पी सायली

भटकंतीची व्याख्याच तरुणाईने बदलून टाकली आहे. जबाबदारीने करिअर घडवणारी ही पिढी त्या काही क्षणांमध्ये आपला नेहमीचा प्राधान्यक्रम उलटापालटा करून वेगळी वाट निवडते. स्वत:ला निसर्गाच्या सान्निध्यात, कधी शून्य शांततेत तर कधी माणसांच्या गर्दीत हरवण्यावर जोर देते. नेहमीची माणसं, कोलाहल, सोयीसुविधा सगळं दूर सारून नव्यात हरवण्याची आणि त्यातून स्वत:चंच नवं रूप धुंडाळण्याची त्यांची आस या भटकंतीला वेगळा अर्थ देते. खऱ्या अर्थाने स्वत:ला अंतर्बाह्य़ बदलवणारा तो ‘प्रवास’ ही त्यांची भटकंतीची नवी व्याख्या आहे.

‘बाईस तक पढाई, पच्चीस पे नौकरी, छब्बीस पे छोकरी, तीस पे बच्चे, साठ पे रिटायरमेंट और फिर मौत का इंतजार.. धत् ये ऐसी लाइफ थोडी जीना चाहता हूँ..’, असं म्हणणारा बनी अर्थात कबीर थापर म्हणजेच अभिनेता रणबीर कपूर काही वर्षांपूर्वी आपल्या भेटीला आला होता. रणबीर कपूरने साकारलेलं हे पात्र, त्याचा हा चित्रपट ‘यह जवानी है दीवानी’ म्हणजे खऱ्या अर्थाने एक मैलाचा दगड ठरला. चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीने जितकी उंची गाठली त्याहीपेक्षा या चित्रपटाने नव्या पिढीला मैत्री, नाती, करिअरकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. या दृष्टीने आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाशझोत टाकला. ती म्हणजे फिरण्याची सवय किंवा आवड. फिरा लोकहो.. आयुष्य फार लहान आहे. ‘यहाँ कल का किसे पता.. इसिलिये ए काफिर आज जी ले बेफिक्र होके.. मिलते है पल ये तकदीरवालोंको.. जोड इनसे नाता यहाँ कल का किसे पता..’ हा असाच अंदाज हल्ली प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यातून झळकतो. आणि याच अंदाजातून वेगवेगळ्या पद्धतीने भटकंती करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे..

गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाची वॉल स्क्रोल केली तरीही दहापैकी जवळपास आठएक पोस्ट या फिरण्याशी निगडित असतात. कोणी एकटं, कोणी प्रेम करणाऱ्या एखाद्या खास व्यक्तीबरोबर तर कोणी अनोळखी व्यक्तींसोबत कुठे ना कुठे भटकत असतात. ही भटकंती म्हणजे नुसतंच फिरणं नव्हे. तर आपल्या अंतर्मनाचा ठाव घेण्यासाठी, कोणाला तरी ओळखण्यासाठी, आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे याचा शोध घेऊन त्याविषयी आभार व्यक्त करणारी, गोष्टींचं महत्त्व जाणून घेणारी अशी ही भटकंती असते. भटकंतीची व्याख्याच तरुणाईने बदलून टाकली आहे. जबाबदारीने करिअर घडवणारी ही पिढी त्या काही क्षणांमध्ये आपला नेहमीचा प्राधान्यक्रम उलटापालटा करून वेगळी वाट निवडते. स्वत:ला निसर्गाच्या सान्निध्यात, कधी शून्य शांततेत तर कधी माणसांच्या गर्दीत हरवण्यावर जोर देते. नेहमीची माणसं, कोलाहल, सोयीसुविधा सगळं दूर सारून नव्यात हरवण्याची आणि त्यातून स्वत:चंच नवं रूप धुंडाळण्याची त्यांची आस या भटकंतीला वेगळा अर्थ देते. खऱ्या अर्थाने स्वत:ला अंतर्बाह्य़ बदलवणारा तो ‘प्रवास’ ही भटकंतीची नवी व्याख्या आहे.

बदलणारी जीवनशैली आणि मानसिकता याचे थेट पडसाद कोणत्या एका गोष्टीवर दिसत असतील तर ते म्हणजे आपल्या स्वत:वर. म्हणजे वयाच्या अमुक टप्प्यावर आल्यावर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी, तमुक टप्प्यावर लग्न, पुढे काय तर पगारातील अमुक एक रक्कम उतारवयासाठी साठवायची, कुटुंबाची जबाबदारी पार पाडायची. या साऱ्याला शह देत सध्याची पिढी ही बराच वास्तववादी विचार करते आहे. या विचारांमध्ये लग्न वगैरेपेक्षा पसंती दिली जातेय ती म्हणजे फिरण्याला. पैसे साठवणं किंवा गुंतवणूक करण्यापेक्षा त्या पैशांतीलच काही भाग हा विविध ठिकाणांना भेट देत एक व्यक्ती म्हणून अनुभवांच्या खात्यातीतल ठेवी वाढवणं कधीही उत्तम, असाच अंदाज तरुणाईत पाहायला मिळतो आहे. त्यांचा हा अंदाज त्यांच्याच आईवडिलांनाही स्वीकारार्ह वाटू लागला आहे, त्यांना घरातूनही तितकाच पाठिंबा मिळतो आहे हे विशेष!

करिअर, नोकरी या साऱ्या गोष्टींना महत्त्व दिलं जात असतानाच महत्त्व देण्याची ही परिभाषाच काहीशी बदलली आहे. यावर विचार करण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन अर्थातच वेगळा आहे, पण मुळात तो बदललेला दृष्टिकोनही कोणासाठी तरी आयुष्यभराचा एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो ही बाब नाकारता येत नाही. फिरणं व्यक्तीला समृद्ध बनवतं. फक्त एक व्यक्ती म्हणून नव्हे तर, जबाबदारी, भान, सतर्कता हे प्रत्येक व्यक्तीत असणारे पैलू आणखी उठावदार करण्यास मदतीचं ठरतं. त्यामुळे क्षणभराच्या या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची खंत व्यक्त करत न बसता मनमुराद भटका, असा संदेश या भटकंतीवेडय़ा पिढीचं प्रतिनिधित्व करणारं डॉनल्ड आणि डायना हे जोडपं देतं. सोशल मीडियावर त्यांची ओळख ‘नॉटी अ‍ॅण्ड कर्ली’ अशी आहे.

या दोघांची भटकंती ही अर्थातच एकमेकांवरच्या प्रेमातून सुरू झालेली आहे. प्रेम आपल्याला खूप काही करायची ताकद देतं, शिकवतं आणि अर्थात एक व्यक्ती म्हणूनही हेच प्रेम आपल्याला समृद्ध करतं. अशाच प्रेमाच्या नात्यावर डॉनल्ड आणि डायना यांनी त्यांच्या प्रवासाची सुरुवात केली. लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतरही त्यांच्या नात्यातील मैत्रीच वरचढ ठरली. त्या बळावर कॉर्पोरेट क्षेत्रातील कामं सांभाळून त्यांनी नेहमीच विविध ठिकाणी, खिशाला चाप न देता योग्य दरात फिरण्याचा छंद जोपासला. अर्थात इथे त्यांची प्रायॉरिटी होती ती म्हणजे फिरणं, वैवाहिक आयुष्यात समतोल राखणं, नोकरी सांभाळणं आणि कमीत कमी पैशांमध्ये सोयीस्कर प्रवास करणं. बस्स.. और चाहिये ही क्या..? असा सवाल ही जोडगोळी करते. आयुष्य एकदाच मिळतं आणि त्यातही इतका कमी वेळ प्रत्येकाच्याच हाताशी असतो. त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात तीन महिन्यांतून किंवा सहा महिन्यांतून एकदा तरी निदान या निसर्गाच्या आणखी जवळ जाण्याला आणि तणावग्रस्त आयुष्यातून काहीशी उसंत घेण्यासाठी फिरायला निघणं इज मस्ट, असंच हे दोघेही सांगतात.

भटकंतीतून ‘स्व’चा शोध घेऊ पाहणारी ही तरुणाई कुटुंबव्यवस्था नाकारत नाही किंवा आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक जबाबदाऱ्याही टाळत नाही आहे. बदल झाला आहे तो या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनात. एरवीही भटकंतीचे वेड जोपासणारा आणि सोशल मीडियावर ‘द माँक इन ब्लॅक’ नावाने वावरणारा विशाल भानुशाली हा तरुण या बदलत्या विचारांकडे लक्ष वेधतो. ‘असा एक वर्ग असतो ज्याला फक्त फिरायला आवडतं. तर एक वर्ग असा असतो, ज्याला नुसतं फिरण्याऐवजी अनुभवांमध्ये गुंतवणूक करायला आवडतं. भविष्यासाठी पैसे जमवणं, गुंतवणूक करणं हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतंच, पण मी एखाद्या महागडय़ा गोष्टीवर खर्च करण्याऐवजी विविध ठिकाणांना भेट देण्यास प्राधान्य देतो’, असं विशाल म्हणतो. प्रायॉरिटीचा विषय आला की लग्न आणि वैवाहिक आयुष्य या दोन गोष्टींवर अगदी घरच्यांकडून, मित्रपरिवाराकडूनही जोर टाकला जातोच, पण याचा विचार करायचा तर पाच हजार रुपयांमध्ये लग्न केलेली व्यक्तीही आनंदात राहतेच ना.. किंबहुना, अनेकदा गडगंज पैसा खर्च करून उभी राहिलेली नाती शेवटपर्यंत टिकतही नाहीत. त्यामुळे मी या साऱ्यापासून दूरच आहे. लग्नावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा मी विश्वभ्रमंतीला प्राधान्य देईन. हा माझा फंडा आहे, असं विशाल सांगतो.

वय आणि समाजाने घातलेल्या काही नियमांमागे धावताना अनेकदा आपण विसरून जातो की, प्राधान्य नेमकं कोणत्या गोष्टींना द्यायचं किंवा कोणत्या गोष्टींना नाही. अर्थात हा निर्णय सर्वस्वी त्या व्यक्तीचा असतो, पण खरंच काळ बदलतोय. प्रेमप्रकरणं, ब्रेकअप, नोकरीच्या ठिकाणी असणारा तणाव किंवा कोणा एकाच्या आयुष्याविषयी वाटणारं आकर्षण, कोणाच्या जीवनशैलीविषयी वाटणारं आकर्षण या साऱ्या गोष्टींमुळे प्राधान्य आणि आवडी बदलत आहेत. हा बदल कुठवर टिकेल ठाऊ क नाही. पण हा बदल नक्कीच सर्वाना हवाहवासा आहे. कोणी त्याला आपलंसं केलंय, कोणी आपलंसं करण्याच्या प्रयत्नात आहे, तर कोणी दुरून डोंगर साजरे असं म्हणत अलीकडच्या विश्वातून पलीकडल्या त्या बदलाला न्याहाळत आहेत. दृष्टी तीच आहे, फक्त दृष्टिकोन बदलतोय. वाटा मिळत आहेत तसा वाटसरू घडतोय..

धकाधकीच्या जीवनात तीन महिन्यांतून किंवा सहा महिन्यांतून एकदा तरी निदान या निसर्गाच्या आणखी जवळ जाण्याला आणि तणावग्रस्त आयुष्यातून काहीशी उसंत घेण्यासाठी फिरायला निघणं इज मस्ट..

– डॉनल्ड आणि डायना

भविष्यासाठी पैसे जमवणं, गुंतवणूक करणं हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतंच, पण मी एखाद्या महागडय़ा गोष्टीवर खर्च करण्याऐवजी विविध ठिकाणांना भेट देण्यास प्राधान्य देतो..

– विशाल भानुशाली

viva@expressindia.com