वैष्णवी वैद्य

दरवर्षी ५ जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धनाबद्दल नागरिक अधिकाधिक जागरूक कसे होतील या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता, समस्या व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व हे आजच्या काळात चिंताजनक विषय आहेत.

सजीव-निर्जीव गोष्टींच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण. तसेच पर्यावरणामध्ये जी सजीव घटकांची विविधता आढळते ती असते जैवविविधता! दरवर्षी पर्यावरण दिनाची एक संकल्पना निश्चित के ली जाते. या वर्षी पर्यावरणातील जैवविविधता ही संकल्पना ठरवण्यात आली असून कोलंबिया आणि जर्मनी या दोन देशांनी या दिवसाचे दायित्व घेतले आहे. कोलंबिया जैवविविधतेत ‘मेगाडायव्हर्स’ देश मानला जातो. कोलंबिया हा देश पक्षी, फुलपाखरांच्या प्रजातीत पहिल्या आणि उभयचरांच्या प्रजातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जैवविविधतेतसुद्धा तीन प्रकार असतात— आनुवंशिक, प्रजाती आणि पर्यावरणीय जैवविविधता. या निसर्ग श्रीमंतीचे अस्तित्व पर्यावरणाच्या जीवनचक्रासाठी अत्यावश्यक असते.

जैवविविधतेचे संवर्धन का करावे?

आपण शाळेपासून हे अभ्यासत आलो आहोत की, या जीवनचक्रातला एक जरी जीव नाहीसा झाला तरी संपूर्ण चक्र कोलमडते, कारण त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर प्रजातीही नष्ट होतात. आजच्या काळात औद्योगिकीकरणामुळे ज्या वेगात प्राणी-पक्षी आणि झाडांच्या प्रजाती नष्ट होत आहेत ते चिंताजनक आहे. जीवशास्त्र संवर्धनाचा अभ्यास आहे की, पुढच्या ५० वर्षांत पृथ्वीवरील अध्र्याहून अधिक जीव प्रजाती नष्ट होऊ शकतात. शास्त्रज्ञ पर्यावरणशास्त्रातील विविध प्रक्रिया, नवीन कल्पनांचे अध्ययन करीत आहेत. अस्तित्वात असलेल्या प्रजातींचे संवर्धन आणि नष्ट झालेल्या प्रजातींचे पुन:रुज्जीवन हे संशोधनाचे विषय बनले आहेत. या तर्कशुद्ध संशोधनात्मक संवर्धनाचे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत – मनुष्यनिर्मितींमुळे झालेली पर्यावरणाची हानी, पर्यावरणाचे संवर्धन हे पुढच्या पिढीचे नागरी कर्तव्य आहे, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक आणि अनुभवजन्य तत्त्वांची गरज आहे.

हवामान आणि तापमानातील विचित्र बदलसुद्धा या नष्ट होणाऱ्या प्रजातींचा परिणाम आहे. भारताचा ७०% महसूल हा शेतीवर अवलंबून आहे. विविध जमाती नष्ट झाल्यामुळे जमिनीची, मातीची गुणवत्ता कमी होते. ज्याचा परिणाम अर्थातच शेतीवर होताना दिसतोय. वाढते प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती, शिकार  अशा अनेक कारणांमुळे जैवविविधता नष्ट होते.

हे संवर्धन कसे होऊ शकते?

मानवी जीवन कितीही प्रगत झाले तरी ते निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाचे संवर्धन हे आपलेच संवर्धन आहे. ते कसे होऊ शकते यासाठीही शास्त्रज्ञ नवनवीन प्रयोग आणि संशोधन करत आहेत. ‘इन-सीटु’ किंवा नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन आणि ‘एक्स-सीटु’ म्हणजेच नष्ट होत जाणाऱ्या प्रजातींचे कृत्रिम अधिवासांमधून संवर्धन करणे हे दोन वेगळे अभ्यासाचे विषय आहेत. हे कृत्रिम अधिवास म्हणजे प्राणीसंग्रहालय, वन उद्याने, रोपवाटिका इत्यादी. तिथे या लोप पावत चाललेल्या प्रजातींचे प्रजनन केले जाते. या जिवांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे खाद्यपदार्थ, पाणी आणि राहायची जागा. तेसुद्धा इथे कमीत कमी त्रासदायक कसे होतील यावर भर दिला जातो. पक्षी-प्राण्यांचे संवर्धन करताना विविध झाडे आणि जलस्रोत यांचेही संवर्धन महत्त्वाचे असते. विविध प्रांतांत, परिसरांत असणारी झाडे-झुडपे, त्यांच्या बहरण्याचा ऋतू , त्या भोवतालची जैवविविधता, त्यांच्यावर होणारे परिणाम, झाडे देशी आहेत की विदेशी या सगळ्यांची माहिती संवर्धनासाठी महत्त्वाची असते. पण या गोष्टी सामान्य नागरिकांना समजणे अवघड असते. त्यांच्यामध्ये आणि खासकरून तरुणांमध्ये ही जनजागृती करण्यासाठी पर्यावरणप्रेमी संस्था कार्यरत असतात. त्यातलेच एक मोठे नाव म्हणजे ठाण्यातील ‘फर्न’ संस्था. ही संस्था ठाणे आणि मुंबई भागांतील झाडे, माळरान, जंगले आणि त्यामधील जैवविविधता यांचा अभ्यास लोकसहभागाद्वारे करीत असते जेणेकरून नागरिक जागरूक होतील.

जागतिक स्तरावर घरबसल्यासुद्धा लोकांना या संवर्धनविषयक कार्यक्रमात सहभाग घेता येईल असे एक परिचयाचे नाव म्हणजे ‘ई-बर्ड’. हा एक सिटिझन-सायन्स प्रोग्रॅम आहे. पक्ष्यांची माहिती असणारे कुठल्याही वयोगटाचे नागरिक यात भाग घेऊ शकतात. आपल्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांचे फोटो, नाव, ठिकाण, वेळ आणि त्यांचा क्रियाकल्प याची माहिती ई-बर्ड साइटवर पाठवावी. यामुळे जागतिक स्तरावर प्रचंड मोठय़ा प्रमाणात डेटाबेस जमा होतो आणि संशोधनास मदत होते. लोकांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी या साइटवर दरवर्षी नव्या थीम्स असतात आणि विजेत्यांना पारितोषिकही दिले जाते. पर्यावरण अभ्यासिक अपूर्वा पाटील सांगतात, ‘जैवविविधता म्हटले की डोळ्यांसमोर येतात ते पक्षी, प्राणी, झाडे आणि अगणित कीटक. यांच्या अस्तित्वासाठी असणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास. त्यातूनच त्यांना आपली निसर्गातली कामगिरी बजावता येते. या वर्षीच्या थीमला धरून बोलायचे झाले तर जैवविविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मानवाचे अस्तित्वसुद्धा यावरच अवलंबून आहे. संवर्धन कोणीही करू शकते त्यासाठी तुम्हाला शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरीक्षण करणे आणि नोंदी ठेवणे. हे असेल तर आपण कुठल्याही जीवाचे रक्षण करू शकतो. पूर्वीच्या काळी दिसणारे प्राणी पक्षी आता दुर्मीळ आहेत याचे कारण फक्त त्यांची कत्तल किंवा माणसाने केलेला अतिवापर नाही तर नष्ट होणारे त्यांचे नैसर्गिक अधिवास हे आहे. अगदी साधे उदाहरण म्हणजे शहरी भागांत चिमण्या दुर्मीळ झाल्या आहेत. घराबाहेर आपण पक्ष्यांसाठी जे खाद्य ठेवतो त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात खाद्य शोधण्याच्या वर्तनात बदल होतात. कबुतर असा एक पक्षी आहे जो घर बांधणे असो किंवा पक्ष्यांसाठी टाकलेले खाद्य असो, काहीच सोडत नाही म्हणून ते इतर पक्ष्यांवर वरचढ झाले आणि त्यांची संख्या वाढत गेली. निसर्गातील अन्नसाखळीचा तोल ढासळला की त्याचे परिणाम लगेच दिसून येतात.’

शहरी भागांत पक्ष्यांची घटत जाणारी गणना आणि त्याचा धोका यावर संशोधन करण्याचे काम ‘सलीम अली पक्षीविज्ञान आणि नैसर्गिक इतिहास’ संस्थेने हाती घेतले आहे. अपूर्वाने या संस्थेसाठी सुद्धा काम केले आहे. नेचर रॉक्स ही त्यांची कंपनी आहे जिथे त्या पर्यावरण अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. तरुणांसाठी विविध पर्यावरणविषयक संकल्पनांचे आयोजन त्या ‘सोमय्या सेंटर फॉर एक्सपेरिमेंटल लर्निग’द्वारे करतात.

पाण्यातली जैवविविधतासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. याविषयी संशोधन करणारी भारतातील नामवंत संस्था म्हणजे ‘भारतीय वन्यजीवन संस्थान’. विविध सागरी आणि गोडय़ा पाण्यातील जीवांचे रक्षण कसे करता येईल हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. गुजरातच्या समुद्री सीमेलगत आढळणाऱ्या समुद्री गायींचे अधिवास जपणे, त्यांना असणारा धोका कमी करणे यावर त्यांचे अनेक वर्षे संशोधन सुरू आहे. पाणघोडे, डॉल्फिन या जिवांचेही रक्षण कसे करता येईल हा अभ्यास सुरू आहे. महाराष्ट्र सागरी कासवांचे संवर्धन करण्याचे काम रत्नागिरीतील सह्यद्री निसर्ग मित्र संस्था, महाराष्ट्र वनविभाग यांच्या अथक प्रयत्नातून होत आहे. पुण्यातील ‘ओईकॉस’ नावाची संस्था वेगवेगळ्या प्रांतांतील अधिवास पुन:रुज्जीवित करण्याचे काम करते आहे.

आजची तरुण पिढी काळाच्या एक पाऊल पुढे आहे. म्हणून या संवर्धनाबद्दल त्यांच्यात जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. आज तरुण पर्यावरण अभ्यासक समोर येताना दिसतात ही सुखद बाब आहे, पण संशोधनाच्या पलीकडे जात ते कृतीत येण्याचीही आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत ‘जैवविविधता व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात येते. प्रत्येक परिसरातील जैविक संसाधने, औषधी गुणधर्म आणि इतर पारंपरिक उपयोग याविषयीची नोंद केली जाते. याला ‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ असेही म्हणतात.  याच्या मदतीने आपापल्या परिसरातील जैवविविधतेचे जरी संवर्धन आपण केले तरी या वैश्विक कार्याला थोडा हातभार लागू शकतो.

viva@expressindia.com