News Flash

‘मी’लेनिअल उवाच : परमिसन लेना चाहिए

संमती हा विषय फक्त स्त्रियांसाठी नसून पुरुषांसाठीही लागू होतो.

(संग्रहित छायाचित्र)

जीजिविषा

तुमच्या आयुष्यात अनेक क्षण येतील जेव्हा तुम्हाला कुणाला तरी तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे हे सांगावेसे वाटेल किंवा आधीच रिलेशनशिपमध्ये असल्यास पुढचे पाऊल उचलावेसे वाटेल. तेव्हा हे लक्षात ठेवा की आपल्या बरोबरच्या व्यक्तीची संमती आपण पदोपदी घेत आहोत ना? संमती हा विषय फक्त स्त्रियांसाठी नसून पुरुषांसाठीही लागू होतो.

प्रिय वाचक मित्र,

मोहसिना आणि फैजल प्रेमाच्या गप्पा मारायला एका तलावाकाठी भेटतात. मोहसिना त्याला तिचे आवडते रंग सांगते. आपल्याला दिसून येते की दोघांमध्येही जवळ येऊ बघण्याची इच्छा आहे. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत असताना, तिचे लक्ष नसताना फैजल हळूच त्याचा हात तिच्या हातावर ठेवतो. मोहसिना लगेच वळते आणि त्याला म्हणते, ‘काय करतोयस?’ फैजलची तत्क्षणी तत-पप होऊ लागते. मोहसिना पुढे त्याला विचारते – ‘ऐसे अच्छा थोडी लगता है, आपको परमिसन लेनी चाहिए ना?’ फैजलला काही कळत नाही. त्याला वाटलेलं की तिला हरकत नसावी, पण ती त्याला म्हणते की तुला असं वाटलं, म्हणजे तू गृहीत धरलंस. पण तू मला विचारलंस का? कुणाच्या घरात शिरताना आपण त्यांना विचारतो ना? का असंच घरात घुसतो? त्यावर फैजल अजिबात वाद न घालता, तिला न कोसता ‘सॉरी’ म्हणतो.

‘फटा पोस्टर निकला हिरो’ या सिनेमात विश्वास राव जे गाणं गातो, तेही आपल्याला माहितीच आहे – खाली पीली रोकने का नहीं, तेरा पीछा करूँ तो टोकने का नहीं. तू हे राइट मेरा, तू है डीलाइट मेरा, तेरा रस्ता रोकू तो चौकने का नहीं.’ किंवा ‘जोश’मधल्या शाहरुख खानला समजवायला ऐश्वर्या गाते ‘ये उसका स्टाइल होएंगा, होठों पे ना दिल में हाँ होइंगा’.

आजच्या पत्रात काय लिहावे हा विचार करत असताना माझ्या डोक्यात सतत या काही गमती सुरू होत्या आणि मला अचानक आजचा विषय सापडला –  कन्सेंट म्हणजे संमती – म्हणजे नो मीन्स नो.. आणि म्हणजेच उसकी ना / खामोशी में हाँ नहीं छुपी है हे समजणे. आपल्या समाजात लहानपणीच आपल्याकडून ‘नाही’ म्हणायचा अधिकार काढून घेतला जातो. कोणते तरी काका येतात आणि घरातल्या लहान मुलांना ‘पा’ किंवा ‘पि’ देणे हे आवश्यक होऊन जाते. कोणी तरी काकू येतात आणि आपल्याला नाचून किंवा गाऊन दाखवावे लागते. बघायला गेलं तर या अगदीच क्षुल्लक गोष्टी आहेत, पण अशाच छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून आपण नाही म्हणायचा अधिकार गमावतो. ही झाली एक बाजू.

दुसरी बाजू पूर्णपणे वेगळ्या टोकाची.

आपल्यापैकी अनेक जणांनी लाजाळूचे झाड कुठे न कुठे बघितले असेल. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते – इंग्रजीत या झाडाचे लाडाचे नाव आहे – ‘टच मी नॉट’ म्हणजे सरळ-स्पष्ट, मला हात लावू नका! पण मला एक जण दाखवा ज्याने ते झाड बघताच किमान ३ वेळा तरी त्याला हात लावला नसेल. माझ्या घरी मी स्वत: ते झाड लावले आहे आणि दिवसातून किमान दोनदा मी त्याच्या पानांशी खेळते. झाडांना बोलता आले असते तर माझ्या लाजाळूने नक्कीच मला, ‘परमिसन लेना चाहिए ना?’, असा डायलॉग मारला असता आणि कट्टीही घेतली असती. का वागत असू आपण असे? खरंतर कारण काहीही असो. हे वागणे चुकीचेच आहे हे मनावर कोरून घ्यायला हवे. तुमच्यापैकी अनेकजण टीनेज म्हणजे पौगंडावस्थेत असतील किंवा विशीत असतील. तुमच्या आयुष्यात अनेक क्षण येतील जेव्हा तुम्हाला कुणाला तरी तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे हे सांगावेसे वाटेल. किंवा आधीच रिलेशनशिपमध्ये असल्यास पुढचे पाऊल उचलावेसे वाटेल. तेव्हा हे लक्षात ठेवा की आपल्या बरोबरच्या व्यक्तीची संमती आपण पदोपदी घेत आहोत ना? संमती हा विषय फक्त स्त्रियांसाठी नसून पुरुषांसाठीही लागू होतो. त्याचबरोबर विषमलैंगिक बरोबर समलैंगिक नात्यांनाही लागू होतो. नाही म्हणायचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि हा ‘नाही’ म्हणजे नकार पचवायची क्षमताही प्रत्येकामध्ये हवीच हवी. कुणीही, म्हणजे अगदी कुणीही तुम्हाला तुमच्या संमतीशिवाय, जबरदस्ती करून किंवा अगदीच उथळ उदाहारण द्यायचं म्हटलं तर ब्रेकअपची भीती दाखवून काहीही करायला भाग पाडत असेल, मग ती व्यक्ती मुलगा असो अथवा मुलगी – त्या व्यक्तीशी संवाद साधा. त्या नात्याचा नीट विचार करा. आपले मित्र-मैत्रिणी त्यांच्या रिलेशनशिप्समध्ये काय करत आहेत याने दबावाखाली येऊ नका. प्रेम दबाव टाकत नाही, प्रेम समजून घेते. प्रेमात घाई नसते, प्रेमात संयम असतो. प्रेमात एकमेकांच्या कम्फर्ट आणि मर्यादेबद्दल आदर असतो आणि मर्यादा या व्यक्तिसापेक्ष असतात.

कदाचित तुम्हाला माझे विचार पटतील न पटतील, पण एक मैत्रीण म्हणून मी हे तुमच्याशी शेअर करते आहे. कोणत्याही नात्यामध्ये विश्वास महत्त्वाचा आहे. तो गमावू नका. रिक्षेच्या मीटरवर ‘डोन्ट टच मी’ लिहिलेले जर का आपल्याला समजत असेल तर एक व्यक्ती जेव्हा नाही म्हणते तेव्हा तिचा नकार स्पष्ट आहे हेही समजण्याइतपत शहाणे नक्कीच आहोत. तेव्हा नीट विचार करा आणि ‘ना तो है ही, शायद हाँ हो जाए’ हा फॉम्र्युला इकडे वापरू नका. (ज्यांनी पराठे खाल्ले त्यांनाच कळले, ज्यांना नाही कळले त्यांनी मागच्या शुक्रवारचे पत्र जरूर वाचा.)

ता.क. – वातावरण थोडे गंभीर झाले असेल म्हणून जाता जाता एक टीप – दोस्ती में ‘येस सॉरी’ और ‘येस थँक्यू’ मस्ट!

कळावे,

जीजि

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 4:07 am

Web Title: article on permission should be obtained abn 97
Next Stories
1 डाएट डायरी : चांगले आणि वाईट काबरेहायड्रेट्स
2 वस्त्रांकित : लावणीतील वस्त्रबोली
3 व्हिवा दिवा : रितिका साठे
Just Now!
X