05 August 2020

News Flash

काम हिच ओळख

‘राष्ट्रीय युवा दिना’च्या निमित्ताने समाजात आगळवेगळं काम करणाऱ्या, हटके पॅशन ते करिअपर्यंतची वाट शोधणाऱ्या तरुणांचा हा प्रवास..

(संग्रहित छायाचित्र)

मितेश रतिश जोशी

नावातून आपली एक वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न करणारी तरुणाई कामातूनही आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडताना दिसते. ‘राष्ट्रीय युवा दिना’च्या निमित्ताने समाजात आगळवेगळं काम करणाऱ्या, हटके पॅशन ते करिअपर्यंतची वाट शोधणाऱ्या तरुणांचा हा प्रवास..

अंथरायला आणि पांघरायला घोंगडीचा वापर एकेकाळी घरोघरी दिसून यायचा, पण बदलत्या काळात आता घोंगडीचा वापर कमी होऊ  लागला आहे. घोंगडीची जागा मऊ  मऊ  ब्लँकेटने घेतली आहे. हे त्याच्या लक्षात आलं आणि प्रॉडक्शन इंजिनीअर पदवीला विडासुपारी देऊन पुण्याच्या नीरज बोराटे या युवकाने थेट घोंगडी खरेदी-विक्रीचा उद्योग थाटला. ‘घोंगडी डॉट कॉम’ या नावाने त्याने स्वत:चं स्टार्टअप सुरू केलं आहे. करिअरच्या सुरुवातीला नीरजने ‘देशपांडे फाऊंडेशन’च्या १४ दिवसांच्या सत्राला कर्नाटकात हजेरी लावली होती. तिथे गोधडी आणि घोंगडी बनवणाऱ्या कारागिरांशी त्याची ओळख झाली. घोंगडीला मोठी बाजारपेठ नसल्याने कारागीर हवालदिल होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. आणि त्यातूनच त्याने ‘घोंगडी डॉट कॉम’ची सुरुवात केली. नीरज पारंपरिक घोंगडय़ांबरोबरच लोकरीपासून गादी, उशी, लोड, गालिचा, जाजम, आसनपट्टी, कानटोपी, हातमोजे अशा अनेक प्रकारच्या वस्तू विकतो. यामुळे कलेचेही जतन होते आहे आणि गावातील स्त्री-पुरुषांना रोजगारही मिळतो आहे. त्यांच्या कलेतील कौशल्यही वाढीस लागते.

नीरज सांगतो, ‘घोंगडी हा ग्रामीण भागातील छोटय़ामोठय़ा घरांमध्ये अगदी सहज दिसणारा घटक. जमिनीवर अंथरूण म्हणून, कधी पांघरूण म्हणून, तर पावसाळ्यात शेतावर जाताना खोळ करून घोंगडी वापरली जाते. घोंगडीवर बसून केलेल्या व्यवहाराच्या, सोयरीकीच्या बैठकी मोडायच्या नाहीत असा एक अलिखित करार आहे. आजही बिरुबा, खंडोबा, बाळूमामा अशा देवांच्या ठिकाणी वाहण्यासाठी घोंगडीचा वापर होतो. तसेच जागरण, गोंधळ यातदेखील देव घोंगडीवरच मांडले जातात. हे सगळं चित्र अभ्यासल्यावर माझ्या लक्षात आलं की घोंगडीचा संबंध केवळ या देवांपुरताच उरला आहे. घोंगडी पुढच्या पिढीलासुद्धा दिसावी या हेतूने मी या उद्योगात २०१६ साली आलो. संपूर्ण भारतातील घोंगडी कारागिरांच्या घोंगडय़ा मी विकतो. त्या घोगडय़ांना भपकेबाज आकर्षक नाव न देता मी त्यांचंच नाव देतो. आज एकूण १९ देशात आपल्या घोगडय़ांची ऊब परदेशी बांधव अनुभवत आहेत, असं तो सांगतो.

चप्पल हे आता एक आभूषण झालं आहे. पूर्वी वापरायला चपलेचा एक जोड मिळताना मारामारी व्हायची. कितीतरी वर्ष एकच चप्पल वापरली जायची. आता महिन्याला नवीन चप्पल असते. प्रत्येक युवकाकडे किमान तीन-चार जोड तरी असतातच. घरी घालायची स्लीपर वेगळी, ऑफिसचे चकचकीत बूट वेगळे, जिमिंगसाठी शूज, ड्रेसवर सँडल किंवा हायहिल्स वगैरे वगैरे. या चपलेचा घरोघरी ढीग वाढत चालला आहे. चप्पल ठेवायला आकर्षित कपाटं येऊ  लागली आहेत. जर एक माणूस चपलेचे एवढे जोड वापरत असेल तर कल्पना करा जगभरात चप्पलचे किती जोड वापरले जात असतील. आता हे गणित काही हातांच्या बोटांवर मोजणे शक्य नाही. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू अशी की या चप्पलमुळे कचऱ्यात आणखी भर पडत चालली आहे. दरवर्षी जसा लाखो टन प्लॅस्टिकचा कचरा तयार होतो, तसा लाखो करोडो टन जुन्या चपलेचाही कचरा तयार होतो. या अशाच जुन्या चपलांना नवीन आकार देत आहेत श्रीयांस आणि रमेश हे दोन तरुण. २०१३ साली मुंबईच्या जैन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ई.डी.आय.आय.च्या स्पर्धेत या दोघांनी भाग घेतला. ज्यामध्ये त्यांनी जुन्या चपला नवीन अवतारात पेश केल्या. आणि या स्पर्धेत भारतातल्या १३ अव्वलांच्या पंक्तीत हे दोन युवक जाऊन बसले. तिथूनच या स्टार्टअपची कल्पना दोघांना सुचली. आणि त्यातूनच ‘ग्रीनसोल’ ही सामाजिक संस्था त्यांनी सुरू केली. श्रीयांस सांगतो, आम्ही लोकांच्या जुन्या चपला घेतो. त्याला नवीन साज देतो. आणि त्या नव्या चपला भारतातल्या दुर्गम भागातील लोकांना दान करतो. आम्ही एक वेगळी टीम तयार केली आहे. जी भारतातील असे दुर्गम भाग शोधत असतात. आमच्या वेबसाइटवर परवडणाऱ्या दरात या चपला विक्रीसाठी उपलब्ध आहेत. देशातल्या कानाकोपऱ्यातून जुन्या, टाकाऊ  चप्पल गोळा करून त्यापासून नवीन चप्पल तयार करणाऱ्या या दोन मित्रांच्या अनोख्या उपक्रमाचे रतन टाटांपासून अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामांपर्यंत सगळ्यांनीच कौतुक केले आहे.

गगनचुंबी इमारतींवर केले जाणारे मोहक पेंटिंग नेहमीच नेत्रसुख देतात. हीच आगळीवेगळी वाट निवडली आहे पुण्याच्या नीलेश खराडे या युवकाने. लहानपणी सोलापूरला असताना सिनेमा, नाटकांचे बोर्ड लिहिणाऱ्या आर्टिस्टकडे नीलेश कुतूहलाने बघायचा. सोलापूरला कलेचं वारं नव्हतं. जे होतं ते मुंबई- पुण्यात. त्याच्या कला क्षेत्रात करिअर करण्याला घरच्यांचा विरोध होता. म्हणून दहावी झाल्यावर नीलेश पुण्यात घरी कोणालाही न सांगता पळून आला. पुण्यात आल्यावर ३० रुपये दिवस पगार घेऊन त्याने एका आर्टिस्टकडे नोकरी केली. डिप्लोमा पदवी प्राप्त केली. अनुभवाचं गाठोडं पक्कं केलं. मुंबईत आशिया खंडातील सर्वात मोठं दादासाहेब फाळकेंचं भित्तिचित्र ७ दिवसांत काढण्याचा विक्रम त्याने केला. या विक्रमानंतर त्याला संपूर्ण भारतातून कामासाठी मागणी येऊ  लागली. जगप्रसिद्ध आणि सर्वात उंचावर असलेली स्पिती व्हॅली येथे जगातील सर्वात उंचीवर त्याने बुद्ध पेंटिंग रेखाटली. त्याचा हा अनुभव सांगताना नीलेश म्हणाला, एवढय़ा उंचावर मला रंग मिळाले नाहीत. म्हणून झाडू आणि चुन्याच्या साहाय्याने मी बुद्ध पेंटिंग तयार केलं आणि विश्वविक्रम रचला. अनेक सामाजिक प्रथांना वाचा फोडण्यासाठी त्याने चित्र रेखाटली. यातील एक उदाहरण म्हणजे नेपाळ येथे चालणारी कुमारीदेवी ही प्रथा. सध्या नीलेश वाघोली येथे १०० फूट उंच इमारतींवर हरितक्रांतीचे संदेश देणारे भित्तिचित्र रेखाटत आहे.

रस्त्यावर, समुद्र किनारी, जॉगिंग ट्रॅकवर साचणारा ‘कचरा’ ही समस्या न संपणारी आहे. पण या समस्येवर स्वीडन येथे मोठय़ा प्रमाणावर काम केले जात आहे. ‘प्लॉगिंग’ ही ती संकल्पना आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा ती आणली आहे पुण्यातल्या विवेक गुरव या युवकाने. पेशाने अभियंता असलेल्या विवेकने ही चळवळ पुण्यात सुरू केली आहे. प्लॉगिंग म्हणजे नेमकं काय?, याची उकल करून देताना विवेक म्हणाला, “प्लॉगिंग म्हणजे जॉगिंग करता करता आजूबाजूला दिसणारा प्लॅस्टिक कचरा उचलणे. सकाळच्या मोकळ्या हवेत धावणे आरोग्यासाठी केव्हाही फायदेशीर. पण हाच फायदा निसर्गालासुद्धा मिळायला हवा. प्लॉगिंग या संकल्पनेमध्ये धावताना रिकाम्या हाताने धावण्यापेक्षा हातात प्लास्टिकची पिशवी घेऊन धावतात आणि वाटेतील कचरा त्या पिशवीत गोळा करतात’’. विवेकने पहिल्यांदा ही संकल्पना राबवल्यावर त्याच्या या कामाची दखल पुणे महानगरपालिकेनेसुद्धा घेतली आहे. २८ डिसेंबर २०१९ या दिवशी पुणे महानगरपालिकेने विवेकच्या साहाय्याने प्लॉगेथॉन आयोजित केली. ज्यामध्ये संपूर्ण पुणे शहरातून एक लाख पाच हजार पुणेकर रस्त्यावर धावले. १९ हजार किलो प्लास्टिक आणि ३० हजार किलो कचरा या प्लॉगेथॉनमधून गोळा केला. आता ही चळवळ कोल्हापूर, नाशिकसारख्या शहरांमध्येसुद्धा लवकरच सुरू होणार आहे.

‘प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया’ राजगोपाळ वासुदेव यांचे नाव आपल्याला काही नवीन नाही. त्यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून रस्ते बनवले आहेत. आणि याच धर्तीवर काम केलं आहे बारावीत शिकणाऱ्या निधी कलाल या युवतीने. ‘हेरिटेज गर्ल्स स्कूल उदयपूर’च्या (राजस्थान) कॅम्पसमध्ये हा आविष्कार निधीने केला आहे. तिच्या या प्रयोगाबद्दल निधी म्हणाली, ‘‘प्लास्टिक आणि काही नॉन बायोडिग्रीडेबल वस्तूंचा वापर करत मी ऑक्टोबर २०१९ मध्ये हा रस्ता बनवला. या रस्त्याचे फायदे असे की या रस्त्याला खड्डे पडत नाहीत. हा रस्ता १०० टक्के इकोफ्रेंडली आहे. म्हणूनच आम्ही याला ‘ग्रीन पाथ’ हे नाव दिलं आहे. मी वर्तमानपत्रात खड्डय़ांमुळे जीव गेल्याची बातमी सतत वाचत होते. तिथेच मन हेलावलं होतं. केमिस्ट्रीचा प्रयोग करत असताना माझ्या मनात ही कल्पना आली. जी मी माझ्या प्राध्यापकांना सांगितली. त्यांना ती आवडली. त्यांनी ती प्राचार्याच्या पुढय़ात मांडली. प्राचार्यानी मला स्कूल कॅम्पसची काही जागा दिली. आणि त्याच जागेत मी हा रस्ता तयार केला’’. हा रस्ता बनवल्याबद्दल तिचं कौतुक भारत सरकारच्या परिवहन मंत्रालयानेसुद्धा प्रशस्तीपत्र देऊन केलं आहे.

कितीतरी नवनवीन संकल्पना-अभ्यास-संशोधनातून ही तरुणाई रोजची मळलेली वाट सोडून नवं काही निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेली दिसते. आपली आवड आणि कामाची सांगड घालत समाजोपयोगी करिअर उभी करणाऱ्या तरुणाईने निर्माण केलेली सकारात्मक ओळख इतरांसाठीही प्रेरणादायी अशी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2020 12:26 am

Web Title: article on national youth day abn 97
Next Stories
1 क्षितिजावरचे वारे : काउंटडाउंन सुरू झाले!
2 नाममहात्म्य
3 संशोधनमात्रे : काळाचे धागेदोरे
Just Now!
X