल्याने लोकांना थोडा लाडावलेलासुद्धा वाटतो. हा वाचकाला जोडणारा दुसरा धागा. आजकाल बऱ्याच कु टुंबात एकुलतं एक मूल असण्याचीच पद्धत आहे त्यामुळे पर्यायाने यासोबत येणारी सुख-दु:खे वाचकांना आपलीशीच वाटतात. हाजिमे या गुंत्यातून जात असतानाच त्याला ‘शिमामोतो’ भेटते. तीसुद्धा एकुलती एक, स्वत:मध्ये रमणारी सुंदर, सुशील मुलगी. दोघांना एकमेकांचा सहवास आवडायला लागतो. पण हे आवडणे नेमके काय ते कळायचे दोघांचेही वय नसते. दोघांच्याही आवडीनिवडी तशा टोकाच्या पण तरीही एकमेकांचा वाढत्या सहवासामुळे त्यांचे शालेय जीवन सुखकर होते एवढे मात्र नक्की. शिमामोतोच्या घरी सांगीतिक वातावरण असते त्यामुळे बरेचदा हाजिमेला तिच्या घराची ओढ लागते. शिमामोतो आणि तिच्या वडिलांसमवेत गाण्यांचे रेकॉर्ड्स ऐकणे हा त्याचा दिनक्रम झालेला असतो. हळूहळू शालेय शिक्षण संपते, हाजिमे उच्चशिक्षणासाठी दुसऱ्या शहरात स्थायिक होतो. काळाच्या ओघात शिमामोतो आणि हाजिमेची ताटातूट होते, परंतु ते मनाने एकत्र बांधले गेले असतात. बालवयातली ती निखळ मैत्री वयाच्या चौकटीत बांधली गेल्यामुळे तिचे प्रेमात रूपांतर झाले नाही. पण नंतर वय आणि अंतर दोन्ही वाढले आणि जे तेव्हा मिळाले नाही ते आता शोधावेसे वाटले. उच्चशिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न असा हाजिमेचा प्रवास जसा साधारण मुलाचा व्हायला हवा तसाच होतो. अनेक नातेसंबंध, चढ-उतार अशा सगळ्या गोष्टींना तो सामोरे जातो. लेखकाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक प्रसंग अगदी सूक्ष्मपणे सांगितला आहे. दोन व्यक्तींमधली शांततासुद्धा इतकी समर्पकरीत्या वर्णिली जाऊ शकते ही या लेखनशैलीची ताकद आहे. हाजिमेच्या आयुष्यात अनेक मुली येतात, पण प्रत्येक वेळी त्याला शिमामोतोची आठवण आल्याशिवाय राहात नाही. शिमामोतो पोलिओ रुग्ण असते त्यामुळे तिच्या एका पायाची चाल निकामी असते. हाजिमेला ती गोष्ट अगदी लक्षात असते आणि त्याची आठवणसुद्धा होत असते. शिमामोतोची आठवण आता येईल असे क्षण त्याच्या आयुष्यात लहानपणी आलेले असतात आणि म्हणूनच कदाचित त्याचे मन तिच्याकडे सारखे खेचले जात होते. तो एकुलता एक असल्याचा जणू कलंकरूपी एकटेपणा शिमामोतोमुळे नाहीसा होतो. फक्त पुस्तकांमध्ये आणि गाण्यामध्ये रमणारे त्याचे मन माणसांमध्ये रमू लागते. पुढे जाऊन हाजिमे जपानमधील दोन प्रशस्त जॅझ क्लबचा मालक होतो, एक उत्कृष्ट पती आणि वडीलसुद्धा होतो पण काहीतरी राहून गेलं, निसटलं अशी जाणीव त्याला सतत होत असते.

याच वळणावर त्याला शिमामोतो पुन्हा भेटते. अगदी नकळत, अनपेक्षित.. पण तरीही त्याचे मन कशाला तरी घाबरत असते. तो पूर्णत: मोकळा होण्यासाठी संकोचत असतो. शिमामोतो मात्र इतका जुना मित्र पुन्हा भेटल्याच्या अप्रूपात असते. ती अगदी उत्सुकतेने त्याच्याबद्दल सर्व काही जाणून घेते. भेट होण्यासाठी एकदाही प्रयत्न न केल्याबद्दल खेद व्यक्त करते. हे सगळे हाजिमे अगदी कुतूहलाने पाहात असतो, ऐकत असतो. या सगळ्यात शिमामोतो एक अट घालते ती म्हणजे तिच्या आयुष्याबद्दल काहीही न विचारण्याची! हेसुद्धा हाजिमे मान्य करतो. हा झाला कथानकाचा भाग. यामध्ये भाषाशैली, लेखनशैली, शब्दसंपदा, कथेचे नाटय़ या सगळ्यात कादंबरी अगदी अव्वल आहे. पण तरुण वाचकांची मने खेचणे सोपे काम नाही. साहित्याची सुयोग्य जाण असणाऱ्या आजच्या पिढीला धरून ठेवणारा यातला धागा म्हणजे कथेचा ‘आपलेपणा’. हाजिमे जणू प्रत्येक तरुणात दडला आहे. कारण तो एकटेपणात रमतो, तिथेच खूप व्यक्त होतो. व्यक्तिसापेक्ष असणाऱ्या माणसाच्या भावना प्रेमाच्या ऋणानुबंधात मात्र अगदी सहज एकरूप होतात. हाच मुद्दा लेखकाने अचूक हेरला आणि सगळ्याच तरुण वाचकांची मने काबीज केली. आज अनेक अभिव्यक्ती माध्यमे आहेत त्यामुळे वाचनाची गोडी लागणे तसे कठीणच. पुस्तक वाचताना आपण स्वत:ची कहाणी पात्रांसकट उभी करत असतो. मुराकामीने जणू फक्त शब्द नाही तर कथानकाचे सीन उभे केले आहेत. ते फक्त वाचले जात नाहीत तर डोळ्यांना दिसतातसुद्धा. हे फार कमी लेखकांना जमते जे मुराकामीला १९९२ सालीच जमले. अशा अनेक परिमाणात हे पुस्तक वाचकांची वाहवा मिळवते.

पण सुरुवातीला सांगितलेला शेवट आता जवळ आलेला असतो. शिमामोतो पुन्हा आयुष्यात आल्यावर वेगळे वळण लागते. आता ते दोघे आधीसारखे नसतात, एकमेकांबद्दलच्या भावना, परिस्थिती काहीच आधी सारखे नसते. पण हाजिमेचे आपल्या बायकोवर – युकिकोवर आणि लहानग्या मुलींवर नितांत प्रेम असते. त्यांना एकमेकांचा अत्यंत सुंदर सहवास मिळालेला असतो. इतकेच नाही तर हाजिमेला जे काही व्यावसायिक सुखकर जीवन मिळाले असते ते त्याच्या सासऱ्यांनी दिलेले असते. युकिकोशी त्याचे लग्न झाले नसते तर त्याचे आयुष्य सामान्यच राहिले असते. युकिकोचे पात्र संपूर्ण कथानकात फक्त शेवटी प्रकाशझोतात आले. जेव्हा तिला आपला संसार वाचवायचा असतो आणि हाजिमेसमोर दोन दिव्य पर्याय उरतात!

कथानकाचे पैलू हळूहळू अंदाजयोग्य होत जातात पण तरीही वाचनीय असतात, कारण शेवट अनपेक्षित असतो. या पुस्तकाचा मतितार्थच ‘शेवट’ असा आहे. शेवट अनपेक्षित असला की कथानकातली उत्सुकता अधिक वाढते. या अनपेक्षित शेवटामधली गंमत मुराकामीने टिकवून ठेवली आहे. मुराकामी हा वाचनामधला तरुणांसाठी नवा ट्रेण्ड बनला आहे.

viva@expressindia.com