03 August 2020

News Flash

अराऊंड द फॅशन : प्लस फॅशन

‘प्लस फॅशन’ ही अलीकडची गोष्ट असल्यासारखे भासवले जाते. मात्र या फॅशनने शतकपूर्ती केली असल्याचे फॅशन उद्योगाचा इतिहास सांगतो.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

मध्यंतरी एक सुंदर वाक्य वाचनात आलं, ‘फॅशनही फॅशनअसते जेव्हा सगळेच तिची खरेदी करतात, पण फॅशनजेव्हा कोणीच खरेदी करत नाही तेव्हा ती ठरते कला..’. हे वाक्य समर्पक ठरतं ते ‘प्लस साइज फॅशन’ला, कारण आज ‘प्लस फॅशन’कला म्हणून पुढे येते आहे की फक्त बाजारीकरणाची नवी गरज म्हणून.. यावर संभ्रम आहे. मुळात ‘प्लस फॅशन’ ही अलीकडची गोष्ट असल्यासारखे भासवले जाते. मात्र या फॅशनने शतकपूर्ती केली असल्याचे फॅशन उद्योगाचा इतिहास सांगतो.

कपडय़ांच्या बाबतीत आपल्या मनात एक हळुवार कोपरा असतो. आपल्याला उत्तमोत्तम चांगले कपडे घालता यावेत, अशी सगळ्यांचीच प्रांजळ इच्छा असते, पण.. ‘मला कपडे फिट होत नाहीत, मी काय करू?’, असं म्हणत स्वत:शीच झुंजणाऱ्यांची संख्या आपल्याकडे अधिक आहे. आपली शरीररचना इतर मुलींप्रमाणे स्लिमट्रीम नाही याची खात्री असल्यामुळे ‘आपण कधी घालणार असे कपडे?’ हा प्रश्न कायम सतावत राहतो. दहा वर्षांपूर्वी ‘प्लस साईज फॅशन’ ही संकल्पना काही घरोघरी ज्ञात नव्हती. किरकोळ लोकांनाच ती माहिती असावी. काही वर्षांपूर्वी मी कसे कपडे घालून बाहेर हिंडायचे हे मी ठरवणार, असा विचार आपल्याकडे सहज होत नसे. प्लस साइज असणं म्हणजेच कपडे जपून घालायला हवे, हे बंधनकारक होतं, किंबहुना आजही आहे. त्यामुळे ‘प्लस साइज’साठी स्वतंत्र फॅशनअसणं हा विचार तर लांबचाच होता. तरीही ही फॅशन आली आणि वेगाने जगभर रुजली. ग्लोबल फॅशनच्या इतिहासातला हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. ‘प्लस साइज फॅशन’जगभरात कशी-का आली? लोकप्रिय कशी झाली? तिथून ती भारतात कशी आली आणि पुढे या फॅशनची वाढ कशी असेल?, असे अनेक प्रश्न मनात उमटतात.

थोडं इतिहासात डोकावलं तर साधारणपणे एकोणीसशे साली स्त्रियांचे व्यवसाय हे होममेकरचे, नॅनीचे किंवा शिक्षिकेचे असायचे. त्याकाळी स्त्रिया नोकऱ्याही करत असत, पण त्या काळातील प्रिंटेड (वर्तमानपत्रातील) जाहिराती पाहिल्या तर फीमेल मॉडेल या कंबरेला अ‍ॅप्रन बांधून गुबगुबीत फ्रॉक घातलेल्या आणि केसांचा अंबाडा बांधलेल्या अशाच दिसतील. त्यातदेखील विविध शरीरयष्टीच्या मॉडेल्स होत्या. त्यानंतर थोडं पुढे म्हणजे ५०-६० च्या दशकापुढे गेलं तर चित्र पालटलेलं दिसेल. त्यावेळी सर्व स्तरातील स्त्रिया नोकरी करू लागल्या. स्वतंत्र झाल्या आणि जग फिरू लागल्या. जसजसं तंत्रज्ञान बदलत गेलं तशी फॅशनही बदलत गेली. फ्रॉक जाऊन तिथे जीन्स आली आणि असे अनेक छोटे-मोठे बदल झाले. बाजारपेठा विकसित होऊ  लागल्या आणि ‘आजची कमावती स्त्री’ म्हणून मॉडर्न कपडय़ातील मॉडेल्स जास्त झळकायला लागल्या. ऑफिस वूमन्सचं त्या प्रतिनिधित्व करू लागल्या. येथे ‘प्लस साईज मॉडेल्स’ दिसणं अशक्य झालं. आता याचा मध्यांक होता ‘प्लस साईज फॅशन’च्या जन्माचा. आपण कुठेतरी वगळले जात आहोत अशी भावना निर्माण झाली ती अमेरिकन कॉस्च्यूम डिझायनर लेना हिम्मेलस्टाइन हिच्या मनात. ‘प्लस साइज फॅशन’मागचा खरा चेहरा म्हणून तिची ओळख आहे. ‘लेन ब्रायन्ट’ या लेबलअंतर्गत प्लस साइज फॅशन आणली. लेना धाडसी आणि आत्मविश्वासू होती. ती खास गरोदर स्त्रियांसाठी कपडे शिवायची. ती जगातील पहिली मॅटर्निटी ड्रेस बनवणारी कॉस्च्यूम डिझायनर ठरली. तेव्हा ही गोष्ट कौतुकास्पद होती आणि त्यामुळेच तिचा आदरही सर्वत्र होता. फॅशन रिव्हॉल्यूशनमधला एक टप्पा येथून पुढे सरकायला लागला. तेव्हाच्या जाहिरातीही उल्लेखनीय ठरल्या. प्लस मॉडेल्स असणाऱ्या जाहिरातींवर ‘ऑल आर स्मार्ट अ‍ॅण्ड स्लिमिंग’ किंवा ‘ऑल आर लेस दॅन अवर सेलिंग प्राइज’, अशा स्लोगन्स होत्या. या ‘ऑल आर’मध्ये जाड आणि बारीक असा भेद न दर्शवता सर्व स्त्रिया छान दिसतात, असा विचार होता. जेणेकरून प्लस साईज मॉडेल्सनी घातलेले कपडे हे जाहिरातीच्या फलकावर लिहिलेल्या शब्दांवरून तरी प्लस साईज असलेल्या स्त्रिया कुठलीही शंकाकुशंका मनात न ठेवता निर्भिडपणे प्लस साइज कपडे विकत घेतील, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. पहिल्या महायुद्धाची साक्षीदार असलेल्या लेनाचं कर्तृत्व एवढं की तेव्हा तिने प्लस साईज फॅशन रेडीमेड क्लोदिंगमध्ये आणली. तिने २०,००० पेक्षा जास्त स्त्रियांचे कपडय़ांसाठी मोजमाप घेत, वर्गवारी केली आणि त्यापद्धतीने तिने प्लस साइज क्लोदिंग सुरू केले. तिने याच जोरावर १९२३ मध्ये ५ मिलियन डॉलरची उलाढाल केली. त्यावेळी तिला रोज १५ पोस्टकार्ड यायचे कपडय़ांची ऑर्डर देण्यासाठी. तेही त्या तणावाच्या परिस्थितीत.. त्यामुळे आजतागायत तिची ख्याती टिकून आहे. ‘प्लस साइज फॅशन’च्या इतिहासातली हे सुवर्णपान असलं तरी तिथून पुढे या फॅशनला सकारात्मक-नकारात्मकदोन्ही प्रकारच्या परिणामांना तोंड द्यावं लागलं.

मॉम जीन्स, हाय वेस्टेड जीन्स, ग्रज, वेटसिल, ओव्हररॉल्स आणि कर्वी आऊटफिट्स असे कपडे ९० च्या काळापासून येऊ  लागले, पण प्लस फॅशनला धड कोणी पुरस्कृत करत नव्हतं. त्याला‘मीनिंगलेस..आउटडेटेड’ अशा उपमा दिल्या गेल्या. आता इतक्या वर्षांनी पुन्हा या फॅशनला बाजारपेठ उपलब्ध झाली, कारण त्याचं जाहिरातीकरण खूप मोठय़ा प्रमाणात झालं. जाहिरातीमुळे कपडे खरेदीचं प्रमाण वाढलं, आणि परिणामी मोठमोठे ब्रॅण्डसही यात उतरले. जेव्हा प्लस साईज फॅशन ही ब्युटी कॅ म्पेनम्हणून ओळखली गेली तेव्हाच ती सामान्य माणसापर्यंत पोहोचली, कारण ब्युटी प्रॉडक्ट्स तर आज सर्व इन्कम ग्रुपमधील मुलं-मुली खरेदी करतात. इथे सेलिब्रिटींचेही चेहरे नव्हते तर सर्वसामान्य प्लस साईजच्या मुलींचे चेहरे प्रसिद्ध के ले. अर्थात, आजही ही फॅशन खरेदी तितकी सहजसोपी नाही. काहींच्या मते प्लस साइज फॅशनलवकर संपणार आहे, काहींना ती स्वस्त वाटते, तर ही फॅशनच महागडीच असली पाहिजे, असाही एक मतप्रवाह आहे. ही सगळी व्यावसायिक मूल्ये म्हणून छान वाटतात, पण या क्षेत्राचे भान व्यावसायिकांना कितपत आहे?, हा मुद्दा उपस्थित होतो. फॅशन व्यावसायिकांना‘प्लस साइज फॅशन’चे स्टोअर्स जगभरात उभे करायचे आहेत. आता तंत्रज्ञानाच्या गाडी बसूनच पुढे जायचं असं ठरवलं असल्याने मॅन्युफॅ क्चरिंग, लॉजिस्टिक आणि अवाढव्य खर्च याची काळजी हे व्यावसायिक घेऊ  शकतील का?, याबद्दलही शंका व्यक्त केली जाते.

एक गंमत अशीही आहे की, ‘प्लस साईज’ ही जास्त करून मध्यम बांध्याच्या शरीरयष्टीची ओळख होती. म्हणजे अगदी जाड नाही आणि अगदी बारीकही नाही. १९४०-५० मध्ये प्लस साईज यालाच म्हणत. आज ‘प्लस साईज’ ही अधिक वजनदार व्यक्तींची फॅशन मानली जाते. इतक्या वर्षांत ‘प्लस साईज’ फॅशनसाठी साईज नेमकी किती?, हा गोंधळ आजही जगभर कायम आहे. त्यामुळे आज जागतिक पातळीवर या फॅशनला लौकिकार्थाने काही विशेष महत्त्व प्राप्त होतंय असं तर कुठेच दिसत नाही. सुरू होण्याआधीच संपलेली फॅशनअसं तिला आजही संबोधलं जातं. १९४० ते १९८० पर्यंत ‘प्लस साईज फॅशन’चे काहीच संदर्भ सापडत नाहीत. त्यामुळे सध्या तरी ग्लोबलायझेशनच्या आशीर्वादाने बहरलेली अशी ही फॅशनचर्चेचा विषय ठरली असली, तरी ही ‘प्लस साईज फॅशन’चे टीकाकारच जास्त आहेत, हे सातत्याने जाणवत राहतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 5:10 am

Web Title: article on plus size fashion abn 97
Next Stories
1 टेकजागर : मित्र तोच जाणावा..
2 फिट-नट : चिराग पाटील
3 ओळख ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृतीची!
Just Now!
X